अस्तित्वभानाचं अर्घ्य -''बुडता आवरी मज..’’ सुरेन्द्र दरेकर

‘’बुड़ता आवरी मज..’’या संवेदना प्रकाशनाकडून प्रकाशित झालेल्या संग्रहात सुरेन्द्र दरेकर यांच्या दोन दीर्घकथा आहेत. कथा हा फॉर्म असला तरी त्यांची एकूण संपृक्तता दोन कादंब-यांचा ऐवज असलेली अशीच आहे.

समकालीन मराठीतील अतिशय समृद्ध असा अस्तित्वानुभव देणा-या अशा या कथा आहेत. दोन्ही कथांचे नायक विज्ञान तत्त्वज्ञान आत्मज्ञान या रूढ श्रेणींच्या पलिकडे जात एका प्रबुद्ध अशा निर्वातात विसावताना जाणवतात. या प्रवासातले त्यांचे सहप्रवासीही अनेक प्रकारचे असले तरी आत्मिक विकासाच्या सहसंवेदना उलगडणारे प्रगल्भ विज्ञान-तत्वज्ञानी गुरु,तितक्याच क्षमतेचे गुरुतुल्य मित्र,सुहृद-स्नेही, प्रिय व्यक्ती यांची गजबज त्यात आहे. या प्रवासातली साधी नोकरमाणसंही साधी नाहीत ( क्रमश: आरती, झेनाबी )कारण नायकांच्या विकसित अंतर्दृष्टीच्या झोतात त्यांच्यातलेही हिरोइक पैलू झळाळून उठतात.

 ‘’बुडता आवरी मज ‘’ मधले बाबा (यशवंत )आणि ‘’पॉईज’’मधला महेश यांच्यात काही साधर्म्यस्थळे आहेत. हे नायक किंवा protagonist एकेकाळच्या संपन्न आणि आता पड़झड होत चाललेल्या मोठ्या संयुक्त कुटुम्बाच्या पसा-यात वाढलेले आहेत. बाबांच्या स्वभावात एक अलिप्तपण आले आहे ते मूलत: संसार सोडून विरक्त झालेल्या वडिलांकडून- नानांकडून- आहे.नानांकडूनच कृष्णमूर्तींच्या अध्यात्मविचारांचा  आणि टागोरांच्या कवितेचा, विरक्तीचा आणि रसिकतेचा वारसा बाबांना मिळाला आहे. बाबांच्या – यशवंतच्या- आईविना पोरक्या जीवनात सावत्र आईने केलेल्या छळामुळे हे अलिप्तपण वाढले आहे. 

 त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर वडिलांच्या मानसिक आजारावर परिवार आणि हितचिंतक यांनी काढलेला रामबाण तोडगा ’’माणसाच्या बदली माणूस’‘’ म्हणून चित्राई बाबांची सावत्र आई बनून आली. तिने त्यांचा सर्वार्थाने छळ केला.त्यातच नाना संसार सोडून आत्मशोधाच्या परिक्रमेला निघून गेले. चित्राईने सदोदित आपल्या मुलाला, श्रीकांतला बाबांपासून दूर ठेवलं.

याचा काव्यात्म न्याय म्हणून जणू, कथेच्या शेवटी आजारी श्रीकांतशी पुन्हा भावनिक धागे जुळून त्याची लहान मुलं बाबांच्या अकालमृत्यूने हिरावलेल्या तरुण मुलाची-सुशांतची- जागा घ्यायला त्यांच्या जीवनात येतात. जो एकमात्र भावनिक आधार अशा तरूण मुलाच्या अपमृत्यूने आणि वैवाहिक विसंवादाने आजारी आणि वैराण झालेल्या त्यांच्या पत्नीला पुन्हा जीवनाला सन्मुख करतात. पुन्हा एकदा मृत्यूने हिरावलेल्या ‘’माणसाच्या बदली माणूस’’ नियती बहाल करते . पण यावेळी ही सुखान्तिका असते.भूतकालीन विपरितातून ही शुभंकर परिस्थिती आता वर्तमानकालात उद्भवते .या सा-याला वास्तूशास्त्रीय बद्लाचीही पार्श्वभूमी आहे.या ज्ञानशाखेचा सकारात्मक भूमिकेतून अभ्यास आणि आयोजन आहे.कृष्णमूर्तींच्या विचारांच्या प्रकाशात स्वत:ला सतत पारखणे आहे. घटनांच्या अलोट प्रवाहाच्या चपेटयातही तोल सावरत, काळ, घटना आणि अस्तित्व यांचे परस्पर संबध तपासत हा कुटुंबप्रमुख "भवा"च्या म्हणजे काहीतरी होण्याच्या इच्छेच्या पलिकडे असलेले सत्त्व आणि स्वत्व विकसित करत आहे. 

ही कथा (दोन्ही कथा )अमाप अशा इतर तपशिलांनी आणि आधीच्या तसेच पुढील पिढीतील अनेक व्यक्तिचित्रांनी भरगच्च आहे.बाबा-ममांच्या दोन्ही बुद्धिवान मुलींची भाव-विचार-व्यवसायविश्वं , त्यांचे-त्यांचे मित्रपरिवार, होऊ घातलेले जावई ,घराचा डोलारा सांभाळणारी ,नोकर या शब्दाचा अर्थच बदलून टाकणारी आरती, बाबांना प्रवासात भेटलेले आणि जिवलग सुहृद झालेले सेनगुप्ता, त्यांचा परिवार, बाबांवर निस्वार्थी प्रेम करणारे मित्र हरीश सुखाडिया आणि त्यांचा वास्तुशास्त्रतज्ज्ञ मुलगा आणि सून मिहिर आणि आभा सुखाडिया, असा मोठा आणि प्रेमाचा गोतावळा, ज्याचं चित्रण क्वचित गौरी देशपांडे यांच्या शैलीची आठवण करून देतं कारण या सर्वच व्यक्तिरेखा संपन्न-व्युत्पन्न अशा आहेत. 

तपशिलांच्या अंगाने लेखक कुठेही कमी पड़त नाही किंवा गुळमुळीत लिहीत नाही पण त्याचा परिणाम म्हणून कथेची संपृक्तता दमछाक होण्याइतकी वाढू शकते अर्थात हे या लेखनाचं आव्हान आहे. त्यातील विरोधविकास हा स्वचा स्वेतर विश्वातील घटितं आणि व्यक्तीप्रभाव यांच्याशी संवाद आणि संघर्ष यातून सिद्ध झाला आहे. यातील नायक अफाट वाचन, व्यासंग, चर्चा आणि एक प्रकारची बाह्यजगतापासून संरक्षण करणारी आत्मिक साधना यांच्या कवचात वावरत आहे. आत्यंतिक संकटातही सौन्दर्यबोध या साधनेमुळे अनुभवास येतात की अगदी बालवयातील काही अद्भुत अशा साक्षात्कारी क्षणांशी या सर्वाचं कनेक्शन आहे हे स्पष्ट न होण्यातच अस्तित्वाची सुंदर गूढता आहे.त्याच्या पत्नीवर त्याच्याकडून वैचारिक संवादाच्या अभावातून झालेला अन्याय परिमार्जन करण्यासाठी त्याची धडपड आहे, कुटुम्बाचा विसकटलेला तोल सावरण्यासाठी तो प्रयत्नशील आहे आणि त्याही दृष्टीने कथा सुखान्त आहे.आस्तिक्याचा दुर्लभ असा विचारसिद्ध प्रत्यय  देणारी आहे. 

 दुसरी कथा ''पॉईज''. म्हणजे पुन्हा तोलच. संतुलन. यातील कथानायक महेशचं जीवन ही एकीकडे तृषार्त उत्कट अशी विज्ञानसाधना करत असतानाच सतत रिक्ततेचा "काही नाही"चा अनुभव घेणा-या व्यक्तिमत्वाची जीवनक्रमणा आहे. महेश तुलनेने अधिक तरुण आहे.तोही संपन्न अशा पण उताराला लागलेल्या कृषिक कुटुम्बातून आला आहे. त्यालाही काही सूचक स्वप्ने पडतात,कदाचित बालवयातील अपघातातून जडलेला आणि पुढे वाढलेला रिक्ततेचा –‘’काही नाही’’ चा चक्राकारी अनुभव पुन्हापुन्हा येतो.

त्याचे महाविद्यालयीन गुरु सेठीसर जैवरासायनिकी आणि उत्क्रांतीविषयक संशोधन करणारे एक जबरदस्त अवलिया व्यक्तिमत्व आहे. ते एक ज्ञानविज्ञानाचं वादळच आहे. त्यांचं आणि महेशचं एकत्र येणं महेशच्या आयुष्यातील गुंता वाढवणारं आहे.या सर्वात , होस्टेलमधील हव्याहव्याशा प्रगल्भ सुहृद-जिवलगांमध्ये गुरफटून श्रेयस शोधणारा आणि एका क्षणी हे सर्व सोडण्याचा निर्णय घेणारा अतिशय बुद्धिवान महेश त्यात उमलू पाहाणा –या प्रेमालाही पाठमोरा होतो. आणि तरीही त्या प्रेमाची व्याकुळता पुढील जीवनात अनुभवत राहातो, त्याच्या छाया पत्नीच्या व्यक्तित्वात शोधू पाहातो. 

 दोन्ही कथांमधील नायकांच्या पत्नींच्या व्यक्तिरेखा सशक्त आणि स्वनिर्भर आहेत. पतीच्या अलिप्ततेतून उद्भवलेल्या  एकाकीपणाच्या अनुभवातून महेशची पत्नी अनुजा अधिक सहजपणे बाहेर येते कारण आर्थिक स्वातंत्र्य आणि आपले प्रयोजन आपण शोधण्याची तिच्यात हिम्मत आहे. वयानेही  अनुजा अधिक पुढल्या पिढीची प्रतिनिधी आहे तसेच आधीच्या कथेतील बाबांची पत्नी रेवती (ममा) हिच्यासारखा पुत्रवियोगाचा अतिशय विदारक अनुभवही सुदैवाने तिच्या वाट्याला आलेला नाही.याही कथेत सुहृदांचा मोठा गोतावळा दुरावून कथेच्या शेवटी पुन्हा एकत्र आला आहे. सौहार्द आणि संवादाची कोवळी किरणं कथेच्या शेवटी पसरली आहेत. हीसुद्धा वैचारिक  घुसळणीतून प्राप्त झालेली सुखान्तिका आहे. मध्येमध्ये विक्षेप असलाच तर तो महेशचं आजारपण ,महाविद्यालयीन प्रेयसी सुषमाच्या कौटुंबिक जीवनात तिच्या बाळाचा मृत्यू अशा सार्वत्रिक अनुभवाच्याच घटनांचा. महेशच्या नातेवाईकांचा परिवार , त्यातील ताणेबाणे वैशिष्ट्यपूर्ण असले तरी त्यात फारशी खलप्रवृत्ती अशी नाही. 

महेशचा संघर्ष अधिक आत्मिक स्वरूपाचा आहे."क्लेशोsधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्त चेतसाम्" या श्रीकृष्णोक्तीची आठवण करून देणारा आहे. महेशचा कठोर विरोधक आणि निर्मम संशोधकही तो स्वत:च आहे. आयुष्यातल्या पॉयजनला पचवत एका पॉईजपर्यंत आपण पोचतोच , स्वानुभवाच्याही पलिकडे जातो अशी धारणा असणारा महेश. ही कथाही अनेक व्यक्तित्वे, प्रसंग झपाट्याने कवेत घेत जाते. दोन्ही कथांमध्ये नायक बहुभाषिक बहुआयामिक आहेत.स्थलकालांचे विशाल विस्तार पटलावर येतात.मोफुसिल ते मेट्रोपाॅली सर्वसंचार आहे. अनेक कलाशाखा ज्ञानशाखा विस्ताराने रसिकतेने अनुभवल्या, चर्चिल्या जातात, यात कृषिविज्ञान ,आयुर्वेद यांचाही कथेच्या ओघात प्रसंगांच्या परिवेशात समावेश होतो.

हे एकरसतेने घडते, कुठेही ठिगळ वाटणारे तुकडे नाहीत. वैचारिक काव्य आणि वैचारिक ललित याप्रमाणेच वैचारिक दीर्घकथेचा हा अनुभव मराठी साक्षेपी वाचकाला नवा नाही , पण त्याची इयत्ता वाढवणारा आहे आणि असं असूनही या लेखनाची वाचनीयता यत्किंचितही उणी पडत नाही. पुस्तक हातातून खाली ठेवता येत नाही मात्र पुनर्वाचनाची वारंवार आवश्यकता वाटू शकावी एवढा ठेवा त्यात खच्चून भरलेला आहे. संवेदना प्रकाशनाची निर्मितीमूल्ये चांगली आहेत.मनोज दरेकर यांचं  मुखपृष्ठ , आतील रेखाटनं पुस्तकाला हवंसं रूप  देणारी आहेत  आणि मोनिका गजेंद्रगडकर यांचा ब्लर्ब पुस्तकाची प्रतिष्ठा वाढवणारा आहे.

 तृषा भागवून वाढवणारे असं हे अस्तित्वभानाचं अर्घ्य आहे. असा वाचनानुभव लेखकाने मराठी साहित्यजगताला पुन्हापुन्हा द्यावा ही शुभेच्छा ! 

 -भारती..

Comments

  1. Great write up indeed , mainly touching upon thematic aspects and its elusive nature. Says hardly anything on stylistic features. Will get a book soon. You increased my curiosity.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग