ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग
ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग- श्रद्धेची शास्त्रशुद्ध चिकित्सा करणारा असा हा सतरावा अध्याय आहे .तदनुषंगिक विषयांचीही यात चर्चा आहे. शास्त्राशिवाय कर्माला सुटका नाही हे आधीच्या अध्यायाच्या अंतीचे भगवंतांचे उद्गार अर्जुनाला खटकले. शास्त्रांचा विस्तार अनंत, एकवाक्यतेचा अभाव ,शास्त्रासाठी देशकालपरिस्थितीची अनुकूलता मिळणे अनिश्चित ,अशा वस्तुस्थितीत बिचाऱ्या मुमुक्षूंना गती कोणती अशी शंका अर्जुनाला आली. एका श्रद्धेच्या बळावर ते तरुन जातील का हा क्रमप्राप्त प्रश्न त्याच्या मनात उपस्थित झाला, आणि त्याने भगवंतांना तो विचारला .त्या प्रश्नाची संपूर्ण चिकित्सा भगवंतांनी येथे केली आहे नित्यरीतीप्रमाणे श्रीगुरुस्तवनाने याही अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वरांनी केली आहे. ज्ञानेश्वरवर्णित श्रीगुरुस्तोत्र - या अध्यायातील गुरुस्तोत्रात गुरूला गणरायाच्या रुपात ज्ञानेश्वरांनी पाहिले आहे गेल्या अध्यायात ज्ञानसूर्याच्या स्वरूपात गुरूला कल्पून एका आध्यात्मिक सूर्योदयाचे रूपक ज्ञानेश्वरांनी रचले होते. या अध्यायातील या गणरायरूपकातही तसाच अलौकिक प्रतिभाविलास आहे. ज्ञानदेव म्...