Posts

Showing posts from May, 2022

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -ध्यानयोग -अध्याय सहावा

  ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -ध्यानयोग - अध्याय सहावा धृतराष्ट्राचा मोह सहाव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच संजयाने धृतराष्ट्रास म्हटले," येथे श्रीकृष्ण योगरूप अभिप्राय अर्जुनास सांगण्यास सिद्ध झाले आहेत .अनायासे हे श्रवणाचे परमसुख आम्हास मिळत आहे .जणू ब्रह्मरसाचे हे जेवण रांधले असताना आपण येथे अकस्मात पाहुणे आलो किंवा तहानलेल्याने पाणी म्हणून प्यावे ते अमृतच असावे ,असा हा योग आहे." - यावर धृतराष्ट्र कोरडेपणाने म्हणाला," हे तुला आम्ही विचारले नाही." त्याच्या  या अलिप्तपणामागे त्याचा अविवेकी पुत्रमोह आहे, धृतराष्ट्र मोहाने ग्रासला आहे हे संजयाला जाणवले. सहाव्या अध्यायाचे ज्ञानदेवप्रणित महत्त्व आणि प्रतिज्ञा- समुद्रमंथनातून अमृतप्राप्तीचा जो क्षण, तोच या गीतार्थमंथनात सहाव्या अध्यायाचा आहे असं श्रीज्ञानदेव म्हणतात. गीतार्थाचे सारतत्त्व, विवेकसमुद्राचे पैलतीर,अनेक योगसमृद्धींचे भांडार या अध्यायात उमटले आहे .आदिमाया जेथे विश्रांती घेते, शब्दब्रह्म जेथे मौनात विलीन होते, तेथून याच्या अर्थाचा अंकुर जोमाने फोफावतो. श्रीज्ञानदेव प्रतिज्ञापूर्वक म्हणतात- माझा मराठाचि बो

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -कर्मसंन्यास योग -अध्याय पाचवा

  ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -कर्मसंन्यास योग -अध्याय पाचवा अर्जुनाचा प्रश्‍न- संन्यास श्रेष्ठ की कर्म - पाचव्या अध्यायाच्या सुरुवातीसच अर्जुनाने श्रीहरीला विचारले," हे श्रीकृष्णा, हे तुमचे बोलणे तरी कसे आहे? तुम्ही एकच गोष्ट निश्चित सांगावी, तर ती अंतःकरणात धरून ठेवता येईल .मागे तुम्ही सकळ कर्मांच्या संन्यासाबद्दल बरेच निरूपण केले आणि आता कर्मयोगाच्या पक्षाने बोलत आहात .आम्हा अजाणांसमोर अशी द्व्यर्थी भाषा करून आपण आम्हाला गोंधळून टाकत आहात. ऐकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे । हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ॥ ४ ॥ ऐका. एक तत्व जर सांगावयाचे असेल तर एकच निश्चित सांगितले पाहिजे, हे तुम्हाला दुसर्‍यांनी सांगवयास पाहिजे काय ?  तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें । जे हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा ॥ ५ ॥ एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या श्रेष्ठांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये.  "बोध हा नेहमीच एकाच तत्त्वाचा, एकाच निष्ठेने करावा हे काय मी तुम्हाला सांगावे? तर आता हा परमार्थ ध्वन्यर्थाने न सांगता प्रकटपणे सांगावा ,

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- ज्ञानकर्मसंन्यासयोग-अध्याय चौथा

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- ज्ञानकर्मसंन्यास योग- अध्याय   चौथा अर्जुनाचे अलौकिक भाग्य चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीसच श्री ज्ञानदेवांनी अर्जुनाच्या अलौकिक भाग्याची स्थिती वर्णिली आहे. जो विवेकविचार भगवंत अर्जुनाला सांगत आहेत तो नुसता ऐकणे म्हणजे श्रवणेंद्रियांची पहाट होणे, स्वप्न सत्यात अनुभवणे.बोलणारा श्रीकृष्ण व ऐकणारा अर्जुन आणि विषय असा गहन. ज्ञानेश्वर म्हणतात- हे संवादसुख भोगण्यासाठी साऱ्या इंद्रियांच्या शक्ती श्रवणेंद्रियात एकवटून येतात, मग प्रत्यक्ष ज्याच्यासाठी हा संवादयोग जुळून आला तो अजून किती भाग्यवान! या दैवी गुणांनी युक्त अशा सुहृदासाठी श्री नारायणाच्या मनात काही वेगळेच प्रेम विलसत आहे. जे पिता वासुदेव, माता देवकी किंवा बंधू बळिराम यापैकी कुणालाही श्रीभगवंतांनी सांगितले नाही ते आज अर्जुनाच्या श्रवणी पडत आहे. जिचे सतत सान्निध्य त्या देवी लक्ष्मीलाही हे गुह्य भगवंतांनी कधी सांगितले नाही.  देवी लक्ष्मीयेवढी जवळिक ।परी तेही न देखे या प्रेमाचें सुख| आजि कृष्णस्नेहाचें बिक । यातेंचि आथी ॥९॥ देवी लक्ष्मी एवढी जवळ असणारी पण या प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही. कृष्णाच्या प्रेमाचे फळ