ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -ध्यानयोग -अध्याय सहावा
ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -ध्यानयोग - अध्याय सहावा धृतराष्ट्राचा मोह सहाव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच संजयाने धृतराष्ट्रास म्हटले," येथे श्रीकृष्ण योगरूप अभिप्राय अर्जुनास सांगण्यास सिद्ध झाले आहेत .अनायासे हे श्रवणाचे परमसुख आम्हास मिळत आहे .जणू ब्रह्मरसाचे हे जेवण रांधले असताना आपण येथे अकस्मात पाहुणे आलो किंवा तहानलेल्याने पाणी म्हणून प्यावे ते अमृतच असावे ,असा हा योग आहे." - यावर धृतराष्ट्र कोरडेपणाने म्हणाला," हे तुला आम्ही विचारले नाही." त्याच्या या अलिप्तपणामागे त्याचा अविवेकी पुत्रमोह आहे, धृतराष्ट्र मोहाने ग्रासला आहे हे संजयाला जाणवले. सहाव्या अध्यायाचे ज्ञानदेवप्रणित महत्त्व आणि प्रतिज्ञा- समुद्रमंथनातून अमृतप्राप्तीचा जो क्षण, तोच या गीतार्थमंथनात सहाव्या अध्यायाचा आहे असं श्रीज्ञानदेव म्हणतात. गीतार्थाचे सारतत्त्व, विवेकसमुद्राचे पैलतीर,अनेक योगसमृद्धींचे भांडार या अध्यायात उमटले आहे .आदिमाया जेथे विश्रांती घेते, शब्दब्रह्म जेथे मौनात विलीन होते, तेथून याच्या अर्थाचा अंकुर जोमाने फोफावतो. श्रीज्ञानदेव प्रतिज्ञापूर्वक म्हणतात- माझा मराठाचि बो...