ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय बारावा- भक्तियोग
ज्ञा नेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय बारावा- भक्तियोग ज्ञानेश्वरकृत श्रीगुरूंच्या कृपादृष्टीचे स्तोत्र जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे । अनवरत आनंदे । वर्षतिये ॥ १ ॥ गुरुकृपादृष्टी महिमानाच्या या रूपकापासून बाराव्या अध्यायाची म्हणजेच भक्तियोगाची ज्ञानदेव सुरुवात करतात. एक ते एकोणीस ओव्यांच्या या रूपकात गुरुकृपादृष्टी ही अनंताच्या खडतर प्रवासातली साक्षात मायमाऊली आहे असे ज्ञानेश्वर त्यांच्या अमोघ सुंदर शैलीत प्रतिपादन करतात. ते म्हणतात, "हे शुद्धे ,उदारे, प्रसिद्धे, निरंतर आनंदाची वृष्टी अशा हे श्रीगुरुकृपादृष्टीदेवते! विषयरूप सर्पाचे विष तू क्षणात उतरवतेस, मग ताप कसला? शोक कुठला? तुझ्या प्रसादरसमहापुरात सारे शांतमंगलच होते. तुझ्यामुळे सेवकांना योगसुखाचे सोहळे भोगावयास मिळतात. सोहमसिद्धीची त्यांची आवड तू पुरवतेस. योगाच्या मांडीवर तू तुझी बाळे जोजवतेस .हृदयाकाशाच्या पाळण्यात गुह्य उपदेशाची अंगाई गात झोके देतेस.प्रत्यक् ज्योतीने त्यांना ओवाळतेस. मनपवनाची खेळणी त्यांच्यापुढे मांडतेस. आत्मसुखाची बाळलेणी घालून त्यांना सजवतेस. जीवनकळेचे दूध त...