ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग


ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग-

श्रद्धेची शास्त्रशुद्ध चिकित्सा करणारा असा हा सतरावा अध्याय आहे .तदनुषंगिक विषयांचीही यात चर्चा आहे. शास्त्राशिवाय कर्माला सुटका नाही हे आधीच्या अध्यायाच्या अंतीचे भगवंतांचे उद्गार अर्जुनाला खटकले. शास्त्रांचा विस्तार अनंत, एकवाक्यतेचा अभाव ,शास्त्रासाठी देशकालपरिस्थितीची अनुकूलता मिळणे अनिश्चित ,अशा वस्तुस्थितीत बिचाऱ्या मुमुक्षूंना गती कोणती अशी शंका अर्जुनाला आली. एका श्रद्धेच्या बळावर ते तरुन जातील का हा क्रमप्राप्त प्रश्न त्याच्या मनात उपस्थित झाला, आणि त्याने भगवंतांना तो विचारला .त्या प्रश्नाची संपूर्ण चिकित्सा भगवंतांनी येथे केली आहे नित्यरीतीप्रमाणे श्रीगुरुस्तवनाने याही अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वरांनी केली आहे.

ज्ञानेश्वरवर्णित श्रीगुरुस्तोत्र -
या अध्यायातील गुरुस्तोत्रात गुरूला गणरायाच्या रुपात ज्ञानेश्वरांनी पाहिले आहे गेल्या अध्यायात ज्ञानसूर्याच्या स्वरूपात गुरूला कल्पून एका आध्यात्मिक सूर्योदयाचे रूपक ज्ञानेश्वरांनी रचले होते. या अध्यायातील या गणरायरूपकातही तसाच अलौकिक प्रतिभाविलास आहे.
ज्ञानदेव म्हणतात-
विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगमुद्रा ।
तया नमोजी गणेंद्रा । श्रीगुरुराया ॥ १ ॥
त्रिगुणत्रिपुरीं वेढिला । जीवत्वदुर्गीं आडिला ।
तो आत्मशंभूनें सोडविला । तुझिया स्मृती ॥ २ ॥
विश्वरूपाने विकास पावलेल्या मायेच्या आकृतीला तुमची योगनिद्राच सोडवू शकते, अशा त्या गणराय गुरुदेवाला नमन असो. त्रिगुणरूप त्रिपुरांमध्ये म्हणजे तीन नगरांमध्ये अडकलेल्या, जीवित्वरूप किल्ल्यात कैद अशा आत्मरूप श्रीशंकराला तुझ्या स्मरणमात्रे मुक्त करता येते,म्हणून शंकरापेक्षाही तूच श्रेष्ठ आहेस. असे तुझे बलवत्तर गुरुत्व(वजन),पण मायाजळातून तरंगत पलीकडे जाण्याच्या विषयात मात्र तू हलका होतोस.तुझ्याविषयी मूढता धारण करणाऱ्यांना तू वाकड्या सोंडेचा दिसतोस, पण ज्ञात्यांना मात्र समजून येतोस. तुझे बारीक नेत्र उघडझापेच्या सूक्ष्म हालचालीत उत्पत्तीप्रलयाचे नियंत्रण करतात.तुझे विशाल कर्णपट हालले की गंडस्थळावरील मदाचा सुगंध चाळवणाऱ्या लहरी उठतात व जीवरूप निळे भ्रमर तिथे गर्दी करतात.जणू निळ्या कमळांनी तू पूजला जातोस. पण त्याच कर्णपटांच्या निवृत्तीमय चाळवण्याने ती पूजा भंग होते, व तुझ्या मोकळ्या स्व-स्वरूपाची शोभा दृश्यमान होते .तुझी पत्नी माया आपल्या नृत्यपदन्यासाने जगद्रूप आभास दाखवते तर तांडवाच्या निमित्ताने तूही आपले कौशल्य दाखवतोस. हे उदारा, तू ज्याचा आप्त होतोस तो खरे तर आप्तत्वामधले सर्व व्यवहार विसरतो. त्यांना पारखे होतो. तुला समोर ठेवून नाना उपायांची धावाधाव करणाऱ्याला तू सापडत नाहीस, पण तुझ्या ध्यानात सर्वस्व हरवलेल्या,नेणिवेत बुडालेल्या सिद्धपुरुषांवर तुझे केवढे प्रेम असते! त्या नेणतेपणातच जणू सर्वज्ञता नांदत असते. उदकाच्या आश्रयास गेलेल्या मिठाने त्याला नमस्काराचा उपचार कसा पाळावा? माझे नमनही त्याच कोटीतले समजून रिकामी घागर जशी समुद्रातून उचंबळत निथळत बाहेर येते,वात दिव्याच्या संगतीने दिवाच होते त्याप्रमाणे श्रीनिवृत्तीनाथा,तुम्हाला नमन करून मी पूर्णतेप्रत पोचत आहे.आता मी तो गीतेचा अर्थ प्रगट करीन.
आतां रिता कुंभ समुद्रीं रिगे । तो उचंबळत भरोनि निगे ।
कां दशीं दीपसंगें । दीपुचि होय ॥ १९ ॥
तैसा तुझिया प्रणितीं । मी पूर्णु जाहलों श्रीनिवृत्ती ।
आतां आणीन व्यक्तीं । गीतार्थु तो ॥ २० ॥

अर्जुनाच्या प्रश्नाची ज्ञानेश्वरांनी केलेली उकल -
"अर्जुना, कृत्य व अकृत्य यांची रीति आचरणात आणण्यास तुला एक शास्त्रच पूर्णपणे प्रमाण मानले पाहिजे"- हे सोळाव्या अध्यायाच्या अंतीचे भगवतद्वचन ऐकून अर्जुनाच्या मनात एक शंका उपस्थित झाली.अर्जुन मनामधे असे म्हणाला की देवाचे सांगणे हे असे कसे ? की शास्त्राशिवाय कर्म करण्याला मोकळीक नाही ?
जे कृत्याकृत्यव्यवस्था । अनुष्ठावया पार्था ।
शास्त्रचि एक सर्वथा । प्रमाण तुज ॥ २२ ॥
तेथ अर्जुन मानसें । म्हणे हें ऐसें कैसें ।
जे शास्त्रेंवीण नसे । सुटिका कर्मा ॥ २३ ॥
सतराव्या अध्यायाच्या सुरुवातीस "ये शास्त्रविधीमुत्सृज्य" या श्लोकात अर्जुनाने श्रद्धेबद्दल आपली भावना प्रकट करतानाच ही शंका व्यक्त केली आहे.
ज्ञानदेव म्हणतात-
जो शृंगार आणि शौर्याचा आधार ,असा परमवीर अर्जुन म्हणाला-" हे कृष्णा शास्त्रावाचून इतर कशानेही मोक्ष दिसणार नाही असे आपण सोळाव्या अध्यायाच्या अंती कोणत्या अर्थाने म्हणालात?कधी देशच मिळत नाही, कधी काळच अवकाश देत नाही, कधी शास्त्राभ्यास करविणारा (गुरू) दूरच राहतो, कधी अभ्यासाची साधने अनुकूल नसतात. कधी आपलेच पूर्वकर्म आड येते. शास्त्रसंपादन बंद पडण्याची अशी अनेक कारणे असतात.कित्येकांची शास्त्राबद्दल एकही युक्ती चालत नाही म्हणून त्याचा विचारच ते सोडून देतात. पण शास्त्राचा अभ्यास करून पवित्र अनुष्ठाने आचरून राहणाऱ्या पुण्यपुरुषांचा मार्ग पत्करणे याहून सोपे नव्हे काय? धड्यातील अक्षरे कोवळे बाळ गिरवून अक्षरओळख करून घेते.वाटाड्याच्या मागून आंधळा चालतो त्याप्रमाणे शास्त्रनिपुणांचे आचरण आपल्या श्रद्धेने प्रमाण मानावे,त्याच श्रद्धायुक्त बुद्धीने यज्ञयागादि आचरावे -असे केल्यास हे पुरुषोत्तमा, कोणती गती मिळते?
धड्याचिया आखरां । तळीं बाळ लिहे दातारा ।
कां पुढांसूनि पडिकरा । अक्षमु चाले ॥ ४२ ॥
तैसें सर्वशास्त्रनिपुण । तयाचें जें आचरण ।
तेंचि करिती प्रमाण । आपलिये श्रद्धे ॥ ४३ ॥
अशाप्रकारे अर्जुनाचा श्रद्धाविषयक मूलभूत प्रश्न ज्ञानदेवांनी उकलून सांगितला आहे.

सत्व रज आणि तम या गुणांनुसार श्रद्धा, आहार, दान व यज्ञ यांचे त्रिविधस्वरूप-

"श्रद्धा" हे काही तारुन नेणारे एखादे स्वयंभू तत्व नाही असे स्पष्टपणे प्रतिपादन करताना श्रीकृष्णांनी तन्निनिमित्त श्रद्धा, आहार ,दान व यज्ञ यांचे सत्वरजतमात्मक त्रिविधस्वरूप स्पष्ट केले आहे .त्याचा विस्तार ज्ञानेश्वरांनी येथे केला आहे. श्री भगवंत म्हणतात-
नुसधियाची श्रद्धा । झोंबों पाहसी परमपदा ।
तरी तैसें हें प्रबुद्धा । सोहोपें नोहे ॥ ५० ॥
"नुसत्या (हव्या त्या) श्रद्धेने परमपदाला घेण्यास पहातोस. तर चतुर अर्जुना हे तसे सोपे नाही. "
याच्या स्पष्टीकरणासाठी अनेक उपमांची योजना ज्ञानदेव करतात.जसे की चंदन हे शीतलतेसाठी प्रसिद्ध असले, तरी अग्नीकाष्ठ म्हणूनही ते कामी येते हे आपल्याला माहीतच आहे. गंगेचे पाणी पवित्र असले तरी मद्यपात्रात ते ओतल्यास त्याचा परिणाम काय होतो हे आपल्याला माहीतच आहे. अनादिमायेच्या प्रभावाने सर्व प्राणिमात्र त्रिगुणांचेच बनलेले आहेत. असंख्य जन्मांतरे होत जात असता प्राण्यांचे त्रिगुणत्व बदलत नाही. एका वेळी एक गुण बलवत्तर होऊन इतर दोन गुण दबल्यासारखे होतात. त्यानुसार जीवाच्या वृत्ती बनतात व श्रद्धेचे स्वरूप बदलते. प्राण्यांच्या वाट्याला आलेली जी श्रद्धा, ती या तीन गुणांसारखी होते.पाणी हे जसे उसात घातले की गोड, मि-यात तिखट व विषात मारक ठरते तसेच हे आहे.
तियापरीं यियें अपारें । होत जात जन्मांतरें ।
परी त्रिगुणत्व न व्यभिचरें । प्राणियांचें ॥ ६० ॥
म्हणूनि प्राणियांच्या पैकीं । पडिली श्रद्धा अवलोकीं ।
ते होय गुणासारिखी । तिहीं ययां ॥ ६१ ॥
सात्विक श्रद्धेचा परिपोष असलेले जीव सर्व विद्या शिकतात,यज्ञक्रिया करतात,देवलोकात जाऊन स्थिरावतात. पण सत्व बळावते  तेव्हा रज आणि तम गप्प का बसतील? सत्वाचे बल नाहीसे करून जेव्हा रजोगुण आकाशात जातो तेव्हा तीच श्रद्धा जणू कर्मरूपी केर झाडणारी केरसुणी होते. तम बळावल्यावर तीच श्रद्धा भलभलत्या गोष्टी करवून घेते. राजस लोक यक्ष राक्षसांना भजतात तर तामस श्रद्धेचे लोक भलभलत्या भोगांसाठी भूतप्रेतांची अमंगल पूजा करतात, बळी देतात.
सत्त्वाचेनि आंगलगें । ते श्रद्धा मोक्षफळा रिगे ।
तंव रज तम उगे । कां पां राहाती ? ॥ ६३ ॥
मोडोनि सत्त्वाची त्राये । रजोगुण आकाशें जाये ।
तेव्हां तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ॥ ६४ ॥
मग तमाची उठी आगी । तेव्हां तेचि श्रद्धा भंगी ।
हों लागे भोगालागीं । भलतेया ॥ ६५ ॥
म्हणून नेहमी सात्विक श्रद्धेचे जतन करावे. श्रुतीस्मृतींचा जे मूर्तिमंत अर्थ, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालल्यास मोक्षाचा बागुलबुवा वाटत नाही.मग असा तो सात्त्विक श्रद्धावंत व्यासांची ब्रह्मसूत्रे न शिकेना का ? तो सर्व शास्त्रांचे परिशीलन न करेना का ? स्वतंत्र बुद्धीने स्थापलेले नवीन सिद्धांत त्याचे स्वाधीन नसेनात का ?
हे सात्त्विकमति  जया ।निर्वाहती होय धनंजया ।
बागुल नोहे तया । कैवल्य तें ॥ ८३॥

तो न पढो कां ब्रह्मसूत्र । नालोढो सर्व शास्त्र ।

सिद्धांत न होत स्वतंत्र । तयाच्या हातीं ॥ ८४॥

परी श्रुतिस्मृतींचे अर्थ । जे आपण होऊनि मूर्त ।
अनुष्ठानें जगा देत । वडील जे हे ॥ ८५॥
एक दिवा प्रयत्नपूर्वक लावल्यावर दुसरा दिवा मात्र त्या पहिल्यावर सहजतेने चेतवता येतो, तसेच हे घडते. शास्त्रांचा खरा अर्थ जाणून आचरण करणाऱ्यांचे अनुकरण करणारा सामान्यमति जीवही तरुन जातो.
सत्ववृत्तीच्या परिपोषणासाठी आहारविषयक सावधता बाळगणेही आवश्यक आहे. आहार हा स्वभाववर्धक असतो, आहारानुसार पिंड (धातु) बनतो आणि पिंडानुसार अंतरंग तयार होते . अशाप्रकारे आहार हा त्रिगुणात्मक परिणामांचा कारक असतो.ज्याप्रमाणे भांड्याच्या तापण्याने आतले पाणीही तापते, त्याप्रमाणे आहाराच्या योगाने चित्तवृत्ती बनते.
तेवीं जैसा घेपे आहारु । धातु तैसाचि होय आकारु ।
आणि धातु ऐसा अंतरु । भावो पोखे ॥ ११५॥
जैसें भांडियाचेनि तापें । आंतुलें उदकही तापे ।
तैसी धातुवशें आटोपे । चित्तवृत्ती ॥ ११६ ॥
येथे ज्ञानेश्वर उदाहरण देतात की अगदी सावधचित्त पुरुषानेही मद्यपान केल्यावर तो उन्मत्तच होतो ना! कारण उन्मत्तपणा हा मद्याचा परिणाम आहे.
मूळचीच सुरस, गोड ,रसार्द्र, परिपक्व अन्ने, त्यातून शिजवून मृदू व टवटवीत केलेली, आकाराने आटोपशीर, जणू गुरुमुखीची अक्षरे- तोंडाला गोड व शरीराचे हितवर्धन करणारे हे अन्न सात्त्विक प्रवृत्तीच्याच माणसाला आवडणार !हे अन्नरुप शरीराला मिळणारे त्राणच.
रसें गाढीं वरी ढिलीं । द्रवभावीं आथिलीं ।
ठायें ठावो सांडिलीं । अग्नितापें ॥ १२७॥
आंगें सानें परीणामें थोरु । जैसें गुरुमुखींचें अक्षरु ।
तैशी अल्पीं जिहीं अपारु । तृप्ति राहे ॥ १२८ ॥
याउलट राजस आहार. फक्त मारत नाही म्हणून काळकूट म्हणायचे नाही, एरवी कडूजार ,आंबटशार,ऊनऊन-जणू अन्नरूप अग्नीच. कपार कोसळून धुळवड उठावी तशा अंगात झिणझिण्या उठवणारे तिखटजाळ रायते .हे खाऊन झाल्यावर तोंडाशी पाण्याचे भांडे व शरीराचा दाह शमवण्यासाठी जमिनीवर लोळणे. अन्नरुपाने जणू शरीरस्थ व्याधीसर्पांना चेववण्यासाठी माजवण घालण्याचाच हा प्रकार आहे.
ते आहार नव्हती घेतले । व्याधिव्याळ जे सुतले ।
ते चेववावया घातलें । माजवण पोटीं ॥ १४९ ॥
तैसें एकमेकां सळें । रोग उठती एके वेळे ।
ऐसा राजसु आहारु फळे । केवळ दुःखें ॥ १५० ॥
तामस अन्नाचा प्रकार सर्वात अमंगळ.शिळे, अर्धवट शिजलेले किंवा पूर्ण करपलेले, कुजलेले किंवा वाळून कोळ झालेले ,आंबलेले, फसफसलेले ,चिवडून चिखल झालेले, त्याच्यावर अपेयपानाचा मारा. सारेच किळसवाणे.पण चमत्कार असा की ज्या दोषयुक्त वाईट पदार्थांना निषेधाचा कलंक-शिंतोडा असतो,त्या खाण्यास पिण्यास अयोग्य अशा पदार्थांसाठीच तामसी व्यक्तीकडून उत्कट हाव वाढवली जाते.
मग चमत्कारु देखा । निषेधाचा आंबुखा ।
जया का सदोखा । कुद्रव्यासी ॥ १६१॥
तया अपेयांच्या पानीं । अखाद्यांच्या भोजनीं ।
वाढविजे उतान्ही । तामसें तेणें ॥ १६२ ॥


यज्ञांमध्ये श्रेष्ठ सात्विक यज्ञ फलाशेशिवायच सिद्ध होतो. मन व देहाचा लय करून फक्त स्वधर्माचरण म्हणून यज्ञ मांडला जातो. अशा यज्ञाचे कुंड,मंडप वेदी स्वतः नियतीने जमवाजमव केल्याइतकी आपापल्या जागी सुशोभित असतात.जसे काही सर्व अलंकार घातलेली अशी यज्ञाविद्याच यज्ञाच्या निमित्ताने प्रत्यक्ष मूर्तिमंत आली आहे.
सकळावयव उचितें । लेणीं पातलीं जैसीं आंगातें ।
तैसे पदार्थ जेथिंचे तेथें । विनियोगुनी ॥ १७९ ॥
काय वानूं बहुतीं बोलीं । जैसी सर्वाभरणीं भरली ।
ते यज्ञविद्याचि रूपा आली । यजनमिषें ॥ १८० ॥
इच्छेच्या भागाशिवायच केलेल्या या तेज:पुंज यज्ञविधीमध्ये जणू यज्ञविद्याच यथार्थत्वाने वावरते.तुळशीचे रोपटे जोपासणारा फळ ,फुले व छाया या तिन्हींच्या आशेपासून मुक्त एका अध्यात्मभावानेच प्रेरित झालेला असतो.सात्विक यज्ञाची प्रेरणा अशीच असते.
राजस यज्ञ म्हणजे यज्ञाच्या निमित्ताने परलोकी स्वर्ग व इहलोकी प्रतिष्ठा मिळवणे. जणू श्राद्धाला राजा बोलावणे! तेवढाच बोलबाला व समर्थांशी संबंध.
जरी राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये ।
आणि कीर्तीही होये । श्राद्ध न ठके ॥ १८५॥
तैसा धरूनि आवांका । म्हणे स्वर्गु जोडेल असिका ।
दीक्षितु होईन मान्यु लोकां । घडेल यागु ॥ १८६॥
त्याचप्रमाणे विचार मनात धरून तो रजोगुणी पुरुष म्हणतो, की मला या यज्ञाने संपूर्ण स्वर्गप्राप्ती होईल व मी दीक्षित म्हणून लोकांना मान्य होईन आणि यज्ञही घडेल.
तामस यज्ञाचे मूळ फक्त हेकट आग्रहात असते. जसा पशुपक्षांच्या लग्नात काम हाच उपाध्याय असतो तशीच येथे विधीची पर्वा नसते. त्या यज्ञात मंत्र वगैरे आवश्यक नाहीत. ज्याप्रमाणे माशीच्या तोंडाकडून कसलाही अशुद्ध अन्नकणही सुटत नाही त्याप्रमाणे तमोगुणी पुरुष शास्त्रदृष्ट्या विहित-निषिद्ध हे न पहाता स्वैर वागतो.विधीहीन ,ब्राह्मणद्वेष्ट्या अशा तामसाच्या यज्ञात श्रद्धेचा लवलेशही नसतो ,पण सर्वस्व खर्चले मात्र जाते.
तरी तामसाचिया आचारा । विधीचा आथी वोढावारा ।
म्हणूनि तो धनुर्धरा । उत्सृंखळु ॥ १९०॥
नाहीं विधीची तेथ चाड । नये मंत्रादिक तयाकड ।
अन्नजातां न सुये तोंड । मासिये जेवीं ॥ १९१ ॥


दानही त्रिविध गुणयुक्त असते. सात्विक दान म्हणजे सण,सुहृद व संपत्ती एकवट जुळून येण्याचा सुयोग. पवित्र स्थळी सुमुहूर्तावर शास्त्रशुद्ध रीतीने दान देणे म्हणजे सात्विक दान. राजाला विडा द्यावा तशा लीनभावनेने, कोणत्याही तर्‍हेच्या प्रत्युपकाराच्या  आशेशिवाय दिलेले हे निर्मळ दान शुद्ध सत्वभावनेने प्रेरित असते.

तरी स्वधर्मा आंतौतें । जें जें मिळे आपणयातें 

तें तें दीजे बहुतें । सन्मानयोगें ॥ २६५॥

तरी स्वधर्माचरणाने जे जे आपणास मिळालेले असेल, ते ते मोठ्या सन्मानाने द्यावे ही या दानामागची शुद्ध प्रेरणा असते.

साकांक्ष दान हे राजस दान .जसे,दुभत्याच्या आशेने गाईला चारा घालावा !आहेरावर नजर ठेवून आप्तांना निमंत्रण करावे! वसा करणारीचे घरी जसे वाण पाठवावे,तसे हे दान.

परी मनीं धरूनि दुभतें । चारिजे जेवीं गाईतें ।
का पेंव करूनि आइतें । पेरूं जाइजे ॥ २८४ ॥
नाना दिठी घालुनि आहेरा । अवंतुं जाइजे सोयिरा ।
का वाण धाडिजे घरा । वोवसीयाचे ॥ २८५॥
अजून उदाहरणे द्यायची तर पैसे घेऊन पीडिताला औषध द्यावे! चुकून एखाद्या उत्तम ब्राह्मणास दान द्यायचा प्रसंग आलाच, तर एक कवडी द्यावी व इहपरलोकी उद्धाराची इच्छा करावी, असल्या मनोवृत्तीचे हे दान.
तामसदान अमंगल ठिकाणी, करकरीत संध्याकाळीसारख्या अवेळी, चोरीच्या द्रव्याने, गारुडी वेश्या जुगारी आदि मूर्तिमंत भुतावळीस केले जाते .
मग म्लेंच्छांचे वसौटें । दांगाणे हन कैकटे ।
का शिबिरें चोहटे । नगरींचे ते ॥ २९३॥
तेही ठाईं मिळणी । समयो सांजवेळु कां रजनी ।
तेव्हां उदार होणें धनीं । चोरियेच्या ॥ २९४॥
पात्रें भाट नागारी । सामान्य स्त्रिया का जुवारी ।
जिये मूर्तिमंते भुररीं । भुले तया ॥ २९५ ॥
चुकून पुण्यस्थळ मिळालेच तर असा तामस गर्वाने फुगून तेथे नेमका उद्धट होतो आणि सत्पात्राला अपमानित करतो.
अशा प्रकारे त्रिगुणांनी प्रेरित श्रद्धा, आहार, दान व यज्ञ यांचे अत्यंत तपशीलवार वर्णन श्री ज्ञानेश्वरांनी येथे करून आपल्या वर्तनाच्या परीक्षेचे जणू निकषच निर्माण केले आहेत.


तपाचे प्रकार व गुणानुसार त्याचे त्रिविधस्वरूप
सतराव्या अध्यायाच्या चौदा,पंधरा व सोळाव्या श्लोकात तपाचे शारीर, वाङ्मय (वाचिक) व मानसिक असे तीन प्रकार सारभूत शब्दात वर्णिले आहेत.
त्याची अर्थशोभा वाढवताना श्रीज्ञानेश्वर म्हणतात-
पाय देवालयाची यात्रा करण्यासाठी वेठीस धरलेले, हात देवाचे आंगण सुशोभित करण्यासाठी,देह काठीसारखा साष्टांग नमस्कारात धराशायी करण्यासाठी असे जे वर्तन, ते शारीर तपाचे लक्षण .विद्याविनयसंपन्न ब्राह्मणांसाठी तसेच दुःखित संकटग्रस्तांसाठी व माता-पितरांसाठी सेवाव्रताचे आचरण, ज्ञानदानी गुरुचे निरंतर भजन असे वर्तन. 

स्वधर्माच्या धगधगीत होमात पुन्हापुन्हा देहबुद्धीची बुरशी जाळून काढायची, उद्यमशील राहायचे, प्राणिमात्रांचा आदर व स्त्रीविषयी इंद्रियांचे कठोरतम नियमन. जन्मापुरताच स्त्री स्पर्श! 

आणि स्वधर्माचा आगिठां । देह जाड्याचिया किटा ।आवृत्तिपुटीं सुभटा । झाडी कीजे ॥ २०८ ॥

वस्तु भूतमात्रीं नमिजे । परोपकारीं भजिजे ।

स्त्रीविषयीं नियमिजे । नांवें नांवें ॥ २०९ ॥
जन्मतेनि प्रसंगे । स्त्रीदेह शिवणें आंगें ।
तेथूनि जन्म आघवें । सोंवळें कीजे ॥ २१०॥
ही लक्षणे उत्कर्ष पावणे म्हणजेच शारीर तपाची सिद्धी होणे.
वाङ्मय किंवा वाचिक तप म्हणजे निष्पाप पुण्यशील वाणीचा विकास. लोखंडाचे अंग न दुखावता, न तोडता मोडता परीस त्याला जागीच सुवर्णरूप देतो.त्याप्रमाणे ज्या बोलण्यात ऐकणार्‍याच्या जवळ असलेल्या जोडीदाराला दु:ख न देता, सुख होईल असा चांगलेपणा अनुभवास येतो , ते वाचिक तप. सज्जनांचे बोलणे असेच ऐकणाऱ्याला न दुखवता त्याचे चित्तपरिवर्तन करते.
तरी लोहाचें आंग तुक । न तोडितांचि कनक ।
केलें जैसें देख । परीसें तेणें ॥ २१५॥
तैसें न दुखवितां सेजे । जावळिया सुख निपजे ।
ऐसें साधुत्व कां देखिजे । बोलणां जिये ॥ २१६ ॥
अविवेक नाहीसे करणारे ,अमृतमधुर, पापक्षालन करणारे असे बोलणे असेल तरच बोलावे, न पेक्षा वेदांच्या आवृत्ती किंवा नामस्मरण करीत राहावे मोकळ्या क्षणातही परमेश्वराचे नाम भरून टाकणे ही वाणीला लावलेली पराकोटीची सात्विक शिस्त आहे. हे नाव शिवाचे किंवा किंवा विष्णूचे आपल्या वृत्तीनुसार पंथानुसार कोणतेही असावे, ते मनात वसावे हे महत्त्वाचे .तोंड म्हणजे वेदशाळाच नाहीतर ईशनामाचे घर असे असेल तर ते वाचिक तप.


मानस तपातून एक पराकोटीची तरलनिर्मल मनस्थिती मांडली आहे.सौम्यसुंदर दृष्टांतांची वृष्टी करत ज्ञानेश्वर म्हणतात- "तरंगांनी सरोवर सोडावे, मेघांनी आकाश व सर्पांनी चंदनाचा त्याग करावा त्याप्रमाणे विकल्पजाल संपलेले व केवलस्वरूप मन स्वभावतः शुद्ध होते.तळहातावर रोमरहित स्वच्छ जागा निसर्गतः असावी, तसे.
म्हणौनि तिये मानसीं । भावशुद्धिचि असे अपैसी ।
रोमशुचि जैसी । तळहातासी ॥ २३४ ॥
काय बहु बोलों अर्जुना । जैं हे दशा ये मना ।
तैं मनोतपाभिधाना । पात्र होय ती ॥ २३५ ॥
केवळ निजबोधाच्या वाफेने भरलेले मनरूप क्षेत्र एवढेच त्याचे अस्तित्व असते, अशी अवस्था जेव्हा मनाला  प्राप्त होते तेव्हा ती स्थिती ‘मानस तप’ या नावाला प्राप्त होते. मानस तप  या परमपवित्र दशेला म्हणतात.


गुणांनुसार तपाचे त्रिविध स्वरूप
शारीर वाचिक व मानस या तिन्ही प्रकारचे सात्विक तप वरील प्रकारे सविस्तर वर्णून झाल्यावर ज्ञानदेव राजस आणि तामस तपाचे विश्लेषण करतात.
ज्याप्रमाणे वेश्या आपले शरीर विकण्याकरता शृंगार करते, त्याप्रमाणे ज्या तपाचरणातून स्वत:स विकण्याकरता (लोकात आपली प्रतिष्ठा वाढवण्याकरता) आपले शरीर व बोलणे तपाने माखले जाते,धनाच्या ठिकाणी व मानाच्या ठिकाणी आशा वाढवून जे कष्टाने भरलेले तप केले जाते त्या तपाला राजस तप म्हणावे.
अंग बोल माखूनि तपें । विकावया आपणपें ।
अंगहीन पडपे । जियापरी ॥ २४५ ॥
हें असो धनमानीं आस । वाढौनी तप कीजे सायास ।
तैं तेंचि तप राजस । बोलिजे गा ॥ २४६॥
ज्ञानदेव पुढे म्हणतात , "प्रसिद्धीसाठी केलेले हे राजस तप अंती फळाच्या दृष्टीने निष्फळ तर ठरतेच पण आचरणाच्या कसोटीवरही ते शेवटपर्यंत टिकत नाही.अस्थिरता हाच त्याचा विशेष असतो."
सात्विक तपामागे परलोकप्राप्तीची प्रेरणा असते ,तर राजस तपामागे े्रकारच विपरीत आहे. स्वतःच्या शरीराला अघोरी कष्ट देऊन हे तप केले जाते, ते दुसऱ्याच्या, विशेषतः सुखात असलेला इतरांच्या विनाशासाठी.
तेवीं आपलिया आटणिया । सुखें असतया प्राणिया ।
जिणावया शिराणिया । कीजती गा ॥ २६१ ॥
किंबहुना हे वोखटी । घेऊनि क्लेशाची हातवटी ।
तप निफजे तें किरीटी । तामस होय ॥ २६२ ॥

ब्रह्माच्या  तिहेरी नावाची उपपत्ती व  विनियोग-
सतराव्या अध्यायाच्या तेविसाव्या श्लोकात "ॐ तत्सत्" या ब्रह्माच्या तिहेरी नावाच्या उपपत्तीचा व विनियोगाचा विचार आहे .त्या संदर्भात ज्ञानदेव म्हणतात-
अनादि परमेश्वराला नाम व जाती नाहीच ,पण अविद्येच्या रात्री त्याला ओळखण्यासाठी वेदाने एक खूण केलेली आहे. बालक मूळचे अनाम, पण ठेवलेल्या नावाला ओ देते, त्याप्रमाणे संसारकष्टाने श्रमलेल्या जीवांना हाक मारता यावी, त्यांना ओ देता यावी, म्हणून ईश्वराने नाम धारण केले आहे. या नामाच्या शक्तीतूनच ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची पात्रता मिळत असते, एवढे याचे सामर्थ्य आहे. "ॐ तत्सत्" हेच ते नाव. सर्व मंत्रांचा राजा तो ‘ॐ’ ते त्या नावातील पहिले अक्षर समजा, ‘तत्’ हे दुसरे अक्षर होय व ‘सत्’ हे तिसरे अक्षर आहे. याप्रमाणे ‘ॐ तत् सत्’ या रूपाने ब्रह्माचे हे नाम त्रिधा झाले आहे. उपनिषदांचे हे सुंदर गंधित फूल .
तरी सर्व मंत्रांचा राजा । तो प्रणवो आदिवर्णु बुझा ।
आणि तत्कारु जो दुजा । तिजा सत्कारु ॥ ३३९॥
एवं ॐतत्सदाकारु । ब्रह्मनाम हें त्रिप्रकारु ।
हें फूल तुरंबी सुंदरु । उपनिषदाचें ॥ ३४० ॥
विनियोग म्हणजे व्यवस्था. अन्न व भूक दोन्ही जवळच असतात,पण जेवायचे कसे ते लहान बाळाला ठाऊक नसते. म्हणून लंघन घडते. या नामाची व्यवस्था अशी आहे की कर्माच्या आदि, मध्ये व अंती  याची क्रमशः योजना करावी लागते. ही युक्ती जाणारे ब्रह्मज्ञानी ब्रह्मपदाला पोचतात.
तरी या नामींचीं अक्षरें तिन्हीं । कर्मा आदिमध्यनिदानीं ।
प्रयोजावीं पैं स्थानीं । इहीं तिन्हीं ॥ ३५१॥
हेंचि एकी हातवटी । घेउनि हन किरीटी ।
आले ब्रह्मविद भेटी । ब्रह्माचिये ॥ ३५२ ॥
ॐ हा कर्मारंभ आहे इथूनच अध्यात्म व जीवन व्यापून टाकणाऱ्या सत्कर्माची सुरुवात होते. ज्ञानीजन आदिम ओंकार ध्यानात प्रत्यक्ष पाहतात.वाणीने उच्चार करतात. त्या ध्यानाने ॐकार सिद्ध झाल्यावर व नंतर ॐकाराचा उच्चार स्पष्ट केल्यावर मग ते कर्माच्या आचरणाला लागतात.
तो आदि तंव ओंकारु । ध्यानें करिती गोचरु ।
पाठीं आणिती उच्चारु । वाचेही तो ॥ ३५४॥
तेणें ध्यानें प्रकटें । प्रणवोच्चारें स्पष्टें ।
लागती मग वाटे । क्रियांचिये ॥ ३५५||
धर्माने मिळवलेली द्रव्ये यज्ञ दान व तपामध्ये विनियुक्त होतात. अंधार व अरण्याच्या साम्राज्यात दिव्यासारखा समर्थ सोबती घेऊन प्रवासाला सुरुवात करावी, तसे अज्ञानरूप काळारण्यात एवढ्याशा ओंकारतेजाने क्रियांचे परिणाम स्पष्ट होऊ लागतात.नंतर ते धर्माने मिळवलेली अनेक द्रव्ये ब्राह्मणद्वारा अग्नीमध्ये अर्पण करतात. नाना यज्ञनिष्पत्तीच्या रूपाने अहंकाराचा त्याग करतात .दान, तप, यज्ञ यांच्या योगाने मोक्षमार्ग खुला करतात. या आरंभकालीन क्रिया ओंकाराच्या योगेकरून सिद्ध होतात.

त्या क्रिया फलद्रूप होऊ लागल्या की 'तत्' या शब्दाची योजना करायची असते.त्या क्रिया जेव्हा फळामधे अल्पसा प्रवेश करू पहातात, तेव्हा त्या कर्मफलाचे ठिकाणी ते ज्ञानीजन ‘तत्’ शब्दाचा विनियोग करतात. म्हणजे तत् शब्दाने बोधित होणारे जे ब्रह्म त्याला फळासह कर्म अर्पण करतात. तत् हा कर्मफलक त्याग आहे .
परी हें असो ऐसिया । या यज्ञदानादि क्रिया ।
ओंकारें सावायिलिया । प्रवर्तती ॥ ३६४ ॥
तिया मोटकिया जेथ फळीं । रिगों पाहाती निहाळीं ।
प्रयोजिती तिये काळीं । तच्छब्दु तो ॥ ३६५ ॥
."ते "म्हणजे सर्व जगाच्या पलीकडले  एक प्रकाशक तत्त्व. त्याचे शुद्ध स्वरूप चित्तात आणून ही सर्व क्रियाफले त्या ब्रह्मात तद्रूप होऊन आम्हाला भोगावयास शिल्लक राहू नयेत अशी  जाणीव असलेले ब्रह्मज्ञानी कर्मफलातून अंग झाडून मोकळे होतात. व कर्मफलस्वरूप बंधनातून मुक्त होतात.

सत् म्हणजे जे असत् नाही ते,देशकालापलीकडचे, कर्माची सीमा सुटत असताना, बुद्धीला भ्रांत पडत असताना कर्माचे व बुद्धीचे नियमन करून त्याला साधुत्व देणारे ईश्वराचे रूप.
मीठ समुद्रात विरघळून गेले तरी क्षारतेच्या रूपाने त्याची ओळख शिल्लक राहते,तसेच कर्म ब्रह्माकार झाले तरी वेगळेपणाने जाणवत राहते.तर ॐकार व तत्कार यांनी जे कर्म ब्रह्मस्वरूप झाल्याचे दाखवले ते वेगळेपणा टाकून ब्रह्ममात्रच व्हावे, हा वेगळेपणा जाऊन ब्रह्म आत्मस्वरूपात स्थिर व्हावे,म्हणून ईश्वराने सत् शब्द ठेवला आहे.असा हा सत् शब्दाचा अंतरंग विनियोग समज, असे श्रीकृष्ण म्हणतात,अहो मी ज्ञानदेव असे म्हणत नाही,असे ज्ञानदेव स्पष्ट करतात.
तरी ओंकार तत्कारें । जें कर्म दाविलें ब्रह्माकारें ।
तें गिळूनि होईजे एकसरें । सन्मात्रचि ॥ ३८१ ॥
ऐसा हा अंतरंगु । सच्छब्दाचा विनियोगु ।
जाणा म्हणे श्रीरंगु । मी ना म्हणें हो ॥ ३८२॥
म्हणजे ओंकाराने आणि तत्काराने  ब्रह्मरूप करून दाखविलेले कर्म सत्स्वरूप व्हावे, असत्याचे नाणे आटून जळून जावे, सद्भावाची वृद्धी व्हावी, असत् मिथ्या आहे हे कळून तो मार्ग खुंटावा, ऐक्यबुद्धी मनात स्थिरावावी यासाठी हा शब्द आहे .रोग्याला जसे औषध, भंगलेल्याला सावयवत्व, त्याप्रमाणे न्यून पडलेल्या कर्माला सत् शब्द तारून नेतो. कर्माची सीमा सुटून ते असाधुत्वास जाऊ लागले की सत् शब्द त्याला सावरून साधूकर्म करून सोडतो.
परी आश्रयो आकाशा । आकाशचि का जैसा ।
या नामानामी आश्रयो तैसा । अभेदु असे ॥ ४०० ॥
आकाश या नावाला आकाश हाच जसा एक आधार आहे, कारण दोघे एकच एकमेव आहेत, त्याप्रमाणे ‘ॐ तत् सत्’ या नामाचा व नामीचा (ब्रह्माचा) आशय अभेद आहे. म्हणजे ॐ तत् सत् या नावाचा व परब्रह्मवस्तूचा अभेद आहे.
अशा प्रकारे जेथून सारी दृश्य सृष्टी निर्माण होते, त्या मूळ शुद्ध स्थानी, अपरिच्छिन्न परब्रह्मात सत्कर्मांचीही वलये विरून जीव जाऊन पोहोचतो.म्हणून हे तीन अक्षरी साक्षात परब्रह्मच आहे असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे.त्या नामाचे विनियोगयुक्त अनुष्ठान म्हणजे सर्व वेदांचे अनुष्ठान असे त्यांचे प्रतिपादन आहे.
समारोप
अध्यायाच्या शेवटी भगवंत श्रद्धा या विषयाचा साररूप समारोप करतात. ते म्हणतात,"मर्मज्ञ अर्जुना, आता याप्रमाणे असे चांगले माहात्म्य असलेले जे ब्रह्मनाम आहे, ते तू जाणलेस काय ? तर या नामाविषयीच तुझी श्रद्धा नेहमी विस्तारलेली असू दे. या नामाच्या विनियोगाने झालेले कर्म, जन्ममरणरूपी बंधाला उरू देत नाही."
एवं ऐसें सुमहिम । म्हणौनि हें ब्रह्मनाम ।
आतां जाणितलें कीं सुवर्म । राया तुवां ? ॥ ४०८ ॥
तरी येथूनि याचि श्रद्धा । उपलविली हो सर्वदा ।
जयाचें जालें बंधा । उरों नेदी ॥ ४०९ ॥
अध्यायाच्या अंती अर्जुनाबद्दलच्या अनावर कौतुकाने संजयाच्या तोंडून अनेक अर्जुनस्तुतीपर वचने बाहेर पडली. साक्षात रणसंग्रामाच्या धगधगत्या भूमीपटलावर निजानंदसाम्राज्य भोगणारा अर्जुनासारखा पुरुषश्रेष्ठ तोच,आणि हा शत्रुपक्षाचा असला तरी गुणी अर्जुन तर यावेळी आमच्या सुखाचा (आम्हाला आत्मसुख देणारा) गुरूही आहे. असे त्याने धृतराष्ट्रासमोर व्यक्तही केले.
संजयो म्हणे कौरवराया । गुणा रिझों ये रिपूचिया ।
आणि गुरुही हा आमुचिया । सुखाचा येथ ॥ ४२४ ॥
हा न पुसता हे गोठी । तरी देवो कां सोडिते गांठी ।
तरी कैसेंनि आम्हां भेटी । परमार्थेंसीं ॥ ४२५ ॥
पण शत्रुभावाने पछाडलेल्या राजाच्या मनाला हे टोचेल अशी त्याला भीती वाटली.
याचें जैसें कां करणें । तैसें मीही करीन बोलणें ।
ऐकिजो ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ॥ ४३० ॥
म्हणून संजयाने अर्जुनाचे गुणवर्णन करण्याचे सोडून अर्जुनाने श्रीकृष्णास विचारलेली गोष्ट सांगण्यास जसा आरंभ केला तसे व्याख्यान मीही करीन, ते श्रोत्यांनी ऐकावे, असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव अध्यायाचा समारोप करताना म्हणतात.


Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –