माझ्या मोकळ्या वेळेत - पद्यानुकृती

 समकालीन कविता - फादील अल अझावी (Fadhil al-Azzawi ,जन्म 1940 ) हे अरब जगतातील मान्यताप्राप्त इराकी कवी-साहित्यिक .अनेक कवितासंग्रह , कादंबऱ्या , समीक्षा व आत्मचरित्रात्मक लेखन त्यांनी अरेबिक भाषेत केले आहे. इंग्लिश साहित्याच्या पदवीबरोबर जर्मन भाषेतून उत्तम अनुवाद केले आहेत.इराकमधील सत्तांतरात तुरुंगवास सोसल्यानंतर ते पूर्व जर्मनीत राहतात.’’IN MY SPARE TIME’’ या त्यांच्या अफलातून कवितेतून अद्भुत कल्पनाविलास आणि विश्ववास्तवावरील एक खोचक भाष्य आपल्याला चकित करून जातं.


माझ्या मोकळ्या वेळेत - पद्यानुकृती


या कंटाळ्याच्या दीर्घ मोकळ्या प्रहरी

मी घेऊन बसतो पृथ्वीगोल सामोरी

खेळातच रचतो त्यावर नवीन देश

अनुपस्थित जेथे पोलिस किंवा पक्ष


उडवून टाकतो इतरही आणिक काही

ते देश विचारत ज्यांना कोणी नाही

ओसाड दूरवर वाळवंट रखरखते

मी फुसांडणाऱ्या नद्या धाडतो तेथे


निर्मितो मग नवे खंड आणखी सागर

असू देत आपले! गरजच उद्भवली तर

रंगीत नकाशा नवी रेखणी भारी -

जर्मनी गुंडाळून प्रशांत सागरतीरी!


पाण्यात व्हेल माशांची गजबज चाले

ते तिचे किनारे धुक्यामध्ये बुडलेले

गल्बते वल्हवत चाच्यांचीच खुशाल

त्या किनाऱ्यास मग निर्वासित जातील


बापडे बिचारे स्वप्न पाहात अगम्य

बाव्हारियातल्या उद्यानाचे रम्य

मी अदलबदलतो जागाही मोक्याच्या

इंग्लंड आणखी अफगाणिस्तानाच्या


कारण राणीसरकारांच्या राज्यात

तरूणांना हशीश लाभावे फुकटात!

मी करतो चोरी कुवेटची सांभाळून

कुंपणांतून अन् खाणींच्या सीमांतून


चंद्रग्रहणाच्या काॅमोरो बेटांना

मी जपून नेतो तेलाच्या विहिरींना

वाहत नेतो ढोलाच्या ठेक्यावरती

बगदाद शहर मी ताहिती बेटावरती


सौदी अरेबिया खुशाल रखडत राहो

प्राचीन चिरंतन वाळवंटी ती नांदो

ती जातिवंत उंटांना जपते नित्य

शुद्धता जपत ती होते किती कृतार्थ


आणि अमेरिका! पुन्हा सोपवून देत

मी रेड इंडियन लोकांच्या हातात

कारण एकच की न्याय मिळावा त्याला

त्या इतिहासाला :नकारल्या गेलेल्या


जग बदलणे असे ना सोपे मी जाणे

गरजेचे पण ते! हेच शेवटी म्हणणे..


- पद्यानुकृती - भारती..

 

(मूळ कविता - इंग्रजी अनुवाद  Khaled Mattawa यांचा.)


During my long, boring hours of spare time

I sit to play with the earth’s sphere.

I establish countries without police or parties

and I scrap others that no longer attract consumers.

I run roaring rivers through barren deserts

and I create continents and oceans

that I save for the future just in case.

I draw a new colored map of the nations:

I roll Germany to the Pacific Ocean teeming with whales

and I let the poor refugees

sail pirates’ ships to her coasts

in the fog

dreaming of the promised garden in Bavaria.

I switch England with Afghanistan

so that its youth can smoke hashish for free

provided courtesy of Her Majesty’s government.

I smuggle Kuwait from its fenced and mined borders

to Comoro, the islands

of the moon in its eclipse,

keeping the oil fields in tact, of course.

At the same time I transport Baghdad

in the midst of loud drumming

to the islands of Tahiti.

I let Saudi Arabic crouch in its eternal desert

to perserve the purity of her thoroughbred camels.

This is before I surrender America

back to the Indians

just to give history

the justice it has long lacked.

I know that changing the world is not easy

but it remains necessary nonetheless.

Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –