ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय अकरावा -विश्वरूपदर्शन योग

 



ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय अकरावा -विश्वरूपदर्शन योग

अर्जुनाच्या संकोचाचे चित्रण
अकराव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच विनयमधुर अशी विनंती श्रीज्ञानदेव पुन्हा एकदा श्रोत्यांना करत आहेत व त्यांचे या अध्यायाच्या परमअद्भुत विषयवस्तूकडे लक्ष वेधून घेत आहेत.
हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड ।
तरी आतां अवधानामृतें वाड । सिंपोनि कीजे ॥ १९ ॥
महाराज, हे ज्ञानाचे सुंदर झाड आपणच लावले आहे. तर आता यास आपण आपल्या अवधानाचे अमृत  शिंपून ते मोठे करावे .

ज्ञानदेवांच्या निरुपणाची सुरुवात अर्जुनाच्या भावोत्सुक अशा अवस्थेच्या वर्णनाने होते. त्याच्या मनात एक उत्कट इच्छा आहे आणि त्याच वेळी परमोत्कट संकोचही आहे.
आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोहीं रसीं ।
येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥ १ ॥
आता यानंतर अकराव्या अध्यायामधे (शांत व अद्भुत या) दोन रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे.
जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा ।
आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु ॥ २ ॥
या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारास आला आहे आणि इतर रसांनाही या दोन रसांच्या पंक्तीला बसण्याचा मान मिळाला आहे.
शांतरसाच्या घरी अद्भुतरस पाहुणा आला आहे अशा महत्तम अकराव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच श्रीज्ञानेश्वरांनी अर्जुनाच्या संकोचाचे चित्रण केले आहे. ते म्हणतात,"अर्जुनाने विश्वरूपाची इच्छा मनात धरून भीत-भीत सुरुवात केली. यावेळी, मनाने घेतलेला अनुभव नयनांचेही पारणे फेडून टाकणारा ठरावा असे त्याला वाटत होते." सर्वही सर्वेश्वर "हाच तो अनुभव.
हें सर्वही सर्वेश्वरु । ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु ।
तो बाहेरी होआवा गोचरु । लोचनांसी ॥ २९ ॥
हे सर्वही सर्वेश्वररूप आहे. अशा रूपाने अनुभवास पटलेला प्रियकर परमात्मा, तो आपल्यापुढे डोळ्याला प्रत्यक्ष दिसावा.
हे जिवाआंतुली चाड । परी देवासि सांगतां सांकड ।
कां जें विश्वरूप गूढ । कैसेनि पुसावें ? ॥ ३० ॥
ही मनातील इच्छा खरी, परंतु ती देवास सांगतांना अडचण वाटते, कारण ज्याअर्थी देवाचे विश्वरूप गुप्त आहे, त्याअर्थी ते उघड करून दाखवा असे आपण कसे विचारावे ?
दहा अध्यायांच्या आनंदयात्रेत अर्जुनाच्या बुद्धीला उमगलेला व मनात स्थिरावलेला हा अनुभव आता इंद्रियगोचर व्हावा अशी विलक्षण मागणी त्याला करायची होती पण धैर्य नव्हते. ईश्वराच्या अनेक आवडत्या आप्तांनी जे विचारले नाही  ते मागण्याइतके आपण श्रेष्ठ आहोत की काय? सलगी आहे ,पण ती काय लक्ष्मीहून अधिक ?पण तीही असे काही मागू धजावली नाही. सेवा हातून घडली आहे पण ती गरुडापेक्षा तर अधिक नाही ना? तो गरुडही येथपर्यंत पोहोचला नाही. सनकादिकांहून का आपण निकटवर्तीय आहोत ? प्रेमळपणा काय गोकुळीच्या गोपाळांहून  आपल्यात  आहे ?त्यांनाही मूलपणा दाखवून फसवले. अंबरीशाचे गर्भवासही याने सोसले.पण ही अंतरंगातली गुप्त गोष्ट जिवासारखी जपली. या सर्व प्रेमळांना, निर्मळांनाही जे मिळाले नाही ते मागण्याचे धैर्य कसे करावे या विचाराने अर्जुनाला भीड वाटली.

अशा प्रकारे अकराव्या अध्यायाच्या आरंभी ज्ञानेश्वरांनी अर्जुनमानसाचा आविष्कार करून पुढील अद्भुतरम्य वर्णनाची गोडी वाढविली आहे.

अर्जुनाचा विश्वरूपसंबंधी प्रश्न
"मोहोsयम् विगतो मम"या अर्जुनोक्तीचा विस्तार ज्ञानेश्वरांनी येथे केला आहे. अर्जुन म्हणाला- देवा तुम्ही माझ्यासाठी जे बोलू नये ते बोललात. हृदयामध्ये कृपणासारखे जपलेले, शब्दब्रह्मापासूनही चोरलेले असे ज्ञान तुम्ही माझ्यासमोर उघड केले. शंकरांनीही या अध्यात्मासाठी ऐश्वर्य सोडून विजनवास पत्करला, ते तुम्ही मला  देऊ केले. महामोहाच्या पुरात मस्तकापर्यंत बुडालेल्या माझे रक्षण केलेत.एक आपल्याशिवाय विश्वात काहीच नसताना "आम्ही आहोत" असे मी कर्मदरिद्री म्हणत होतो.
मी जगीं एक अर्जुनु । ऐसा देहीं वाहे अभिमानु ।
आणि कौरवांतें इयां स्वजनु । आपुलें म्हणें ॥ ५१ ॥
या जगामधे मी एक अर्जुन आहे, असा देहाच्या ठिकाणी मी अभिमान बाळगतो. आणि या कौरवांना आपले भाऊबंद मानतो.
याहीवरी यांतें मी मारीन । म्हणें तेणें पापें कें रिगेन ।
ऐसें देखत होतों दुःस्वप्न । तों चेवविला प्रभु ॥ ५२ ॥
याहीपुढे जाऊन यांना मी मारीन आणि पापाच्या योगाने मग मला देखील कोणती गती मिळेल असे म्हणत होतो. याप्रमाणे मी वाईट स्वप्न पहात होतो. त्या मला महाराज, आपण इतक्यात जागे केलेत.
"मी अर्जुन" या देहाभिमानाने मी ग्रस्त होतो .हे कौरव माझे स्वजन असे मी समजत होतो.यांना मारण्याच्या पापाचा विचार करत होतो. या दु:स्वप्नातून आपणच जागे केलेत. या अहंकाराच्या भरात आग्रहरूप डोहात हट्टाने दडून बसलो होतो .तुझ्याशिवाय यातून मला कोणी ओढून काढले असते? मागे लाक्षागृहात जळणार होतो तेथे वाचवलेत, पण ते भय आमच्या शरीरांना होते. इथे तर चैतन्याचाच नाश ठरला होता . दुराग्रहरूप हिरण्याक्षाने माझी बुद्धी रूप वसुंधरा मोहार्णवरूपी खिडकीतून हरण केली,तेथे वराहरूपाने तू माझे रक्षण केलेस.अरे आनंदसरोवरीची  कमळे असावीत तसे तुझे हे डोळे ज्याच्यासाठी कृपाप्रसादाचे मंदिर होतात,त्याला मोह कसा शिवेल ?
आजीं आनंदसरोवरींचीं कमळें । तैसे हे तुझे डोळे ।
आपुलिया प्रसादाचीं राउळें । जयालागीं करिती ॥ ६५ ॥
हां हो तयाही आणि मोहाची भेटी। हे कायसी पाबळी गोठी ।
केउती मृगजळाची वृष्टी । वडवानळेंसीं ? ॥ ६६ ॥
अशा कुणाला देखील  भ्रांती ग्रासेल?ही दुबळी गोष्ट काय बोलावी ? वडवानळ (समुद्रात जळणारा वणवा)जर समुद्राच्या पाण्यानेही विझला जात नाही तर त्यावर मृगजळाच्या वृष्टीचा काय परिणाम होणार ?
तुझ्या पायांना शिवून उद्धरलोच आहोत तर मोह नष्ट झाल्याचे  फारसे आश्चर्य नाही. प्राणिमात्रांच्या उत्पत्तीलयाबद्दल सर्व सांगितलेस. ज्याचा महिमा पांघरल्यामुळे वेदाला शोभा आली त्या परमात्म्याचे ठिकाण दाखवलेस. हे सर्व अगाध माहात्म्य पाहूनही मनात एक इच्छा उपजली आहे. ज्याच्या संकल्पाने ही लोकपरंपरा निर्माण होते व नाश पावते ते तुझे मूळ रूप , जिथून देवांच्या कार्यासाठी तू रूपे धारण करतोस व मत्स्यकूर्मादि खेळ संपल्यावर हे गारुड्या,तू  जेथे विश्रांती घेतोस, जे उपनिषदांनी गायिले, सनकादिकांनीआलिंगिले ते तुझे अवघे विश्वरूप माझ्या दृष्टीला गोचर व्हावे अशी दृढ आशा घेऊन माझा जीव ताटकळत आहे."
उपनिषदें जें गाती । योगिये हृदयीं रिगोनि पाहाती ।
जयातें सनकादिक आहाती । पोटाळुनियां ॥ ८५ ॥
उपनिषदे ज्याचे वर्णन करतात, योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात, ज्याला सनकादिक संत मिठी मारून राहिलेले आहेत,
ऐसे अगाध जें तुझें । विश्वरूप कानीं ऐकिजे ।
तें देखावया चित्त माझें । उतावीळ देवा ॥ ८६ ॥
असे जे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप कानांनी मी ऐकतो, ते पहाण्याकरता देवा, माझे चित्त फारच उत्कंठित झाले आहे.
अशाप्रकारे अर्जुनाने आपला विश्वरूपसंबंधी प्रश्न येथे विनयाने उपस्थित केला आहे.

साक्षीरूपाने संजयाने पाहिलेले विश्वरूप
ईश्वराचे परम ऐश्वर्य अर्जुनाला पहावयास मिळाले ते साक्षीरूपाने संजयानेही पाहिले असे संजयाचे अहोभाग्य .
संजय म्हणतो, "समुद्रातील लाटांप्रमाणे ज्या महद्रूपात अवतार होतात- जातात ,ज्या परमात्मसूर्याच्या सत्तेने विश्वरूप मृगजळ भासमान होते, ज्या अनादि भूमिकेत चराचराची चित्रे उमटतात ते विश्वरूप श्रीहरीने अर्जुनास दाखवले.
हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रींचे कां कल्लोळ ।
विश्व हें मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे ॥ १८० ॥
जिये अनादिभूमिके निटे । चराचर हें चित्र उमटे ।
आपणपें श्रीवैकुंठें । दाविलें तया ॥ १८१ ॥

मागे यशोदेला श्रीमुखात जी चौदा भुवने दाखविली होती किंवा बाळ ध्रुवाच्या गालाला शंखाचा स्पर्श करून वेदांपेक्षा आणि गहन ज्ञान त्याच्या तोंडून वदवले होते,तसा हा चमत्कार झाला .ब्रह्मगोळ बुडवून टाकणार्‍या प्रलयकाळीच्या पूर्णोदकात मार्कंडेय एकाकी पोहत असावा तसा या विश्वरूपकौतुकामध्ये एकटाच अर्जुन शिल्लक राहिला." हे एवढे आकाश इथे होते ते कोणी नेले ?!चराचर महाभूतांचे काय झाले? दिशांचे ठाव बुडाले! वर-खाली सारे एकाकार झाले. स्वप्नामधून जाग आल्यासारखी ती लोकसृष्टीही हरपली “- असे आश्चर्योद्गार काढत मनाचे मनपण विसरलेला, इंद्रिये आत परतून हृदयदेशात दाटलेला, मोहनास्त्र घातल्यासारखा तो वीरवर पार्थ वर्षाकाळचे मेघ गर्जत चहूबाजूंनी घेरत यावेत, महाप्रलयाचे तेज चढत वाढत राहावे तत्सदृश या अनुभवात बुडून गेला.

अर्जुनाने विश्वरूपात पाहिलेली रुपे

"अनेक वक्त्रनयनं" या दहाव्या श्लोकावर भाष्य करताना श्रीज्ञानदेव म्हणतात, -"तेव्हा तेथे जणू काही रमापतीची राजभुवने किंवा लावण्यलक्ष्मीची अनेक भांडारे किंवा आनंदाचे फोफावलेली वने किंवा सौंदर्याची राजसत्ता अशी श्रीहरीची मनोरम रूपे अर्जुनाला दिसली.पण  त्यातच सहजपणे भयानक, काळरात्रीच्या सैन्यासारखी उग्र अमंगल रूपेही दिसू लागली. ती जणू मृत्यूची मुखे, प्रलयानलाची  उघडलेली महाकुंडे  होती.काही सालंकृत सौम्य रूपे होती.
कीं आनंदाची वनें सासिन्नलीं|जैसी सौंदर्या राणीव जोडली ।
तैसीं मनोहरें देखिलीं । हरीवक्त्रें तेणें ॥ १९5॥
किंवा आनंदाची उद्याने बहराला यावीत, किंवा जणुकाय सौंदर्याला राज्य प्राप्त व्हावे, तशी त्याने मन हरण करणारी श्रीकृष्णाची मुखे पाहिली.
तयांही माजीं एकैकें । सावियाचि भयानकें ।
काळरात्रीचीं कटकें । उठवलीं जैसीं ॥ १९6॥
त्यात देखील कित्येक मुखे जणुकाय प्रळयरात्रीच्या सैन्याने उठाव केला आहे अशी सहजच भयंकर होती.
ज्ञानदृष्टीने ही रुपे पाहणाऱ्या अर्जुनाला या रूपांचा शेवट कधी येणार हे समजेनासे झाले. मग तो कौतुकाने त्या मुखांचे डोळे पाहू लागला.
तंव नानावर्णें कमळवनें । विकासिलीं तैसे अर्जुनें ।
डोळे देखिले पालिंगनें । आदित्यांचीं ॥ २०0 ॥
अनेक वर्णांच्या कमळांसारखे अनेकरंगी, सुंदर आकारांनी सुशोभित असे सूर्यासारखे तेजस्वी नेत्र त्याने पाहिले. कृष्णमेघांमध्ये कल्पांतसमयी विजा कडकडव्यात, तशा भिवयांखाली तळपणा-या अग्नीसारख्या पिंगट दृष्टींची शोभा  पाहिली. या  एका दर्शनाच्या अनेकतांनी तो हैराण झाला."पाय कुठे आहेत?मुकुट कुठे आहे? या रूपाचे बाहू तरी कुठे आहेत?" अशी त्याची पाहण्याची भूक वाढू लागली. त्याची भूक भागेल असे चरणांपासून ते मुकुटापर्यंत संपूर्ण विश्वरूप त्याच्या प्रत्ययास आले. या दिव्यतेजाचा शृंगार कसा वर्णावा? देव स्वतःच स्वतःचा शृंगार बनले होते. अंग तेच ,अलंकार तेच, तेच हात, हत्यार तेच, जीव तेच शरीर तेच, असे चराचर कोंदाटून टाकणारे विश्वरूप अर्जुनाने पाहिले .त्या तेजाच्या तीव्रतेने नक्षत्रांच्या लाह्या उडू लागल्या. त्या तेजाने हटून अग्नी समुद्राचा आश्रय घेऊ लागला.मग कालकूटाच्या लाटा उसळाव्यात ,किंवा महाविद्युत अरण्य पसरावे तसे आयुधे उचललेले अनंत हस्त त्याला दिसले.
अशा वैभवशाली शब्दात विश्वरूपदर्शनासारख्या अद्भुत अनुभवाचे वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे, तेव्हा मूळ श्लोकाच्या संपृक्त आशयाला त्यांनी आपल्या शैलीत तितक्याच ताकदीने वर्धमान केले आहे.

अर्जुनाला विराट रुपात दिसलेली प्रसन्न रूपे

"दिव्यमालांबरधरं"  या अकराव्या अध्यायातील अकराव्या श्लोकात आदल्या श्लोकातील  उग्र भयानक रूपदर्शनांवरचा सौम्यसुंदर उतारा प्रकटला आहे. त्याचा विस्तार करताना ज्ञानदेव म्हणतात," भेदरून आपली नजर तेथून काढून अर्जुनाने कंठ व मुकुटाकडे वळवली, तेव्हा कल्पतरूंच्या उत्पत्तिस्थानाप्रमाणे आल्हाददायक,महासिद्धींच्या मूळपीठाप्रमाणे प्रभावी, लक्ष्मीने शिणून जेथे  मस्तक टेकवावे अशी दिव्यपुष्पांनी आच्छादित झालेली प्रभूची प्रसन्न रुपे त्याला दिसली. मुकुटावर घोस रुळत होते. कंठात अनेकानेक माळा शोभत होत्या.
स्वर्गें सूर्यतेज वेढिलें । जैसें पंधरेनें मेरूतें मढिलें ।
तैसें नितंबावरी गाढिलें । पीतांबरु झळके ॥ २१7॥
स्वर्गाने सूर्यतेज पांघरून घ्यावे, किंवा मेरू पर्वताला सोन्याचा लेप करावा त्याप्रमाणे कमरेवर कसलेला पीतांबर शोभत होता.
कर्पूरगौर महादेवाला कापराचे उटणे लावावे, कैलासपर्वत चमचमत्या पाऱ्याने मढवावा, क्षीरसागराला दुधाचे आच्छादन करावे किंवा चांदण्याच्या वस्त्राची घडी उलगडून गगनाला लेववावी अशी मूळ रूपवैभव वृद्धिंगत करणारी चंदनउटी प्रभूच्या सर्वांगावर शोभत होती. ज्यामुळे प्रकाशालाही कांतिमानता येते, ब्रह्मानंदालाही दाह होत असेल तर तो उतरतो, पृथ्वीचेही आयुष्य वाढते, असा तो चंदनसुगंध त्या निर्लेप परमेश्वराने लेपून घेतला होता. पण ही शृंगारशोभा पाहता पाहताच अर्जुन अस्वस्थ झाला. देव बसला आहे की उभा आहे हे त्याला कळेनासे झाले.दृष्टी मिटली तरी रूप दर्शन हटेना .
बाहेर दिठी उघडोनि पाहे । तंव आघवें मूर्तिमय देखत आहे ।
मग आतां न पाहें म्हणौनि उगा राहे।तरी आंतुही तैसेंचि॥ २२3॥
दृष्टि उघडू्न तो बाहेर पाहू लागला, तरी सर्वच विश्वरूपमय आहे असे त्यास दिसू लागले. मग आता मी काही पहाणार नाही असा निश्चय करून तो उगीच राहिला (त्याने डोळे मिटून घेतले), तरी आतही त्याला तसेच विश्वरूप दिसले.
पार्थाचे पाहणे व न पाहणे दोन्ही नारायणरूपांनी व्याप्त झाले. कल्पांती द्वादश  सूर्यांचा मेळ व्हावा तरी त्या तेजाची बरोबरी होणार नाही . विजांचे सारे लोळ एकवटून तिथेच प्रलयानलाची सामग्री आणवावी  व दहा महत्तेजेही त्यात मिळवावी, तरी ते सारे कमीच अशा आल्हाददायक दिव्य रूपांची दाटी अर्जुनाने पाहिली.

अर्जुनाची विश्वरूप आवरण्याची विनंती
"पश्यामि देवांस्तव देव देहे" -पासून सुरू होणारी अर्जुनाची विश्वरूपस्तुती  हे अखिल साहित्यशब्दसृष्टीतले एक आश्चर्यनिधान व अंतिम सौंदर्यविधान आहे. श्रीज्ञानेश्वरांनी तितक्याच समर्थ व परमरूपवंत शैलीत ते मराठीत आणले आहे. अर्जुनाची विनंती सांगताना ते म्हणतात,"अर्जुनाने देवाचा जयजयकार करून म्हटले ,"स्वामी मजसारख्या सामान्याला तू काय हे दाखवलेस? या सृष्टीचा आश्रय तूच हे स्पष्ट दिसले. मंदार पर्वतावर प्राणीसमुदाय फिरावेत तशी तुझ्या विराट देहावर भुवने खेळताना दिसत आहेत.आकाशाच्या खोळीत ग्रहगण शोभावेत तसे या विश्वात्मक शरीरावर स्वर्गलोक व सुरपरिवार नांदत आहे. महाभूतांचे पंचक, सत्यलोकासहित ब्रह्मदेव,कैलासपर्वतावर पार्वतीसह महादेव तुझ्या एका अंशात विराजमान आहेत. कश्यपादि ऋषिकुळे व निरनिराळ्या पाताळसृष्टीतील नागमंडळे तूच धारिली आहेस. तुझा अवयवांच्या भिंतीवर ही चौदा भुवनांची चित्रे रेखाटली आहेत.हे रूप तरी कसे आहे ?तुझे हात पहावेत तर अनंत व्यापार अनंत तर्‍हांनी करणारे असे, बाहुदंडापासून आकाशाला कोंब फुटावेत तसे करकमळांचे भार दिसत आहेत.
मग महाशून्याचेनि पैसारें । उघडलीं ब्रह्मकटाहाचीं भांडारें ।
तैसीं देखतसें अपारें । उदरें तुझीं ॥ २६८।।
जी सहस्रशीर्षयाचें देखिलें । कोडीवरी होताति एकीवेळें ।
कीं परब्रह्मचि वदनफळें । मोडोनि आलें ॥ २६९॥
महाशून्यांचे विस्तार उघडावेत, ब्रह्मकमंडलूंची कोठारे दिसावीत अशी तुझी अपार उदरेआहेत.सहस्रशीर्ष तुला म्हणतात, पण तुझ्या कोट्यवधी वदनरूप फळांनी परब्रह्म लगडून गेले आहे. तशाच तुझ्या नयनरांगा अनादि-अनंत पसरलेल्या आहेत.
ऐसा कवणें ठायाहूनि तूं आलासी । एथ बैसलासि कीं उभा आहासि ।
आणि कवणिये मायेचिये पोटीं होतासी । तुझें ठाण केवढें ॥ २७४॥
तुझें रूप  अवयव कैसें । तुजपैलीकडे काय असे ।
तूं काइसयावरी आहासि ऐसें । जंव पाहिलें मियां ॥ २७५॥
तू कुठून आलास ?बसलेला आहेस की उभाच आहेस? कोणत्या मातेच्या उदरी राहिला होतास? तुझे स्थान केवढे? वय काय? तुझ्या पलीकडे काय आहे? आमचा सारथी तो तूच ना मुकुंदा ?हा तुझा महिमा पाहतानाही रथाच्या मकरतुंडामागची आकृती ती हीच हे जाणवते आहे. हा मुकुट तोच ना ?पण त्याचे तेज आता काही वेगळेच दिसते आहे. वरल्या हातातले हे चक्रही ओळखीचेच. माझ्या हट्टासरशी तू विश्वरूप की झालास! पण आता विस्मय मानण्यासाठीही देहभान नाही.येथे तुझ्या अंगकांतीच्या प्रभेने सूर्य काजव्यांसारखे  हरपून जात आहेत . या तेजज्वाळांच्या धडधडण्याने दिव्यचक्षूही  पोळून निघत आहेत. पंचाग्नींच्या ज्वाळांचे वळसे पडून येथे ब्रह्मांडांचे कोळसे होत आहेत.
हे अक्षर,अव्यय,अविनाश, अनादिसिद्ध विश्वपुरुषा, कोपप्रसादांची लीला दाखवणारा तूच. अनावर अशा  तुझे आकलन कसे करावे ?मध्यंतरी, तुझ्या दिव्यदाहक रूपाग्नीमध्ये सारे जनलोक तळमळत आहेत.हे देवगण भयभीत होऊन प्रार्थना करीत आहेत. हे नाना ऋषीमहर्षी सिद्धगण 'स्वस्ति' असे म्हणून तुला स्तवनाने शांतवत आहेत. हे रुद्रादित्यांचे समुदाय,वसुंसहित अश्‍विनीकुमार, वायू ,पितर ,गंधर्व, यक्षराक्षस,महेंद्रादि देव मंजुळ आराधनांनी, नमस्कारांनी तुला आपल्या मुकुटांची ओवाळणी करत आहेत.
महाकाळाहून वरचढ अशी तुझी रूपे ,त्यातल्या कराल दाढा हे सारे पाहून माझा देह तर जाणारच पण चैतन्य तरी टिकेल का? आता प्रसन्न व्हा. ही महामारी आवरती घ्या !हे विश्वरूप पाहून सुखाचा दुष्काळच पडला आहे.
नावरे व्याप्ती हे असाधारण । न साहवे तेजाचे उग्रपण ।
सुख दूरी गेलें परि प्राण । विपायें धरीजे ॥ ३१८॥
(तुझी विश्वरूपाची) व्यापकता विलक्षण असल्यामुळे तुझे आकलन होत नाही. व तुझी रूपाची प्रखरता सहन होत नाही. यामुळे सुख तर दूरच राहिले, परंतु जग हे आपले प्राण मोठ्या कष्टाने धरून राहिले आहे.
देवा ऐसें देखोनि तूंतें । नेणों कैसें आलें भयाचें भरितें ।
आतां दुःखकल्लोळीं झळंबतें । तिन्हीं भुवनें ॥ ३१४ ॥
देवा, तुला पाहून भयाची भरती कशी आली ते कळत नाही.  दु:खांच्या लाटांत तिन्ही लोक गटांगळ्या खात आहेत.
ही सारी तोंडे उघडून तू या सेनेचा घास घेत आहेस हे धडधडीत दिसते आहे !गेले हे कौरवकुलश्रेष्ठ !देशोदेशींच्या सहाय्यक राजपुरुषांनाही तू सोडत नाहीस.. हत्तींचे समुदाय ,घोडे ,रथ, पायदळ, भीष्म ,द्रोण, कर्ण साऱ्यांचा काळ तूच.हा जळता वारा निवारण करण्यास काळकूटधारी शंकरही कमीच पडतील.हे विषव्याप्त आकाश कोणी प्राशावे ?जग चहूकडून तुझ्या तोंडात शिरत आहे .
मिया होआवेया समाधान। पुसिलें विश्वरूपध्यान ।
तंव एकेंचि वेळे त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी ॥ ४४६॥
माझे समाधान व्हावे म्हणून मी विश्वरूपाचे ध्यान विचारले आणि इतक्यात एकदम तू सर्व त्रैलोक्यसंहारच करीत सुटलास.
तरी तूं कोण कां येतुलीं । इयें भयानके मेळविली ।
आघवियाचि करीं परिजिलीं । शस्त्रें कांह्या ॥ ४४७ ॥
तेव्हा तू आहेस तरी कोण ? व इतकी ही भयंकरता कशाकरता तयार केली आहेस ? व या सर्वच हातात शस्त्रे कशाकरता धारण केली आहेस ?

विश्वरूपदर्शनाचा अनुभव आणि व्याप्ती अर्जुनासारख्या वीरश्रेष्ठालाही झेपलेली नाही, कारण परिमित अशा कुणाही देहबुद्धीधारी जीवाच्या धारणाशक्तीच्या पलीकडचीच ती अनुभूती आहे. या प्रसंगी त्याने केलेली वर्णनेही आकलनशक्ती पलीकडच्या प्रांताला भिडणारी,प्रत्ययास न येणाऱ्या गोष्टींचा शब्दरूप प्रत्यय देणारी अशीच आहेत.

प्रभूने  भयभीत अर्जुनाला धीर देण्यासाठी दिलेली आश्वासने

भ्यालेल्या अर्जुनाला धीर देण्यासाठी श्री भगवंत म्हणाले ," मी काळ आहे हे तर खरेच. लोकांच्या संहारासाठीच ही इतकी तोंडे पसरून येथे ठाकलो आहे, पण या महासंहारातून तुम्ही पांडव मात्र वाचणार आहात. तुम्ही माझे आहात हे लक्षात ठेवा. अन्यांचा मात्र येथे संहारच मांडला आहे. वज्रानलामध्ये लोण्याचे मडके टिकेल का ?तसेच हे जग माझ्या काळमुखातून  बचावणार नाही.
तंव ऐसें म्हणितले देवें । अर्जुना तुम्ही माझें हें जाणावें ।
येर जाण मी आघवें । सरलों ग्रासूं ॥ ४५६ ॥
वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी ।
तैसें जग हें माझिया तोंडीं । तुवां देखिलें जें ॥ ४५७॥ 

या सैन्यांची वल्गना व्यर्थ आहे .यांची वीरवृत्तीची कुंथणी निरर्थक आहेत. हत्तींच्या दळांचा डौल सांगणारी ,सृष्टीची प्रतिसृष्टी करू म्हणणारी, मृत्यूलाही प्रतिज्ञेने मारू म्हणणारी जगाचा एकच घोट घेऊ म्हणणारी ही मंडळी. यांचे शब्दच शस्त्राहून तिखट आहेत .पण हे ढगांचे लोट किंवा पोकळीच्या पेंड्या वळाव्यात तसेच सारे आहे. हा मृगजळाला आलेला पूर आहे. हे दळ नव्हेच, कापडाच्या सापासारखे निरुपद्रवी खेळणे आहे. ही बाहुली इथे सजवून मांडली आहेत. त्यांच्या हालचालीतले बळ मी आधीच शोषून टाकले आहे. हालवणारी दोरी तुटल्यावर खांबावरची बाहुली कोणीही कोलमडून टाकू शकते. या सैन्याचा आकार तसाच सहज मोडणारा आहे, म्हणून उठ, अर्जुना! शहाण्यासारखे वाग. मागे गोग्रहणाच्या वेळी तू मोहनअस्त्र सोडलेस व विराटाच्या भेकड उत्तराने सर्वांचे वस्त्रहरण केले ,त्याहूनही हे काम सोपे आहे .आयत्या रणात संहाराचे निमित्त तू हो. यशश्री राजश्री तुझीच आहे.हे सव्यसाची तू निमित्तमात्र हो!
द्रोण ,भीष्म, कर्ण ,जयद्रथ कुणाचीच पर्वा करू नकोस .अरे हे सर्वजण चित्रातले सिंह आहेत. ओल्या हातानेही पुसले जातील. मी या सर्वांचा ग्रास केलेला तू प्रत्यक्ष पाहिलास.माझ्या वदनात हे शिरले तेव्हाच यांचे आयुष्य सरले .म्हणून उठ! फुकटच्या शोकात भ्रमू नकोस.
यावरी पांडवा । काइसा युद्धाचा मेळावा ? ।
हा आभासु गा आघवा । येर ग्रासिलें मियां ॥ ४७५।।
जेव्हां तुवां देखिले । हे माझिया वदनीं पडिले ।
तेव्हांचि यांचें आयुष्य सरलें । आतां रितीं सोपें ॥ ४७६॥
तुझ्या विरोधातले सारे वाघाने नेले आहे. रे बाबा ! आता यश तुझेच आहे .स्वभावत:च गर्विष्ठ, जगात बलवान व मदोन्मत्त भाऊबंद सहज संहारून अर्जुन विजयी झाला हे वचन विश्वाच्या वाक्पटावर कोरून टाक .
सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।
ते वधिले रिपु विशद । शौर्य याचे ॥ ४८०॥
ऐसिया इया गोष्टी । विश्वाच्या वाक्‌पटीं ।
लिहूनि घाली किरीटी । विजया होई ॥ ४८१ ॥

सत्य लोकातून निघालेल्या गंगौघाप्रमाणे हा घनगंभीर नाद किंवा महामेघांचा गडगडाट किंवा मंदराचलाने घुसळलेल्या क्षीरसागराचा गंभीर शब्द -तसेच हे विश्वरूप भगवंताचे बोलणे होते.
भगवंतांच्या आश्वासनांचा उद्देश अर्जुनाला धीर देण्याचा, जीवितासह यशश्री देण्याचा असला ,तरी विश्वरूपदर्शनाचा व त्या दिव्यवाणीच्या श्रवणाचा एकूणच भव्य उग्र अनुभव अर्जुनाला भयकारी वाटला.

अर्जुनाने अपराधांची मागितलेली क्षमा
"सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं"  या अकराव्या अध्यायातल्या एक्केचाळीसाव्या श्लोकात व त्या पुढल्या श्लोकांमध्ये आलेल्या अर्जुनाच्या साश्चर्य क्षमाभावनेचा हृदयंगम विस्तार श्रीज्ञानेश्वरांनी येथे केला आहे .
अर्जुन म्हणाला ,"अनंत,बलशाली सर्वदेशव्यापक अशा तुझ्याशी आम्ही सोयरे पणाच्या भ्रमात वावरलो. किती वाईट झाले हे सर्व !अमृताने आम्ही सडासंमार्जन केले .कोकरू घेऊन कामधेनू देऊन टाकली. परिसाचा पर्वत फोडून त्याचा गडगा घातला .कल्पतरू तोडून शेताला कुंपण केले .चिंतामणीच्या खाणीतले खडे घेऊन ओढाळ गुरे  हाकलली !हेच पहा ना -हे युद्ध ते कसले आणि केवढे ?पण तुला परब्रह्माला येथे सारथी म्हणून बसवले. कौरवांकडे शिष्टाईसाठी तुला पाठवले. अशा व्यापारव्यवहारार्थ तुला वापरले !
हे आजिचेचि पहा रोकडे।कवण जूझ हे केवढे
एथ परब्रह्म तूं उघडें । सारथी केलासी ॥ ५३४ ॥
यया कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलासि दातारा ।
ऐसा वणिजेसाठीं जगेश्वरा । विकलासि आम्हीं ॥ ५३५ ॥
तू योग्यांचे समाधीसुख,पण तुझ्यासमोर मी हट्ट की केले!  विश्वाचे अनादिमूळ अशा तुझ्याशी नाते..संबंधाने विनोद केले. घरी येऊन मानपान घेतले. कमी पडले तर सलगीची रुसणीफुगणीही केली. तुझ्याकडून पायधरण्या करून घेण्याचेही प्रसंग आणले. तुझ्याबरोबर दांडपट्टा कुस्ती खेळलो. सोंगट्या खेळताना तुला झोंबरे बोललो व भांडलो देखील! तुला उलटा बुद्धिवाद सांगून "आम्ही तुझे काय लागतो" असेही उर्मटपणे म्हटले .
चांग तें उराउरीं मागों । देवासि कीं बुद्धि सांगों ।
तेवींचि म्हणों काय लागों । तुझें आम्ही ॥ ५४२ ॥
ऐसा अपराधु हा आहे । जो त्रिभुवनीं न समाये ।
जी नेणोचि आम्ही पाये । स्वीकरिले तुझे ॥ ५४३ ॥
असे किती अपराध सांगावेत!मी तर अपराधांची राशीच आहे. मातेप्रमाणे हे सर्व पोटात घाल. समुद्र गढूळ नद्यांना सामावून घेतो ,तसाच तू. प्रीतीने वा प्रमादाने मी जे बोललो, जसे वागलो त्याची हे मुकुंदा,क्षमा कर!"- अशा लाघवी शब्दात अर्जुनाने आपल्या सख्यजन्य अपराधांची भगवंताकडे क्षमा मागितली.

अर्जुनाची कृष्णरूपदर्शनाची विनंती व त्यावर भगवंतांची प्रतिक्रिया

हे विश्वरूपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे ।
आतां होताति आंधळे। कृष्णालागी ॥ ५९६ ॥
तें साकार कृष्णरूपडें । वांचूनि पाहों आन नावडे ।
तें न देखतां थोडें । मानिताती हे ॥ ५९७ ॥
"पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम्" या महानुभूतीमध्ये गटांगळ्या खाणाऱ्या, घाबऱ्या झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाचे परिचयाचे सावळे सुंदर सगुण रूप पहावेसे वाटू लागले .त्यानेच हट्ट करून ,मोठमोठे दाखले देऊन विश्वरूपदर्शन मागितले होते. सख्यप्रीतीतले धैर्य गोळा करून त्याने ते मागितले, आणि श्रीकृष्णांनी त्याला ते  विनासायास दिलेही .पण ते देणे त्याच्या मर्त्य ओंजळीत मावणारे नव्हते. त्याला दिलेल्या दिव्यचक्षूंनाही पोळून काढणारे  ते परमेश्वराचे अमितरूप घघम्ही तरुण त्याची महाप्रभा त्याचं सौंदर्य आणि उग्रता शृंगार आणि संहार सारेच अर्जुनाच्या बुद्धीला भोवंडून टाकणारे होते .जणू महापुरात तो तहानेने कासावीस झाला. ही तहान विश्वरूपी महासागर भागवू शकणार नव्हता .त्याची तृष्णा भागवू शकणारे रूप नित्य परिचयाच्या शामसुंदराचेच होते, ज्याला पाहून मन सुखावते ,डोळे निवतात, शरीर ज्याला आलिंगन देऊन कृतार्थ होते, तोच श्रीकृष्ण एवढ्या विश्वरूप प्रवासानंतर अर्जुनाला हवा झाला.
आम्हां भोगमोक्षाचिया ठायीं । श्रीमूर्तीवांचूनि नाहीं ।
म्हणौनि तैसाचि साकारु होईं । हें संहारी आतां ॥ ५९८ ॥
"आम्हाला ऐहिक व पारलौकिक भोगाच्या ठिकाणी फार काय सांगावे, मोक्षाच्या ठिकाणी देखील शामसुंदर मूर्तीवाचून दुसरे काही नाही. म्हणून देवा, आता तू तसाच चतुर्भुज हो व हे विश्वरूप आटोप "- अशी अर्जुनाने श्रीकृष्णाला विनंती केली. अनन्य भक्तीतला प्रेमभाव हा भक्ताच्या नित्य आराधनेतील परिचयाच्या सगुणरूपातच विलीन झालेला असतो अर्जुन हे या भक्तीप्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण आहे
त्रैलोक्यातील महानुभावांनाही  अप्राप्य अशा  विश्वरूपाबद्दलची अर्जुनाची ही  अनास्था पाहून भगवंतांनी आश्चर्य व्यक्त केले आणि विश्वरूपाच्याच यथार्थतेबद्दल  निश्चयबुद्धी ठेवण्यास त्याला कळकळीने सांगितले पण नंतर त्याची विनंती मान्यही केली.
तरि अझुनिवरी पार्था । सांडीं सांडीं हे व्यवस्था ।
इयेविषयीं आस्था । करिसी झणें ॥ ६२१ ॥
"तर अर्जुना, अजूनपर्यंत तरी हे तुझे ठरलेले मत (विश्वरूप हे भयंकर रूप आहे व चतुर्भुजरूप हे सुंदर रूप आहे) टाकून दे. या सगुणरूपाविषयी आस्था (प्रेम) कदाचित धरशील तर धरू नकोस.
हें रूप जरी घोर । विकृत आणि थोर ।
तरी कृतनिश्चयासि  घर । हेंचि करीं ॥ ६२२ ॥
हे विश्वरूप जरी भयंकर अक्राळ विक्राळ आणि अवाढव्य असे आहे तरी (चतुर्भुजरूपापेक्षा) हे विश्वरूप माझे खरे रूप असल्याकारणाने हेच उपासनेला योग्य आहे असा तू पक्का निश्चय कर. "
या सर्व घटनाक्रमाला साक्षी असलेल्या संजयाची प्रतिक्रिया ज्ञानदेवांनी एका सुंदर उपमेच्या सहाय्याने वर्णिली आहे. दुकानदाराने महावस्त्र उलगडून दाखवावे व गिऱ्हाईकाला आवडले नाही म्हणून त्याची पुन्हा घडी करून ठेवावी तसेणच श्रीकृष्णांनी विश्वरूपदर्शनानंतर पुन्हा कृष्णरूप धारण केले.
हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी।होती विश्वरूपाची घडी ।
ते अर्जुनाचिये आवडी । उपलविली  देवे ॥ ६४१ ॥
त्याप्रमाणे कृष्णाकृतीच्या रूपाने जी विश्वरूपी वस्त्राची घडी होती, ती अर्जुनाच्या पसंती करता देवांनी उकलून दाखवली .
तंव प्रमाण आणि  रंगु । तेणें देखिलें साविया चांगु ।
तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु।म्हणौनि घडी केली पुढती ॥ ६४२॥
तेव्हा (एखादे वस्त्र विकत घेणारे गिर्‍हाइक जसे त्या वस्त्राची लांबी, रुंदी व रंग पाहाते त्याप्रमाणे) अर्जुनाने या विश्वरूपी वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सहज चांगली पाहिली, त्यावेळी अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभवही नाही, म्हणून देवांनी विश्वरूपी वस्त्राची सगुण कृष्णाकृतिरूपी पुन्हा घडी केली.

ज्ञानदेवांनी केलेला समारोप
भरोनि सद्‌भावाची अंजुळी । मियां वोंवियाफुलें मोकळीं ।
अर्पिलीं अंघ्रियुगुलीं । विश्वरूपाच्या ॥ ६९८ ॥
"मी शुद्ध भावनारूप ओंजळीत ओव्यारूपी मोकळी फुले भरून विश्वरूपाच्या दोन्ही पायांवर अर्पण केली "-असे ज्ञानदेव म्हणतात.
अकराव्या अध्यायाच्या उपसंहाराच्या या शेवटच्या ओवीत अर्जुनाच्या बरोबरीने विश्वरूपदर्शनाचा आनंद  श्रीज्ञानेश्वरांच्याही  ज्ञानचक्षूंनी  घेतल्याचा अभिप्राय सूक्ष्मरूपाने दडला आहे. त्याकारणाने या ओव्याच ते मोकळ्या फुलांनी भरलेली ओंजळ म्हणून श्रीचरणी अर्पण करत आहेत.

भारती बिर्जे डिग्गीकर


 

Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –