शहराचं शोकगीत : (अनुकृती- मूळ कविता रॉबर्ट पिन्स्की )
रॉबर्ट पिन्स्की हे १९४० मध्ये जन्मलेले अमेरिकेचे महान कवी, समीक्षक, साहित्यिक , अनुवादक.Poet Laureate म्हणूनही अमेरिकेने त्यांना मान्यता दिली. जवळजवळ १९ कवितासंग्रह लिहिणारे पिन्स्की कवितेला मौखिक कला मानतात आणि सामान्य लोकांना तिच्या महाप्रवाहात सामील करून घेण्याचे यशस्वी प्रयोग त्यांनी केले आहेत. ‘’ City Elegies ‘’ – शहराचे शोकगीत - या कवितामालिकेचा पहिला भाग .ज्यात त्यांची महानगरीय संपन्न जाणीव आधुनिक कवितेची व्यामिश्र अनुभूती वाचकाला देते. शहराचं शोकगीत : प्रत्येकजण असा भरकटत रहातो इथे पूर्ण दिवसभर स्वतःचं बंदिस्त शहर घेऊन हेलकावत राहातो शहरभर मंत्रभारित ओसाड : जणू एक स्थानकच शहरगर्भात कुठे गेलं माझं ते दार जे उघडतं मागल्या आळीत ? भिंती दगडमंडित,चढउतरते वीटढिगारे,स्फटिक-कडे कुठं आहे तो माझा रेखीव रस्ता जाणारा बंदराकडे ? ती खानावळ ?कुठे लपला कारखाना? ते घर प्रेमाचे जोडकमानीची छतं ?ते काळोख कातळचौकोनांचे ? कुठाय ती बाग ? वृक्षात झाकलेलं बाकडं लोखंडी ? शहारत्या वेली.रहदारीवर झुकते देवदारांची रांग खडी आता आहे आपल्यामध्ये एक डोंगर, अरण्यातली दरी दोघांना पाहिलं जिथे श...