ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय दहावा -विभूतियोग


ज्ञानेश्वरी परिचय -अध्याय दहावा -विभूतियोग

ज्ञानदेवकृत श्रीगुरुमहिमान

गीतेच्या उत्तरखंडाला दहाव्या अध्यायापासून प्रारंभ झाला आहे.आतापर्यंत संपन्न झालेल्या अर्ध्या महायात्रेचा आनंद श्रीज्ञानदेवांच्या मनातून व शब्दातून या अध्यायाच्या आरंभी ओसंडला आहे. हेच या अध्यायारंभीच्या गुरूमहिमानाचे मुख्य निमित्त.
प्रथमच श्रीगुरुंना संस्कृतप्रचुर विशेषणांचा त्यांनी अभिषेक घडवला आहे. दहाव्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत याचे सौंदर्यपूर्ण प्रत्यंतर येते.
नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।
पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ १ ॥
स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारूपी कमळाचा विकास करणार्‍या व परावाणीचा विषय (स्वरूपस्थिती) या रमणीशी विलास करणार्‍या श्रीगुरो, तुम्हाला माझा नमस्कार असो.

"स्पष्ट बोध करण्यात कुशल", "विद्येचे कमळ उमलविणारा सूर्य", "प्रकृतीरुपी स्त्रीसह विलास करणारा","संसारांधकारास नाशणारा सूर्य", " अत्यंत तरुण तूर्येचे लालन करणारा", "अखिल जगत्पालक"," मंगल रत्नभांडार"," सज्जनांच्या वनातील चंदनवृक्ष" अशी एकाहून एक सौंदर्यमय, नादमय ,अर्थवाही विशेषणांची फुले त्यांनी गुरुचरणी वाहिली आहेत.
जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी ।जरी मुकेयातें अंगिकारी ।
तो वाचस्पतीशीं करी । प्रबंधुहोडा ॥ ८ ॥
महाराज आपले प्रेम हेच कोणी सरस्वती, तिने जर मुक्याचा अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पतीबरोबर देखील वादविवाद करील. तुम्हाला माझा नमस्कार असो .
हें असो दिठी जयावरी झळके।कीं हा पद्मकरु माथां पारुखे ।
तो जीवचि परि तुके । महेशेंसीं ॥ ९||
हे राहू द्या. ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडेल अथवा आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकावर स्थिर राहील, तो जीवच खरा, पण तो शिवाच्या बरोबरीचा होईल. तुम्हास माझा नमस्कार असो .
गुरूंच्या उदार वाणीच्या कृपाप्रसादाने नवरसरूप अमृतसागराचा ठाव घेता येतो.त्यांच्या स्नेहसरस्वतीने मुक्यालाही जरी अंगिकारले तरी तो वाचस्पतीशी ग्रंथरचनेतील पैजा जिंकेल. अशा अपार सत्तेच्या बळावर ही कठीण ग्रंथरचना सुलभ व सुंदर होऊन आपल्या मुखातून अवतरेल असे विनयी विधान करतानाच ज्ञानेश्वर पुढे त्याच्या पुष्ट्यर्थ असेही म्हणत आहे की श्रीगुरूंची प्रेमरसपूर्ण दृष्टी यांच्यावर झळकली किंवा त्यांचा कमलहस्त ज्याच्या मस्तकावर ठेवला तो सामान्य जीवही महेशाच्या योग्यतेचा होतो .गुरूंच्या या असल्या सामर्थ्यामुळे आपल्या हातून ही अद्भुत रचना झाली आहे असे ते या ओळीतून सांगत आहेत.
जे बोलणियाचे रानीं हिंडतां।नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता ।
परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ॥ २० ॥
या शब्दरूपी अरण्यामधे वाटेल तितके भटकले असताही त्या वाचारूप वृक्षास विचाररूप फळे आल्याची गोष्ट कानावर येत नाही. परंतु ती वाचाच माझ्याबाबतीत गुरूंनी विचारांचा कल्पवृक्ष केली.
ज्ञानदेवांनी येथे एका सुंदर उपमेचे उपयोजन केले आहे.शब्दांची सृष्टी हे जणू एक गहन अरण्य आहे, एक महान भ्रमजालआहे .त्यात कितीही भरकटले तरी सद्वस्तूशी आपली भेट होणे सर्वथैव अशक्य आहे.हे अशक्य ते शक्य केवळ श्री गुरुकृपेमुळे झालेले आहे .या गुरुकृपेमुळे त्यांची वाचा, त्यांची शब्दसृष्टी आपसूकच विवेकाची कल्पवल्लरी झालेली आहे. सत्यार्थाने सिद्ध झाली आहे.
श्रीगुरुंच्या सामर्थ्याचे असे निवेदन करून पुढे ज्ञानेश्वर विनयाने म्हणतात,"अशा गुरूंच्या वर्णनार्थ मी कोणते वाचाबळ आणू? कल्पतरूवर मोहर कुठला धरेल? क्षीरसागराला कशाचे जेवण द्यावे? चंदनाला कसला सुगंधी लेप लावावा? अमृताला कसले पक्वान्न द्यावे?गगनाहून उंच कसे जावे? येथे मौनातच नमस्कार करणे उचित. आपण प्रज्ञाबळाने काही करू पाहणे म्हणजे मोत्यावर अभ्रकाचा मुलामा देणे, किंवा सोन्यावर रुप्याचा लेप करणे." अशा अनेकविध विधानालंकारांनी ज्ञानदेवांनी गुरुमहिमान वर्णिले आहे.


ज्ञानेश्वरांनी सांगितलेली नऊ अध्यायांची अनुक्रमणिका आणि नवव्या अध्यायाचे महत्त्व -
ज्ञानदेवांनी अत्यंत साक्षेपाने आतापर्यंत ओलांडलेल्या अध्यायरूपी टप्प्यांचे वर्णन केले आहे .
ते म्हणतात," भाषणांच्या अरण्यात भरकटताना सुफल झालेल्या शब्दांची वार्ताही  कधी ऐकली नव्हती पण श्रीगुरुकृपेने तीच वाचा विवेकाची कल्पवल्लरी बनली. 
देहबुद्धीच आनंदभांडाराची ओवरी झाली."
ओवीप्रबंधात मांडलेला हा नऊ अध्यायांचा विस्तार असा आहे-
१.प्रथमामध्ये अर्जुनाचा विषाद वर्णून झाला.
२.दुसऱ्यामध्ये योगाचे विवरण आहे पण सांख्यबुद्धीला भेद दाखवूनच.
३.तिसऱ्यामध्ये केवळ कर्माची प्रतिष्ठा मांडली.
४.चौथ्यामध्ये तेच कर्म ज्ञानासहवर्तमान आले आहे.
५.पाचव्यामध्ये हे योगतत्त्वाचा गौरव आला.
६.तेच सहाव्यामध्ये आसनांच्या आधारे स्पष्ट केले.त्याचप्रमाणे योगस्थिती व योगभ्रष्टांची गती याचेही विश्लेषण याच अध्यायात आले. 
७.सातव्यामध्ये मायेतून सुटण्यासाठी जे चार प्रकारचे भक्त भगवंतांची आराधना करतात त्यांचे वर्णन आले आहे.
८.आठव्या अध्यायात सात प्रश्नांचे विवरण तसेच प्रयाणसमयासंबंधी ज्ञान आले.
९.येथपर्यंत सारांशाने अध्यायांचे टिपण करणाऱ्या ज्ञानेश्वरांनी नवव्या अध्यायाच्या वर्णनाच्या आरंभीच आपल्या प्रतिभाविलासी शैलीची उधळण केली आहे. असंख्यात शब्दब्रह्मातून जेवढा अभिप्राय निघतो तेवढा एका महाभारतात येतो. अखंड महाभारतात जे येते ते गीतारुपी श्रीकृष्णार्जुनसंवादात साररूपाने येते व गीतेच्या सातशे श्लोकांमध्ये जे ज्ञान येते ते सारांचेही साररूप ज्ञान एका नवव्या अध्यायात एकवटले आहे एवढा त्याचा प्रभाव आहे.

तिये आघवांचि जें महाभारतीं  तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं ।
आणि जो अभिप्रावो सातेंशतीं। तो एकलाचि नवमीं॥ ३१ ॥
आता भारताच्या अठरा पर्वांमधे जो काही अभिप्राय आहे तो कृष्णार्जुनांच्या संवादामधे गीतेत प्राप्त होतो. आणि गीतेच्या सातशे श्लोकात जो अभिप्राय आहे तो एकट्या नवव्या अध्यायात आहे.
या अध्यायाचा अर्थ सांगताना वेदही घाबरतात.गूळसाखरेच्या ढेपींची चव जशी एकवट असूनही ढेपीगणित भिन्न तसेच गीतेचे हे अध्याय, पण त्यातही नवव्याची गोडी अवीट .ती सांगण्यास समर्थता येणे ही ज्ञानेश्वरांवर झालेली प्रभूकृपा आहे. एका ऋषीने आपली छाटी तापवली, कोणी प्रतिसृष्टी निर्मिली,कुणी समुद्रावर पाषाण तारले,कुणी सूर्याला धरले,कुणी  सागर चुळीत सामावून घेतला.या अद्भुत चमत्कारांच्या तोडीचाच हा चमत्कार आहे. राम-रावणांच्या युद्धाला उपमा त्याचीच. दुसरी नाही. तसेच नवव्या अध्यायाचे आहे.
मूळ ग्रंथींचिया संस्कृता । वरि मर्‍हाठी नीट पढतां ।
अभिप्राय मानलिया उचिता ।कवण भूमी हें न चोजवे॥ ४३ ॥
मूळ संस्कृत गीताग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रीतीने दोन्हींचा अभिप्राय जर चांगला पटला तर कोणता मूळ ग्रंथ आहे हे कळणार नाही.
नवव्या अध्यायाचे महत्त्व सांगतानाच या टप्प्यावर आपल्या रचनेच्या सौंदर्याचे,महत्तेचेही सहर्ष निवेदन श्रीज्ञानेश्वरांनी येथे केले आहे. मूळ संस्कृतावरून अनुवादलेली ही भावार्थदीपिका एका स्वतंत्र रचनेइतकीच सौंदर्य व अर्थपूर्णतेत बलवत्तर आहे हे साक्षेपी वाचकांना सहज समजेल, असे अत्यंत वास्तव व विधान त्यांनी येथे केले आहे. ज्ञानेश्वरी व गीता यांची तुलना केली असता मूळ कोणते हे कळू नये इतपत ज्ञानेश्वरीची गुणवत्ता ,अर्थवत्ता स्वतंत्रपणे महान आहे. ही जणू गीतेला समांतर अशी एक महद्कृती आहे. ज्ञानेश्वरांच्या या विधानामागे या महाकृतीचे श्रेय श्रीगुरुला द्यायचा विनय दडलेला आहे हेही येथे अध्याहृत आहेच.
अशा प्रकारे नवव्या अध्यायाची आपण केलेल्या मराठी भावविस्तृत अनुवादात वर्धमान झालेली अनुपमेय श्रेष्ठता त्यांनी येथे सांगितली आहे.

श्रीहरींनी वर्णिलेले स्वतःचे ऐश्वर्य
"न मे विदु: सुरगणा:"या श्लोकापासून श्रीहरींनी स्वतःचा परमऐश्वर्ययुक्त विस्तार सांगितला आहे.जे जाणण्यास गेले असता वेद मुके झाले, मन व वायूची गतीही पांगळी पडली,रवीशशींचे तेज रात्र होण्याआधीच मावळले ,असे श्रीहरीचे ऐश्वर्य आहे. 
उदरातला गर्भ आईचे वय जाणत नाही. त्याचप्रमाणे देवांनाही परमेश्वराचे ज्ञानवर्तमान नाही.जलचरांना समुद्राचे मोजमाप करणे किंवा माशीला आकाश ओलांडणे अशक्‍य असते, त्याप्रमाणे महर्षींच्या ज्ञानालाही ईश्वराची वजनेमापे काढणे अशक्य आहे. तो कोण, केवढा ,कुणाचा कोण याचे निरूपण करताना कल्पांत झाले.
मी कवण पां केतुला । कवणाचा कैं जाहला ।
या निरुती करितां बोला । कल्प गेले ॥ ६७ ॥
मी कोण आहे, केवढा आहे, कोणापासून व केव्हा उत्पन्न झालो आहे, या गोष्टीचा निर्णय करण्यात किती एक युगे निघून गेली.
कां जे महर्षीं आणि या देवां । येरां भूतजातां सर्वां ।
मी आदि म्हणौनि पांडवा । अवघड जाणतां ॥ ६८ ॥
मोठाले ऋषी आणि देव यांना आणि दुसरे जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना मीच कारण आहे. म्हणून अर्जुना, मला जाणणे, त्यांना कठीण आहे. उतरणीवरचे पाणी डोंगर चढून जाऊ शकत नाही. झाड आपल्या मुळांना लागू शकत नाही तसेच ईश्वरापासून निर्माण झालेले जग त्याला ओळखू शकत नाही.बीजातील अंकुराने वटवृक्ष झाकता येईल का ?तरंगामध्ये सागर साठवता येईल का ?परमाणूमध्ये भूगोल सामावेल का ?
ऐसाही जरी विपायें । सांडूनि पुढीले पाये ।
सर्वेंद्रियांसि होये । पाठिमोरा जो ॥ ७२ ||
प्रवर्तलाही वेगीं बहुडे । देह सांडूनि मागलीकडे ।
महाभूतांचिया चढे । माथयावरी ॥ ७३ ॥
असा जरी मी जाणण्याला कठिण आहे, तरी कदाचित जो कोणी  सर्व इंद्रियांकडे पाठमोरा होतो (वृत्ती अंतर्मुख करतो),
समजा चुकून देहभावनेकडे जरी त्याची प्रवृत्ती झाली तरी तेथून वेगाने माघारी फिरतो, स्थूल, सूक्ष्म व कारण हे देहकोश मागे टाकून पंचमहाभूतांच्याही माथ्यावर जो चढतो (पंचमहाभूतांचा निरास करतो.) -
- अशा ज्ञानमय मनुष्याला मात्र ईश्वराच्या ऐश्वर्याची जाणीव असते. पण असे अपवाद म्हणजे मनुष्यांमधले परमेश्वरी अंशच.

ईश्वराचा भावरूप प्रभाव

सारी जीवसृष्टी ईश्वराच्या ज्या भावरूप प्रभावात गुरफटलेली असते ते भाव असे आहेत- पहिल्याप्रथम बुद्धी, मग निस्सीम ज्ञान, मोहाचा अभाव ,सहनशीलता, क्षमा, सत्य, शम ,दम,भय, निर्भयता,अहिंसा ,समता ,संतोष व तप, दान, कीर्ती व अपकीर्ती हे भाव प्राणीमात्रांच्या ठायी ईश्वरामुळेच निर्माण होतात.
सृष्टीच्या व्यापारासाठी ईश्वराने आपल्या मनातून संकल्पाने कश्यप आदि सप्तर्षी स्वयंभू असे मुख्य चार मनू हे सर्व निर्माण केले.पुढे यांच्यापासून अनेक राजर्षी लोकपाल निर्माण झाले. प्रजा विस्तारली,पण मूळ एकच .श्रीईश्वर. त्याचाच विस्तार विश्वरूपाने फोफावला.
यालागीं सुभद्रापती । हे भाव इया माझिया विभूती ।
आणि यांचिया व्याप्ती । व्यापिलें जग ॥ १०४ ॥
"अर्जुना, म्हणून वर सांगितलेले हे बुद्ध्यादिक विकार ह्या माझ्या विभूति आहेत. आणि ह्यांच्या योगाने हे सर्व जग व्यापून राहिले आहे.
म्हणौनि गा यापरी । ब्रह्मादि पिपीलिकावरी ।
मीवांचूनि दुसरी । गोठी नाहीं ॥ १०५ ॥
म्हणून अर्जुना, याप्रमाणे ब्रह्मदेवापासून प्रारंभ करून शेवटी मुंगीपर्यंत माझ्यावाचून येथे दुसरी गोष्टच नाही!
जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत ।
हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥ ११८ ॥
जो जो प्राणी दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावे. हा माझा भक्तियोग आहे असे निश्चित समज."

- आपला विभूतीविस्तार सांगण्याआधीच श्रीभगवंत येथे अर्जुनाला खऱ्या भक्तियोगाचा अर्थ विशद करून सांगत आहेत. भगवंतांशिवाय या सृष्टीमध्ये दुसरे काहीच नाही.त्याच्या विभूती जाणून घेणे महत्त्वाचे असेलही, पण भेटणाऱ्या प्रत्येक प्राणीमात्रात  त्याचे रूप पाहायला हे खरे विभूतीदर्शन .यातच खरा भक्तियोग सामावलेला आहे. साध्या वाटणार्‍या परंतु आचरणात आणण्यास अत्यंत कठीण अशा या ओवीत श्रीज्ञानेश्वरांना प्रिय असा चिद्विलासवाद सामावलेला आहे .सृष्टी व भगवंतांची फाळणी न करता त्यांच्या या निर्मितीतूनच त्यांचे दर्शन घेणे हा विचार अध्यात्माला जीवनापासून वेगळे करणाऱ्या पूर्वसुरींच्या विचारापेक्षा खूपच वेगळा आहे .वारकरी पंथाच्या अध्यात्मिक समतेचे बीज या ओवीत सापडते.
असा साक्षात्कार झालेले महानुभाव एकमेकांना भेटतात तेव्हा तो आनंदसोहळा अनुपमेय असा असतो. ईश्वरप्रेमाने मत्त झालेले दोन महान भक्त जेव्हा एकत्र येतात तेव्हाच्या त्यांच्या भावस्थितीचे एक अतिरम्य चित्र ज्ञानदेव खालील ओवीत रेखाटतात. एकरसत्व म्हणजे काय हे या ओवीतील सरोवरांच्या उपमेतून इतके स्पष्ट झाले आहे की भगवद्भक्तांमधले "मैत्र जीवांचे" कोणत्या श्रेणीचे असेल याची स्पष्ट कल्पना यावी.
जैशीं जवळीकेंचीं सरोवरें ।उचंबळलिया कालवती परस्परें ।
मग तरंगासि धवळारें । तरंगचि होती ॥ १२१ ॥
"ज्याप्रमाणे जवळ असणारी दोन सरोवरे पावसाळ्यात ओसंडून वाहिली असता त्यांचे पाणी उसळून एकमेकात मिसळते ,मग  अशा स्थितीत कोणता तरंग कोणत्या सरोवराचा हे ओळखणे कठीण असते कारण दोघांचेही तरंग जणू परस्परांच्या घरी राहावयास आलेले असतात.
तैसी येरयेरांचिये मिळणी । पडत आनंदकल्लोळांची वेणी ।
तेथ बोध बोधाचीं लेणीं । बोधेंचि मिरवी ॥ १२२ ॥
त्याप्रमाणे भक्तांना भक्त मिळाले असता आनंदाच्या लाटांची वेणी गुंफली जाते, अशा स्थितीत बोध बोधानेच बोधाचेच अलंकार मिरवतो."-
अशा रीतीने श्रीहरीने स्वस्वरूपाबद्दल व ऐश्वर्याबद्दल,अमितविस्ताराबद्दल आणि तद्रूप झालेल्या भक्तांबद्दल येथे निवेदन केले आहे.

अर्जुनाचा विभूतीविषयक प्रश्न
प्रत्यक्ष श्रीहरीच्या तोंडूनच त्यांचे आत्मप्रभावी निवेदन ऐकून अर्जुन कृतार्थ झाला. भगवंतांच्या विभूतीविस्ताराबद्दल जाणून घेण्याची त्याला तीव्र इच्छा झाली. पण त्याआधी श्रीईश्वराची स्तुती गाण्याची त्याहूनही तीव्रतर प्रेरणा झाली.
हां हो जी अवधारा । भला केरु फेडिला संसारा ।
जाहलों जननीजठरजोहरा- । वेगळा प्रभू ॥ १४५ ॥
अहो महाराज ऐका. (माझा) जन्ममरणरूप कचरा तुम्ही चांगला नाहीसा केला. यामुळे देवा, मी आईच्या पोटातील अग्निकुंडापासून मुक्त झालो.
या प्रभुकृपेचा प्रसाद असा आहे की अर्जुनाच्या दृष्टीतील संसाररूप  केरकचरा जाऊन त्याला निर्मळ सत्याचे ज्ञान झाले. आईच्या उदरात शिजून निघण्याच्या जन्मक्रमातूनही त्याची सुटका झाली,असे त्याने येथे म्हटलेले आहे. अर्थात भगवंतांची उक्ती व त्यामागे उचंबळणारे अर्जुनाविषयीचे त्यांचे प्रेम यातून अर्जुनाचा मोक्षमार्ग खुला झाला आहे असा त्याचा अभिप्राय आहे.

अर्जुन पुढे  म्हणाला," हे परब्रह्मा,या महाभूतांना तू विश्रांतीस्थान आहेस. तू तिन्ही देवांचेही परमदैवत, तू पंचविसावा पुरुष, प्रकृतीभावापलीकडील दिव्य आहेस. जन्मधर्मात न सापडणारा तू अनादिसिद्ध स्वामी .या काळयंत्राचा सूत्रधार .जीवकळेची आधारदेवता ,ब्रह्मांडकमंडलू धारण करणारा तो तूच. आजवर ऋषींकडून बरेच ऐकले, पण खऱ्या अर्थांना पारखा होतो. प्रत्यक्ष नारदाचे गायन ऐकले पण खरा अर्थ सोडून गीतसुखातच रमलो. आंधळ्यांच्या गावी सूर्योदय झाला तर ते कोवळ्या उन्हाची ऊब घेतील पण प्रकाश कसा पाहतील? असित-देवल आदि महर्षींकडूनही मी तुझ्याबद्दल ऐकले, पण विषयविषाने कडू पडलेल्या माझ्या बुद्धीला तुझ्या मधुर परमार्थाच्या गोष्टीही कडूच वाटल्या.  प्रत्यक्ष व्यासदेवांकडून तुझे चरित्र ऐकले,पण अंधारात चिंतामणी पाहण्यासारखी गत झाली. रत्नांच्या त्या खाणींचा प्रकाशक असा तू, त्या खाणी तुझ्याविना व्यर्थच ठरल्या. गुरुकृपेशिवाय अध्ययन केलेले सर्व व्यर्थ होते .माळ्याने जिवापाड कष्टाने शिंपलेली बाग वसंतागमीच  फळाला यावी, विषमज्वराचा जोर ओसरल्यावरच मधुर पदार्थांची माधुरी जाणवावी,तसेच माझे झाले. एरवी आकाशाचे मोठेपण आकाशानेच जाणावे, पृथ्वीचे वजन तिचे तिलाच ठाऊक असावे तसेच परमेश्वराच्या शक्तीला जाणणारा त्याचा तोच.
जी तुझिया विभूती आघविया|परि व्यापिती शक्ति दिव्या जिया ।
तिया आपुलिया दावाविया । आपण मज ॥ १८५ ॥
महाराज, सर्व विभूती आपल्याच आहेत. परंतु दिव्य शक्तीने व्याप्त असलेल्या अशा ज्या आपल्या विभूती आहेत त्या आपण मला दाखवाव्यात.
जिहीं विभूतीं ययां समस्तां।लोकांतें व्यापूनि आहासी अनंता ।
तिया प्रधाना नामांकिता । प्रगटा करीं ॥ १८६ ॥
कृष्णा, ज्या विभूतींनी सर्व लोकांस व्यापून टाकलेले आहे, त्या मुख्य-मुख्य व नामांकित विभूती सांगाव्यात.
- तरीही हे प्रभो! मी आपल्याला कसे ओळखावे? आपले चिंतन कसे करावे? तुम्ही आपले भाव जसे आता स्पष्ट केले तसेच आपला विभूतीविस्तारही सांगावा."
अशाप्रकारे अर्जुनाने विभूतींविषयी प्रश्न केला.

श्रीहरीच्या ठळक पन्नास विभूतींचे वर्णन -

श्रीहरीच्या अनंत विभूतींपैकी पंच्याहत्तर या अध्यायात येतात.त्यातील ठळक पन्नास या विभूती या अशा आहेत-

- या भूतमात्रांच्या ठायी आत्मा, आदित्यांमध्ये विष्णू ,प्रभावंतांमध्ये सूर्य, नक्षत्रांमध्ये चंद्र ,वेदांमध्ये सामवेद,देवांमध्ये महेंद्र, इंद्रियांमध्ये मन, रुद्रांमध्ये शंकर, यक्षगणांमध्ये कुबेर, वसूंमध्ये पावक, शिखरांमध्ये मेरूपर्वत, पुरोहितांमध्ये बृहस्पती, सेनानींमध्ये स्कंद ,महर्षींमध्ये भृगू, जलाशयांमध्ये समुद्र, वाणीमध्ये सत्यांकितअक्षरे ,यज्ञांमध्ये जपयज्ञ,स्थावरांमध्ये हिमालय पर्वत, वृक्षांमध्ये अश्वत्थ,देवर्षींमध्ये नारद, सिद्धांमध्ये कपिलाचार्य, घोड्यामध्ये उच्चै:श्रवा ,गजांमध्ये ऐरावत, पुरुषांमध्ये राजा, हत्यारांमध्ये वज्र, धेनूंमध्ये कामधेनू,जलचरांमध्ये वरूण, नियम करणाऱ्यांमध्ये यमधर्म, दैत्यकुळात प्रल्हाद, श्वापदांमध्ये सिंह ,पक्ष्यांमध्ये गरुड, वेगवंतांमध्ये पवन, प्रवाहांमध्ये गंगा, विद्यांमध्ये अध्यात्मविद्या,अक्षरांमध्ये अकार,समासांमध्ये द्वंद्व, आकाश सामावून घेणारा अपार काळ ,सर्व हरून घेणाऱ्यांमध्ये मृत्यू ,स्त्रियांमध्ये कीर्ती, संपत्ती, वाचा ,स्मृती, स्वहितकारक बुद्धी ,धृती व क्षमा अशा सप्तविभूती ,महिन्यांमध्ये मार्गशीर्ष, छंदांमध्ये गायत्री छंद ,ऋतूंमध्ये वसंतऋतु ,यादवांमध्ये श्रीकृष्ण, पांडवांमध्ये अर्जुन, मुनींमध्ये व्यासमुनी, गूढांमध्ये मौन ,कपटांमध्ये द्यूत, शस्त्रधार्‍यांमध्ये श्रीराम, शासन करणार्‍यांमध्ये दंड व सारासार विवेक करणार्‍यांमध्ये नीतिशास्त्र अशा श्रीईश्वराच्या पन्नास ठळक विभूती सांगता येतील.

विभूतीयोगाचा भगवंतानी  आणि ज्ञानेश्वरांनी केलेला समारोप

श्रीज्ञानेश्वर म्हणतात," अशा प्रकारे अनेक विभूतींचे वर्णन करून श्रीभगवंतांनी अर्जुनाला समजावले की पर्जन्याच्या धारांचा हिशेब ठेवता येणार नाही की पृथ्वीवरील तृणांकुराचा शेवट होणार नाही. भगवंतांशिवाय चराचर सृष्टीत काहीच नाही. महोदधीवरील तरंगांप्रमाणे या विभूती आहेत. त्यातील पंच्याहत्तर विभूतींचा या अध्यायात उल्लेख आहे, इतकेच. भूतमात्रांमध्ये बीजरूप ईश्वरच असल्याने अखिल वस्तुजातात त्याचे स्वरूप पहावे .
ऐशियाही सातपांच प्रधाना । विभूती सांगितलिया तुज अर्जुना ।
तो हा उद्देशु जो गा मना । आहाच गमला ॥ ३०२ ॥
माझ्या मुख्य विभूतींना पार नाही असे जरी आहे, तरी तुझ्या विचारण्यावरून आम्ही तुला सात पाच (पंच्याहत्तर) आमच्या मुख्य विभूती सांगितल्या. पण ते आमचे जे थोडक्यात विभूती सांगणे ते अर्जुना, आमच्या मनाला व्यर्थ वाटले.
येरां विभूतिविस्तारांसि कांहीं । एथ सर्वथा लेख नाहीं ।
म्हणौनि परिससीं तूं काई । आम्हीं सांगों किती ॥ ३०३ ॥
बाकीच्या आमच्या विभूती-विस्ताराला येथे मुळीच मर्यादा नाही.म्हणून आम्ही सांगणार किती व तू ऐकणार काय ?
जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया ठाया ।
ते ते जाण धनंजया । विभूति माझी ॥ ३०७ ॥
अर्जुना, ज्या ज्या (प्राण्याच्या) ठिकाणी ऐश्वर्य आणि दया ही दोन्ही रहावयास आलेली असतील, तो तो प्राणी माझी विभूती आहे असे समज.
पण त्यातूनही जिथे जिथे संपत्ती व दया एकत्र वस्ती करताना दिसतात तिथे ईश्वराचा अंश नक्कीच असतो अशी एक खूण त्यांनी सांगितलेली आहे.

शेवटी,भगवंत अर्जुनाला सांगतात,” सामान्य व विशेष अशी भेदवृत्ती मनात न आणता ईश्वराच्या एका अंशानेच हे सारे जग व्यापले आहे हे समजून घ्यावे. याकरता आता भेदभावना टाकून ऐक्यदृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखे भज.”
आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे ।
यालागीं भेदू सांडूनि सरिसें । साम्यें भज ॥ ३१७ ॥

अशाप्रकारे या आकलनासहित या अध्यायाचा समारोप भगवंतांनी केला आहे. 

मात्र ईश्वराच्या विभूतीआकलनाने आसावलेला अर्जुन आता त्याच्या प्रत्यक्ष विश्वरूपदर्शनाचा हट्ट  धरणार आहे हे ज्ञानदेवांना या अध्यायान्तीच जाणवू लागले आहे.
म्हणौनि विश्वरूप पुसावयालागीं । पार्थ रिगता होईल कवणें भंगीं ।
तें सांगेन पुढिलिये प्रसंगीं । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥ ३३५ ॥
म्हणून ‘मला विश्वरूप दाखवा’ हे श्रीकृष्णास विचारावयास अर्जुन कोणत्या पद्धतीने सरसावेल ते मी पुढल्या प्रसंगी सांगेन. असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.
या उत्कंठावर्धक वातावरणात विभूतीयोगाचा समारोप झाला आहे.

भारती बिर्जे-डिग्गीकर

Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –