Posts

Showing posts from August, 2022

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय बारावा- भक्तियोग

  ज्ञा नेश्वरी परिचय -अध्याय बारावा- भक्तियोग ज्ञानेश्वरकृत श्रीगुरूंच्या कृपादृष्टीचे स्तोत्र जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे । अनवरत आनंदे । वर्षतिये ॥ १ ॥ गुरुकृपादृष्टी महिमानाच्या या रूपकापासून  बाराव्या अध्यायाची म्हणजेच भक्तियोगाची  ज्ञानदेव सुरुवात करतात. एक ते एकोणीस ओव्यांच्या  या रूपकात  गुरुकृपादृष्टी  ही अनंताच्या खडतर प्रवासातली साक्षात मायमाऊली आहे असे ज्ञानेश्वर त्यांच्या अमोघ सुंदर शैलीत प्रतिपादन करतात. ते म्हणतात, "हे शुद्धे ,उदारे, प्रसिद्धे, निरंतर आनंदाची वृष्टी अशा हे श्रीगुरुकृपादृष्टीदेवते!  विषयरूप सर्पाचे विष तू क्षणात उतरवतेस, मग ताप कसला? शोक कुठला? तुझ्या प्रसादरसमहापुरात सारे शांतमंगलच होते. तुझ्यामुळे सेवकांना योगसुखाचे सोहळे भोगावयास मिळतात. सोहमसिद्धीची त्यांची आवड तू पुरवतेस. योगाच्या मांडीवर तू तुझी बाळे जोजवतेस .हृदयाकाशाच्या पाळण्यात गुह्य उपदेशाची अंगाई गात झोके देतेस.प्रत्यक् ज्योतीने त्यांना ओवाळतेस. मनपवनाची खेळणी त्यांच्यापुढे मांडतेस. आत्मसुखाची बाळलेणी घालून त्यांना सजवतेस. जीवनकळेचे दूध तू बाळांना पाजतेस. अनाहत नादाचे गाणे गातेस

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय अकरावा -विश्वरूपदर्शन योग

  ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय अकरावा -विश्वरूपदर्शन योग अर्जुनाच्या संकोचाचे चित्रण अकराव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच विनयमधुर अशी विनंती श्रीज्ञानदेव पुन्हा एकदा श्रोत्यांना करत आहेत व त्यांचे या अध्यायाच्या परमअद्भुत विषयवस्तूकडे लक्ष वेधून घेत आहेत. हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड । तरी आतां अवधानामृतें वाड । सिंपोनि कीजे ॥ १९ ॥ महाराज, हे ज्ञानाचे सुंदर झाड आपणच लावले आहे. तर आता यास आपण आपल्या अवधानाचे अमृत  शिंपून ते मोठे करावे . ज्ञानदेवांच्या निरुपणाची सुरुवात अर्जुनाच्या भावोत्सुक अशा अवस्थेच्या वर्णनाने होते. त्याच्या मनात एक उत्कट इच्छा आहे आणि त्याच वेळी परमोत्कट संकोचही आहे. आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोहीं रसीं । येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥ १ ॥ आता यानंतर अकराव्या अध्यायामधे (शांत व अद्भुत या) दोन रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे. जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा । आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु ॥ २ ॥ या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारास आला आहे आण