ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय आठवा -अक्षरब्रह्म योग

 ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय आठवा -अक्षरब्रह्म योग


आठव्या अध्यायाच्या सुरुवातीस ब्रह्म ,अध्यात्म, कर्म आदि विषयांवर अर्जुनाचे सात प्रश्न आणि श्री भगवंतांनी त्यांना दिलेली उत्तरे आहेत. भक्तीयोगाचा विषय येथे चर्चिला गेला आहे .प्रयाणकाळ आणि तदनंतरचे शुक्ल आणि कृष्णमार्ग या गूढ विषयांच्या चर्चेने हा अध्याय गहनगंभीर अशा स्वरूपाचा झालेला आहे.

अर्जुनाचे सात प्रश्न

आठव्या अध्यायाच्या सुरुवातीसच अर्जुनाने श्री भगवंताला विचारलेले सात प्रश्न असे आहेत-
1.ब्रह्म म्हणजे काय?
2.कर्म हे कशाचे नाव आहे?
3.अध्यात्म कशाला म्हणतात?
४.अधिभूत कसे असते?
५.अधिदैवत कोण असते?
६.अधियज्ञ तो कोणता?
७.प्रयाणकाळी म्हणजे अंतकाळी, हे मधुसूदना, तुला कसे जाणावे?
अशाप्रकारे सातव्या अध्यायाच्या अखेरीस ईश्वराने उल्लेख केलेल्या गहन संकल्पनांचा रोकडा अर्थ अर्जुनाने येथे त्याला विचारलेला आहे.

श्रीहरीने या प्रश्नांची दिलेली उत्तरे

1.ब्रह्म - या सच्छिद्र शरीरापासून सर्वत्र ओथंबले असूनही जे गळतही नाही, शून्याहूनही सूक्ष्म व आकाशाच्या पदरातूनही गाळून घ्यावे इतके विरळ, असे तत्त्व ते ब्रह्म.
एर्‍हवीं सपूरपण तयाचें पहावें । तरी शून्यचि नव्हे स्वभावें ।
वरी गगनाचेनि पालवें । गाळूनि घेतलें ॥ १६ ॥
एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेले तर ते शून्यच वाटेल पण ते स्वभावाने शून्य नाही. (कारण ते मूळचे सत् आहे). शिवाय ते इतके सूक्ष्म आहे की सूक्ष्मात सूक्ष्म जे आकाश त्याच्या पदरातून ते गाळून घेतले आहे ॥
जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे ।
हालवलेंहि न गळे । तें परब्रह्म ॥ १७ ॥
जे इतकेही सूक्ष्म आहे, परंतु झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हलवले तरी गाळले जात नाही. ते परब्रह्म होय. ॥

२.अध्यात्म -आकार प्राप्त झाला म्हणून जन्मत नाही, आणि आकार लोपला म्हणून नाशत नाही अशी जी आपल्या आत्म्याची सहजस्थिती, जी ब्रह्माची नित्यता धारण करते तीच अध्यात्म .
आणि आकाराचेनि जालेपणें । जन्मधर्मातें नेणें ।
आकारलोपीं निमणें । नाहीं कहीं ॥ १८ ॥
आणि आकारवान पदार्थांच्या उत्पत्तीबरोबर जे जन्मरूपी विकाराला जणात नाही व आकारवान पदार्थ नाहीसे झाल्यावर जे केव्हाही नाश पावत नाही ॥
ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।
तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ॥ १९ ॥
अर्जुना याप्रमाणे आपल्या सहज स्थितीने असणार्‍या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वास अध्यात्म असे नाव आहे. ॥

३. कर्म- या निर्विकल्पतेतच प्रकृती अहंकार आदिंच्या योगाने आदिसंकल्पाचा अंकुर फुटतो. ब्रम्हांडगोलांची बीजधारणा होते. मग जीवसृष्टीच्या विकास विनाशाची गणतीच करता येत नाही. या अनेकत्वात फक्त परब्रह्म भरलेले असते. कर्ता कोण ते कळत नाही, व कारणही काही दिसत नाही असा निराकाराचा जो आकारपसारा, विस्तार  त्याचे नाव कर्म .
म्हणौनि कर्ता मुदल न दिसे । आणि सेखीं कारणहीं कांहीं नसे ।
माजीं कार्यचि आपैसें । वाढों लागे ॥ २८ ॥
म्हणून मुळात याचा कर्ता कोणी दिसत नसून शेवटी याचे कारणही काही नाही व मध्ये कार्यच आपोआप वाढावयास लागले आहे.
ऐसा करितेनवीण गोचरु । अव्यक्तीं हा आकारु ।
निपजे जो व्यापारु । तया नाम कर्म ॥ २९ ॥
याप्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी  हा भासमान होणारा आकार उत्पन्न होतो असा जो व्यापार त्याला ‘कर्म असे नाव आहे. 

४.अधिभूत -मेघाप्रमाणे निर्माण होऊन हरपून जाणारे, पंचमहाभूतांचा मेळावाच म्हणता येईल असे, भूतमात्रांच्या आश्रयाने प्रकटणारे, ज्याचे अस्तित्व मिथ्या व ज्याचा विनाश हेच सत्य ,ते अधिभूत होय.
तैसें असतेपण आहाच । नाहीं होईजे हें साच ।
जयातें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां ॥ ३१ ॥
त्याप्रमाणे ज्याचे असतेपण उगीच वरवर असते, व न होणे हेच ज्याचे खरे स्वरूप आहे, आणि ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन व्यक्त दशेला आणतात.
भूतांतें अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगें तरी दिसे ।
जें वियोगवेळे भ्रंशें । नामरूपादिक ॥ ३२ ॥
जे पंचमहाभूतांचा आश्रय करून असते, आणि पंचमहाभूतांचा संयोग (पंचीकरण) झाला तरच जे दिसते, आणि पंचमहाभूतांचा वियोग झाला असता ते नामरूपात्मक शरीर नाशाला पावते.
५.-अधिदैवत -प्रकृतीने उत्पन्न केलेल्या या विलासाचा उपभोक्ता ,बुद्धीचा द्रष्टा, इंद्रियांचा अधिपती, देहाच्या अंती मनोरथांची पाखरे जेथे निजावयास परततात तो वृक्ष, जो अहंकाररुपी निद्रेत भ्रमणारा परमात्माच, म्हणून स्वभावधर्मानुसार जीवदशेला पोहोचलेला तो अधिदैवत पुरुष होय.
जो परमात्माचि परी दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा ।
म्हणौनि स्वप्नीचिया वोरबारा । संतोषें शिणे ॥ ३५ ॥
जो वास्तविक परमात्माच आहे पण जो दुसरा (वेगळा) झाला. कारण की ज्यास अहंकाररूपी झोप येऊन (द्वैतभासात्मक) स्वप्नाच्या व्यवहाराने जो संतोष पावतो व कष्टी होतो,
जीव येणें नांवें । जयातें आळविजे स्वभावें ।
तें अधिदैवत जाणावें । पंचायतनींचें ॥ ३६ ॥
ज्याला जीव या नावाने स्वभावत: बोलतात, त्याला पंचभूतात्मक शरीररूपी घरातील अधिदैव समजावे.

६.अधियज्ञआता या शरीरग्रामात शरीरभावाचा उपशम करणारा अधियज्ञ तो मी (श्रीभगवंत) असे जाणावे.
आतां इयेचि शरीरग्रामीं । जो शरीरभावातें उपशमी ।
तो अधियज्ञु एथ गा मी । पंडुकुमरा ॥ ३७ ॥
आता याच शरीररूपी गावामधे जो शरीरभावाला (देहाहंकारादिकांना) नाहीसे करतो तो शरीरातील अधियज्ञ, अर्जुना मी आहे. ॥

७.प्रयाणकाळ- जिवंतपणी ज्याचा ध्यास धरावा, तेच प्रयाणकाळी वृद्धिंगत होते हे जाणून सदासर्वकाळ माझे स्मरण कर म्हणजे मरणकाळी मजमध्ये विलीन होशील असा नि:संशय निर्वाळा अर्जुनाच्या शेवटच्या प्रश्नाला उत्तर म्हणून  भगवंताने दिलेला आहे.
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे ।
तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥
याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते. ॥
आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे ।
म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥
आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो, असे आहे म्हणून तू नेहमी माझेच स्मरण कर. ॥

ज्ञानदेव म्हणतात,"वर उल्लेखिलेल्या सात गहन संज्ञांचा अर्थ अर्जुनाने भगवंतास विचारला असला, तरी तो श्रीकृष्णाचा परमआप्त, म्हणजे एका अर्थी कामधेनूचे कल्पवृक्षातळी उभे राहिलेले पाडस!  त्याची कोणतीच इच्छा अतृप्त राहणं शक्य नाही."अर्जुनाच्या भाग्ययोगाला उद्देशून ज्ञानेश्वरांनी अशी सुंदर उपमा योजिली आहे व पुढे श्रीहरींनी त्या प्रश्नांची दिलेली उत्तरे विवरण केलेली आहेत.

ज्ञानदेवांनी विशद केलेले परमपुरुषाचे स्वरूप -

आकाररहित, जन्ममरणाच्या पलीकडे असलेल्या, सर्वथैव परिपूर्ण, आकाशाहून जुन्या व परमाणुहून  सूक्ष्म, ज्याच्या सान्निध्याने विश्वव्यवहार चालतो ,हेतू ज्याला भितो ,जे अचिंत्य, चर्मचक्षूंना अगम्य, पण ज्ञानचक्षूंसमोर सुप्रभातीसम सुस्पष्ट अशा अव्यंग परब्रह्माला जो जाणतो व मरणकाळी स्थिर चित्ताने त्याचेच स्मरण करत पद्मासन घालून, उत्तराभिमुख बसून, जीवात कर्मयोगाचे सुख साठवून एकवटलेल्या मनोधर्माने आधारचक्रापासून ब्रह्मरंध्राकडे प्राण योगबळाने वळवून कोणासही नकळत देह ठेवतो असा पुरुष केवळ देहधारी परब्रह्म म्हणजेच परमपुरुष होय असे श्रीज्ञानदेव विशद करतात. 
ईश्वराचे अ-क्षर असे परमधाम अशा पुरुषाला प्राप्त होते पण त्यासाठी त्याने जीवनभर ब्रह्मचर्यासारखी संकटे व निष्ठूर तप-आचरणे पाळली असतात. इंद्रियांना हीनदीन करून टाकलेले असते ,तेव्हाच मरणकाळी ही गती प्राप्त होते.
कां झांकलिया घटींचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां ।
या रीतीं जो पांडवा । देह ठेवी ॥ ९८ ॥
अथवा घटाखाली झाकलेला दिवा केव्हा काय झाला (विझला) हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे अर्जुना जो देह ठेवतो, ॥
तो केवळ परब्रह्म । जया परमपुरुष ऐसें नाम ।
तें माझें निजधाम । होऊनि ठाके ॥ ९९ ॥
तो पुरुष जे केवल ब्रह्म आहे, असे जे माझे खास स्वरूप आहे ते होऊन रहातो. 
अशाप्रकारे तत्त्वतः मरणकाळ ही जीवनकाळाशी सुसंगत अशी एक व्यवस्था आहे असे परमपुरुषाच्या वर्णनातून श्री ज्ञानेश्वर विशद करतात. वरवर पाहता प्रत्येकाच्या वाट्याला येणारा मरणभोग, त्याचे स्वरूप व तपशील वेगवेगळा असू शकतो. पण ज्या निष्ठांचे जीवनभर स्मरण व आचरण जिवाने केले त्याच निष्ठा अंतकाळी त्याच्या जाणिवेला वेढून राहतात असे त्यांना सांगायचे आहे.

ज्ञानदेवांनी परमपदप्राप्तीसाठी सांगितलेली साधना-

ऐसें जें पद । दुर्लभ आणि अगाध ।
जयाचिये थडिये वेद । चुबुकळिले ठेले ॥ १०७ ॥
असे जे ठिकाण (ब्रह्मस्वरूप) जे मिळावयास कठिण व जाणण्यास कठिण व ज्याच्या अलिकडच्या काठाशीच वेद गटांगळ्या खात राहिले आहेत (वेदासही जे अगम्य आहे),
तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवे मोडे ।
हें हृदयाचिया डोहीं बुडे । तैसें कीजे ॥ १११ ॥
तरी या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे ती सहज नाहीशी करून ते हृदयाच्या डोहात बुडेल तसे करावे.
- ते परमपद प्राप्त होण्यासाठी ज्ञानदेव म्हणतात," मनाची बाहेर धावण्याची सवय बंद करून ते हृदयाच्या डोहात बुडवून टाकावे. त्यासाठी आधी इंद्रियनिग्रहांची कवाडे घट्ट बंद करून घ्यावी लागतील.अशा प्रकारे कोंडलेले मन हृदयातच निर्विकल्प होऊन स्थिर होते. हात-पाय मोडल्यावर घराबाहेर पडणं अशक्य होतं त्याप्रमाणे इंद्रियनिग्रह केल्यावरच या प्रकारचे स्थैर्य साध्य होतं. अशा स्थिर चित्ताने प्राणाचे ओंकारस्वरूप करून तो सुषुम्नेच्या मार्गाने ब्रह्मरंध्रात म्हणजेच मस्तकाच्या पोकळीत आणावा. नंतर धारणेच्या बळाने ओंकारातील मात्रात्रय ओंकाराच्या अर्धमात्रेत लय पावतील अशा बेताने वायू आकाशामध्ये  स्थिर करावा .या स्थितीत ओंकाराचा अर्धमात्रेत लय होईल व ओम् हे स्मरणही नाहीसे होऊन प्राण पूर्णत्वास जातील व ओंकाराच्याही पलीकडले असे माझे आनंदस्वरूपच शिल्लक राहील असा निर्वाळा श्री ईश्वराने दिला आहे ."

अशा प्रकारे इंद्रियदमन ,ओंकारस्मरण व योगाभ्यासाधिष्ठित मार्गक्रमण यावर आधारित अशी एक शास्त्रीय साधना ज्ञानेश्वरांनी आदर्श अंतकाळ वर्णन करताना सांगितली आहे. कदाचित त्यांच्याच पुढे योजलेल्या समाधीग्रहणाचे ते येथे अलिप्तपणे विवरण करत असावेत अस हे सर्व वाचताना वाटते!

निजधामाचे ज्ञानदेवकृत स्वरूप

'तद्धामं परमं मम' या गीतेच्या आठव्या अध्यायातील एकविसाव्या श्लोकात उल्लेखिलेल्या निजधामाचे श्रीज्ञानदेवांनी आनंदमय असे निरूपण केले आहे.
हें त्रैलोक्यचि पुरुषोत्तमु । ऐसा साच जयाचा मनोधर्मु ।
तया आस्तिकाचा आश्रमु । पांडवा गा ॥ १९३ ॥
अर्जुना,हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे, अशी ज्यांची खरी समजूत आहे त्या आस्तिकांचे जे परमात्मस्वरूप नेहमी रहाण्याचे ठिकाण आहे.
जें निगर्वाचें गौरव । जें निर्गुणाची जाणिव ।
जें सुखाची राणिव । निराशांसी ॥ १९४ ॥
जे परमात्मस्वरूप गर्वरहित पुरुषांचे मोठेपण आहे, जे सुखाचे राज्य आहे,
जें संतोषियां वाढिलें ताट । जें अचिंता अनाथांचें मायपोट ।
भक्तीसी उजू वाट । जया गांवा ॥ १९५ ॥
जे परमात्मस्वरूप संतोषी पुरुषांस वाढलेले ताट आहे, जे संसाराची चिंता न करणारे असून ज्यांना माझ्यावाचून दुसरा कोणी मालक नाही. अशा भक्तांचे मायपोट आहे आणि ज्या गावाला पोहोचण्याला भक्ति हीच सरळ वाट आहे.

ज्ञानदेव म्हणतात," ज्याला अव्यक्त असे कौतुकाने म्हणता येते, जे मन-बुद्धीच्या कार्यकक्षेबाहेर वसलेले ,ज्याच्या आकाराला येण्याने निराकारत्व लोपत नाही, व आकारलोपाने ज्याची नित्यता भंगत नाही ते माझे परमधाम असे तू जाण. त्याच्या उच्चारातच एक असा बोध होतो की यापलीकडे काही नाहीच.हीच परमगती. 
इथे पोचलेल्याचे वागणे कसे? तर राजासारखे. बाहेर दहा इंद्रियांची रहदारी चालूच आहे .विषयांची बाजारपेठ मांडली गेली आहे. मनाचा चव्हाटा गजबजलेला आहे .सुखदुःखांचा राज-करभार महालात पोचता होतो आहे .आणि स्वतः स्वामी असलेला तो राजपुरुष मात्र सुखाने मंचकावर पहुडलेला आहे तो या व्यवहारांचा कर्ता नाही .प्रजाच आपापले व्यवहार त्याची राजमुद्रा वागवीत राहाटत असते. याला पुरुष म्हणण्याचे आणखी एक कारण म्हणजे मायेशी एकनिष्ठेचा प्रपंच तो चालवतो! एरवी त्याच्या अंगणाला आकाशाचे पांघरूण असेच म्हणावे लागेल !त्रैलोक्य म्हणजेच पुरुषोत्तम असा मनोधर्म असलेल्या अशा आस्तिकांचा आश्रम म्हणजे भगवंताचे हे निजधाम .निर्वाणीचे महत्त्व म्हणून ओळखले जावे,निर्गुणाची साक्षात जाणीव म्हणावे ,निराशांसाठी सुखाचे साम्राज्य ठरावे असे हे पद आहे.हे संतुष्टांना वाढलेले ताट, हे अनाथांचे मायपोट , हे ईश्वराचे गाव आहे. भक्तीची साधीसरळ वाट येथे पोहोचते.थंडीत गरम पाण्याने स्वतःच थंड होऊन जावं, सूर्याच्या भेटीला गेलेल्या अंधाराचे नावच उरू नये तसेच या गावी गेलेल्यांचा संसारच मोक्षमय होतो. अग्नितले इंधन नंतर वेगळे काढता येते का ?साखरेचा पुन्हा ऊस होतो का ?लोखंडाचे परिसाने एकदा सोने केल्यावर त्या सोन्याचे पुन्हा लोखंड होते का? तुपाचे पुन्हा दूध होते का? त्याचप्रमाणे ज्या अवस्थेनंतर परतीची वाट नाही तेच ईश्वराचे गहनरम्य परमधाम होय."
'आस्तिकांच्या आश्रमा'चे हे वर्णन ज्ञानेश्वरांनी अशाप्रकारे परम उंचीवर नेले आहे. त्याहीपुढे एक अवर्णनीय वळण घेऊन ते म्हणतात," फार काय सांगावे?ज्या  धामाला जायचे, ते धाम स्वतःच व्हायचे" असा हा प्रकार आहे !"
हें एकैक सांगोनि वायां । काय फार करूं धनंजया ।
पैं गेलिया जया ठाया । तो ठावोचि होईजे ॥ १९६ ॥
अर्जुना हे एकेक सांगून व्यर्थ विस्तार कशाला करू ? परंतु ज्या ठिकाणी गेले असता ते ठिकाणच आपण होतो..! 
सातव्या अध्यायात “येथ जो जो कीजे तरणोपावो। तो तो होइजे अपावो॥” असे बजावणारे ज्ञानदेव आता “ज्या गावाला जायचे ते गाव स्वत:च व्हायचे “ अशा टप्प्यावर श्रोत्यांना घेऊन आले आहेत.

ज्ञानेश्वरवर्णित अर्चिरादि  व धूम्रमार्ग

आतां असो हें सकळ । जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ ।
तया अग्नीचें प्रयाणीं बळ । संपूर्ण आथी ॥ २१९ ॥
आता हे सगळे असू दे. सारांश असे समजा की ज्ञानाला मूळ कारण अग्नि आहे. त्या अग्नीचे मरणकाळी संपूर्ण बळ असावे.

आठव्या अध्यायातील "अग्निज्योतीरह: शुक्ल"या श्लोकाचे नेमकेच विवरण करताना ज्ञानदेव म्हणतात ,"देहाच्या आत अग्निज्योतीचा प्रकाश असावा ,बाहेर शुक्लपक्षातला दिवस असावा, तसेच उत्तरायणातील सहा महिन्यांपैकी कोणताही महिना असावा ,असा 'समयोग' साधून जे देह ठेवतात ते ब्रह्मविद्  ब्रह्ममय होतात. या काळाचे सामर्थ्यच तसे आहे. योग्यांना सायुज्यमुक्ती देणाऱ्या या काळास अर्चिरादि किंवा अग्निमार्ग म्हणतात."
हा उत्तम काळु जाणिजे । यातें अर्चिरा मार्गु म्हणिजे ।
आतां अकाळु तोही सहजें । सांगेन आईक ॥ २२५ ॥
हा उत्तम काळ आहे असे समज. याला अर्चिरामार्ग म्हणावे. आता अकाळ जो आहे तोही ओघाने सांगतो, ऐक. 

'धूमो रात्रिस्तथा' या श्लोकात धूम्रमार्गाचे वर्णन आहे.ज्ञानदेव म्हणतात,
ऐसी मनबुद्धिकरणीं । सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी ।
तेथ जन्में जोडलिये वाहणी । युगचि बुडे ॥ २३१ ॥
याप्रमाणे मन, बुद्धि व इंद्रिये यांच्या सभोवती अशी ही धुराच्या समुदायाची कोंदणी होते. तेव्हा जन्मभर संपादन केलेला स्वरूप अभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो. 
हां गा हातींचें जे वेळीं जाये । ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे ।
म्हणौनि प्रयाणीं तंव होये । येतुली दशा ॥ २३२ ॥
बाबा अर्जुना, जन्मभर केलेला हातचा अभ्यास जेव्हा जातो, त्यावेळी दुसर्‍या प्राप्तीची गोष्ट कशाला मनात आणायला पाहिजे. ? म्हणून तर मरणकाळी अशी अवस्था होते. ॥
ऐशी देहाआंतु स्थिती । बाहेरि कृष्णपक्षु वरि राती ।
आणि सामासही वोडवती । दक्षिणायन ॥ २३३ ॥
अशी ही देहाची आत स्थिती होऊन बाहेर वद्य पंधरवडा त्यातून रात्र आणि दक्षिणायनातील सहा महिनेही येतात. 
ज्ञानदेव धूम्रमार्गाचे विवरण करताना म्हणतात,"देहीचा अग्नि निमाल्यानंतर देह म्हणजे निव्वळ ओला तेजोविहीन चिखलाचा गोळा.या चिखलात ती मालवू घातलेली जाणीव अंधारात जणू काहीतरी शोधत असते .अशा अवस्थेत आयुष्यवेळा केवळ अंधारात चाचपडत असते. अयोग्य वेळीच्या धूम्रमार्गी प्राणोत्क्रमणात देहाच्या आत कफ व वात यांची गर्दी होऊन सगळीकडून तमप्रकोप होऊन अंतःकरण जणू अंधाराने कोंदाटून जाते. इंद्रिये लाकडासारखी ताठर होतात. स्मरणशक्ती भ्रमामध्ये बुडून जाते .मन वेडेपिसे होते. प्राण कोंडल्यासारखे होतात. अग्निचे अग्निपण गेल्यावर मागे उरतो तो केवळ धूरच .तशी शरीरातली चेतना शरीरातच घोटाळत राहते .जणू चंद्रावर आलेले पावसाळ्यातले मळभ. धड अंधार नाही, धड उजेड नाही अशी अवस्था . या अवस्थेत जन्मभर जोडलेले सारे क्रमशः नाहीसे होऊन प्रलय ओढवतो.मग नव्या लाभाची गोष्टच नको. ही सर्व देहाआतील स्थिती , तर बाहेर कृष्णपक्ष व  रात्र, आणि महिनाही दक्षिणायनातला.  अशा काळी प्रयाणानंतर ब्रह्मप्राप्ती कोठली ?ही सर्व पुनरावर्तनाची लक्षणे आहेत . अशा वेळी ज्याचा देह पडतो तो योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन माघारा जन्मास येतो."
काहीशा गूढगडद शब्दात पण तटस्थपणे श्रीज्ञानदेवांनी मरणवेळमीमांसा अर्चिरादि व  धूम्रमार्गांच्या वर्णनातून मांडली आहे. 

देह - दु:खाचे आगर-ज्ञानदेवकृत विवेचन-

'जे क्लेशतरूची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी ।
जे मृत्युकाकासीं कुरोंडी । सांडिली आहे ॥ १४० ॥
जे शरीर दु:खरूप झाडांची बाग व अध्यात्मादि तीन तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्युरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे. 
जें दैन्याचें दुभतें । जें महाभयातें वाढवितें ।
जें सकळ दुःखाचें पुरतें । भांडवल ॥ १४१ ॥
जे दीनता प्रसवणारे आहे, जे मरणाला पोसते व जे सर्व दु:खांचे पुरेसे भांडवल आहे .
आठव्या अध्यायातील पंधराव्या श्लोकात जन्माला येण्यास म्हणजेच पुन्हा पुन्हा पुनर्जन्म घेण्यास "दुःखालयं "असे विशेषण योजिले आहे. त्यावर आपल्या शैलीने उपमांची,श्लेषांची वृष्टी करत श्रीज्ञानदेव म्हणतात, "हा देह म्हणजे क्लेशवृक्षांचे आगर आहे. त्रिविधतापांची शेगडी आहे. मृत्यूरूप कावळ्यासाठी काढून ठेवलेला हा पिंड आहे. हे दैन्याचे दुभते आहे .महाभयास वाढवणारे सकळ दु:खांचे भांडवल आहे .वाईट बुद्धीचे मूळ व कुकर्माचं फळ म्हणून हे प्राप्त झाले. हे भ्रांतीचे मूर्तरूप, प्रपंचाचे आसन, विकारांचे उद्यान, रोगराईला हे खाद्य वाढले आहे.ही काळाची उष्टी खिचडी , हा जन्ममरणाचा चव्हाटा आहे . विकल्पाची  मूस, विंचवांचे फुटलेले पेंव असे हे शरीर. ही जणू वाघाची गुहा, वेश्येचा हा मित्र,मानभावी चोराचे मैत्र,कोड आलेल्याने दिलेले आलिंगन ,काळ सर्पाची मृदुता, पारध्याचं गाणं ,वै-याने केलेला पाहुणचार ,दुर्जनाचे आदरातिथ्य अशाप्रकारे अनेक अनर्थांचा हे शरीर म्हणजे महासागर आहे. ते स्वप्नात पाहिलेले स्वप्न, मृगजळावर पोसलेले अरण्य असे हे शरीर श्रीभगवद्स्वरूपास पोचलेल्यांना पुन्हा प्राप्त होत नाही."
याप्रकारे अतिशय कठोर उपमांची योजना करून ज्ञानदेव शारीरिक आकर्षणात फसून जाण्यापासून आपल्या श्रोत्यांना परावृत्त करत आहेत .

अर्जुनाला प्रयाणकाळाबद्दल आलेली शंका
आठव्या अध्यायाच्या एकशेविसाव्या श्लोकात अर्जुनाची प्रयाणकाळाबद्दलची शंका परमेश्वराच्याच मुखातून व्यक्त झाली आहे. भगवंत म्हणतात, "अर्जुना तुझ्या मनात कदाचित असे येईल की प्रणवरूप परब्रह्माचे स्मरण मरणकाळी होईल तरी कसे? इंद्रियांवर प्राण संकट येऊन ठेपले, जीवनाचे सुख बुडाले, आत-बाहेर मरण खुणांची दाटी झाली ,अशावेळी कसले आसन?कसला निरोध?कसले स्मरण?
मग भगवंतच या शंकेचे परस्पर निरसन करताना म्हणतात जो निरंतर माझी स्मरण करतो त्याचा अंतसमयी मी सेवक होतो, त्याची काळजी वाहतो.
तेथ अर्जुना जरी विपायें । तुझ्या जीवीं हन ऐसें जाये ।
ना हें स्मरण मग होये । कायसयावरी अंतीं ॥ १२० ॥
येथे अर्जुना, कदाचित तुझ्या मनात असे वाटेल की अंतकाळी स्मरण कशाने होणार ? 
इंद्रियां अनुघडु पडलिया । जीविताचें सुख बुडालिया ।
आंतुबाहेरी उघडलिया । मृत्युचिन्हें ॥ १२१ ॥
कारण इंद्रिये आपापली कामे करण्यास असमर्थ स्थितीत असल्यावर जगण्यात असलेले सुख नाहीसे झाल्यावर आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागतात..
ते वेळीं बैसावेंचि कवणें । मग कवण निरोधी करणें ।
तेथ काह्याचेनि अंतःकरणें । प्रणव स्मरावा ॥ १२२ ॥
मग त्यावेळेस योगसाधनास कोणी बसावे ? व इंद्रियांचा निग्रह कोणी करावा ? आणि कोणत्या अंत:करणाने ॐकाराचे स्मरण करावे ?
तरि गा ऐशिया हो ध्वनी । झणें थारा देशी हो मनीं ।
पैं नित्य सेविला मी निदानीं । सेवकु होय ॥ १२३ ॥
तर बाबा अशा शंकेला कदाचित तू मनात जागा देशील तर अशी शंका मनात आणू नकोस. कारण माझी जे नेहेमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाळी मी त्यांचा सेवक होतो. 

अशाप्रकारे जीवितकाळी भक्ताचा योगक्षेम वाहणारा परमेश्वर अंतकाळी भक्ताच्या सद्गतीची चिंता वाहतो.

अहोरात्रविद् संज्ञेचा अर्थ -

परि ब्रह्मयाचियाहि आठां पाहारांतें।आपुलिया डोळां देखते ।
जे आहाति गा तयांतें । अहोरात्रविद म्हणिपे ॥ १५९ ॥
परंतु ब्रह्मदेवाच्या आठा प्रहरांना आपल्या डोळ्यांनी पहाणारे जे आहेत, त्यांना ब्रह्मदेवाच्या दिवसरात्रीला जाणणारे म्हणावेत. 

आठव्या अध्यायाच्या १५९ व्या ओवीत अहोरात्रविद् या संज्ञेचा अर्थ आला आहे .हजार युगांच्या चौकड्या जाव्यात तेव्हा ब्रह्मलोकीचा एक दिवस होतो. तशीच हजार चौकड्यांची रात्र असते. याला अहोरात्र म्हणतात .ही अहोरात्र पाहणारे भाग्यवान चिरंजीव होतात. ब्रह्मदेवाच्या आठही प्रहरांना आपल्या डोळ्यांनी पाहणाऱ्याला अहोरात्रविद् म्हणतात.

श्रीहरींनी अर्जुनाला योगी होण्याचा दिलेला आदेश
अर्चिरादि  व धूम्रमार्गाचे विवरण केल्यावर श्रीहरी आठव्या अध्यायात गीतेच्या सत्ताविसाव्या श्लोकात अर्जुनाला 'तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ' - असा आदेश देतात. त्याचे स्पष्टीकरण ज्ञानदेव असे करतात-
याकारणें पंडुसुता । तुवां होआवें योगयुक्ता ।
येतुलेनि सर्वकाळीं साम्यता । आपैसया होईल ॥ २५६ ॥
अर्जुना, म्हणून तू योगसंपन्न हो. एवढ्याने स्वत:च्या ठिकाणी सर्वकाळ स्वरूपसाम्यता होईल.
मग भलतेथ भलतेव्हां । देह असो अथवा जावा ।
परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघडु नाहीं ॥ २५७ ॥
मग वाटेल तेथे, वाटेल तेव्हा, देहाचा पाश असो अथवा जावो, परंतु बंधरहित अखंड ब्रह्मस्थितीत बिघाड येणार नाही.
"मरणसमय प्राप्त झाला असता अकस्मात काहीही प्राप्त होत नाही. म्हणून मार्गस्थ असतानाच, म्हणजे आयुष्यक्रमणा चालू असतानाच देहाचा त्याग करून ब्रह्मवस्तू व्हावे हेच अधिक योग्य. कारण देह राहो किंवा जावो आपण मूळ ब्रह्मस्वरूपच आहोत.दोरीवरील सर्पभास निमाला की दोरीच शिल्लक असते. पाण्यावरचे तरंग विराले की पाणीच उरते .अशा प्रकारे जो ब्रह्मस्वरूप झाला त्याच्या देहाचे नावही शिल्लक राहत नाही.मग रस्ता कशाला शोधावा? कोणी कुठून आणि कुठे जावे? देशकाल आदि सारे आपणच आहोत असे जाणल्यावर काहीच शिल्लक राहत नाही.असे पहा, घट फुटेल आणि मग नंतर आकाश नीटपणे बाहेर पडून गगनाला जाऊन भेटेल, असे थोडेच आहे? घटाकार नाहीसा होण्यापूर्वीपासूनच घटाकाश मूळ आकाशामध्ये अंतर्भूत आहे अशा ज्ञानबोधी योग्यांना मार्ग-अमार्गाचे संकट पडत नाही. मग भलत्या ठिकाणी व भलत्या वेळी देह पडला म्हणून त्यांच्या ब्रह्मभावनेत बिघाड येत नाही. ते कल्पारंभी जन्मत नाहीत की कल्पांती मृत्यू पावत नाहीत. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला योगयुक्त होण्यास, योगी होण्यास सांगितले आहे."

आठव्या अध्यायाचा सार-समारोप

तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे ।
तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥
याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते.

'यं यं वाsपि स्मरन्भावं' - आठव्या अध्यायातील या सहाव्या श्लोकावर भाष्य करणारी ही वरील ओवी या अध्यायात सारभूत आहे असे म्हणता येईल.
या अध्यायात अनेक क्लिष्ट अध्यात्मिक संकल्पनांचे स्पष्टीकरण आहे तसेच अध्यायाच्या उत्तरार्धात योग्यांच्या अर्चिरादि व धूम्रमार्गी मरणवेळांचे फलसूचन आहे.
एकूणच हा अध्याय म्हणजे सामान्यांसाठी नेणिवेच्या प्रांतातील पर्यटन आहे !त्यातील देहदुःखाची क्लेशकारी वर्णने, व विशेषतः धूम्रमार्गी मरणवेळेचे प्रत्ययकारी वर्णन या सर्वांमुळे या अध्यायातील वातावरण काहीसे गूढ व भयाकारी झाले आहे.
पण या सर्वांना छेद देणारे ,सर्वसामान्यांच्या आकलन व आचरणकक्षेत येणारे एक सोपे विधान श्रीभगवंतांनी वरील श्लोकात केले आहे, व ज्ञानेश्वरांनी त्याचा भावार्थ तितक्याच सहजतेने या ओवीत ओवीबद्ध केला आहे.
-"जिवंत असताना मनास आवडल्याने जे जीवात उरते, तेच मरणकाळी वृद्धिंगत होत असते !"
या साध्या सिद्धांतातून भगवंत सांगत आहेत की सतत माझे स्मरण करणाऱ्या जीवमात्रांचा मरणकाळ व पुढील गती माझ्यामध्येच समर्पित होण्याची असणार हे निश्चित! 

भारती बिर्जे-डिग्गीकर



Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –