ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय बारावा- भक्तियोग

 


ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय बारावा- भक्तियोग


ज्ञानेश्वरकृत श्रीगुरूंच्या कृपादृष्टीचे स्तोत्र

जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।
अनवरत आनंदे । वर्षतिये ॥ १ ॥

गुरुकृपादृष्टी महिमानाच्या या रूपकापासून  बाराव्या अध्यायाची म्हणजेच भक्तियोगाची  ज्ञानदेव सुरुवात करतात. एक ते एकोणीस ओव्यांच्या  या रूपकात  गुरुकृपादृष्टी  ही अनंताच्या खडतर प्रवासातली साक्षात मायमाऊली आहे असे ज्ञानेश्वर त्यांच्या अमोघ सुंदर शैलीत प्रतिपादन करतात.


ते म्हणतात, "हे शुद्धे ,उदारे, प्रसिद्धे, निरंतर आनंदाची वृष्टी अशा हे श्रीगुरुकृपादृष्टीदेवते!  विषयरूप सर्पाचे विष तू क्षणात उतरवतेस, मग ताप कसला? शोक कुठला? तुझ्या प्रसादरसमहापुरात सारे शांतमंगलच होते. तुझ्यामुळे सेवकांना योगसुखाचे सोहळे भोगावयास मिळतात. सोहमसिद्धीची त्यांची आवड तू पुरवतेस. योगाच्या मांडीवर तू तुझी बाळे जोजवतेस .हृदयाकाशाच्या पाळण्यात गुह्य उपदेशाची अंगाई गात झोके देतेस.प्रत्यक् ज्योतीने त्यांना ओवाळतेस. मनपवनाची खेळणी त्यांच्यापुढे मांडतेस. आत्मसुखाची बाळलेणी घालून त्यांना सजवतेस. जीवनकळेचे दूध तू बाळांना पाजतेस. अनाहत नादाचे गाणे गातेस. समाधीच्या ज्ञानाची नीज तू त्यांना थोपटून आणतेस.
अशी साधकांची तू मायमाऊली आहेस. तुझ्या पावलांच्या आश्रयाने सकळ विद्या-कलांचा परिपोष होतो, म्हणून तुझी सावलीसुद्धा मी सोडून जाऊ इच्छित नाही . 

हे गुरुकृपादृष्टीमाते,तुझ्या करूणेचे अधिष्ठान ज्याला लाभले, तो सकळविद्या सृष्टीचा ब्रह्मदेव ठरला. म्हणून हे ऐश्वर्यशालिनी अंबे, स्वजनांची कल्पवल्लरी अशा तुझ्याकडे मी ग्रंथनिरुपणाची आज्ञा मागत आहे. येथे नऊ रसांचे सागर उचंबळू देत.उचित,योग्य अशा भाषालंकारांचे आगर ओसंडू दे.भावार्थाचे पर्वत उभे राहू देत. साहित्यरूप सुवर्णाच्या खाणी या मराठीच्या भूमीत उघडू देत. विवेकरूप वेलींचे वन माजू दे. संवादफळांनी लगडलेली सिद्धांताची वने उपवने घनदाट वाढू देत. पाखंडांचे खळगे व वादांचे आडमार्ग तू मोडून काढ. कुतर्काची क्रूर श्वापदे निर्दाळून टाक.
श्रीकृष्णगुणीं मातें । सर्वत्र करीं वो सरतें ।
राणिवे बैसवी श्रोते । श्रवणाचिये ॥ १५ ॥
ये मर्‍हाठियेचिया नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं ।
घेणें देणें सुखचिवरी । हों देईं या जगा ॥ १६ ॥
तूं आपुलेनि स्नेहपल्लवें । मातें पांघुरविशील सदैवें ।
तरी आतांचि हें आघवें । निर्मीन माये ॥ १७ ॥
मला जेथे तेथे श्रीकृष्णगुणवर्णनात श्रेष्ठ कर .श्रोत्यांना श्रवणसुखाच्या राजसिंहासनावर बसव. या मराठीच्या नगरात ब्रह्मविद्येचा सुकाळ करून सोड. तिचे देणे व घेणे सर्वतोपरी सुखमय होईल असे कर. तुझ्या मायेचा पदर माझ्यावर सदैव पांघरशील, तर हे माये, हे सारे आत्ताच निर्माण करेन!"
"ये मर्‍हाठियेचिया नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं ।
घेणें देणें सुखचिवरी । हों देईं या जगा"- 
मराठी मनाला कधीही विसर पडणार नाही अशा अजरामर ओळी या रूपकात अंतर्भूत आहेत.बाराव्या अध्यायातील  ही सोळावी ओवी लोकमानसामध्ये सर्वश्रुत अशी आहे. वेळोवेळी मराठी भाषेचा जो अभिमान ज्ञानदेवांनी प्रकट केला आहे,मायबोलीच्या सन्मानार्थ ज्या पंक्तींची योजना केली आहे त्या पंक्तींमध्ये ही ओवी समाविष्ट आहे. "तीरे संस्कृतची गहने |तोडोनी मर्‍हाठी शब्दसोपाने|" अशा आशयाचे विधान अकराव्या अध्यायात करणारे ज्ञानदेव येथील सांगत आहेत की मराठीला साधीसुधी व उपेक्षित समजण्याचे काहीच कारण नाही, कारण तिच्या समर्थ पुत्रांनी तिच्याच नगरात ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याचा शुभसंकल्प आपल्या गुरूंच्या कृपेने केला आहे. जिचे देणे व घेणे दोन्ही सुखमय अशी ही ब्रह्मविद्या आजवर संस्कृत भाषेच्या सर्वसामान्यांहून दूर अशा एका नगरात वसत होती, श्रीगुरुकृपेने तिचा वसंत आता मराठीच्या परिसरात फुलणार फळणार आहे, अशा अर्थाची ही ओवी आणि तिच्यात व्यक्त केलेली आत्मविश्वासपूर्ण प्रार्थना ज्ञानदेवांच्या  महाकृतीच्या प्रतिष्ठेला साजणारी आहे.

या विनवणीवर गुरुकृपादृष्टी प्रसन्न होऊन म्हणाली, "गीतार्थ विवरण्यास उठ. आता अधिक बोलू नकोस!"

अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांची ज्ञानदेवांनी केलेली मांडणी

ज्ञानेश्वरीमधील या अध्यायाचे तात्त्विक वैशिष्ट्य असे आहे की बाराव्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचा उगम अकराव्या अध्यायातील विश्वरूपदर्शनअनुभवात आहे, हे स्पष्ट करणारी मांडणी ज्ञानदेवांनी केली आहे.

ते लिहितात,"तेव्हा विजयध्वज अर्जुन भगवंताला विचारता झाला, हे श्रीकृष्णा आपल्या अद्भुत विश्वरूपामुळे माझे चित्त भयभीत झाले आहे. तुमच्या परिचित मूर्तीचीच ओढ मनाला वाटते आहे.तर ती आवड धरू नकोस म्हणून तुम्हीच तिचे निवारण करता. तर आता मला पुरते समजले की व्यक्त आणि अव्यक्त ही नि:संशय तुझीच रुपे आहेत. भक्तीमुळे व्यक्तरूप प्राप्त होते, योगामुळे अव्यक्तरूप प्राप्त होते. तुला येऊन मिळण्यासाठी ही दोन रुपे आहेत. सोन्याचा शंभर भाराला जो कस लागतो तोच एकभारासाठीही लागतो. म्हणून एकदेशीय व व्यापक या दोन्ही रूपांची योग्यता एकच आहे. माझे चित्त याची प्रचीति घेऊन चुकले आहे. याचीच परीक्षा घेण्यासाठी प्रभू, आपण क्षणभर विराटरूप धारण केले .
पण आता असा प्रश्न पडला आहे की ,आपल्या सर्व मनोधर्मे जे भक्तीला विकले गेले, तूच ज्यांचे परमनिधान,अंत:करणात तुलाच घट्ट धरून जे सर्वपरींनी तुझी उपासना करतात, हे तुझे भक्त होऊन आणि जे ओंकाराच्याही पलीकडे वाणीलाही अवघड, कशाहीसारख्या नसलेल्या अक्षर अव्यक्त देशरहित अशा निर्मळ परब्रह्माला उपासतात ते ज्ञानीजन, यापैकी खरा योग कोणी जाणला?
तें अक्षर जी अव्यक्त । निर्देश देशरहित ।
सोऽहंभावें उपासित । ज्ञानिये जे ॥ ३२ ॥
तयां आणि जी भक्तां । येरयेरांमाजी अनंता ।
कवणें योगु तत्त्वतां । जाणितला सांगा ॥ ३३ ॥
अशा प्रकारे "तेषां के योगवित्तमा:"  या अर्जुनाच्या गीतेतील मूळ प्रश्नाची मांडणी त्याच्या भावस्थितीच्या अधिक जवळ जाऊन ज्ञानदेवांनी केली आहे.

ईश्वराच्या व्यक्त आणि अव्यक्त रूपांची उपासना करणाऱ्या साधकांमध्ये श्रेष्ठ कोण  आणि का -
अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना पहिल्याच श्लोकात "मय्यावेश्य मनो ये मां"- असे म्हणत भगवंताने या प्रश्नाचे निवारण करून नंतर पूर्ण विवरण केले आहे.
त्यावर श्रीज्ञानेश्वरांचे भाष्य असे आहे-
इया किरीटीचिया बोला । तो जगद्‌बंधु संतोषला ।
म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करूं ॥ ३४ ॥
अर्जुनाच्या या बोलांनी तो जगद्बंधू श्रीकृष्ण संतुष्ट होऊन म्हणाला," तू खरेच चांगला प्रश्न करू शकतोस." भगवंताचे सगुण व निर्गुण अशी दोन्ही रूपे पाहून झाल्यावरच व अर्जुनासारख्या भक्तश्रेष्ठालाच सुचू शकणारा हा प्रश्न आहे. भक्तिभावाने भगवंताला भजणारे, त्यालाच जीवभाव वाहिलेले सगुणोपासक भक्त व त्याच्या अव्यक्त अक्षर परब्रह्म रूपाकडे आकृष्ट होणारे ज्ञानमार्गी यात श्रेष्ठ कोण हा प्रश्नच मुळात अतिशय मार्मिक आहे.
सबंध गीता हा श्रीकृष्णार्जुन संवाद असल्याने अर्जुनाच्या अशा अत्यंत मार्मिक शंका सर्वत्रच येत असतात व त्यातून भगवंतांच्या निवेदनाचा तात्त्विक परिपोष होताना दिसतो. येथेही या टप्प्यावर झालेली ही विचारणा तत्त्वचर्चेतून नेमके सत्व मागणारी आहे हे जाणून भगवंतांनी प्रथम अर्जुनाचं कौतुक केले आहे आणि नंतर त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.


श्रीभगवंत म्हणाले,"अस्ताचलावरच्या सूर्यबिंबामागून ज्याप्रमाणे किरण जातात, किंवा वर्षाकाळी नदीचा ओघ जसा चढतावाढता दिसतो तशी ज्यांची श्रद्धा नित्य नवीच असते, गंगा समुद्राला मिळाली तरी मागले अनिवार ओघ पुन्हा पुन्हा येऊन सागरात लोटतच राहतात असा ज्यांचा तुडुंब निरंतर प्रेमभाव, तसे सर्व इंद्रियांसहवर्तमान माझ्यात चित्त गुंतवून जे रात्र दिवस न म्हणता माझी उपासना करतात ,तेच माझे भक्त परम योगयुक्त असे मी मानतो.."

याचे कारण देताना श्रीभगवंतांनी अव्यक्ताची आराधना करणाऱ्यांचे कष्ट चित्रित केले आहेत. मनाचेही नख जेथे लागत नाही, बुद्धीची दृष्टी शिरत नाही, इंद्रियनिश्चयाचा तर प्रश्नच उद्भवत नाही ,ज्याचे चिंतन करताना विचार कुंठित होतो,असे अव्यक्त परब्रह्म जे उपासतात त्यांचा मार्ग खूपच अवघड. वैराग्यरूप तीव्र  अग्नीने विषयांची सैन्ये जाळताना इंद्रियांचीही  होरपळ होते .त्यातच संयमाचा फास घालून ही इंद्रिये हृदयस्थानी कोंडून घातलेली असतात.अपानाच्या तोंडाला घट्ट आसनमुद्रा  लावून मूळबंधाचा बुरुज हे ज्ञानीश्रेष्ठ लढवतात. त्या अग्नीत सप्तधातूंची होळी करून अनेक व्याधींनी शरीरस्थ यंत्रांची आराधना करतात. येथे श्री ज्ञानदेव गूढ अशा योगिक प्रक्रियांसहित केलेला साधनामार्गातील खडतर प्रवास शब्दबद्ध करतात
प्राणशक्तिचामुंडे । प्रहारूनि संकल्पमेंढे ।
मनोमहिषाचेनि मुंडें । दिधलीं बळी ॥ ५३ ॥
(ते अव्यक्ताचे साधक) प्राणशक्तिरूपी चामुंडा देवी समोर संकल्परूपी मेंढे मारून ते मेंढे व मनोरूपी महिषाचे मस्तक हे बळी देतात.
चंद्रसूर्यां बुझावणी । करूनि अनुहताची सुडावणी ।
सतरावियेचें पाणी । जिंतिलें वेगीं ॥ ५४ ॥
मग ते इडा व पिंगळा नाड्यांना सुषुम्नेत विलीन करून अनाहत शब्दाचा गजर करून  (ब्रह्मरंध्रातील) चंद्रामृत त्वरेने जिंकतात.
अशा आत्मक्लेशी मार्गाने ते ब्रह्मरंध्रापर्यंतचा प्रवास करून ब्रह्माशी एकरूप  होतात. पण या भक्तीशिवायच्या अव्यक्ताच्या आसक्तीत महेंद्रासारखी पदे आडवी येतात, ऋद्धी-सिद्धींचे मोह पडतात. कामक्रोधाचे उपद्रव छळतात व  शून्याशी शरीर झुंजवावे लागते.तहानेनेच तहान मारावी,भुकेने भूक खावी,हाताच्या वावाने वारा मोजावा,शीत नेसावे, उष्ण पांघरावे, वृष्टीच्या घरात राहावे थोडक्यात पतीशिवाय नित्य नव्याने सती जावे असा हा संघर्ष असतो !
शीत वेढावें । उष्ण पांघुरावें ।
वृष्टीचिया असावें । घरांआंतु ॥ ६५ ॥
किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेशु नीच नवा ।
भ्रतारेंवीण करावा । तो हा योगु ॥ ६६ ॥
जीवाला निराकाराचा छंद लागणे हे इतके अवघड, क्लेशकारक आणि उपाधीने भरलेले असते. म्हणूनच पूर्वोक्त भक्तजन हे ज्ञानीजनांपेक्षाही श्रेष्ठ आहेत.

भगवंताच्या सगुणरूपाच्या उपासक भक्ताची  लक्षणे

"ये तु सर्वाणि कर्माणि" या बाराव्या अध्यायातील सहाव्या श्लोकात वर्णिलेली ही लक्षणे ज्ञानेश्वरी याप्रकारे आली आहेत-
वर्णविशेषामुळे जी जी कर्मे वाट्याला आली आहेत, ती ती  सर्व कर्मेंद्रिये सुखाने करत आहेत.विधिनिषेधफलानुसार विधीचे पालन करीत व निषेधांना म्हणजेच अकर्मांना टाळीत सगुणभक्त जीवनक्रमणा करतो.पण हे करताना तो कर्मफळे ईश्वराला अर्पण करून नि:शेष करून टाकतो.
कर्मेंद्रियें सुखें । करिती कर्में अशेखें ।
जियें कां वर्णविशेखें । भागा आलीं ॥ ७६ ॥
विधीतें पाळित । निषेधातें गाळित ।
मज देऊनि जाळित । कर्मफळें ॥ ७७ ॥
कायावाचामनामध्ये जे भावतरंग उठतात, त्यांना परमेश्वराशिवाय दुसरी गती ठाऊक नसते. असे जे भगवंताशी परायण होऊन त्याची उपासना करतात ते ध्यानाच्या निमित्ताने त्याचे घर होऊन जातात. त्यांची प्रीती एका भगवंताशीच देवघेव करते, त्यासाठी भोगमोक्षासारखी कुळेही त्यांना तुच्छ वाटतात असे एकनिष्ठेने जीव,मन व शरीरेकरुन भगवंताला सगुणोपासक भक्त विकले गेले असतात.
मातेच्या उदरी जो येईल त्याचे मातेचे सोयरेपण केवढे?त्याचप्रमाणे अशा सगुण भक्तांचा सर्व भरिभार भगवंताने घेतलेला असतो. समर्थाची पत्नी भिक्षा मागेल का? तसेच त्यांचे असते. त्यांना संसारचिंतेची फिकीर कधीच नसते. ते जणू भगवंताची पत्नीच. त्यांचे काहीही करण्याची लाज भगवंताला वाटत नाही.
एर्‍हवीं तरी माझियां भक्तां । आणि संसाराची चिंता ।
काय समर्थाची कांता । कोरान्न मागे ॥ ८५ ॥
तैसे ते माझें । कलत्र हें जाणिजे ।
कायिसेनिही न लजें । तयांचेनि मी ॥ ८६ ॥
पण जन्म-मृत्यूच्या लाटांचा झपाटा, भवसिंधूचे उफाळते पाणी त्यांनाही भयव्याप्त  करू शकते. यासाठीच भगवंत निरनिराळे सगुण अवतार घेऊन त्यांच्या गावी धावत जातात. त्यांना आपल्या ध्यानाच्या, प्रेमाच्या मार्गाला लावून सायुज्याच्या किनाऱ्यावर घेऊन जातात.
भवसिंधूचेनि माजें । कवणासि धाकु नुपजे ।
तेथ जरी कीं माझे । बिहिती हन ॥ ८८ ॥
म्हणोनि गा पांडवा । मूर्तीचा मेळावा ।
करूनि त्यांचिया गांवा । धांवतु आलों ॥ ८९ ॥
अशाप्रकारे सगुणोपासक भक्त हा अनन्यभक्‍तीच्या योगाने त्याच्या नित्यनैमित्तिकांपासून ते संकटकालांपर्यंत नेहमीच प्रभूशी एकनिष्ठ असतो. ती निष्ठाच त्याचा मोक्षमार्ग ठरते.

मन एकाग्र करण्यासाठी प्रभूने सांगितलेली साधने
"मय्येव मन आधस्त्व"पासून पुढील पाच श्लोकात प्रभूने मन एकाग्र करण्याची साधने क्रमशः सांगितलेली आहेत.
मन आणि बुद्धी स्थिर करून प्रेमभराने भगवंतामध्ये विरवून सोडली तर भक्त व  भगवंत वेगळा राहतच नाही. दिव्याचा लय होताच तेजाचा पसारा आटोपतो. प्राण जाऊ लागले की इंद्रियेही बरोबरच निघतात त्याचप्रमाणे मन आणि बुद्धी बरोबरच अहंकारही श्रीचरणी लीन होतो व भक्त सर्वव्यापक भगवंताहून  वेगळा उरत नाही.
म्हणोनि माझिया स्वरूपीं । मनबुद्धि इयें निक्षेपीं ।
येतुलेनि सर्वव्यापी । मीचि होसी ॥ १०२ ॥
पण मनबुद्धीसहित चित्त भगवंताच्या ठायी अर्पण करणे अजिबात सोपे नाहीच. अशा परिस्थितीत आठ प्रहरांमधून क्षणभर तरी ते भगवंताकडे नक्कीच लावता येईल! 
अथवा हें चित्त । मनबुद्धिसहित ।
माझ्यां हातीं अचुंबित । न शकसी देवों ॥ १०४ ॥
तरी गा ऐसें करीं । यया आठां पाहारांमाझारीं ।
मोटकें निमिषभरी । देतु जाय ॥ १०५ ॥
मग जेवढे भगवंताचे सुख, गोडी त्याला लागेल तसतशी विषयांची अरुची वाढीस लागेल. शरदऋतूमध्ये नदीचा प्रवाह ओहोटून जावा तसे प्रपंचातून मन उठू लागेल. पौर्णिमेहून झिजत जाणारे शशिबिंब अमावास्येला समूळ नाहीसे होते त्याप्रमाणे चित्त हळूहळू भगवद्रूप होईल. यालाच भगवंतांनी अभ्यासयोग म्हटले आहे. की ज्याच्या योगाने काहीच असाध्य नाही. कोणी अंतरिक्षात गती प्राप्त करतो,कोणी हिंस्र श्वापदांशी मैत्री करतो, कोणी विष पचवू शकतो. "असाध्य ते साध्य" करणारा असाच हा योग आहे.
म्हणोनि अभ्यासासी कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।
यालागी माझ्या ठायीं । अभ्यासें मीळ ॥ ११३ ॥
पण अभ्यासाचेही सामर्थ्य कोणाच्या अंगी नसेल, तर भगवंत म्हणतात ,"जेथे आहेस तसाच राहा!  इंद्रियांना कोंडणे नको ,भोगाला तोडणे नको, जातीचा अभिमान सोडणे नको, कुळधर्म ,विधिनिषेध सारे यथासांग चालू दे. पण मन,वाचा, देहाने जो व्यवहार होतो आहे तो "मी केला" असे म्हणणे फक्त सोडून द्यावयाचे.
कुळधर्मु चाळीं । विधिनिषेध पाळीं ।
मग सुखें तुज सरळी । दिधली आहे ॥ ११६ ॥
परी मनें वाचा देहें । जैसा जो व्यापारु होये ।
तो मी करीतु आहें । ऐसें न म्हणें ॥ ११७॥
ज्याच्या सत्तेने विश्व चालते त्या परमेश्वरावर करणे न करणे सोडून आयुष्याचे सार्थक करता येते. जेथे माळी नेतो तेथे पाणी मुकाटपणे जाते .त्याप्रमाणे जे जे  कर्म उत्पन्न होते ते कमीअधिक न म्हणता परमेश्वराच्या ठायी अर्पून सायुज्यसदनास पोचता येते.
कर्म भगवंताच्या चरणी अर्पण करणेही कठीण वाटत असेल तर कर्मफळांचा शून्यात तरी त्याग करत जावे.
वन्हीची ज्वाळा जैसी । वायां जाय आकाशीं ।
क्रिया जिरों दे तैसी । शून्यामाजी ॥ १३२॥
अर्जुना हा फलत्यागु । आवडे कीर असलगु ।
परी योगामाजीं योगु । धुरेचा हा ॥ १३३ ॥
खडकावरील मेघवृष्टीप्रमाणे किंवा अग्निमधील बीजपेरणीप्रमाणे निष्काम भावनेने कर्मत्याग केल्यास सोडलेल्या कर्मांचे विस्तार खुंटतात व पुनर्जन्मांची समाप्ती होते.
अशा क्रमाने अभ्यासातून ज्ञानसंपादन व ज्ञानातून ध्यानाकडे यावे.सर्वकर्मफलत्यागातून परिपूर्ण शांतीचा अनुभव घ्यावा.
अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान ।
ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४०॥
मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु ।
त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४१ ॥

अशा प्रकारे मन एकाग्र करण्याच्या एकाहून एक वरचढ युक्ती परमेश्वराने येथे सांगितल्या आहेत.

श्रीहरीने वर्णिलेला साद्यंत भक्तियोग
" जो हा अर्जुना साद्यंत |सांगितला प्रस्तुत| भक्तियोग समस्त| योगरुप॥"असे श्री भगवंतांनी ज्या भक्तियोगाबद्दल म्हटले आहे ,त्या भक्तियोगाचा अभ्यास कसा वाढवावा ते वरती आलेच  आहे.आता या भक्तियोगाची व्यवच्छेदक लक्षणे "अद्वेष्टा सर्वभूतानां" या तेराव्या श्लोकापासून परमेश्वराने साद्यंत वर्णिलेली आहेत.

पहिले लक्षण म्हणजे सर्व भूतांच्या ठायी द्वेषाचा अभाव. येथे ज्ञानेश्वर सुंदर उपमा-दृष्टांतांचा वर्षाव करतात व भक्ताचे स्वे-तर सृष्टीशी समत्वाने वर्तणे कसे असते हे समजावून सांगतात.
ते म्हणतात ,"जसे की चैतन्य सर्वत्र एकरसाने वर्तते, पृथ्वी उत्तमाधमाचा आपपरभाव करत नाही, प्राण राजा आणि रंकामध्ये सारख्याच कृपेने नांदतात ,पाणी वाघाची व गायीची तृष्णा एकभावाने भागवते,  त्याप्रमाणे सर्व भूतांशी मैत्र हे या भक्तियोगाची महत्त्वाची खूण आहे. "
उत्तमातें धरिजे । अधमातें अव्हेरिजे ।
हें काहींचि नेणिजे । वसुधा जेवीं ॥ १४४ ॥
कां रायाचें देह चाळूं । रंकातें परौतें गाळूं ।
हें न म्हणेचि कृपाळू । प्राणु पैं गा ॥ १४५ ॥
गाईची तृषा हरूं । कां व्याघ्रा विष होऊनि मारूं ।
ऐसें नेणेंचि गा करूं । तोय जैसें ॥ १४६ ॥
सतत संतुष्टता व दृढनिश्चय व परमेश्वराच्या ठिकाणी वाहिलेली मनोबुद्धी हे भक्तियोग अभ्यासणाऱ्या भक्तश्रेष्ठाचे आणखी एक लक्षण आहे .वृष्टीशिवायही समुद्र जिथला तिथेच असतो, तसेच त्याचे समाधान बाह्य उपाधींवर अवलंबून नसते.
जगाच्या व्यवहाराने ज्याला त्रास होत  नाही व ज्याचा लोकांना त्रास होत नाही, तोच खरा भक्तियोगी समजावा. शरीर ज्याप्रमाणे अवयवांचा कंटाळा कळत नाही त्याचप्रमाणे सर्व जग हेच ज्याचा देह झाले, त्याला कोणीच अप्रिय अप्रिय उरत नाही. हर्ष, अमर्ष ,उद्वेग यांच्या पलीकडे तो जातो .असा भक्तश्रेष्ठ निरपेक्ष व्यवहार करणारा असतो.त्याचे निखळ अस्तित्व हीच सुखाची निरंतर वृद्धी.
जगचि देह जाहलें । म्हणोनि प्रियाप्रिय गेलें ।
हर्षामर्ष ठेले । दुजेनविण ॥ १६८ ॥
जयाचिया ठायीं पांडवा । अपेक्षे नाहीं रिगावा ।
सुखासि चढावा । जयाचें असणें ॥ १७२ ॥
त्याची शुचिता काशीहूनही श्रेष्ठ कारण तेथे  शरीरत्याग करावा लागतो.हिमवंतही  दोषनाशक, पण तेथेही प्राण अर्पण करावे लागतात. गंगेतही बुडावे लागते. न मरताच शुद्धता देणारा असा सहवास भक्ताचाच असतो. आकाशाप्रमाणे व्यापक असून त्याचे मन तसेच उदासीन व संसार व्यथेतून सुटलेले असते. जसा की पारध्याच्या तावडीतून निसटलेला पक्षीच.
व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश ।
तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा ॥ १८० ॥
संसारव्यथे फिटला । जो नैराश्यें विनटला ।
व्याधाहातोनि सुटला । विहंगु जैसा ॥ १८१ ॥
या भक्तियोगात श्रेष्ठ पदास पोचलेला भक्त आत्मलाभासारखे दुसरे काहीच नाही हे जाणून हर्षत नाही, भेदभाव लोपल्यामुळे द्वेष करत नाही.  इच्छा करत नाही. शुभाशुभ द्वंद्वात सापडत नाही. "अखंड बोधाची भजनशील मूर्ती" असेच त्याचे वर्णन करावे लागेल.तरी अरे अर्जुना, त्याच्यासारखे दुसरे आवडते आम्हाला खरोखर कोणी नाही, हे तुझी शपथ घेऊन सांगतो.
ऐसा बोधुचि केवळु । जो होवोनि असे निखळु ।
त्याहीवरी भजनशीळु । माझ्या ठायीं ॥ १९५ ॥
तरी तया ऐसें दुसरें । आम्हां पढियंतें सोयरें ।
नाहीं गा साचोकारें । तुझी आण ॥ १९६ ॥
त्याच्या ठिकाणी वैष्यम्याची वार्ताच नसते. शत्रु मित्र दोन्ही त्याला सारखेच.दिवा घरात उजेड करेल, परक्याला अंधार देईल,असे संभवते का ?ऊस लावणाऱ्याला गोड व गाळणाऱ्याला कडू असा कधीच नसतो. मानापमान, शीतोष्ण त्याला सारखेच. गगनात तिन्ही ऋतूंची ये जा होते पण ते जसे त्यापलीकडे अविचल असते ,तसेच त्याचे अस्तित्व .अंतर्बाह्य संग सोडून शरीरात शरीर लय करून त्याचे रहाणे असते .
आकाशाला लेप होत नाही, तद्वत त्याला निंदा स्तुती सारखीच. मौन त्याला प्रिय असते. वायूला एका ठिकाणी बिऱ्हाड नसते, तसाच तो अनिकेत असतो. पण त्याला अनिकेत कसे म्हणावे ?विश्व हेच त्याचे घर असते .तशीच त्याची स्थिरबुद्धी असते. किंबहुना तो स्वतःच चराचर होऊन राहिलेला असतो.
अर्जुना, इतके असूनही अधिक ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी उत्सुकता असते, तर त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो.
आघवाची आकाशस्थिति । जेवीं वायूसि नित्य वसती ।
तेवीं जगचि विश्रांती- । स्थान जया ॥ २१०॥
हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ॥ २११ ॥
मग याहीवरी पार्था । माझ्या भजनीं आस्था ।
तरी तयातें मी माथां । मुकुट करीं ॥ २१२ ॥
साद्यंत भक्तियोगाची (किंवा भक्तियोग्याचीही ) ही लक्षणे वर्णन करून श्रीहरी म्हणतात," अशा भक्तश्रेष्ठासाठी मला अचक्षूला डोळे आहेत ,त्याला आलिंगन देण्यासाठी मी हा चार हातांचा देह धारण केला आहे .हातातील लीलाकमळ त्याच्याच पूजेसाठी आहे .
तो पहावा हे डोहळे । म्हणोनि अचक्षूसी मज डोळे ।
हातींचेनि लीलाकमळें । पुजूं तयातें ॥ २२१॥
दोंवरी दोनी । भुजा आलों घेउनि ।
आलिंगावयालागुनी । तयाचें आंग ॥ २२२॥
त्याच्याबरोबरचे मैत्र काय वर्णन करावे? पण त्याच्या चरित्राची प्रशंसा करणाऱ्यांबद्दल मला प्राणाहून प्रेम वाटते.
तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें ।
जे भक्तचरित्रातें । प्रशंसिती ॥ २२५ ॥
या शब्दात भगवंताने भक्तश्रेष्ठाबद्दलची आपली निरतिशय प्रेमभावना व्यक्त केली आहे. सगुणोपासक भक्तासाठी प्रत्यक्ष परमेश्वरालाच सगुणरूपाचा आश्रय करावा लागतो यातच सारे काही सामावले आहे.
आम्हीं तयांचें करूं ध्यान । ते आमुचें देवतार्चन ।
ते वांचूनि आन । गोमटें नाहीं ॥ २३३॥
तयांचें आम्हां व्यसन । ते आमुचें निधिनिधान ।
किंबहुना समाधान । ते मिळती तैं ॥ २३४ ॥
या ओव्यांमध्ये तर चक्क भूमिकांची अदलाबदल झालेली दिसते. इथे परमेश्वरच भक्तश्रेष्ठाचे ध्यान आणि अर्चन करू इच्छितो, त्याशिवाय त्याला काहीही गोड वाटत नाही. इतकेच नाही तर  परमेश्वरालाच भक्तश्रेष्ठाचे व्यसन जडलेले आहे आणि भक्तश्रेष्ठ भेटतो तेव्हाच त्याला समाधान मिळते इथपर्यंत ते व्यसन वाढलेले आहे असे ज्ञानदेव पराकोटीच्या भावुकतेने निवेदन करतात.
ज्ञानदेव म्हणे तुम्ही । संत वोळगावेति आम्ही ।
हें पढविलों जी स्वामी । निवृत्तिदेवीं ॥ २४४॥
"ये तो धर्म्यामृतमिदं" या बाराव्या अध्यायाच्या समारोपाच्या श्लोकात भगवंत म्हणतात, अशा भक्तश्रेष्ठांची ही लक्षणे, ही धर्मानुकूल गोष्ट जे श्रद्धेने श्रवण करतील तेही मला अत्यंत प्रिय आहेत.
श्री ज्ञानदेव त्यावर भाष्य करतात, की अशा भक्तांना ,संतांना शरण जावे हे श्रीनिवृत्तीनाथांनी आम्हाला शिकवले आहेच. 
बाराव्या अध्यायाचे सार हेच आहे की या परमवैराग्ययुक्त संतांना शरण जावे कारण ते भगवंताहून वेगळे नाहीत. भगवंताला स्वतःच्या स्तुतीपेक्षाही त्यांची स्तुती अधिक प्रिय आहे.







Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग