ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -ध्यानयोग -अध्याय सहावा

 ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -ध्यानयोग -अध्याय सहावा


धृतराष्ट्राचा मोह
सहाव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच संजयाने धृतराष्ट्रास म्हटले," येथे श्रीकृष्ण योगरूप अभिप्राय अर्जुनास सांगण्यास सिद्ध झाले आहेत .अनायासे हे श्रवणाचे परमसुख आम्हास मिळत आहे .जणू ब्रह्मरसाचे हे जेवण रांधले असताना आपण येथे अकस्मात पाहुणे आलो किंवा तहानलेल्याने पाणी म्हणून प्यावे ते अमृतच असावे ,असा हा योग आहे."
- यावर धृतराष्ट्र कोरडेपणाने म्हणाला," हे तुला आम्ही विचारले नाही."त्याच्या या अलिप्तपणामागे त्याचा अविवेकी पुत्रमोह आहे, धृतराष्ट्र मोहाने ग्रासला आहे हे संजयाला जाणवले.

सहाव्या अध्यायाचे ज्ञानदेवप्रणित महत्त्व आणि प्रतिज्ञा-

समुद्रमंथनातून अमृतप्राप्तीचा जो क्षण, तोच या गीतार्थमंथनात सहाव्या अध्यायाचा आहे असं श्रीज्ञानदेव म्हणतात. गीतार्थाचे सारतत्त्व, विवेकसमुद्राचे पैलतीर,अनेक योगसमृद्धींचे भांडार या अध्यायात उमटले आहे .आदिमाया जेथे विश्रांती घेते, शब्दब्रह्म जेथे मौनात विलीन होते, तेथून याच्या अर्थाचा अंकुर जोमाने फोफावतो.
श्रीज्ञानदेव प्रतिज्ञापूर्वक म्हणतात-
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥१४॥
माझे हे प्रतिपादन मराठी आहे खरं पण ते अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल, अशा तर्‍हेची रसभरित शब्दरचना मी करीन. 
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोले इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥१६॥
ऐका, रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा उत्पन्न होतील व माझ्या शब्दांच्या योगाने इंद्रियांमधे परस्परांत भांडण लागेल.
" साहित्यगुणांनी समृद्ध असा याचा आशय मी  माझ्या प्राकृत मराठीत इतक्या वैभवाने आणेन की तो अमृताशीही पैजा जिंकेल. हा माझा शब्द इतका परिपूर्ण आणि सुलक्षणी असेल की त्याच्या आस्वादार्थ इंद्रियांमध्ये भांडण लागेल."
अशा प्रकारे आशयाचे महत्त्व व अभिव्यक्तीचे सौंदर्य यांच्या निकषावर श्रीज्ञानदेव सहावा अध्याय महत्त्वाचा मानतात. गीतार्थाच्या सारभूत अशा सहाव्या अध्यायासाठी सिद्धता करतानाच श्रीज्ञानेश्वरांनी आपला अनुपम आत्मविश्वास प्रतिज्ञापूर्वक नोंदला आहे ,आणि त्यात कसलीही अतिशयोक्ती नाही. ही अमृताची अक्षरे चिरनूतन आणि चिरसुंदर आहेत, महाराष्ट्राच्या आणि विश्वाच्या हृदयावर निरंतर राज्य करत आहेत.अशा प्रकारे श्रीज्ञानदेवांनी अवघड आशयाचे शिवधनुष्य लीलया उचलले आहे. योगाभ्यासाच्या रस्त्याने केलेला हा प्रवास भल्याभल्यांना आटपत नाही.श्रीशंकरही या यात्रेचे अजून यात्रिक आहेत,असा हा अनादि-अनंत प्रवास आहे.
अगदी स्थळ निवडण्यापासून ,आसन सिद्ध करण्यापासून ते सिद्धींचे टप्पे पार करून ब्रह्मरूपात विलीन होण्यापर्यंत ही अंतर्यात्रा म्हणजे शरीराच्या लहानशा प्रांगणात उतरणार्‍या परमात्मवादळाची रोमहर्षक गाथा आहे. हा विषय कोरड्या शब्दांचा नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवाचा , तो शब्दात आणणे म्हणजे अरूपाला रूपसंपदा प्रदान करण्याइतके अशक्य.श्रीज्ञानदेव मात्र जराही न डळमळता या बिकटतेला पुरून उरतात.या अध्यायात जणू त्यांची प्रतिभा माहेरी आलेली आहे कारण ते स्वतःच योगीश्रेष्ठ आहेत, म्हणून असे निरूपण ते अधिकाराने करतात.सद्गुरूकृपेचा वारंवार नि:संकोच आत्मविश्वासाने उच्चार करतात.
तैसी गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे ।
म्हणौनि तें अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥३५॥
जर सद्गुरूची कृपा प्राप्त होईल तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही ? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्यावर ती कृपा अलोट आहे. 
तेणें कारणें मी बोलेन । बोलीं अरूपाचें रूप दावीन ।
अतींद्रिय परी भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥३६॥
त्या सद्गुरूकृपेच्या योगाने मी व्याख्यान करीन व  माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवीन. आणि जरी ते ब्रह्म इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना घेता येईल असे मी करीन. 

संन्यासी व योगी यांच्यातील साम्य-भेद-

श्रीभगवंत संन्यासी व योगी यांच्यातील साम्यभेद सांगताना म्हणतात ,"ब्रह्मरूपात संन्यासी व  योगी यांच्यात काहीच फरक नाही. जसे निरनिराळ्या नावांनी एकाच पुरुषास हाक मारावी  किंवा निरनिराळ्या मार्गांनी एकाच स्थानास पोचावे, तसेच योग आणि संन्यासातील  तथाकथित भिन्नत्वाचे आहे. जो कर्मे करून फलाशेचा त्याग करतो तो योगी .खऱ्या अर्थाने संन्यासी तोच. ज्याप्रमाणे पृथ्वी सहजपणे वृक्षवल्ली निपजवते पण त्यांची फळे चाखण्याची इच्छा करत नाही, त्याप्रमाणे खरा योगी आपल्या स्थितीच्या ,जातीच्या आधारे विहित नित्यकर्मे करतो पण त्यात गुंतत नाही .असा योगीच तत्त्वतः संन्यासी होय.
एरवी एखादे कर्म बद्धक (बंधनकारक )मानून त्याचा वृथा त्याग करण्यात संन्यास नसून एका नव्याच कर्माचा आरंभ संभवतो.
वांचूनि उचित कर्म प्रासंगिक ।तयातें म्हणे हे सांडावें बद्धक ।
तरी टांकोटांकीं आणिक । मांडीचि तो ॥४८॥
याशिवाय नित्यनैमित्तिक कर्म करणे प्राप्त झाले तर त्या कर्माला तो म्हणतो, हे कर्म बंधन करणारे आहे, हे मी टाकीन. पण हे कर्म टाकले की लागलीच तो दुसरे कर्म करण्याचे आरंभतोच. 
जैसा क्षाळूनियां लेपु एकु।सवेंचि लाविजे आणिकु ।
तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वायां ॥४९॥
जसा एक लेप धुवून टाकून लागलीच दुसरा लावाला, त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टात पडतो. 
गृहस्थाश्रमाचें वोझें । कपाळीं आधींचि आहे सहजें ।
कीं तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ॥५०॥
डोक्यावर अगोदरच स्वभावत: गृहस्थाश्रमाचे ओझे आहेच, ते टाकण्याकरता संन्यास घेतला तर त्याबरोबरच पुन: संन्यासाश्रमातील कर्मांचे ओझे तो डोक्यावर घेतो. 
श्री ज्ञानदेव येथे एक सुंदर उपमा देतात ते म्हणतात ,"एक लेप  धुवून टाकून दुसरा तिथे चढवावा तशीच ही तथाकथित कर्मत्यागाची प्रक्रिया असते  म्हणून गृहस्थाश्रमातील विहितकर्मे न सोडताच योगसुख अनुभवणारा खरा संन्यासी व योगी असतो."
अशाप्रकारे संन्यास ही एक बाह्य उपाधी नसून आंतरिक अवस्था आहे व ती योगीजनांनाच खऱ्या अर्थाने साधते असे येथे स्पष्ट केले आहे.

स्वतःच स्वतःचा मित्र किंवा शत्रू-
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥६-५॥
आपला आपण उद्धार करावा, अवनती करू नये. आपण स्वत:च स्वत:चे मित्र आहोत व स्वत:च स्वत:चे शत्रू आहोत. 
"योगारुढाला एवढी योग्यता देते तरी कोण?" या अर्जुनाच्या विस्मयजनक प्रश्नाला श्रीभगवंतांनी "उद्धरेत् आत्मनः आत्मानं" असे उत्तर दिले आहे .
त्याचे स्पष्टीकरण विविध दृष्टांतांच्या सहाय्याने करताना श्रीज्ञानदेव म्हणतात," भ्रांतीच्या शय्येवर अज्ञानाची नीज निजलेल्याला जन्म-मृत्यूचे दु:स्वप्न पडते. जागे झाल्यावर सहजच ते संपते. हे घडते ते एका व्यक्तीच्याच जाणिवेत .अर्जुना, देहाभिमानामुळे आपण अशाच दु:स्वप्नात गुरफटून स्वतःचा नाश करून घेतो. त्यामधून जागे होणे फक्त आपल्याच हाती आहे. हा अहंकार सोडून आपण आपल्या मूळ स्वरुपात विलीन होणे हे आपलेच काम आहे .पोपटाच्या वजनाने नळी हालते ,पण उडण्याऐवजी पोपट नळीला घट्ट धरून स्वतःसाठी काल्पनिक बंधन तयार करतो.हतभाग्याने लाभाच्या वेळी स्वतःचे डोळे झाकून घेऊन आंधळे व्हावे किंवा कोशातल्या किड्याने स्वतःचा तुरुंग स्वतःच तयार करावा तशीच ही परिस्थिती असते. या मिथ्यत्वाचा त्याग करण्यासाठी आधी संकल्पाची धाव थांबवली पाहिजे ."
एऱ्हवीं कोशकीटकाचिया परी । तो आपणया आपण वैरी ।
जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळीं ॥७२॥
नाहीतर शरीर हेच उत्तम समजून तेथे आत्मबुद्धी ठेवतो, तो कोशातील किड्याप्रमाणे आपला आपणच शत्रु होतो.
जैशी ते शुकाचेनि आंगभारें ।नळिका भोविन्नली एरी मोहरें ।
तेणें उडावें परी न पुरे । मनशंका ॥७६॥
पोपटाला धरण्याकरता बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यामुळे जेव्हा पोपटाच्या वजनाने ती नलिका उलट बाजूला फिरते तेव्हा वास्तविक त्याने तेथून उडून जावे, परंतु ही नळी सोडली तर आपण पडू व मरू या त्याच्या मनातील शंकेचे समाधान होत नाही. 
या प्रकारे  ज्ञानदेवांनी आपले स्पष्टीकरण प्रतिमासमृद्ध केले आहे.

श्रीज्ञानदेवांनी सांगितलेली योग्याची लक्षणे-
तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता ।
परमात्मा परौता । दुरी नाहीं ॥८१॥
अशा त्या पुरुषाने आपले अंत:करण जिंकल्यामुळे व त्याच्या सर्व इच्छा निवृत्त झाल्यामुळे त्याला परमात्मा कोठे लांब पलीकडे नाही.
'स्वांत:करणजित','सकळकामोपशांत' अशा शब्दात योग्याचे वर्णन करताना श्रीज्ञानदेव म्हणतात ,"हीण जळून गेल्यावर उरलेले शुद्ध सोने ,घटभंगानंतर सहजच उरलेले अवकाश,तसा हा योगी म्हणजे देहरूपात साचलेला परमात्मा होय. शीतोष्ण, सुखदुःख ,मानापमान यांच्या पलीकडे तो जातो. मेघधारा समुद्राला कशा रुततील? ती जळामध्ये जळाचीच मिळणी असते .योगीश्वराला शुभा-शुभामध्ये असाच अभेद वाटतो.ज्ञान व विज्ञानाच्या यथार्थ जाणिवेने तृप्त, खऱ्या गूढ ज्ञानाने युक्त असा हा योगीश्वर . इंद्रियांवर विजय मिळवल्यामुळे त्याला पर्वताएवढे सोने आणि मातीचे ढेकूळ समानच वाटते. सुहृद आणि शत्रू, बंधू आणि द्वेष्टा- दोघेही त्याला सारखेच .सृष्टीजातातील  आकारचित्रांमध्ये त्याला परमात्मवस्तूच भरलेली दिसते जणू त्या मूळ सोन्याचे हे विविध अलंकार. असा समबुद्धी तीर्थराज पुरुष भ्रमिष्टालाही आपल्या संगतीत ब्रह्मज्ञानी करेल. त्याच्या बोलण्यात धर्माला नवजीवन मिळते, त्याच्या दृष्टीमध्ये महासिद्धी उमटतात. स्वर्गसुख आदी गोष्टी त्याला खेळणी वाटतात. त्याच्या स्मरणातूनही त्याची योग्यता आपल्याला लाभते ,त्याच्या स्तुतीनेही आपले कल्याण होते ."

योगाभ्यासासाठी योग्य स्थान व आसन-
योगाभ्यासासाठी योग्य अशा स्थानांचे अत्यंत काव्यमय वर्णन ज्ञानराजांनी केले आहे .
जेथ अमृताचेनि पाडें । मुळाहीसकट गोडें ।
जोडती दाटें झाडें । सदा फळतीं ॥१७३॥
जेथे अमृताच्या योग्यतेची मुळासकट गोड असलेली व नेहेमी फळणारी अशी दाट झाडे लागतात ॥६-१७३॥
पाउला पाउला उदकें । वर्षाकाळेंही अतिचोखें ।
निर्झरें का विशेखें । सुलभें जेथ ॥१७४॥
ज्या ठिकाणी पावलोपावली पाणी आहे, पण ते पावसाळ्यातही निर्मळ असते, व जेथे तर विशेष करून पाण्याचे झरे सहज आढळतात. 
हा आतपुही आळुमाळु । जाणिजे तरी शीतळु ।
पवनु अति निश्चळु । मंदु झुळके ॥१७५॥
हे ऊन देखील जेथे सौम्य भासते आणि जेथे वारा अतिशय शांत असून त्याच्या मंद झुळुका येत असतात 
ते म्हणतात," ज्या स्थानी अशा संतोषाची निर्मिती होते की एकदा बसल्यावर उठावेसे वाटत नाही, वैराग्य जिथे दुणावते ,असे स्थान योगाभ्यासासाठी निवडावे. जे संतांनी पूर्वी वसवलेले आहे अशा रम्य स्थळी धैर्य वाढते ,अभ्यास विनासायास होतो .नास्तिकालाही तेथे तपाची इच्छा होते. सकाम पुरुषाचेही मन हरण करणारी, न राहू इच्छिणार्‍यासही थांबवून घेणारी अशी ती जागा असावी. पण तिथे वस्ती मात्र साधकांचीच असायला हवी.मुळापासून गोड अशी फळभाराने लवलेली झाडे, पावलापावलाला पावसाळ्याशिवायही  खेळणारे पाणी ,झरे तेथे असावेत .ऊनही तेथे थोडे निवळलेले ,त्यातून मंद वाहणाऱ्या झुळुका असे शीतल वातावरण असावे. नि:शब्द एकांत असावा.तेथे श्वापदांची तसेच पोपट, भुंग्यांची भुणभूण असू नये. पाण्यासाठी हंस ,चक्रवाक पक्षी आल्यास त्याला मात्र हरकत नाही. सतत नव्हे, पण क्वचित येऊन जाणारे मोरही असले तरी चालतील. पण अशा ठिकाणी एखादा गुप्त मठ किंवा शिवालय असावे .मनासारख्या जागी एक आसन रचावे. वर मृगचर्म ,खाली धूतवस्त्राची घडी ,त्याहीखाली कोमल एकसारखे रचलेले दर्भांकुर अशी आसनरचना करावी. आसन उंच होईल तर अंग हलेल,नीच झाल्यास भूमीदोष बाधतील ,म्हणून ते सम असावे. अशा ठिकाणी अहंच्या  विस्मरणार्थ सद्गुरुस्मरण करून आसन घालावे. अशा एकाग्र स्थितीमध्ये अंग अंगास तोलून धरते ,वायूस वायू सावरून धरतो."
अशाप्रकारे स्थान व आसनाच्या निवडीबद्दल व रचनेबद्दल ज्ञानदेवांनी सूक्ष्मसुंदर,ललितरम्य मार्गदर्शन केले आहे.

गौण वज्रासनाचे महत्व-
सहाव्या अध्यायात जनसामान्यांना माहिती नसलेल्या, आत्म्याला भवबंधनातून सत्वर मुक्त करणाऱ्या गूढ योगिक क्रियांचा उल्लेख श्रीकृष्णाने केलेला आहे. योगीराज श्रीज्ञानदेवांनी या क्रियांचा म्हणजेच गौण वज्रासन किंवा मूळबंधासनाचा सविस्तर उलगडा या अध्यायात केलेला आहे , 
अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण ।
वज्रासन गौण । नाम यासी ॥१९९॥
अर्जुना, हे मूळबंधाचे लक्षण आहे असे समज व याचेच वज्रासन असे गौण नाव आहे. 
या आसनामध्ये अंगास अंग,वायूस वायू तोलून धरतो. प्रवृत्तीचा निरास होऊन समाधीअवस्था निकट येते.बसल्यास्थळीच अभ्यास घडतो. त्या गौण वज्रासनाचे श्रीज्ञानदेवांनी पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे -
-"पायाच्या मांड्या पोटरीशी  भिडवून दोन्ही पावले गुदस्थानाखाली घट्ट बसवावीत .उजवा पाय खाली ठेवून त्याने शिवणीचा मध्य दाबून धरला की डावा पाय सहजपणे वर बसतो. गुदस्थान व वृषण यामधील चार अंगुळे जागेत दोन्हीकडे समांतर सोडून मधल्या भागात टाचेचा वरचा भाग किंचित उचलून दाबून बसवावा. पाठीचा खालचा भागही उचलल्याप्रमाणे करावा म्हणजे सर्व शरीर जणू त्या टाचेच्या शिखराप्रमाणे तोलले जाते. अशा प्रकारे आधारचक्रावर आसन स्थिरावल्यावर अपानवायूची अधोगती नाहीशी होऊन तो आतील बाजूस ओहोटू लागतो. हाच मूळबंध किंवा हेच गौण वज्रासन होय.

योगाभ्यासामुळे प्राप्त होणाऱ्या सिद्धी -

तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा ।
शक्ति करी उजगरा । कुंडलिनीतें ॥२२१॥
अर्जुना, कोंडलेला अपानवायु असे प्रकार करतो.दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागृत करते. 
नागिणीचें पिलें । कुंकुमें नाहलें ।
वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥२२२॥
कुंकवाने न्हालेले नागाचे पिल्लू वेढे घेऊन निजावे ,
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी ।
अधोमुख सर्पिणी । निदेली असे ॥२२३॥
याप्रमाणे नेमकी साडेतीन वेढ्याची ती कुंडलिनीरूपी नागीण खाली तोंड करून निजलेली आहे.
योगाभ्यासापासून कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी देण्याच्या प्रक्रियेला श्री ज्ञानदेवांनी दिलेली ही निद्रिस्त नागिणीच्या पिलाची प्रसिद्ध उपमा या ओव्यांमध्ये आली आहे .या सर्व प्रक्रियेचे अतिशय अद्भुत वर्णन ज्ञानेश्वर  करतात, त्याचा स्वल्प सारांश असा आहे-
"योगाभ्यासामुळे मूळबंधाकडे कोंडलेला अपानवायु माघारी वळून शरीरात क्षोभ मांडतो. वावटळीप्रमाणे तो शरीरातली सर्व घाण बाहेर काढतो .आसनाच्या उष्णतेने व वज्रासनाच्या चिमटीने कुंडलिनीशक्ती जागृत होऊन शरीरामधले पृथ्वीतत्व व जलतत्त्व निरपून भक्षण करते .व सौम्य होऊन सुषुम्ना नाडीपाशी स्थिरावते, तेव्हा वरील ( मस्तकातील सह्स्रारचक्रामधील) चंद्रामृताचे तळे कलंडून कुंडलिनीत मिसळते. त्यामुळे शरीरात पुन्हा रससंचार होतो. आता कांतीमान होणारे हे योग्याचे शरीर नव्याच तेजात न्हायलेले असते. "
तें आनंदचित्रींचें लेप । नातरी महासुखाचें रूप ।
कीं संतोषतरूचें रोप । थांबलें जैसें ॥२५६॥
ते योग्याचे शरीर आनंदरूपी चित्राचा रंग अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्तीच किंवा संतोषरूप झाडाचे जसे काही बळावलेले रोप आहे. 
तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा ।
नाना सासिन्नला मळा । कोंवळिकेचा ॥२५७॥
तो योगी सोनचाफ्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजुकपणाचा भरास आलेला मळाच. ॥६-२५७॥
श्री ज्ञानेश्वर म्हणतात ,"स्फटिकाप्रमाणे नितळ, रत्नबीजाच्या कोंभाप्रमाणे एकाच वेळी प्रकाशित आणि सुकोमल असते, संध्यारंग कालवून तयार केल्याप्रमाणे त्वचेची आभा केवळ स्वर्गीय असते. जणू हे नवे बालपणच. पण हे बालपण बळवंत आणि धैर्यवंत असते. शरीराला नखे, दात,रोमकणिकाही नवीन येतात. सर्वच काही अलौकिक तेजाने नटलेले असते.शिंपल्यात न मावणाऱ्या मोत्यांच्या तेजाप्रमाणे नयनद्वय भासतात.अशा प्रकारे योग्याचे शरीर व मन एका अद्भुत अद्वितीय उन्नत अवस्थेत संक्रमित होतात. त्यामुळे समुद्रापलीकडचे दिसते, स्वर्गातील ऐकू येते, मुंगीचे मनोगत कळते! नाना सिद्धी समोर ठाकतात. अष्टांग योगाची परिणती ब्रह्मीभूत अवस्थेत होते."
आम्हीं साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीरीं जिहीं केलें ।
ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ॥३२६॥
भगवंत म्हणतात, जे हे अष्टांगयोगरूपी साधन सांगितले, त्या साधनाची मूर्तीच आपले शरीर ज्यांनी केले, ते योगाभ्यासाने शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले. 
परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें ।
वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ॥३२७॥
देहाकृतीच्या मुशीत परब्रह्मरस ओतून तयार केलेली जणु काय मूर्तीच,असे ते (योगी) शरीराने दिसतात. 

ध्यानयोगात व्यक्त झालेला नाथपंथाचा गूढ अभिप्राय-
"पिंडानेच पिंडाचा ग्रास घ्यावा" हा नाथपंथाचा गूढ अभिप्राय आहे. कुंडलिनी महाशक्ती जेव्हा हृदयस्थ पोकळीत स्थिरावते, तेव्हा ती शक्ती प्राणशक्तीत विलीन होते.ही अवस्था महाभूतांचा संहार करणारी, पिंडानेच पिंडाचा घास घ्यावा अशी असते.
पिंडें पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतींचा दंशु ।
परि दाऊनि गेला उद्देशु । श्रीमहाविष्णु ॥२९१॥
पिंडाने पिंडाचा ग्रास करणे (पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करावयाचा)हे आदिनाथ जे शंकर यांच्या अंतरंग खुणेचे मर्म आहे. परंतु हे मर्म श्रीविष्णु दाखवून गेले. 
ऐकें शक्तीचे तेज जेव्हां लोपे । तेथ देहाचें रूप हारपे ।
मग तो डोळ्यांमाजीं लपे । जगाचिया ॥२९३॥
अर्जुना, ऐक. कुंडलिनीचे तेज जेव्हा लय पावते, तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो, (देह वायुरूप होतो). तो याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे मग त्या योग्याला जगाच्या (लोकांच्या) डोळ्यातच लपता येते. 

मनोनिग्रहाबद्दल अर्जुनाची आशंका-
प्रथमतः अर्जुनाने विचारले की मन हे स्वभावतःच चंचल, त्रैलोक्यात भरकटणारे असे असताना यावर संयम कसा करावा? माकडाला समाधी अवस्थेत स्थिरावणे शक्य आहे काय ?महाझंझावाताला " इथे थांब" असं म्हटलं तर तो स्थिरावेल का? या मनाला समदृष्टी यावी तरी कधी ,आणि आमची पुढची अवस्था आम्ही गाठावी तरी कधी?
हें मन कैसे केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें ।
एऱ्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ॥ ४११  ॥
हे मन कसे व केवढे आहे, याचा पत्ता लावू असे म्हटले तर सापडत नाही. एरवी या मनाला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते. 
म्हणौनि ऐसें कैसें घडेल । जे मर्कट समाधी येईल ।
कां राहा म्हणतलिया राहेल । महावातु ? ॥४१२॥
म्हणून हे असे कसे होईल की माकडाला समाधि लागेल ? किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटल्याबरोबर थांबेल काय ? 

अर्जुनाची दुसरी महत्त्वाची शंका अशी की जो मुमुक्षू इंद्रियग्रामातून तर बाहेर पडला, पण पुढील मुक्काम गाठण्याआधीच त्याच्या आयुष्याचा सूर्यास्त झाला अशा मुमुक्षूची गती कोणती?
तंव आत्मसिद्धि न ठकेचि । आणि मागुतें न येववेचि ।
ऐसा अस्तु गेला माझारींचि । आयुष्यभानु ॥४३२॥
आता तो (मुमुक्षू) आत्मसिद्धीच्या गावालाही पोहोचला नाही आणि त्यास परतही येववत नाही असा मध्येच असतांना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला..

अर्जुनाच्या शंकेचे श्रीहरीने केलेले निरसन
श्रीहरीने पहिल्या शंकेचे निरसन करताना अर्जुनास म्हटले,"मन हे खरोखरच अतिचंचल ,पण वैराग्ययुक्त अभ्यासाने त्याला स्थिर करता येते .कारण त्याचा एक चांगला गुण म्हणजे ते जेथे गोडी लागेल तिथे क्रमशः स्थिरावत जाते. म्हणून अनुभवसुखाचे कौतुक त्याला दाखवीत जावे."
तंव  कृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि तें तैसेंचि ।
यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ॥४१७॥
तेव्हा कृष्ण म्हणाले, खरोखर तू म्हणत आहेस तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चपलच आहे.
परि वैराग्याचेनि आधारें ।जरी लाविलें अभ्यासाचिये मोहरें ।
तरी केतुलेनि एके अवसरें । स्थिरावेल ॥४१८॥
परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळवले तर काही वेळाने ते स्थिर होईल. 

दुसऱ्या शंकेच्या निवारणार्थ श्रीहरी म्हणतात," ज्याला मोक्षसुखाची इच्छा आहे त्याला मोक्षावाचून गती नाही. व्हावा तेवढा अभ्यास न झाल्याने आयुष्याच्या समाप्तीअगोदरच ब्रह्मसुख न मिळाल्यास असा योगभ्रष्ट जीव लक्ष्मीकृपेने ऐश्वर्यवंत अशा सुखपूर्ण कुळात पूर्वपुण्याईच्या योगे जन्मास येतो ,किंवा त्याहूनही महासुखक्षेत्री राहणाऱ्या योगीकुळात जन्म घेतो. तेव्हा त्याच्या लहानग्या देहातच आत्मज्ञानाची उषा प्रकटते, बाळपणीच तो सर्वज्ञ होतो, त्याचे मन सारस्वत प्रसवते. अनेक जन्मांची आर्तता फळून त्याला सर्व साधने सहजसाध्य होतात व अनिर्वचनीय अशा ब्रह्मरूपात तो विलीन होतो.
मोटकी देहाकृति उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे ।
सूर्यापुढें प्रगटे । प्रकाशु जैसा ॥४५०॥
अल्प वयातच त्याच्या ठिकाणी स्वरूपज्ञानाचा उदय होतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवण्यापूर्वी अरुणोदयाचा प्रकाश होतो.
तैसी दशेची वाट न पाहतां । वयसेचिया गांवा न येतां ।
बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें ॥४५१॥
त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पहाता, प्रौढ वयरूपी गावाला पोहोचण्यापूर्वीच, अगोदरच लहानपणीच सर्वज्ञता त्याला माळ घालते. 

योग्याची वंदनीयता-
तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥६-४६॥
तपस्वी, ज्ञानी व कर्मी ह्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे. म्हणून हे अर्जुना तू योगी हो. 
योगी हाच कर्मनिष्ठ व ज्ञानी या दोघांनाही वंदनीय आहे कारण तो स्वतः अवघड योगमार्गाचा सोपान चढून सिद्धतत्त्व अशा कैवल्यस्वरूपात विलीन झालेला  असतो. कर्मनिष्ठ कर्मरुप यज्ञाने ,ज्ञानी ज्ञानाचे कवच घालून ज्या परमात्म्याच्या शोधाचा संघर्ष करीत असतात तो परमात्मा योग्याच्या शरीराकारात प्रत्यक्ष नांदत असतो. म्हणून वरील श्लोकातील श्रीभगवंतांचा भाव ज्ञानदेवांनी अशा शब्दात व्यक्त केला आहे-
म्हणौनि कर्मनिष्ठा वंद्यु । तो ज्ञानियांसि वेद्यु ।
तापसांचा आद्यु । तपोनाथु ॥४७७॥
म्हणून तो पुरुष कर्मनिष्ठांना पूज्य आहे. ज्ञानी पुरुषास जाणण्यास तो योग्य आहे आणि तपस्वी लोकांमधे तो मूळ तपोनाथ आहे. 
पैं जीवपरमात्मसंगमा । जयाचें येणें जाहलें मनोधर्मा ।
तो शरीरीचि परी महिमा । ऐशी पावे ॥४७८॥
जीव परमात्म्याच्या ऐक्याच्या ठिकाणी ज्याच्या मनाच्या वृत्तीचे येणे झाले, तो जरी देहधारी असला तरी त्याला असला महिमा प्राप्त होतो. 
म्हणौनि याकारणें । तूंतें मी सदा म्हणें ।
योगी होईं अंतःकरणें । पंडुकुमरा ॥४७९॥
म्हणून याकारणास्तव हे अर्जुना, तू मनाने योगी हो असे मी तुला नेहेमी म्हणतो. 

विश्वरहस्याचे सार ज्यात व्यक्त झाले आहे असा हा सहावा अध्याय योगीराज श्रीज्ञानेश्वर यांनी विस्ताराने आणि परमसुंदरतेने विश्लेषित केला आहे.त्याचा अभिप्राय थोडक्यात मांडणे अशक्य आहे ,आणि तो आत्मसात करणे त्याहूनही अवघड आहे, कारण साक्षात् ब्रह्मस्थितीस पोहोचण्याचा सोपान या शब्दांमध्ये साकारलेला आहे. पण प्रत्येक भक्ताला, साधकाला, मुमुक्षूला या मार्गाने जावेच लागते म्हणून या गहन सुंदर शब्दांचा यथाशक्ती अभ्यास करत राहणे आपले कर्तव्य आहे.


Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग