ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –


ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

शहराची पलिकडची बाजू ..अवशेषांचे राज्य दिसे
ओसाडीतील पडक्या विहिरीमधे गार काळोख वसे
या अंधारी कुहरामध्ये खोल खोल हलते पाणी
उतरत जाती आत पायऱ्या शिळ्या जळी त्या पूर्णपणी
जणू मिळेना प्रमाण एखाद्या गोष्टीचे तरी कळे
खूप खोल जाणारे काही गूढ तथ्य येथेच मिळे
स्तब्ध उभे औदुंबर विहिरीस वेढत फांद्यांचे जाळे
घुबडांच्या घरट्यांचे लोंबत भुरे रिते त्यातच गोळे
जणू शेकडो पुण्यांचा आभास विजेचा चमकारा
त्यातच मिसळे हिरवा कच्चा रानातील गंधित वारा
या साऱ्यांतून आशंका कसल्याशा हृदयाला डसती
घडून गेल्या रहस्यमयशा महानतेची अर्धस्मृती
काठावरती टेकत हिरवे सुंदर कोपर बसलेली
दिसते आहे तगर तारका-फुले पांढरी ल्यालेली
तिच्यालगतची कण्हेर माझी लालबहर जी पाजळते
धोक्याच्या एका बाजूला मला खुणावून बोलवते
विहिरीचे उघडे काळे मुख आकाशा न्याहळे उगा
खोल गूढ शून्यातच एका ब्रह्मसमंधाची जागा..
घुमती तेथे प्रतिध्वनिंचे प्रतिध्वनी गडबडलेले
वेडे शब्दच..गहन अर्थ पण ते अनुमानापलिकडले
क्षणक्षण तो घासे देहाला करे मलिनतेला साफ
कसल्याशा पापाच्या छाया .. रात्रंदिन चाले व्याप
हात-भुजा-छाती आणि मुख पाणी मारून स्वच्छ करे
तरी निघेना ,तरी निघेना मळ- तो हाहा:कार करे
ओठांवरती अनाम स्तोत्रे .. रागातच मंत्रोच्चार
शुद्ध देववाणीतच किंवा करे शिव्यांचा भडिमार
मेंदूच्या रेषा टीकांचे विणत चमकते मणिहार
अखंड चाले खुळेपणाचे स्नान जरी ते अनिवार
त्याच्या प्राणांमध्ये दाटून आहे केवळ अंधार..
पण विहिरीच्या आत पोचती तिरपी किरणे सूर्याची
धूळ तळापर्यंत दिसे त्या तिरिपीतच परमाणूंची
तेव्हा ब्रह्मसमंधाला ते वाटे वंदन केलेले
झुकून त्याला सूर्याने, ते त्याच्यासाठी पाठवले..
कधी विसरुनी वाट चांदणे त्या भिंतीवर टकरावे
‘’ज्ञान-गुरुचा मान राखण्या’ - असेच त्याने मानावे !
ते काटेरी तन-मन तेव्हा फुलारते अनुभवते की
त्याची मान्यच महानता झुकलेल्या आकाशालाही !
भयाण ऊर्जा तेव्हा त्याची द्विगुणित वेगाने जागे
वेद-ऋचा अन लुप्त जगातील लोककथा गाऊ लागे
कितीक सूत्रे ,छंद, मंत्र ते -किती प्रमेये अन प्रेमी
तत्त्वज्ञ किती – मार्क्स नी एंजेल्स, रसेल आणि टॉएन्बी
सिद्धांत किती हायडेग्गरचे, स्पेंग्लर, सार्त्र नी गांधीही ..
त्या विहिरीच्या खोल तळाशी सतत नाहण्याची सक्ती
सोबतीस ही अखंड बडबड - व्याख्यानच हे गहनमती ..
त्या विवरातून त्या कुहरातून गर्जत गुंजत थरथरते
विवर्त उठते एक ध्वनींचे -शब्दांचे रण होत जिथे
रूप लढत प्रतिबिंबाशी मग विस्कटते विकृत होते
प्रतिध्वनीशी ध्वनी झुंजतो असेच सारे विपरीत ते..
काठावरती तगर ऐकते, कोपर टेकून कल्लोळा
कण्हेरपुष्पे, औदुंबर, अन मीही ऐकत साक्षीला
वेड्या चिन्हांनी कथिलेली अशी एक शोकात्मिकता
अडकून राहे विहिरीतच ,ही इथेच आहे कैद कथा ..
खूप उंचसा जिना.. पायऱ्या विरघळती अंधारात
निराळ्याच एका विश्वाची दिशा दाखवत लपतात
चढे एकजण, उतरत पुन्हा, पुन्हा चढे कोसळे पुन्हा
पाय मुरगळे छातीवरती घावांच्या कितीतरी खुणा
भल्याबुऱ्यामधल्या संघर्षाहून तीव्र ही झुंज असे
भले आणखी अधिक भले यातले युद्ध हे चालतसे ..
दुस्तर असते यश किंचितसे तसे अपेशही अनिवार
ध्यास पूर्णतेचा ज्याला त्याला प्रिय दु:खाचा भार
भव्य भौमितिक प्रमेय-दृष्टी एक माप नैतिकतेचे
सूक्ष्म प्राणमय आत्मचेतना दुजे भान नैतिकतेचे
आत्यंतिक पूर्णता-वाद हा.. सोपे नाही समाधान
नेणिवेतल्या कथा मानवी खूप प्रिय तेही भान ..
सूर्य उगवता रक्तनदी चिंतेची पसरे भिंतीवर
चंद्र उगवतो चांदणपट्ट्या लिंपे त्याच्या घावांवर
भाळावर विखुरल्या चांदण्या असंख्य क्षितिजकडेवरच्या
अगणित दशांश बिंदू पसरले मैदानावर गणिताच्या
मेला, कामी आला तो ! या धारातीर्थी कोसळला
छाती बाहू फैलावूून हा शास्त्रज्ञ इथे पडलेला
कोमलहृदयी होता तो. स्फटिकघरासम ती व्यक्ती
प्रासादातील जिणे ..जिने ते चढउतरावे एकांती
कठीण सारे..
भावसंगती ,तर्कसंगती,कृतिविवेकही अवघाच
गणिताच्या समीकरण-पायऱ्या आपण देऊ त्यालाच
या साऱ्यांच्या शोधात फिरे.. भटके गुरुच्या शोधात
पण युग बदले आणि आले लाभ-कीर्तीचे सिद्धांत
फायद्याताली कृती मिळवते पैसे ,अन मनही जिंके
धन जिंके ज्या मनास तेथे सत्य प्रवेशा आशंके..
पण त्याच्या चेतनाभारल्या प्राणांतून संघर्ष जळे
विश्वचेतनेशी त्याचे नाते बिघडे , ना पुन्हा जुळे ..
महानता लाभली .. मनीचे विषाद नाही सरलेले
मला भेटता जरी कधी तो असते त्याला सांगितले
दु:ख स्वत: मी जगलो त्याचे,मूल्य मला समजून आले..
महानता ती त्याची आणि उपयोग तिचा कळे मला
गुणवत्ता त्या अंतरातली अमोल वाटे आम्हाला
जात्याची पाषाणी पाती दोन चिरडणारी त्याला
आतून बाहेरून असा तो भीषण शोककथा जगला
कुहरातून सांगत आहे वेड्या प्रतिकांच्या भाषेत
गणिते करता संपून गेला तो एकांताच्या बंदीत ..
घनवनातले काट्यांतील ते काळे विहिरीचे विवर
मेलेल्या पाखरासारखा तरंगतो आहे त्यावर
का हे आक्रित !का हे विपरीत ! विझली रे विझली ज्योती !
मला व्हायचे ब्रह्मसमंधाचा शिष्यच करुणार्द्रमती
स्वप्न, वेदना ,सिद्धांतांची त्या अधुऱ्या करण्या पूर्ती .. !

पद्यानुवाद - भारती बिर्जे डिग्गीकर
अभिवाचन -
https://soundcloud.com/bharati-birje-diggikar/brahmarakshas-by-muktibodh-a-translation-by-bharati?utm_source=soundcloud&utm_campaign=share&utm_medium=facebook&fbclid=IwAR2vPv8DRafqDqb3FaKWUltw3LoYsWuYpzQGGwa34EVYqsdgA8QVA-ZW94A
मूळ हिंदी कविता
शहर के उस ओर खंडहर की तरफ
परित्यक्त सूनी बावड़ी
के भीतरी
ठंडे अँधेरे में
बसी गहराइयाँ जल की..
सीढ़ियाँ डूबी अनेकों
उस पुराने घिरे पानी में...
समझ में आ न सकता हो कि जैसे बात का आधार लेकिन बात गहरी हो। बावड़ी को घेर डालें खूब उलझी हैं, खड़े हैं मौन औदुंबर। व शाखों पर लटकते घुग्घुओं के घोंसले परित्यक्त भूरे गोल विद्युत शत पुण्य का आभास जंगली हरी कच्ची गंध में बसकर हवा में तैर बनता है गहन संदेह अनजानी किसी बीती हुई उस श्रेष्ठता का जो कि दिल में एक खटके सी लगी रहती। बावड़ी की इन मुँडेरों पर मनोहर हरी कुहनी टेक बैठी है टगर ले पुष्प तारे-श्वेत
उसके पास
लाल फूलों का लहकता झौंर -
मेरी वह कन्हेर... वह बुलाती एक खतरे की तरफ जिस ओर
अंधियारा खुला मुँह बावड़ी का
शून्य अंबर ताकता है। बावड़ी की उन गहराइयों में शून्य ब्रह्मराक्षस एक पैठा है, व भीतर से उमड़ती गूँज की भी गूँज, हड़बड़ाहट शब्द पागल से। गहन अनुमानिता तन की मलिनता दूर करने के लिए प्रतिपल पाप छाया दूर करने के लिए, दिन-रात स्वच्छ करने - ब्रह्मराक्षस घिस रहा है देह हाथ के पंजे बराबर, बाँह-छाती-मुँह छपाछप खूब करते साफ, फिर भी मैल फिर भी मैल!! और... होठों से अनोखा स्तोत्र कोई क्रुद्ध मंत्रोच्चार, अथवा शुद्ध संस्कृत गालियों का ज्वार, मस्तक की लकीरें बुन रहीं आलोचनाओं के चमकते तार !! उस अखंड स्नान का पागल प्रवाह... प्राण में संवेदना है स्याह!! किंतु, गहरी बावड़ी की भीतरी दीवार पर तिरछी गिरी रवि-रश्मि के उड़ते हुए परमाणु, जब तल तक पहुँचते हैं कभी तब ब्रह्मराक्षस समझता है, सूर्य ने झुककर नमस्ते कर दिया। पथ भूलकर जब चाँदनी की किरन टकराए कहीं दीवार पर, तब ब्रह्मराक्षस समझता है वंदना की चाँदनी ने ज्ञान-गुरु माना उसे। अति प्रफुल्लित कंटकित तन-मन वही करता रहा अनुभव कि नभ ने भी विनत हो मान ली है श्रेष्ठता उसकी!! और तब दुगुने भयानक ओज से पहचान वाला मन सुमेरी-बेबिलोनी जन-कथाओं से मधुर वैदिक ऋचाओं तक व तब से आज तक के सूत्र छंदस्, मंत्र, थियोरम, सब प्रेमियों तक कि मार्क्स, एंजेल्स, रसेल, टॉएन्बी कि हीडेग्गर व स्पेंग्लर, सार्त्र, गांधी भी सभी के सिद्ध-अंतों का नया व्याख्यान करता वह नहाता ब्रह्मराक्षस, श्याम प्राक्तन बावड़ी की उन घनी गहराइयों में शून्य| ...ये गरजती, गूँजती, आंदोलिता गहराइयों से उठ रही ध्वनियाँ, अतः उद्भ्रांत शब्दों के नए आवर्त में हर शब्द निज प्रति शब्द को भी काटता, हर रूप अपने बिंब से भी जूझ विकृताकार-कृति है बन रहा ध्वनि लड़ रही अपनी प्रतिध्वनि से यहाँ बावड़ी की इन मुँडेरों पर मनोहर हरी कुहनी टेक सुनते हैं टगर के पुष्प-तारे श्वेत वे ध्वनियाँ! सुनते हैं करोंदों के सुकोमल फूल सुनता है उन्हे प्राचीन ओदुंबर सुन रहा हूँ मैं वही पागल प्रतीकों में कही जाती हुई वह ट्रेजिडी जो बावड़ी में अड़ गई।
X x x
ज्यामितिक संगति-गणित
की दृष्टि के कृत भव्य नैतिक मान आत्मचेतन सूक्ष्म नैतिक मान... ...अतिरेकवादी पूर्णता
की तुष्टि करना
कब रहा आसान मानवी अंतर्कथाएँ बहुत प्यारी हैं!! रवि निकलता लाल चिंता की रुधिर-सरिता प्रवाहित कर दीवारों पर, उदित होता चंद्र व्रण पर बाँध देता श्वेत-धौली पट्टियाँ उद्विग्न भालों पर सितारे आसमानी छोर पर फैले हुए अनगिन दशमलव से दशमलव-बिंदुओं के सर्वतः पसरे हुए उलझे गणित मैदान में मारा गया, वह काम आया, और वह पसरा पड़ा है... वक्ष-बाँहें खुली फैलीं एक शोधक की। व्यक्तित्व वह कोमल स्फटिक प्रासाद-सा, प्रासाद में जीना व जीने की अकेली सीढ़ियाँ चढ़ना बहुत मुश्किल रहा। वे भाव-संगत तर्क-संगत कार्य सामंजस्य-योजित समीकरणों के गणित की सीढ़ियाँ हम छोड़ दें उसके लिए। उस भाव तर्क व कार्य-सामंजस्य-योजन-शोध में सब पंडितों, सब चिंतकों के पास वह गुरु प्राप्त करने के लिए भटका!! किंतु युग बदला व आया कीर्ति-व्यवसायी ...लाभकारी कार्य में
धन,
व धन में से हृदय-मन, और, धन-अभिभूत अंतःकरण
में से
सत्य की झाईं
निरंतर चिलचिलाती थी।
आत्मचेतस् किंतु इस व्यक्तित्व में थी प्राणमय अनबन... विश्वचेतस् बे-बनाव!! महत्ता के चरण में था विषादाकुल मन! मेरा उसी से उन दिनों होता मिलन यदि तो व्यथा उसकी स्वयं जीकर बताता मैं उसे उसका स्वयं का मूल्य उसकी महत्ता! व उस महत्ता का हम सरीखों के लिए उपयोग, उस आंतरिकता का बताता मैं महत्व!! पिस गया वह भीतरी ' बाहरी दो कठिन पाटों
बीच,
ऐसी ट्रेजिडी है नीच!! बावड़ी में वह स्वयं पागल प्रतीकों में निरंतर कह रहा वह कोठरी में किस तरह अपना गणित करता रहा ' मर गया... वह सघन झाड़ी के कँटीले तम-विवर में मरे पक्षी-सा विदा ही हो गया वह ज्योति अनजानी सदा को सो गई यह क्यों हुआ ! क्यों यह हुआ !! मैं ब्रह्मराक्षस का सजल-उर शिष्य होना चाहता जिससे कि उसका वह अधूरा कार्य,उसकी वेदना का स्रोत संगत पूर्ण निष्कर्षों तलक पहुँचा सकूँ।


Comments

  1. मस्त! मूळ (हिंदी) कवितेपेक्षा अनुवाद मला जास्त आवडला. वृत्तबद्ध असल्यामुळे वाचायला मजा येते."गार काळोख" आणि अशा दोन-तीन उपमा विशेष आवडल्यात. मी दोन तीन वेळा पूर्ण वाचून काढली कविता. पण, प्रत्येक ओळीतून चित्र उभं राहतं डोळ्यासमोर आणि त्यात हरवल्यामुळे कवितेचा शेवट येईपर्यंत छोटे छोटे तुकडेच उमगलेत (असं वाटतं). तगर, कण्हेर, आणि आकाशाला पाहणारं विहिरीचं "काळं मुख" यांचं वर्णन ऐकल्यावर एखाद्या जंगलात किंवा निर्जन, ओसाड जागी हुबेहूब अशाच विहिरीपाशी पोहोचल्याचा भास होतो. आणि पुढलं वाचतानाही तिथेच हरवतोय

    ReplyDelete
  2. "कोमलहृदयी होता तो. स्फटिकघरासम ती व्यक्ती
    प्रासादातील जिणे ..जिने ते चढउतरावे एकांती "
    इथे "जिने" या शब्दाने सुंदर श्लेष साधलाय. वाह! मस्त!

    अत्ता वाचल्यावर पुन्हा संभ्रम वाढतच चाललाय. सुरुवातीला ब्रह्मसमंध म्हणजे प्रत्यक्ष ती विहीरच असं वाटलं, पण पुढे पुढे संदर्भहीन व्हायला होतं. कवितेतल्या या कथानकात कवी/कवियित्री/वाचक हे मूकप्रेक्षकाव्यतिरिक्त काही पात्र रंगवतोय/रंगवतेय का?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग