ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -कर्मसंन्यास योग -अध्याय पाचवा

 ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -कर्मसंन्यास योग -अध्याय पाचवा


अर्जुनाचा प्रश्‍न- संन्यास श्रेष्ठ की कर्म -

पाचव्या अध्यायाच्या सुरुवातीसच अर्जुनाने श्रीहरीला विचारले," हे श्रीकृष्णा, हे तुमचे बोलणे तरी कसे आहे? तुम्ही एकच गोष्ट निश्चित सांगावी, तर ती अंतःकरणात धरून ठेवता येईल .मागे तुम्ही सकळ कर्मांच्या संन्यासाबद्दल बरेच निरूपण केले आणि आता कर्मयोगाच्या पक्षाने बोलत आहात .आम्हा अजाणांसमोर अशी द्व्यर्थी भाषा करून आपण आम्हाला गोंधळून टाकत आहात.
ऐकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे ।
हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ॥ ४ ॥
ऐका. एक तत्व जर सांगावयाचे असेल तर एकच निश्चित सांगितले पाहिजे, हे तुम्हाला दुसर्‍यांनी सांगवयास पाहिजे काय ? 
तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें ।
जे हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा ॥ ५ ॥
एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या श्रेष्ठांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये. 
"बोध हा नेहमीच एकाच तत्त्वाचा, एकाच निष्ठेने करावा हे काय मी तुम्हाला सांगावे? तर आता हा परमार्थ ध्वन्यर्थाने न सांगता प्रकटपणे सांगावा ,संन्यास आणि कर्म या दोघांमधला चांगला मार्ग कोणता याचा स्पष्ट निर्णय द्यावा ,जो आम्हास अवलंबिता येईल."

श्रीहरीप्रणित सांख्य व कर्म या दोन्हीतला भेद व अभेद-

तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोगु विचारितां ।
मोक्षकरु तत्त्वता । दोनीही होती ॥ १५ ॥
श्रीकृष्ण म्हणाले – अर्जुना हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्त्विक दृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. 
तरी जाणानेणा सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळा ।
जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणीं ॥ १६ ॥
तरीपण जाणते व नेणते या सगळ्यांना या दोहोंपैकी निष्काम कर्मयोग आचरण्याला सरळ आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरून जाण्याला स्त्रियांना व बालकांना होडी हे सुलभ साधन आहे त्याप्रमाणे भवसागरातून तरून जाण्यास हा कर्मयोग सोपे साधन आहे.

सांख्ययोग्याच्या स्थितीला पोहोचण्यासाठी कर्मयोग हा चांगला अभ्यास आहे आपल्या कामात फळाची आशा न गुंतवून सदैव रत राहिले असता नकळत सामान्य माणसाच्या मनाची अवस्था प्रगल्भ होत जाते.सांख्ययोगासाठी अधिकाधिक अनुकूल होत जाते.

श्रीभगवंत म्हणतात, "तत्त्वत: सांख्ययोगी हा अंत:करणी मोठा शक्तिवंत ,पर्वतासारखा स्थिर असावा लागतो . 'मी','माझे' हे विसरलेला, गेलेल्याची आठवण न करणारा,अप्राप्याची इच्छा न धरणारा असा असावा लागतो. मनाच्या या स्थितीला पोहोचलेला कर्मयोगीही  खऱ्या अर्थाने संन्यासी होऊ शकतो .त्याच्या बुद्धीला संकल्पच नसल्याने तो कर्मबंधनात सापडत नाही."
श्रीज्ञानदेवांच्या शब्दात-
तरी गेलियाची से न करी । न पवतां चाड न धरी ।
जो सुनिश्चळु अंतरीं । मेरु जैसा ॥ १९ ॥
तरी गत गोष्टींची जो आठवण धरत नाही, काही मिळाले तर त्याची इच्छा करत नाही, जो मेरु पर्वताप्रमाणे अंत:करणात अगदी अचळ असतो.
(से=सय,आठवण)
आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण ।
पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥ २० ॥
आणि ज्याच्या अंत:करणात मी व माझे यांचे स्मरण राहिलेले नाही. अर्जुना तो सदोदित संन्यासीच आहे हे जाणावे.

संन्यास ही बाह्य गोष्ट नसून एक ईश्वरलीन अवस्था आहे. संपूर्ण ब्रह्ममय झालेल्या त्या अंतःकरणाला मी व माझे ही भावनाच नसते. हे ज्याच्या संदर्भात घडते तोच खरा संन्यासी .मग त्याने घरदार आदि उपाधींचा प्रत्यक्ष त्याग करायचीसुद्धा गरज नाही असे श्रीपरमेश्वर सांगत आहेत.
याप्रमाणे सांख्ययोग व कर्मयोगातला प्रमुख भेद श्रीभगवंतांनी स्पष्ट केला. कर्मयोग हा सामान्यांसाठी सुलभ तर सांख्ययोग हा बहुत अभ्यासांती अंत:करणाची समस्थिती साधलेल्या योग्यांचा मार्ग,पण हा भेद असूनही दोन्ही मार्गात उद्दिष्टप्राप्ती एकच आहे .म्हणून श्रीभगवान म्हणतात, "सर्वथा मूर्ख असणारेच सांख्य व कर्मयोग भिन्न मानतात, कारण दिव्यांच्या प्रकाशात भिन्नता कुठे संभवते ?तत्त्वार्थ ज्यांनी संपूर्ण जाणले ते या दोन्हींना एकरूपच मानतात."
एर्‍हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा ।
ते सांख्ययोगुसंस्था । जाणती केवीं ? ॥ २६ ॥
एरव्ही अर्जुना, जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्ययोग व कर्मयोग यातील भेद कसे जाणतील ? 
सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती ते भिन्न ।
एर्‍हवीं दीपाप्रति काई आनान । प्रकाशु आहाती ?।।२७।।
ते स्वभावत:च मूर्ख असतात. म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. नाही तर प्रत्येक दीपज्योतीचा प्रकाश काय वेगवेगळा असतो का ?  

योगीजनांची  कर्म करण्याची पद्धत-

योगी भ्रांतीपासून आपले मन खेचून घेऊन ते गुरुवाक्याने जणू धुवून घेतो .मग आत्मस्वरूपात ते रुतवून स्थिर करतो. मीठ समुद्रात पडेपर्यंत अल्प असे म्हणता येईल पण समुद्रात मिळाल्यावर ते समुद्राएवढे होते तसे त्याचे ते संकल्पापासून काढलेले शुद्ध मन चैतन्याकार होते. तो एका जागी राहून त्रैलोक्य व्यापतो व अकर्तेपणाने कर्मात राहतो. 'मी'चे विस्मरण झाल्याने शरीराचा प्रत्यक्ष त्याग न करताही तो अमूर्तभावात जातो. इतरांप्रमाणेच शरीरधारी असा योगी सर्व कर्मे आचरतो. डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो ,स्पर्श करतो,सुगंध घेतो,समयोचित बोलतो, खातो, निजतो, श्वासोच्छवास व डोळ्यांची उघडझाप आदि क्रियाही करतो, पण प्रतीतीच्या भूमिकेतून तो या सर्व क्रियांचा कर्ता मात्र नसतो. भ्रांतीच्या शेजेवरले त्याचे आयुष्यस्वप्न ज्ञानोदयामुळे संपलेले असते. दिव्याच्या प्रकाशात घरातील व्यवहार चालावेत तसे ब्रह्मज्ञानाच्या जाणिवेतूनच या क्रिया त्याच्याकडून आचरिल्या जातात
दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसे ।
देहीं कर्मजात तैसे । योगयुक्ता ॥ ४९ ॥
दिव्याच्या उजेडावर घरातील सर्व व्यवहार चालतात, त्याप्रमाणे ज्ञानाच्या आश्रयाने योगयुक्तांची सर्व कर्मे देहात चालतात. 
तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे ।
जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ॥ ५० ॥
ज्याप्रमाणे कमलाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो, परंतु धर्माधर्मरूप कर्मबंधाने आकळला जात नाही. 

परमेश्वर आणि योगी हे एकरूपच -

"हरी म्हणे पंडुसुता| तोचि ब्रह्म"- असा नि:शेष निर्वाळा देत श्रीज्ञानदेवांनी परमेश्वर व योगी यांमधील एकरसत्वाचा परिपोष केला आहे.
परमेश्वर हा तसा क्रियाशून्य, निर्व्यापार. पण त्याच्याइतका भलाथोरला पसारा कोणी रचला आहे ? पुन्हा या त्रिभुवनरचनेचे कर्तृत्वही तो स्वतःकडे घेत नाही. स्वतःची योगनिद्रा न मोडता तो भूतांचे संभार उभे करतो ,खेळवतो. जगाचे जीवन तोच, पण याच जगाच्या होण्या-जाण्याची त्याला शुद्ध नसते. पापपुण्याचा तर तो साक्षीही नाही. प्रकटाकारांच्या मेळाव्यात तो आकार पांघरून खेळतो, पण तो मुळात अमूर्तच.विश्वाचे सृजन, पालन ,संहार तो करतो ,असे म्हणणेही अज्ञानमूलक आहे ,हे ब्रह्मज्ञान हृदयात प्रकटलेला योगी ही ब्रह्मरूप होतो अहंभावातून उद्भवणारे भेदाभेद मालवतात. विषयसंग न सोडता, इंद्रियदमन न करताही तो योगी  नि:संग अवस्थेचा परमेश्वराप्रमाणेच भोग घेत असतो. ज्याप्रमाणे एखादा समंध लोकांमध्येच असूनही दृष्टीला दिसत नाही तसा तो शरीरात राहूनही संसाराशी अनोळखी असतो.
तैसें नाम रूप तयाचें । एर्‍हवीं ब्रह्मचि तो साचें ।
मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥ १००॥
त्याप्रमाणे त्याच्या नामरूपाची गोष्ट आहे. एरवी ज्याचे मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे, तो खरोखर ब्रह्मच आहे.

अशा प्रकारे ब्रह्मज्ञानोत्तर ब्रह्मरूप झालेल्या ,शरीरात निवास करणाऱ्या पण ईश्वराचे ऐश्वर्य भोगणाऱ्या योगीजनांचे ज्ञानराजांनी वर्णन केले आहे. ईश्वरी लक्षणांनी परिपूर्ण असे हे योगी व परमेश्वर यामध्ये अभेद असतो हे त्यांनी पटवून दिले आहे.

समदृष्टी पंडिताचे स्वरूप -

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ ४-१८ ॥
विद्या व विनय यांनी युक्त असा ब्राह्मण, गाय, हत्ती, तसेच कुत्रा आणि चांडाल या सर्वांचे ठिकाणी त्या ज्ञानी पुरुषांची दृष्टी सारखीच असते.
गीतेतील या श्लोकावर भाष्य करताना श्री ज्ञानदेव म्हणतात," व्यापक ज्ञान ज्याच्या हृदयाचा शोध घेत आले त्याच्या समता दृष्टीबद्दल जास्त काय बोलावे? "एक आपणपेचि जैसे| ते देखती विश्व तैसे||" आत्मवत् विश्वाकडे पाहणे हा त्यांचा सहजभाव असल्याने त्यांना भेदाभेद असत नाही. ही माशी, हा हत्ती ,हा शूद्र ,हा ब्राह्मण ,ही गाय ,हा कुत्रा,हा थोर ,हा लहान आदि सर्व भेदांचे त्यांच्या जाणिवेतून निर्मूलन होते. भेदांची मुळे ज्या अहंभावात रुजलेली असतात, तो अहंभावच जेव्हा संपतो तेव्हा विषमता समूळ नाहीशी होते.

विषयभोगात खरे सुख नाही - यावर श्रीज्ञानदेवांचे परखड भाष्य -
"न तेषु रमते बुधा:" अशा शब्दात श्रीभगवंतांनी ज्या विषयभोगांची निर्भर्त्सना केली त्यावर श्रीज्ञानदेवांनी प्रत्ययकारी दृष्टांतांची वृष्टी केली आहे.
"कमलदलाच्या ताटात ज्याने चांदण्याचे भोजन केले तो चकोर वाळवंट चुंबीत फिरेल काय ?आत्मसुखात रममाण झालेल्या योगियांचे विषयभोग सुटले हे सांगण्याचीसुद्धा गरज नाही .ते स्पष्टच आहे. पण आत्मसुख न ओळखणारे अज्ञानी जीव मात्र दरिद्र्याने कोंड्यातच समाधान मानावे तसे विषयभोगातच गुरफटून राहतात.
एर्‍हवीं विषयीं सुख आहे । हे बोलणेंचि सारिखें नोहे ।
तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥ ११२ ॥
एरवी विषयांमधे काही सुख आहे, हे म्हणणे बोलण्यातही जमा होणारे नाही. नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामधे का उजाडत नाही ? 
सांगैं वात वर्ष आतपु धरे । ऐसे अभ्रच्छायाचि जरी सरे ।
तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां ॥ ११३ ॥
मला सांग, वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल, तर तीन मजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा खटाटोप कशाला ? 

विजेचा क्षणिक चमकारा किंवा अभ्रच्छाया (म्हणजे ढगांची सावली- ) यांची उपमा श्री ज्ञानदेव विषयभोगांना देतात, कारण विषयभोग या गोष्टींइतकेच क्षणिक व अशाश्वत आहेत.. खरे तर विषयसुखाला सुख म्हणणेही चुकीचे आहे. विषकंदाला मधुर म्हणावे, अनिष्टग्रहाला 'मंगल' म्हणावे, मृगजळाला 'जळ ' हे अभिधान द्यावे तशी ही फसवी भाषा आहे.
विरक्तांच्या दृष्टीने असले सुख म्हणजे पंडुरोग्याची पुष्टता. पण पुवातल्या किड्यांना पुवाचा कंटाळा कसा येणार? भोगजळातील या जलचरांना विषयभोगातच  जगणे-मरणे एवढेच ठाऊक असते."
अशाप्रकारे आपल्या एरवीच्या मृदुभाषेचा त्याग करून श्रीज्ञानदेवांनी कठोर शब्दात विषयसुखविचार निरूपिला आहे.

मुक्त योग्याची श्री ज्ञानदेवांनी सांगितलेली लक्षणे -
मुक्त योग्यांना बाह्य विषयांची भाषासुद्धा कळत नाही .पक्षाने फळ खावे तशी त्यांच्या ब्रह्मरस-आस्वादाची रीत नसते. तिथे भोगतेपणही संपलेले असते. अहंकाराचा पडदा सारून, आत्मसुखाला मिठी मारून ते त्यातच विलीन होतात. पाण्यात पाणी मिळावे ,आकाशात वाऱ्याने लोपून जावे तशी ती क्रिया असते. ते आनंदाचे समूर्त आकार, सुखाचे अंकुर, महाबोधाचे क्रीडास्थान होतात. अनंतसुखाच्या डोहाचा तळ गाठून ते तेथेच स्थिरावतात, तद्रूप होतात. आत्मप्रकाशात ते आत्मरूपाने विश्व पाहतात .देहरूप असून परब्रह्म ठरतात.

मुक्त योग्याचे वर्णन करता करता ज्ञानदेवांची झालेली अवस्था-

आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें ।
जें बोलणें बोलापरौतें । बोलवलें ॥ ६४ ॥
आता शांतरसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे. कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टींचे व्याख्यान येथे चालले आहे. 
एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु ।
तयासीचि आथि लागु । परिसावया ॥ ६५ ॥
ज्यांचा इंद्रियांविषयींचा पराधीनपणा चांगल्या तर्‍हेने नाहीसा झाला आहे, त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. 
हा असो अतिप्रसंगु । न संडी पां कथालागु ।
होईल श्लोकसंगति भंगु । म्हणौनियां ॥ ६६ ॥
हे विषयांतर करणे पुरे. कथेचा संबंध सोडू नकोस. कारण तसे करण्याने श्लोकसंगतीचा बिघाड होईल.

योग्याची लक्षणे निरूपण करताकरताच श्री ज्ञानेश्वर स्वतःच त्या लक्षणांच्या अपूर्वतेमध्ये किंचित्काळ तल्लीन झाले. जणू काही स्वतःच्याच स्वरूपाचे लक्षण असे हे वर्णन ऐकून त्यांना शांतरसाचे भरते आले. ते स्वगत म्हणाले," पात्र ओसंडून हा शांतरस वाहत आहे. हे शब्दांपलीकडचे बोलणे आहे .ज्यांच्या इंद्रियांचे पांग फिटले आहेत त्यांनाच हे ऐकण्याचा अधिकार आहे .मग पुन्हा श्रोतृवर्गाचे भान येऊन ते पुढे म्हणाले," या बोलण्याने कथाभंग ,विषयांतर होईल. श्रोत्यांची उत्कट इच्छा जाणून मी निवृत्तीचा दास पुढील कथाभाग सांगतो."
या लहानशा स्वगतसदृश्य ओवीत श्रीज्ञानदेवांनी त्यांच्या वर्ण्यविषयाचे गहनत्व, तो समजून घेण्याचा अधिकार याचा उल्लेख करून पुन्हा विनयी शब्दात निरुपणाचा धागा पुढे नेला आहे.

ब्रह्मस्थितीस नेणाऱ्या योगक्रियेचे ज्ञानदेवकृत विश्लेषण-

"स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यान्"-  पाचव्या अध्यायाच्या अखेरीस गीतेतील या श्लोकातील गहन योगक्रियेचे ज्ञानेश्वरांनी सविस्तर विश्लेषण केले आहे ,ते योगमार्गातील साधकांसाठी आहे. पण भगवद्गीतेच्या प्रत्येक अभ्यासकाला ते समजून घेणं आवश्यक आहे.
ते ऐसे कैसेंनि जहाले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले ।
हें पुससी तरी भलें । संक्षेपें सांगों ॥ १४९ ॥
श्री भगवंत अर्जुनाला म्हणाले,(वर सांगितलेले) जे देहधारी असतांनाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले हेही विचारशील तर तेही आम्ही चांगले थोडक्यात सांगतो.
सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपल्लवां पडे गांठी ।
तेथ पाठिमोरी दिठी । पारखोनियां ॥ १५१॥
इडा, पिंगळा व सुषुम्ना या तिघींच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकांचा संगम( भ्रूमध्यभागी ) होतो तेथे दृष्टि स्थिर करून योगी तिला पाठीमागे ( आत) फिरवतात .
सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम ।
चित्तेंसीं व्योम- । गामिये करिती ॥ १५२ ॥
उजव्या (पिंगळा) व डाव्या (इडा) नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गति (रेचक व पूरक) बंद करून (म्हणजे कुंभक करून) प्राण (हृदयस्थ वायु) व अपान (गुदस्थ वायु) यांची समगति म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्तास ते व्योमगामी (म्हणजे मूर्ध्नी आकाशाकडे जाणारे) करतात.
आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर ।
क्रमोनि हे पार । पातले ते ॥ १५८॥
आणि यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ह्या पलीकडच्या तीराला ब्रह्मत्वाला पोचतात.

येथे पाचव्या अध्यायाच्या अखेरीस श्रीकृष्ण अर्जुनाला विचारीत आहेत की हे सर्व समजून घेऊन तुझ्या मनाचे समाधान झाले का? ऐकण्याची व आचरणात आणण्याची तुझी तीव्र इच्छा असेल तर आम्हाला सांगावयास अडचण काय?
तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणौनि श्रीहरी ।
बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ॥ १७८ ॥
तू मन लावून ऐक. असे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईल. 

अशाप्रकारे सांख्ययोग आणि कर्मयोग यांची एकात्मता, सामान्यांसाठी कर्मयोगाचरणाची सुलभता,ब्रह्मस्थितीस पोचलेल्या कर्मसंन्यासी योग्याची लक्षणे याची रसचर्चा पाचव्या अध्यायात आली.मात्र,या ब्रह्मस्थितीस योगी कसा पोचतो हे अतिशय महत्त्वाचे आहे ,कारण ती अभ्यासाने साध्य होणारी स्थिती आहे . ही ब्रह्मस्थिती प्राप्त होणे हा अपघात नाही तसेच अचानक झालेला अलभ्यलाभ नाही .हा योगाभ्यास सहाव्या अध्यायात म्हणजे ध्यानयोगात विस्ताराने येणार आहे.म्हणून इथे  ध्यानयोगाचे सुतोsवाच श्रीज्ञानदेव करतात. या टप्प्यावर पाचवा अध्याय संपन्न झाला आहे.















Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग