भवारण्यसीमेवरल्या हाका - अनोळखी प्रदेशात आणि रे गोपाळा – सुनंदा भोसेकर
भवारण्यसीमेवरल्या हाका - अनोळखी प्रदेशात आणि रे
गोपाळा – सुनंदा भोसेकर
एका स्वायत्त प्रातिभ-प्रदेशात तिला भेटण्यासाठी
जावं लागतं. तशी ती सभासमारंभात नसते असं नाही. पण तिच्याच शब्दातही ती सापडेल
असंही नाही.तिच्यापर्यंत पोचण्याच्या परवलखुणा शोधताना तिला विसरायला हरकत नाही
अशा एका प्रांताचं बांधकाम तिने फार पूर्वीपासून सुनियोजितपणे केलं आहे.तिथेच आपण
तिच्या हाका ऐकत मग स्वत:लाही विसरून जावं .
समकालीन कवयित्रींपैकी एक महत्वाचं नाव- सुनंदा भोसेकर.
खूप पूर्वी १९८० मध्ये हातात आला होता तो तिचा ऋचा
प्रकाशनकडून आलेला संग्रह –‘’ अनोळखी प्रदेशात ‘’आणि नंतर २००७ मधला ‘’रे गोपाळा
‘’- दोन्ही आता परममित्र प्रकाशनची प्रकाशने आहेत.
‘’अनोळखी प्रदेशात ‘’मधली सुनंदा जेमतेम विशी
ओलांडलेली असेल. पण कवितेतली जाणीव तेव्हाही प्रगल्भ.जिच्या लेखनप्रपंचाची
सुरुवातच विश्वरहस्याने झाली, तिचं वय कसं ठरवावं ?
‘’हिमार्त वादळी पानझडींचे हिशेब आठवत |आपण आपले
विश्वरहस्यासारखे |घोर एकांतिक होऊन जावे हेच बरे.’’
या पहिल्या कवितेच्या पहिल्या ओळीतच तुडुंब
एकटेपण, गूढता आणि असीमता सामावून
सुनंदाने आपल्या लेखनविश्वाची घडी अर्धवट उलगडून ठेवली आहे.वाक्यावाक्यातून
प्रतिमांच्या रंगीत काचांचे तुकडे विखुरलेले. त्यात शतगुणित झालेली आशयांची
आकाशं.सुनंदाची कविता ही एका अर्थी ग्रेसांच्या कवितेसारखी रानभूल आहे. सुरुवातीपासूनच.जाणिवेचा
हा असा वेगळा वाण कसा सिद्ध झाला असेल?
एक विशीतलीच मुलगी लिहिते आहे की -
‘’हाडांना पडलेल्या भोकांमधून |माझी जिगीषा |हलके
हलके पाझरून |जमिनीत विरून जात आहे’’
असं, किंवा,
‘’भुरभुरणाऱ्या पिवळ्या गवताच्या माळावर |मी
आपल्या पांढऱ्या केसांमधले |सर्व शहाणपण पुरून टाकले ‘’-
तेव्हा या कवितेचा स्वर पृथ्वीइतका वृद्ध आहे हे
आपल्या लक्षात येऊ लागतं.मग त्याही पुढे जाऊन समजतं की अरे ही स्वयं पृथ्वीच तर
लिहित नाहीय ना या संदर्भ सुटल्यासारख्या वाटणाऱ्या , कधी एका वेगळ्या
आकलनव्यूहाचा निर्देश करणाऱ्या कविता ?की हा स्वर आहे मानवजातीचाच ?
’इतक्यानेच काय झाले ? |कासाराच्या दुकानामागे |ताटकळून
ताटकळून जमवलेल्या |सर्व रंगीत काचा |
परकराच्या घोळात पसरून |पुढ्यात सांडलेल्या |अतोनात
अहंकारी आकाशाच्या |मर्मस्थानाचा शोध घेत बसले’’
हे काय आहे ते आता समजू लागतं.
सुनंदाच्या कवितेतली निवेदिका अशी आहे.कवितेच्या
तुकड्यातला अनुभव कथनात्म आहे पण कथानकाच्या अतीत आहे. दचकवून भरकटवून सोडून
देणारा आहे. म्हणून तर हा अनोळखी प्रदेश. जिथे अर्थांची ओळख मिळवायचं काम वाटसरू
वाचकाला नव्याने , कोरं होऊन करायचं आहे.
‘’अनोळखी प्रदेशात’ मध्ये प्रवासाच्या कविता, महानगर,तुझ्यासाठी
काही कविता , अनोळखी प्रदेशात आणि संवाद असे छोटे विभाग आहेत,उण्यापुऱ्या ४०
कवितांच्या पानातला ऐवज .
सुनंदा कवितेच्या विश्वातून एका अज्ञात काळोख्या
केंद्राला शोधत निघाल्या आहेत.’प्रवासी’ ही कवयित्रीची ओळख लौकिक जगातही खरी असली
तरी हा प्रवास मात्र लौकिक सृष्टीतला नाही.त्यात प्रतिमांची गजबज आहे.काळे
घोडेस्वार आहेत, घोर शोकदरी आहे.बर्फगार टेकड्या आहेत. समुद्राकाठची गावे आणि
पर्वतप्रदेश आहेत.त्यात एक शहरही आहे त्याचे तमाम रस्ते तसे भयप्रद आहेत. त्या
भयातून सुटका करण्यासाठी हा प्रवास उत्तररात्रीच्या स्वप्नातही पोचतो.
चक्राकार संगमरवरी जिन्याच्या वरच्या टोकाशी |उभ्या
असलेल्या तुझ्या काळ्याभोर केसांच्या लाटा
माझ्या शरीराच्या किनाऱ्यापर्यंत येऊन थडकल्या |आणि
सगळे भय विझून विझून गेले.
हे विश्व ,‘स्व’सकट,आंतरविरोधाने भरलेले आहे.
हिंस्त्रपणा अंगभर धुमसत असताना तोंडाने विश्वकरुणेवर कवयित्री व्याख्याने देते.
त्यातच सहज शक्यतेने लोकलमध्ये खिसा कापला जातो. स्वप्नांप्रमाणे सत्यसृष्टीही विचित्र, इषत विनोदी पण खरं तर निरर्थक
घटनाक्रमाने भरलेली आहे. म्हणून न-नैतिक आणि निरागस आहे.
सुरुवातीच्याच ओळींनी या प्रवासाचा शेवट होतो. हा
चक्राकार प्रवास, त्यातली प्रवासिनी, प्रदेश,इतर माणसे,’तू’, विश्वरहस्यासारखे घोर
आहेत कारण हा जन्मजाणिवेचाच प्रवास
आहे.
क्लासिकल रोमँटिक अंगाने जाणाऱ्या प्रवासाच्या
कवितेनंतर येणाऱ्या ‘’महानगर’’ या शीर्षकाखालच्या काही कविताही शहराच्या वास्तवाचा
आविष्कार अशाच गूढगर्भ प्रकाशयोजनेतून करतात.कारण,
‘’माझा असा सिद्धांत आहे |की शहर माणसांच्या
रक्तात मुरत नाही|उदाहरणार्थ |गतजन्मीप्रमाणे याही जन्मी |
तो हातात तळपती तलवार घेऊन |अरबी घोड्यावर स्वार
होऊन |तुफान दौडत दौडत येईल |असे मला |
लोकलच्या घामट गर्दीतही वाटायचे’’..
त्या स्वप्नाळू वयाची कुठे तरी अशी नोंद व्हायलाच
हवी, तरीही, शेवटी शहर ही रोमँटिसिझमवर आरपार विपरीत परिणाम करणारी गोष्ट आहेच.
‘’असंख्य आघाड्यांवर दमछाक झाल्यावर |हे असे
प्रत्येकाचे |असण्या-नसण्याच्या सीमारेषेवर रेंगाळणे |
बंद मुठीत गच्च धरून ठेवलेली जिगीषा.’’
असं असलं तरी काहीतरी अमूल्य असतंच इतक्या
आघाड्यांवरचे पराभव पेलून उरणारं .
‘’शहराच्या रस्त्यांवरून सैरभैर होताना |मला एकदा
तुकारामाची कविता सापडली| समग्र आयुष्यात घडलेले |इतकेच महत्वाचे.’’
यानंतरचा ‘’तुझ्यासाठी काही कविता’’ हा कविता-समुच्चय
आयुष्याच्या क्षणाक्षणावर ज्याच्या सह्या , त्याच्यासाठी. प्रियकर ? परमेश्वर ?
‘’या क्षणाला जातिवंत चैतन्य भरशील तू माझ्या
शरीरात |नि पुढच्याच क्षणाला तुझ्या मनात येईल मला जिवंत जाळण्याचे|तरीही तुझ्या
रुंद खांद्यांकडे मी बघते आहे |आधारासाठी.’’
हे नातं असं विषम आहे.व्यामिश्र आहे.कदाचित हे
नातं अस्तिवातच नसलेल्या कुणाशी तरी आहे.किंवा असंख्य तुकड्यातुकड्यांतून
साकारलेल्या मनोमय कुणाशी तरी आहे.
‘’खोलीत मध्यभागी दिवा लावून |मी आठवत बसते तुझा
चेहरा
आणि नजरेसमोरून सरकत जाते |असंख्य चेहऱ्यांचे
एकसंध आकाश
संबंधांच्या गुंतवणुकीचा अपरिहार्य शेवट |हाताची
बोटे तुटण्यात.’’
असल्या या नात्यात तणाव आणि तणावच असणं
क्रमप्राप्त.तणावाच्या स्वीकारासकट तणाव.
‘’तू म्हणजे माझ्या सृजनशक्तीला सततचे आव्हान |नंतर
ओसरून जातो सारा कैफ क्षणभरात
कशाला जन्म देऊ |मी तुझ्या या अनंत रूपांना ..’’
‘अनोळखी प्रदेशात’’ हेच शीर्षक असलेल्या पुढच्या
कवितासमूहात पुन्हा एकदा प्रवास करत कवयित्री त्या अनोळखी प्रदेशात पोचली आहे
जिथले संकेत तिला माहिती नाहीत. जिथली झाडे,पक्षी, माणसे , प्रार्थनास्वर तिला
अपरिचित , आदिम, भयप्रद वाटतात.सुनंदा इथे नव्याने काय सांगत आहेत हे स्पष्ट होत
नाही .कदाचित स्वत:लाच , ज्ञात विश्वाला परकं करून टाकणाऱ्या एका टप्प्यावर
कवयित्रीची जाणीव पोचली आहे हे अधोरेखित करायचे आहे.
शेवटच्या छोट्याशा ‘’संवाद’ या शीर्षकाच्या
कविताखंडात मग कवयित्री स्थिरचित्त आहे .भयभावना, एकाकीपण ओलांडून स्वत:शी, स्वेतर
विश्वाशी संवाद करते आहे.
‘’वस्ती झपाटलेली आहे |आणि माणसांची नाही.
हे प्रयत्नपूर्वक मनावरून पुसट आणले |आणि लंगडी
घालत
स्वत:शीच खेळायला सुरुवात केली.’’
एक विचित्र खोचक असा आशावाद तिच्या मनात आकारतो
आहे.
‘’वाळवंटात किंवा पाण्याखाली |बॉम्बच्या चाचण्या
चालू असतील
तेव्हा पियानोवर एखादे विरहगीत| छेडायला काय हरकत
आहे’’...
सुरुवातीपासूनच मुक्तच्छ्न्दी असलेली ही कविता मग
शेवटच्या चार ओळीत पद्यमयता धारण करते.
||मी नसता उगा म्हणावे |आहे तसेच राहो.
असण्याच्या फोलामधला |दाणा गळून जावो||
ही शैली-आख्यायिकेसारखा स्वर लावणारी,प्रतिमाविश्वे
धारण करणारी- अशा शैलीचं सामर्थ्य हीच तिची मर्यादा असते.सुनंदा तिच्या
मंत्रमोहातून बाहेर येईल का ?कवयित्रीने या प्रश्नाचे उत्तर कसलीही घाई न करता
सत्तावीस वर्षांनंतर आलेल्या दुसऱ्या संग्रहातून- ‘’रे गोपाळा ‘’ मधून दिलं आहे.
-
हा आख्यान-स्वर तिचा अंत:स्वर आहे,अपरिवर्तनीय
आहे. पण आता तो अजून परिपक्व झाला आहे, त्यातली सृष्टी स्पष्टतेच्या उजाळ्यात आता वाचकाच्या
अधिक जवळ आली आहे आणि अकृत्रिम ,ठाशीव, सुंदर दिसते आहे.
‘रे गोपाळा’ मध्ये साठ कविता आहेत , स्वतंत्र
शीर्षके असलेल्या , एकच अंत:सूत्र असले तरी .
संग्रहाच्या अर्पणपत्रिकेत ‘’बापाची काठी’’ –
ज्ञानेश्वरांचं स्मरण , पहिल्याच कवितेत अरण्यसीमेवर गोपाळाला सोबतीसाठी हाक
मारणारं ते आतलं लहान मूल.चिरंतन आस्तिकतेचा आधुनिक जाणिवेत झालेला मेळ.
‘’मला भय वाटते |या रुंद पात्राच्या संथ नदीचे
|पात्रातल्या उलट्या झाडांचे|केशरी चंद्रबिंबाचे
खिळून आहे मी जमिनीला |नि हजारो अतृप्त
आत्म्यांच्या हाका |रुतत आहेत माझ्या पाठीत..
रे गोपाळा , मला भय वाटते |नि ओढही वाटते..( रे
गोपाळा )
हे भय, ही ओढ यांचा मेळ कवितेत घातला जातो. कवयित्रीची
जाणीव या कल्पना-अवकाशात स्थानबद्ध होणे पसंत करते.
‘’विहिरीसारखा बांधून काढला आहे | माझा भूतकाळ ,
माझ्या भोवती |या वास्तूने
नि या अखंड वर्तमानात |मी घुमते.. फडफडते ..
आतल्या आत|संध्याकाळ उतरून गेली तरी.
||अपुरी आहे माझी काळाविषयीची जाणीव || ‘’
( लक्षावधी योजने )
जिगीषा. अनेकदा सुनंदा हा शब्द वापरतात. हाताळून
न्याहाळून पाहतात. त्याची चिकित्सा करत राहतात कुणा एका आत्मीयाबरोबर.
‘’तरीही आपण भाग्यवान |की आपल्या संगतीला आहेत |पहाडी
चांदण्यातल्या काही निश्चिंत रात्री
नि संगतीने ऐकलेले |उदास संध्याकाळचे अनाहत नाद.’’(
डोंगर उतरणीवर )
‘’सखी ,| पळस फुलले आहेत बेहोष|पाकळ्यांचा सडा
पडून | शेंदरी झाली आहे जमीन’’(पळस )
हसण्याचे कवडसे,असंख्य पिवळ्या फुलांचे ताटवे,वसंत
वाऱ्यांनी कोंदलेले आभाळ, पळसपाकळ्यांनी झाकलेली शेंदरी जमीन अशा अनेक जीवनोत्सुक
प्रतिमांनी सिनेमॅटिक होत गेलेल्या या कविता निरभ्र निर्भर आनंदाची एक मूठ
आपल्याही मनाच्या डोंगर उतरणीवर, रानातल्या अंतर्रानात उधळून देतात .पुन्हापुन्हा ही
जीवनेच्छा पालवत राहते, अमानुष काळाच्या बंद मुठीत काय आहे याची पर्वा न करता , ती
अशा एकाकीपणावर मात करणाऱ्या काही सहवासक्षणांच्या बळावर.पण शेवटी हे सर्व स्वत:तच
परतून येणे आहे याचं भान अनेक कवितांमध्ये पुन्हापुन्हा उमटतं.
हे सारं प्रेम नक्की संपन्न करणारंच आहे?सनातन
संकेतानुसार ते जाळून शुष्कही करणारं आहे .’’प्रेम आणि मरण’ मध्ये गोविंदाग्रजांनी
अजरामर केलेली वीज विडंबित स्वरूपात शुष्क खोडाजवळ विजेचा खांब होऊन आधार देत
राहते.
‘’भूमी’ हा संकेतव्यूह अनेक कवितांमध्ये पुन्हापुन्हा
येतो.
‘’याच भूमीवर | आले असेन मी | गेल्या शतकात किंवा
सहस्रकात ‘’( याच भूमीवर )
‘’स्वभावच आहे तिचा | माळरान असणे | रानोमाळ होणे
‘’ ( स्वभावच आहे तिचा )
‘’काळ्या मातीवर हात फेरून म्हटले ,| बये, मीच
आले परतून, दिव्यदेही होऊन | पुरले होते शरीर निंबाखाली | गुप्तधनासारखे | विरघळले
कणाकणाने ‘’ ( भूमी )
‘’निगुतीने करते सारे | तरी उदास बसते कधीतरी |
बांधावरच्या निंबाखाली | विसरू म्हणता विसरत नाही | स्वत:चे रान असणे
..’’(’निगुतीने करते सारे)
या सर्वच कवितांमधून ते कर्तव्यकोमल,क्षमाशील पण
कोंडलेल्या उर्जेने,त्वेषाने धगधगणारे भूमीतत्त्व आहे, सखी, स्वामिनी,
मनस्विनी,आत्मिनी अशी ही भूमीची सशक्त,जिवंत रूपं आहेत.
जमाव,वर्दळ हीसुद्धा अशीच एक वेगळेपणाने
सुनंदाच्या कवितेत भेटणारी अर्थवत्ता. हे मनुष्यसमूह नेपथ्यासारखे कवितेत तरळत
राहतात.
‘’सुसाट रस्त्याच्या कडेकडेने | मर्त्य माणसांचा
जमाव | पाय ओढत | जुन्यापुराण्या औजारांचे ओझे अंगाखांद्यावर | दिवसभराची
धूळ.’’(’सुसाट रस्त्याच्या कडेकडेने)
प्रगतीच्या वेगवाटांवर दीनदलित संदर्भरहित झालेली
ही गरीब माणसं आहेत. दिशा हरवलेली . काहीतरी शोधत निघालेली.किंवा हाही बोध हरवून
सर्वस्वाला ग्रासणाऱ्या अगतिकतेच्या हिवाळ्यात
फक्त टिकून राहू इच्छिणारी.
‘’दूर आहेत अजून | सुगीचे दिवस | बांधून ठेवलीत
हत्यारे नि औजारे | हाडं फोडणाऱ्या थंडीत | आता टिकून राहायचे | इतकेच.’’ ( पाचोळ्याने भरून गेले
आवार )
‘’उत्खननात सापडलेल्या शहरासारखाच | दिसतो नव्या
शहराचा आराखडा |’’ ( नवे शहर) मधील वस्ती प्रचंड नरसंहारानंतर त्याच जुन्या
ऱ्हासखुणा नव्याने बांधून काढते आहे.नव्या दंतकथा , दगडाचे देव मांडते आहे.
आता एकाकी वाळवंट तुडवत जिंकत निघालेला मसीहा
नाही. भ्रमनिरास झालेल्या या जगात आता हे समूहच प्रेषिताचं छिन्नरूप वागवतात.
‘’लक्षावधी माणसात विखुरलेले आता | प्रेषिताचे
एकाकीपण | नि ईश्वराआधीचा अंधार | तप्त पोलादासारखा “”
प्रवास आहेच, देशांतराला गेल्यासारख्या घरात
परतणे आहे. निसर्गकुशीतले लख्खसुंदर क्षण आहेत.त्यांना व्यापणारी थकलेली जाणीव आहे.
‘’ आता रस्त्यावर | अडखळत चालताना | तूच आहेस |
माझ्या हातातला | हेलकावणारा दिवा| नि मुक्कामावर पोहोचताना |माझ्या रस्त्यावरचा
प्रकाश ‘’ ( परतीचा प्रवास )
असा तो सांगाती बरोबरही आहे आणि त्याला
चुकवायचेही आहे !
‘’गर्दीतून , गल्लीबोळातून | तोंडावर पदर ओढून |
तुला चुकवत फिरेन | पूर्णचंद्रासारखा माझा जीव | गोधडीखाली झाकून ठेवीन ‘’ ( कावड
)
सुनंदाचं अनुभवविश्व अत्यंत अनवट वाटा तुडवत
जाताना अशी पुन्हापुन्हा ओळखीची अनोळख करत जाते , नव्याने काही जुने सांगते आणि
जुन्याला नवा झळाळ देते.शब्दांची नवी मूस घडवणारी ही सर्वच प्रक्रिया त्या अत्यंत
शारीर पातळीवर मांडतात.
‘’शिशिर ऋतूत गळावी पाने | तसे गळतात शब्द |
मुडपलेले , वाळलेले| पाचोळ्याचे थर साचतात | गात्रांच्या तळाशी .|पाचोळा दमट , कुजणारा | माती होते
त्याची | वारूळ चढते शरीराभोवती | नखशिखांत | चालते फिरते वारूळ | घनदाट जंगलात
|नि हजारो मुंग्या धडपडणाऱ्या | आत कोंडलेला शब्द फोडून काढण्यासाठी ‘’( वारूळ )
व्याधीग्रस्त झालेल्या देहाच्या भोगांवर हेच
शारीर भान अलिप्तपणे भाष्य करत व्यक्त होतं. देहदु:खावर मात करतं.
‘’अस्ताव्यस्त पसरलेला देह वाळूवर | आणि असंख्य
लिलिपुटियन्स मुंग्यांसारखे काम करणारे’’
‘’कशी उगवते ही अखंड सळसळ | उर्जेचे स्रोत वाहत
असावेत | पांढऱ्या कबऱ्या त्वचेआड’’ ( देहाची कविता )
या सर्वातून स्वत:कडे , बाईपणाकडे , भोवतालाकडे ,
निसर्गाकडे, निर्मितीकडे, एकाकीपणाकडे , सहवासक्षणांकडे संतुलितपणे पाहाणाऱ्या
सुनंदा विभ्रमपूर्वक भ्रमनिरास लिहितात असं म्हणावं लागेल.पडझडीच्या अनुभवांची
विडंबित विपरित स्वरूपं भासांमध्ये निथळतात.जिगीषा ओसरत नाही.आस्तिकता सरत नाही .
‘’प्रचंड कंटाळून | कालीने खच्चून जांभई दिली |
उतरवून ठेवले एक एक हात | शस्त्रास्त्रे , वस्त्रालंकार , केशसंभार | सरतेशेवटी
देह| लवलवती ज्योतच उरली ती निरामय | सरकत गेली आभाळात | रमत गमत इकडे तिकडे फिरून
| पसरली भक्तगणांवर | अखंड मायेसारखी ‘’(काली )
‘’वाड्याच्या धूळमातीतून | भरारले एक पाखरू |
पांढऱ्या आकाशावर रेघ ओढल्याप्रमाणे | बहाव्याची तीव्र जिगीषा सरकते | खोल मातीतून
| वाड्याच्या मुळांकडे ‘’(बहावा)
‘’उजेडाच्या जाळीवर | घार बसली | सरकत्या
भिंतीच्या | सावल्या उडाल्या | अर्धवट ग्लानीत | सांडून गेले सारे ..| जगदंब ..
जगदंब .. ||’’ ( सांडून गेले सारे )
‘’रे
गोपाळा’ मधून त्यांनी हातावेगळा केलेला हा सगळाच ऐवज असा अत्यंत मोलाचा, कवितेच्या
प्रवासात आत्म्याची तहान जागवून भागवणारा असा आहे.
-
भारती बिर्जे डिग्गीकर
Comments
Post a Comment