Posts

Showing posts from 2017

प्रभात –गान (Aubade: : Philip Larkin यांच्या इंग्लिश कवितेची पद्यानुकृती)

प्रभात –गान ( Aubade : : Philip Larkin   यांच्या इंग्लिश कवितेची पद्यानुकृती) दिवसभराचं काम. रात्री जराशी नशा करतो      पहाटेचे चार. शांत अंधारात मी टक लावतो. पडद्यांच्या कडा आता उजळत जातील हळूहळू   नेहमी वाट पाहणारं सत्य मला यावेळी येतं कळू अविश्रांत मृत्यू अजून एका दिवसाने जवळ आलाय   कधी आणि कसा मी मरणार? दुसरातिसरा सुचत नाही विचार . ओसाडओसाड प्रश्न. मरणाचे मरण्याचे भयाकार       तळपतात पुन्हा,दिपवतात,घाबरवतात धुवांधार. मन कोरं होतं स्वच्छ त्या तेजात -न पश्चात्ताप, -राहून गेलेलं भलं करणं,प्रेम करणं, आणि मग वेळ असातसा दवडणं- न दु:खदाहही या सर्वाचा कारण हे आयुष्य एकुलतं चुकीच्या ठिकाणाहून निघतं, धडपडतं, कष्टाने चढतं.          कदाचित कधीच नाही यातून सावरणार ते असंच समग्र निरंतर शून्यतेमध्ये विरणार ते आपण प्रवास करत पोचतो याच निर्मूलतेकडे हरवतो. शिल्लक ना राहतो इकडे, ना तिकडे . लवकरच.याहून काय आहे खरं ? याहून काय अधिक भयंकर बरं ? या भयातून सुटण्यासाठी आहे पळवाट कोणती ? धर्माने केला होता

महाकवी कालिदास ऋतुसंहार काव्ये शरदऋतूवर्णन - श्लोक १-१० एक पद्यानुवाद

महाकवी कालिदास (चौथे शतक) ऋतुसंहार काव्ये शरदऋतूवर्णन - श्लोक १-१०   एक पद्यानुवाद   (सद्भारती वृत्त)     तृणांचे चंदेरी वसन ; कमळासारखे रूप उमले     खुळ्याशा हंसांचा ध्वनि नुपुर की आसमंतात घुमले     हिची काया की ही लवचिकपणे पक्व साळी लहरते    वधू आली येथे शरद-रमणी मुग्ध नारी विहरते   || रुप्याच्या वर्खाने कुरण सजले चांदणी रात्र बहरे   जळी हंसक्रीडा- कमलकलिका शुभ्रसौंदर्य विखरे   फुले जाई, कोठे दिसत कदली सातपानी धवलशी   फुलांचे हे सारे उपवन धरे सौम्य आभा विमलशी   || जळाशी मासोळ्या उसळत जशी मेखलांची चमक ती किनाऱ्याला पक्षी विहरत जणू शुभ्रमाळाच रुळती   नितंबांच्या पुष्टीसम दिसत या गोल विस्तीर्ण पुळणी नद्या गर्वोन्मत्ता निघत जणु की धुंद तंद्रीत रमणी    रुपेरी शंखाची चमक, कमळाचे कुठे देठ ढवळे   छटा आकाशाच्या तरल असल्या पाहता   दृष्टि निवळे सरे वर्षावाचे वजन, हलके मेघ वाऱ्यात फिरती    जणू छत्रे राजावर हळुहळू शुभ्र नाजूक ढळती   || नभाला आलेली निळसर छटा अंजनी गर्द खुलते       फुलांच्या रंगांनी भरून अवघी भूमिही लाल दिसते   दरीखोरी सारी फ

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय पहिला- अर्जुनविषादयोग

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय-अध्याय पहिला- अर्जुनविषादयोग १. गीताटीकेच्या प्रारंभी श्रीज्ञानदेवांनी केलेली वंदने आणि वर्णने- ॐ या परब्रह्मवाचक शुभाक्षराने श्रीज्ञानदेवांनी आपल्या गीताटीकेच्या -भावार्थदीपिकेच्या- प्रारंभीच्या वंदनांना सुरुवात केली आहे. ॐ काराने कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ करावयाचा या हेतूबरोबरच ज्याला वंदन करायचे तो आत्म्यातच सामावलेला परमेश्वर ही या मंगलाक्षरातच सामावला असल्याची जाणीवही ज्ञानदेवांनी श्रोत्यांना करून दिली आहे . ॐ नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा || पहिले वंदन या ओंकारस्वरूप,वेदप्रतिपादित, आद्य व स्वसंवेद्य अर्थात स्वतःला जाणणार्‍या आत्मरूपाला आहे. हे आत्मरूप हेच परमेश्वरस्वरूप आहे असे सूचित करून ज्ञानेश्वर पहिल्याच वंदनात आपल्या प्रतिपादनाचे वेगळेपण अधोरेखित करतात. .श्रीज्ञानदेवांनी अतिशय अर्थवाही अशा फक्त चार विशेषणांमध्ये या आत्मरूप परमेश्वराचे वर्णन केले आहे.ओंकारस्वरूप असा हा अंतरात्म्यातच वास करणारा परमेश्वर वेदांनी प्रतिपादिलेला,सनातन व स्वतःला जाणणारा,संपूर्ण ज्ञानमय आहे. दुसरे वंदन या पहिल्या वंदनातूनच उगम प

हिवाळ्यातल्या वाऱ्या रे !- Blow, blow thou winter wind- Willliam Shakespeare

हिवाळ्यातल्या वाऱ्या रे ! -“Blow, blow, thou winter wind” - William Shakespeare  हिवाळ्यातल्या वाऱ्या रे !ये ये वादळवेगाने माणसातल्या कृतघ्नतेहुन ना निर्दय तू,मी जाणे जरी झोंबतो अंगांगा तुझा श्वास हा खरखरता   निराकार फिरणारा तू -  दंशही तुझा वरवरचा हैया हो !मग गात फिरू! हिरव्या रानामध्ये शिरू : मैत्र भ्रम असे एक इथे , प्रेम मूर्खता - मनी धरू : तर मग हैया हैया हो ! जीवनात मस्ती राहो ! कडवट आकाशा शिशिरी गोठवशील का तू इतके विस्मृत उपकारापुढती असले चावे पडत फिके पाण्याला गोठवशील तू तरीही नांगी तुझी बरी मित्राला विसरून जाणे जखम खोलवर अधिक करी हैया हो !मग गात फिरू! हिरव्या रानामध्ये शिरू : मैत्र भ्रम असे एक इथे, प्रेम मूर्खता - मनी धरू : तर मग हैया हैया हो ! जीवनात मस्ती राहो ! भारती .. Blow, blow, thou winter wind, Thou art not so unkind As man’s ingratitude; Thy tooth is not so keen, Because thou art not seen, Although thy breath be rude. Heigh-ho! sing, heigh-ho! unto the green holly: Most friendship is feigning, most loving mere folly: Then, heigh-ho,

कुब्ला खान -एक खंडित स्वप्नदृश्य Kubla Khan Or a Vision in a Dream. A Fragment- by Samuel Taylor Colerigde

कुब्ला खान -एक खंडित स्वप्नदृश्य Kubla Khan Or a Vision in a Dream. A Fragment -   by Samuel Taylor Colerigde झनाडू   नाव आहे एका राजविलासी भव्य प्रासादाचं   कुब्ला खानाच्या फर्मानातून झालं होतं निर्माण त्याचं जिथे पवित्र आल्फ नदी अगणित गुहांमधून वाहात झुळझुळत उतरत लोपते शेवटी एका सूर्यहीन समुद्रात दहा मैल पसरलेला तो सुपीक जमिनीचा विस्तार तटबंदी चौबाजू ंनी त्यातच मनोरेही उभे राखणदार बगीच्यांमध्ये कालव्यांची नसांसारखी जाळी चमके बहरलेल्या झाडांचे सुगंध काठांवर.   टेकड्यांइतक्या जुन्या वनांत उन्हेरी हिरवळ-ठिपके.            पण हाय !एक मोहक तिरपी दरी आता पुढे दिसते गर्द डोंगरउतारांवरचे देवदार जी आरपार छेदत जाते   भयविश्वच असावं हे मंत्रभारलेलं. क्षीण चंद्राखाली कुणी स्त्री तिच्या राक्षस प्रियकराला जणू साद घाली. याच दरीत अखंड कसली खळबळ घुसळत वाहे   गडद धुके नेसून पृथ्वी जणू इथे धपापत आहे   झरा मोठा फुटला आहे इतक्या शक्तीनिशी   त्याच्या त्या आवेगाने भूमी फाटत जाते जशी    गारा तडतड पडती तसे मोठे पाषाणाचे तुकडे मुसळाखा

भवारण्यसीमेवरल्या हाका - अनोळखी प्रदेशात आणि रे गोपाळा – सुनंदा भोसेकर

भवारण्यसीमेवरल्या हाका - अनोळखी प्रदेशात आणि रे गोपाळा – सुनंदा भोसेकर एका स्वायत्त प्रातिभ-प्रदेशात तिला भेटण्यासाठी जावं लागतं. तशी ती सभासमारंभात नसते असं नाही. पण तिच्याच शब्दातही ती सापडेल असंही नाही.तिच्यापर्यंत पोचण्याच्या परवलखुणा शोधताना तिला विसरायला हरकत नाही अशा एका प्रांताचं बांधकाम तिने फार पूर्वीपासून सुनियोजितपणे केलं आहे.तिथेच आपण तिच्या हाका ऐकत मग स्वत:लाही विसरून जावं . समकालीन कवयित्रींपैकी एक महत्वाचं नाव- सुनंदा भोसेकर. खूप पूर्वी १९८० मध्ये हातात आला होता तो तिचा ऋचा प्रकाशनकडून आलेला संग्रह –‘’ अनोळखी प्रदेशात ‘’आणि नंतर २००७ मधला ‘’रे गोपाळा ‘’- दोन्ही आता परममित्र प्रकाशनची प्रकाशने आहेत. ‘’अनोळखी प्रदेशात ‘’मधली सुनंदा जेमतेम विशी ओलांडलेली असेल. पण कवितेतली जाणीव तेव्हाही प्रगल्भ.जिच्या लेखनप्रपंचाची सुरुवातच विश्वरहस्याने झाली, तिचं वय कसं ठरवावं ? ‘’हिमार्त वादळी पानझडींचे हिशेब आठवत | आपण आपले विश्वरहस्यासारखे |घोर एकांतिक होऊन जावे हेच बरे.’’ या पहिल्या कवितेच्या पहिल्या ओळीतच तुडुंब एकटेपण, गूढता आणि असीमता   सामावून सुनंदाने आप