यंत्र-विजय : एक पद्यानुवाद
यंत्र-विजय : एक पद्यानुवाद ( The Triumph of the Machine- : DH Lawrence ) यंत्राच्या विजयाबद्दल ,जो कधी होणार नाही,ते खूप बोलत असतात .. सहस्त्र मानवी शतकं झरतात काळाच्या ओंजळीतून,झुडपं उलगडतात पांढऱ्या पाकळ्यांच्या लपलपत्या जिभांनी रानफुलं सूर्यकिरण चोखतात मग उजाडतं दु:खाचं एक शतक: सर्व उजाड होतं ,यंत्रं विजयी होतात.. यंत्रं ढकलतात आपल्याला, लोटतात इकडेतिकडे, फैलावत ओसाडी बगळ्यांची घरटी गदगदा हलवतात आतली फुटून जाईपर्यंत अंडी दलदली घुसळून काढतात ,भेदरलेल्या बदकांची फडफड पडते उघडी रानटी हंस निर्वाणीचं गाणं गात आपल्याला सोडून जातात पैलथडी कठीण दुस्तर आहेत हे भूस्तर,यंत्रं धडधड करत येतात ज्यांच्यावरून तरीपण काहीकाही हृदयांमध्ये नाही राहता येत त्यांना टिकाव धरून . त्या कुणाचं ते हृदय,ज्याच्या खळगीत राहतात बुलबुल घरटी करून शुभ्र हंसांचे थवे पोहत निघतात मांडीच्या नसांतल्या लाल चिखलातून एक तगडा बैल गायींसह फिरतो त्याच्या वक्षाच्या गवताळ विस्तारावर निरागस कोकरं मेंदूतल्या रंगफुलांमध्ये स्वच्छंद बाग...