ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय-अध्याय सातवा -ज्ञानविज्ञानयोग


ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय सातवा -ज्ञानविज्ञानयोग 

सातव्या अध्यायामध्ये श्रीभगवंतांनी ज्ञान विज्ञान आणि अज्ञान या संकल्पनांची मूलभूत स्वरूपाची चर्चा केली आहे .त्यांच्या स्वतःच्या व्यापक रूपाचा विस्तार वर्णन केला आहे .त्यांच्या दैवी मायेची दुर्लंघ्यता कथन केली आहे.
अतिशय रोचक आणि परिपूर्ण अशा उपमा आणि रूपके यांच्या साहाय्याने या सर्व  संकल्पनांचे ज्ञानेश्वरांनी रसपूर्ण स्पष्टीकरण केले आहे .
या अध्यायाच्या शेवटी अधिभूत ,अधिदैव,अधियज्ञ  अशा गहन संकल्पनांचा ओझरता उल्लेख येतो ती पुढील अध्यायाची नांदी आहे .

ज्ञान विज्ञान आणि अज्ञान यांच्या माऊलीकृत व्याख्या -
स्वरूपज्ञान म्हणजे आत्मज्ञान हेच विशुद्ध ज्ञान होय. या ज्ञानाच्या प्रकाशात विज्ञान आणि अज्ञान यांची व्याख्या श्री ज्ञानेश्वर करतात.
मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे ।
जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ॥ ४ ॥
स्व-रूपज्ञानाचे वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे होडी नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही .
तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे ।
तर्कु आयणी नेघे । आंगीं जयांच्या ॥ ५ ॥
त्याप्रमाणे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही .
अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान ।
तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥ ६ ॥
अर्जुना त्याचे नाव ज्ञान होय. दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि प्रपंचाचे ठिकाणी खरेपणाची बुद्धी असणे त्यास अज्ञान म्हणतात, हेही तू समज. 

श्री ज्ञानदेव म्हणतात,"ज्याच्या योगाने श्री परमेश्वराची तळहातावरली रत्नाप्रमाणे समग्रतेने जाणीव होते ते ज्ञान .ज्ञानाच्या प्राप्तीच्या वेळी लौकिक जाणिवेचे मात्र डोळे मिटतात, विचार मागच्या पावलाने तेथून निघून जातो ,त्याच्या अंगी तर्क तर शिरूच शकत नाही- अशी ज्ञानाची व्याख्या श्रीज्ञानेश्वरांनी केली आहे. इतर प्रापंचिक भौतिक ज्ञान हे विज्ञान होय आणि विज्ञानालाच ज्ञान मानणे हे अज्ञान आहे अशी विज्ञान व अज्ञानाची क्रमशः व्याख्या श्री ज्ञानेश्वरांनी केली आहे .अशा प्रकारे खरे ज्ञान हे बुद्धी व तर्काच्या अतीत असून अन्य प्रापंचिक ज्ञान हे विज्ञान आहे आणि त्यातच गुरफटून राहणे ही अज्ञान अवस्था आहे असा नि:शेष निर्वाळा सातव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच श्रीज्ञानेश्वरांनी दिला आहे.

अपरा आणि परा या दोन प्रकारच्या प्रकृतींचे स्वरूप -
भगवंतांनी आपल्या अपरा आणि परा या दोन प्रकारच्या प्रकृती वर्णिलेल्या आहेत
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥ ७-५ ॥
ही माझी अपरा माया होय. हे अर्जुना, जिने हे सर्व जग धारण केले आहे अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता परा प्रकृति आहे असे समज. 
परा आणि अपरा ही ईश्वराच्या प्रकृतीची किंवा मायेची दोन रूपे आहेत. श्रीज्ञानेश्वरांनी या संकल्पना विस्ताराने सातव्या अध्यायात उलगडल्या आहेत
आप तेज गगन । मही मारुत मन ।
बुद्धि अहंकारु हे भिन्न । आठै भाग ॥ १८ ॥
पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार हे ते आठ वेगवेगळे भाग आहेत.
या आठांची जे साम्यावस्था । ते माझी परम प्रकृति पार्था ।
तिये नाम व्यवस्था । जीवु ऐसी ॥ १९ ॥
आणि जी आठांची साम्यावस्था (हे आठ ज्या ठिकाणी संतुलितपणे विलीन होऊन असतात) तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला 'जीव' असे नाव आहे. ॥७-१९॥
श्री ज्ञानदेव म्हणतात ,"स्वतःच्या देहाची सावली पडावी तशी परमेश्वराची माया त्याच्यापासून निर्माण होते. आठ तत्त्वांपासून ही माया बनलेली असते.भूमी, जल, तेज ,वायू ,आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार ही ती आठ तत्त्वे होत. या आठांची साम्यावस्था ही परमेश्‍वराची परम प्रकृती होय. ही पहिल्या म्हणजे सूक्ष्म प्रकारची प्रकृती. ती अचेतनाला जीवन देते ,तेथे चैतन्य जागवते. मनाकडून शोक, मोहाचे अनुभव घेते. बुद्धीच्या अंगी जाणतेपण आणते.तिच्याठायी असलेल्या अहंकाराच्या परिणामी जगाचे व्यवहार होतात. जीवाच्या ठायी प्रकटलेली ही सूक्ष्म प्रकृती किंवा परा माया होय.
ते सूक्ष्म प्रकृति कोडें । जैं स्थूळाचिया आंगा घडे ।
तैं भूतसृष्टीची पडे । टांकसाळ ॥ २२ ॥
ती सूक्ष्म प्रकृति (जीवरूपा) कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या परिणामास जेव्हा पावते, तेव्हा प्राणीवर्गरूपी नाणी पाडण्याची टांकसाळ सुरु होते. ॥७-२२॥
चतुर्विध ठसा । उमटों लागे आपैसा ।
मोला तरी सरसा । परी थरचि आनान ॥ २३ ॥
चार प्रकारच्या आकृती (अंडज, स्वेदज, जारज, उद्भिज  जीवसृष्टी) त्या टांकसाळीतून आपोआप व्यक्तत्वाला येऊ लागतात.
परमेश्वराची दुसरी प्रकृती म्हणजे त्याची स्थूल प्रकृती .म्हणजेच पंचमहाभूते. सूक्ष्म प्रकृतीचा या स्थूल प्रकृतीशी संयोग होतो तेव्हा भूतसृष्टीची टाकसाळ सुरू होते व चार प्रकारची नाणी ( जारज, अंडज,स्वेदज,उद्भिज हे ते प्रकार -जारज म्हणजे लैंगिक संबंधातून, अंडज म्हणजे म्हणजे अंड्यातून, स्वेदज म्हणजे घामातून आणि उद्भिज म्हणजे बीजातून भूमी फोडून बाहेर येणारे अशा विविध प्रकारे जन्माला येणारे जीव) दिसू लागतात. चौर्‍यांशी लक्ष योनींनी या आदिशून्याचा गाभारा भरून जातो. अशा एकसारख्या नाण्यांचा सुकाळ करून सोडणे व पुन्हा त्यांची आटणी करणे, त्यातच कर्मव्यवहाराचे  खेळ दाखवणे हे या दोनही प्रकृतींचे काम आहे पण या दोन्ही प्रकृती परमेश्वराच्या ठायी एकरूप होतात म्हणून जगाचा आदि मध्य व अंतही परमेश्वरच आहे.
अशा रीतीने द्विविध तरीही परमेश्वराच्या ठायी एकरूप अशा प्रकृतीचे विश्लेषण श्रीज्ञानेश्वरांनी केले आहे .

भगवंतांच्या व्याप्तीचे स्वरूप -
हें रोहिणीचें जळ । तयाचें पाहतां येइजे मूळ ।
तैं रश्मि नव्हती केवळ । होय तें भानु ॥ २९ ॥
या मृगजळाचे मूळ पाहू गेले असता, ते सूर्यकिरणे नसून केवळ तो सूर्यच आहे.॥७-२९॥
तयाचिपरी किरीटी । इया प्रकृती जालिये सृष्टी ।
जैं उपसंहरूनि कीजेल ठी । तैं मीचि आहें ॥ ३० ॥
त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी या स्थूलत्वाच्या परिणामाला पावलेल्या माझ्या पराप्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट मुक्काम होतो त्यावेळी पाहिले असता मीच आहे ॥७-३०॥
श्रीज्ञानदेव म्हणतात,"मृगजळाचे मूळ शोधू गेले तर ते कोठे भूगर्भात नसते, रविकिरणातही नसते, तर प्रत्यक्ष सूर्याच्याच ठिकाणी असते.तद्वतच मायेचे मूळ परमेश्वरात आहे .सृष्टीची उत्पत्ती विस्तार व संहार येथे एक परमेश्वरच आहे .सोन्याचे मणी करून सोन्याच्या सुतात ओवावेत त्याप्रमाणे अंतर्बाह्य परमेश्वराने जग धारण केले आहे .म्हणून पाण्यामधला रस, वायूचा तरल स्पर्श,शशीसूर्यांचा प्रकाश ही परमेश्वराचीच रूपे होत.भूमीचा पवित्र सुगंध,नभमंडळाचा गंभीर शब्द, वेदामधला ओंकार हा भगवंतच आहे. पुरुषाचा पुरुषार्थ ,'अग्नि' अभिधान बाजूला सारले असता  तेजाचे जे तेज तो परमात्माच."
आणि नानाविध योनी । जन्मोनि भूतें त्रिभुवनीं ।
वर्तत आहाति जीवनीं । आपुलाल्या ॥ ३६ ॥
आणि त्रैलोक्यामधे नानाप्रकारच्या योनीत प्राणी उत्पन्न होऊन आपआपला आहार सेवन करून रहातात. ॥७-३७॥
एकें पवनेंचि पिती । एकें तृणास्तव जिती ।
एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ॥ ३७ ॥
कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर रहातात आणि कित्येक पाण्याने जगतात. ॥७-३८॥
ऐसें भूतांप्रति आनान । जें प्रकृतिवशें दिसे जीवन ।
तें आघवाठायीं अभिन्न । मीचि एक ॥ ३९ ॥
याप्रमाणे प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून असा जो आहार दिसतो, व त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी मीच एक अभिन्नत्वाने आहे. ॥७-३९॥
श्री ज्ञानदेव म्हणतात ,"या विश्वविस्तारात जगणाऱ्या सहस्त्रावधी योनी कुठे वाऱ्यावर, कुठे गवतावर ,कुठे अन्नावर ,कुठे जळावर पोसून आपापले जीवन कंठतात. हे बहुविध जीवन वस्तुतः एका परमेश्वराचाच विस्तार आहे . तपस्व्यांचे जे तप, बळवंतांचे जे बळ, बुद्धिवंतांची बुद्धी ही परमेश्वराचीच आविष्करणे होत. धर्माला अनुकूल असा जो काम भूतमात्रांच्या ठिकाणी दिसतो तो परमेश्वराचाच अंश. सात्विक ,राजस व तामस आदी सर्व वृत्तींमध्ये त्याच्याच अस्तित्वाचा विलास आहे .पण परमेश्वर या सर्वात असला तरी त्याच्यामध्ये मात्र हे सर्व नाही. जसे स्वप्नाच्या डोहात जागृती बुडत नाही ,तसे त्याचे अस्तित्व. अग्नीपासून धूर,पण धुरात अग्नी नसावा असा परमेश्वराचा व विकारमय सृष्टीचा संबंध आहे."

दैवी मायेचे वर्णन -

"दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ ७-१४ ॥"
ही माझी त्रिगुणात्मिका दैवी माया तरून जाण्यास दुस्तर आहे. जे मलाच शरण येतात तेच ही माया तरून जातात.
गीतेतील या वरील मूळ श्लोकात आपली दैवी माया तरुन जाण्यास दुस्तर आहे या भगवंतांच्या विधानामध्ये दैवी माया ही एक गहन गंभीर महानदी आहे अशी एक सुप्त उपमा लपलेली आहे या सुप्त  प्रतिमेचा अतिसुंदर विस्तार मायानदीच्या रुपकाच्या आधारे श्रीज्ञानेश्वरांनी सातव्या अध्यायात केला आहे.

जिये ब्रह्माचळाचा आधाडा । पहिलिया संकल्पजळाचा उभडा ।
सवेंचि महाभूतांचा बुडबुडा । साना आला ॥ ६७ ॥
जी मायानदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळसंकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर, तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडाबुडा आला, 
जे सृष्टिविस्ताराचेनि वोघें । चढत काळकळनेचेनि वेगें ।
प्रवृत्तिनिवृत्तीचीं तुंगें । तटें सांडी ॥ ६८ ॥
जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने, कालाच्या ग्रास करण्याच्या शक्तिरूपाच्या वेगाने वाढून प्रवृत्ति व निवृत्ति या दोन्ही उंच काठांबाहेर ओसंडून वाहते ॥७-७०॥
श्रीज्ञानदेव म्हणतात," ब्रह्मरूप पर्वताच्या मध्यभागी पहिल्या संकल्पजळाचा झरा उगम पावतो. या बालनिर्झरात पंचमहाभूतांचा इवलासा बुडबुडा येतो. सृष्टीविस्ताराच्या ओघात व कालक्रमणेच्या  वेगात हा बुडबुडा वाढवून प्रवृत्ती व निवृत्तीच्या उत्तुंग तीरांना भिडतो व नदीरूपाने वाहू लागतो. या नदीवरच त्रिगुणरुप मेघांची महावृष्टी होऊन तिला मोहाचा महापूर येतो. या पुरात किनाऱ्यावरची इंद्रियनिग्रहांची शहरे वाहून जातात! तिच्या पात्रात द्वेषाचे भोवरे फिरत असतात, मत्सराची वळणे प्रवाहाला मिळतात. पात्रात प्रमादरूप प्रचंड मासे तळपत असतात .प्रपंचाचे वळसे घेत वाहणाऱ्या या नदीच्या कर्माकर्मरूप पुरावर सुख-दुःखाचे गदळ तरंगत असते. कामप्रेरणेच्या बेटावर मदनाच्या लाटा येऊन आदळतात तेव्हा जीवरूप फेस भरपूर साठतो.अहंकाराच्या वाऱ्यावर मदत्रयाच्या लहरी उठतात व  विषयोर्मीच्या जणू उकळ्या फुटतात. उदयास्तांच्या लोंढ्यांमध्ये जणू जन्ममरणाचे डोह तयार होतात. या डोहात पंचमहाभूतांचे बुडबुडे किती येतात-जातात. संमोहाचे मासे धैर्याची आमिषे गिळून अज्ञानात फसतात.भ्रांतीच्या गढूळ पाण्यात आस्थेची दलदल तयार होते. रजोगुणाच्या खळखळाटामुळे जणू स्वर्गापर्यंत पाण्याची गाज पोचते .तमाची मोठी धार व सत्वाचे घट्ट स्थिरपण या सर्व वैशिष्ट्यांनी बनलेली ही नदी तरून जाणे अति अवघड आहे ."

माया नदी कोण तरून जाऊ शकतात-

पैं गा मनुष्यांचिया सहस्रशां।माजीं विपाइले याचि धिंवसा ।
तैसें या धिंवसेकरां बहुवसां । माजीं विरळा जाणे ॥ ७-१० ॥
अरे अर्जुना, हजारो मनुष्यांमधे एखाद्यासच तरून जाण्याविषयी इच्छा असते व अशा अनेक इच्छा करणार्‍यांमधे  एखादाच स्वरूप जाणून तरून जातो.
श्रीभगवंत म्हणतात,"सहस्रावधी  मनुष्यामध्ये एखाद्यालाच माझी गोडी लागते आणि या अशा काय गोडी लागलेल्यांमधून एखादाच मला जाणून घेतो .
संदर्भ- स्व-स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाचा उहापोह श्री भगवान करीत असताना  सुरुवातीलाच ज्ञान विज्ञान व अज्ञान या शब्दांचे नेमके अर्थ त्यांनी अर्जुनाला सांगितले. तळहातावरील रत्नाप्रमाणे ईश्वराला जाणणे हे एकच ज्ञान आहे, बाकी सर्व सांसारिक ते विज्ञान आणि विज्ञानालाच ज्ञान समजणे हे अज्ञान अशा नेमक्या व्याख्यांनंतर श्रीभगवंतांनी त्यांना जाणून घेणे अर्थात खऱ्या अर्थाने ज्ञानी बनणे किती अवघड आहे हे या ओवीत सांगितले आहे.
सहस्त्रावधींमधून एखाद्यालाच ही गोडी लागते आणि अशा गोडी लागलेल्या सहस्रावधींमधून एखाद्यालाच ती प्राप्ती होते हे त्यांनी अर्जुनाला स्पष्टपणे सांगितले आहे.
"येथ एक नवलावो |जो जो कीजे तरणापावो|तो तो अपावो |होय ते ऐक|| "म्हणजे, इथे जो जो उपाय करून जाण्यासाठी करावा त्यानेच अपाय होत असतो अशा विस्मयजनक शब्दात मायानदी तरून जाण्याची क्रिया श्रीज्ञानेश्वरांनी वर्णिली आहे. काही जण स्वतःच्या बुद्धिबळावर प्रवाहात झेप घेतात त्यांचा कुठे मागमूसही राहत नाही. कुणी जाणिवेच्या डोहात गर्वाकडून गिळंकृत होतात. कुणी तीन वेदांच्या सांगडी व अहंकाराची धोंड बांधून प्रवाहात शिरतात, ते मदरूप मत्स्याच्या आहारी पडतात. कोणी तारुण्याच्या आवेशात नदी पार करू पाहतात, ते मदनाच्या कासेला लागून शेवटी विषयमगरीच्या भक्ष्यस्थानी पडतात. तेथून हाडे वाचून निघाले तर वार्धक्याच्या प्रवाहात सापडून बुद्धीभ्रंशाच्या जाळ्यात गुरफटतात. शोकक्रोधाच्या भोव-यातून जरा त्यांचे डोके वर दिसले की संकटांची गिधाडे त्यांना चोचीने घायाळ करतात.कुणी यज्ञकर्माची पेटी बांधून आत्मविश्वासाने प्रवाहात शिरतात ,ते स्वर्गसुखाचा खबदाशडीत अडकतात. मग दुःखाच्या चिखलात माखून मरणाच्या वाळूत जाऊन पडतात. याप्रकारे कामवासनेच्या आहारी गेलेले फुकट जातात.कुणी बाह्यकर्माचा भरवसा धरू पाहतात ते विधीनिषेधांच्या वळणावर अडकून पडतात जेथे वैराग्याची नांव शिरू शकत नाही, विवेकाचा उपयोग होत नाही .ही नदी ओलांडण्याची भाषा म्हणजे अपथ्य करणाऱ्याला व्याधी होणार नाही,साधूला दुर्जन अपाय करणार नाहीत, घरी आलेली सिद्धी लोभी माणूस टाकून देईल ,माशाला गळ गिळवेल, मुंगी मेरूपर्वत ओलांडेल आदि उक्तींप्रमाणे व्यर्थ आहे .विषयी पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही त्याप्रमाणे जीवांना मायानदी तरवत नाही !
म्हणौनि गा पंडुसुता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता ।
तेवीं मायामय हे सरिता । न तरवें जीवां ॥ ९३ ॥
म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे विषयलंपट पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे जीवांना ही मायारूप नदी स्वसामर्थ्याने तरता येणार नाही. 
येथ एकचि लीला तरले । जे सर्वभावें मज भजले ।
तयां ऐलीच थडी सरलें । मायाजळ ॥ ९४ ॥
अशा स्थितीत जे सर्वभावाने मला भजले, ते एकच ही मायानदी सहज तरून गेले व त्यांस मायानदीच्या अलिकडच्या काठावरच मायानदीचे जल संपले. 

जे सर्वभावे भगवंताला भजतात त्यांना मात्र ऐलतटीच तिचे पात्र कोरडे पडलेले दिसते .सद्गुरुरूप  नावाड्याबरोबर, अनुभवाच्या कासेला लागून आत्मनिवेदनरूपी होडीतून जे मायेच्या  प्रवाहात शिरतात,अहंभावाचे ओझे टाकून, विकल्पाचा वारा चुकवून ख-या प्रीतीच्या धारेला ते लागतात .ऐक्याच्या उतारावर  बोधाची सांगड त्यांना सापडते व वैराग्याच्या हातांनी पाणी कापत 'सोsहम' भावनेने बळकट होऊन ते मोक्षाच्या तीराला पोहोचतात .पण असे भक्त फारच थोडे असतात.

भक्तांचे प्रकार आणि ज्ञानी भक्ताचा महिमा
आर्त ,जिज्ञासू ,अर्थार्थी व ज्ञानी अशा चार प्रकारचे भक्त भगवंतांनी सांगितले आहेत. आर्त  हा दु:खपीडेच्या निमित्ताने, जिज्ञासू भगवंताचे स्वरूप जाणून घेण्याच्या इच्छेने, अर्थार्थी अर्थसिद्धीच्या लोभाने भगवंतांची भक्ती करीत असतात.
ज्ञानी भक्त हा सर्वश्रेष्ठ भक्त असतो कारण ज्ञानप्रकाशाने त्याची भेदभावना मालवली असते .तो परमेश्वराशी सामरस्य पावला असतो ,आणि तरीही भक्ताच्या भूमिकेतून भक्ती करत असतो .जणू अवकाशात संचार करणारा वारा अवकाशावेगळा नसतो, तसे त्याचे अस्तित्व परमेश्वरात विलीन होऊन शरीरकर्मापुरते वेगळे उरले असते. त्याचे वावरणे जिवाच्याही पलीकडील तत्त्वाला पोचल्यावरचे वावरणे असते. त्यामुळे तो देहधारी असूनही देहाचे वेगळेपण जाणत नाही. इतर सर्व भक्त कोणत्या ना कोणत्या इच्छेने प्रेरित होऊन भगवंताकडे आकर्षित झालेले असतात, पण ज्ञानी भक्त मात्र अनन्यभावाने संपूर्ण हेतूरहित प्रीतीने भगवंताला बांधून टाकतो.
पाहें पां दुभतयाचिया आशा।जगचि धेनूसि करीतसे फांसा ।
परि दोरेंवीण कैसा । वत्साचा बळी ॥ ११७॥
असे पहा की अर्जुना, दुभत्याच्या आशेने लोक गाईला बांधून घालतात, परंतु अशा दोरावाचूनही वासराचा पाश कसा बळकट आहे ! (की दोराशिवायच त्याचा हक्क त्याला सहज मिळतो). 
ज्ञानेश्वरांनी येथे एक सुंदर उपमा योजिली आहे .जो तो दुधासाठी गाईला दावे बांधतो.तिचे वासरु मात्र तिला फक्त प्रेमाच्या बंधनात बांधते. म्हणून दोराशिवायही त्याचे दावे अधिक बळकट असते. गाईला पाहताच 'माझी आई' याशिवाय त्याला काहीही सुचत नाही. म्हणून गायही त्याला तशाच प्रेमभराने कुशीत घेते. तिचे सगळे अंत:करण त्याला पाजण्याकडे ओढ घेत असते. या ओढीसाठी कोणतेही दावे बांधावे लागत नाही. 'कैसी कळवळ्याची जाती| करी लाभावीण प्रीती' असं हे मायलेकराचं नातं असतं. या एकाच उदाहरणातून भगवंत व त्याचे ज्ञानी भक्त यांमधला अदृश्य पण महाशक्तिमान प्रेमबंध ज्ञानेश्वरांनी एका साध्या नित्य अनुभवाच्या भावपूर्ण चित्रात उतरवला आहे.
म्हणून इतरही भक्तांच्या अंत:करणात जन्मलेली प्रतीतीगंगा केशवालाच येऊन मिळाली, तरी ज्ञानी भक्त म्हणजे साक्षात ईश्वराचा प्राण. या अवस्थेप्रत येण्याआधी ज्ञानी भक्त विषयवासनांचे मोठे अरण्य ,त्यातील कामक्रोधांची संकटे टाळून अनेक जन्मांतील प्रवासानंतर सद्वासनेच्या शिखरावर पोचलेला असतो. या प्रदीर्घ प्रवासात कर्मक्षयाची पहाट होऊन गुरुकृपेची उषा उजळते. ज्ञानाचे कोवळे ऊन पसरते.समदृष्टीची शोभा उमलते. त्यावेळी सर्वत्र श्रीईश्वराची अंतर्बाह्य प्रतीती येऊन 'आपणच विश्व' या दृढभावनेचा त्याच्या जाणीवेत संचार होतो.
हें समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो ।
म्हणौनि भक्तांमाजीं रावो । आणि ज्ञानिया तोचि ॥ १३३॥
हे संपूर्ण विश्व श्रीवासुदेवमय आहे अशा अनुभवरूपी रसाची त्याची समजूत ओतलेली असते, म्हणून सर्व भक्तांमध्ये तो राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे. 
भगवंत म्हणतात हे सर्वच वासुदेवमय आहे अशा प्रतीतिरसाचा भाव ज्याच्या मनात उचंबळून येतो तो भक्तांमध्ये श्रेष्ठ आणि तोच ज्ञानी.
अशाप्रकारे ज्ञानी भक्त भगवंताच्या शुद्धा प्रीतीने प्रेरित होऊन अनेक जन्मांच्या संघर्षातून कर्मक्षय व गुरुबोधाच्या मुक्कामावर येतो तेव्हा साम्यसमृद्धीने त्याचे अंत:करण उजळून निघते .'वासुदेव: सर्वमिति' -सर्व काही वासुदेवच आहे या प्रतीतिचा झरा त्याच्या हृदयात खळखळून वाहू लागतो. भगवंताचा सर्वात प्रिय सर्वश्रेष्ठ भक्त तो हाच ज्ञानी भक्त.असा महात्मा केवळ भक्तराज होय. बाकीच्यांची भजने ऐहिक भोगयाचनेकरिता असतात.

मूढाची भगवंत कल्पना-
मूढ माणसाच्या हृदयात कामवासनेचे थैमान चाललेले असते. तिथे ज्ञानाचा दिवा कसा उजळेल?इहलोक व परलोक दोन्हीबद्दल मूढतेच्या अंधारात अशी माणसे हरवतात .जवळच असलेल्या ईश्वराला पारखी होतात व निरनिराळ्या देवतांच्या अर्चनात हरवून जातात. त्या लंपटपणाच्या भरात काहीतरी नियम ठरवतात, उपचारांची शोभा वाढवतात व यथाविधी काहीतरी त्या देवतेच्या चरणी अर्पण करतात .
तरीही अशा यजनात बुडालेल्याची इच्छा पूर्ण करणाराही श्रीभगवंतच असतो, कारण कोणत्याही देवदेवतेत तोच भरून राहिलेला आहे. पण हा निश्चय मूढाच्या मनात नसल्याने तो मात्र भिन्नभावनेने अमुक देवाची वगैरे उपासना चालवत असतो. त्याला इच्छित फल प्राप्तही होते पण ते भगवंताकडूनच! हे तथाकथित भजन म्हणजे एक प्रकारे संसाराचंच साधन असतं.एरवी त्याचे फळभोग स्वप्नासारखे क्षणभंगुर असतात.ज्या दैवताचे तो आराधन करतो तिथपर्यन्तच तो पोहोचतो. पण भगवंताचा अनन्य भक्त मात्र प्रत्यक्ष भगवंतात विलीन होतो. इतरांचा व्यवहार तर हातात पाणी घेऊन त्यात पोहण्यासारखा किंवा अमृताच्या सागरात बुडतांना ओठ घट्ट मिटून डबक्यातील पाण्याची इच्छा आणि आठवण करण्यासारखा हास्यास्पद असतो. अमूर्ताला मूर्त मानून जे वास्तविक तद्रूप आहे त्याच्यासाठी साधने करकरून मूढ माणूस शिणून जातो.योगमायेच्या पटलामुळे तो जणू आंधळा झालेला असतो. एरवी भगवंताशिवाय जगात एकही वस्तू नाही हे त्याला कळून चुकले असते.
एर्‍हवीं मी नसें ऐसें । काय वस्तुजात असे ? ।
पाहें पां कवण जळ रसें- । रहित आहे ? ॥ १५५ ॥
सहज विचार करून पाहिले तर ज्यामधे मी नाही असा काही पदार्थ आहे काय ? असे पहा की रसाशिवाय पाणी कोठे आहे काय ? 
श्री भगवंत म्हणतात एरवी मी नाही असे वस्तुजात कुठे आहे काय? द्रवरूपाशिवाय पाणी असते काय?
मूढ व लोभी भक्तांचे अर्चनप्रकार विश्लेषित करताना  भगवंत म्हणतात ,"इहपरलोकाबद्दलच्या घोर तमोमय कल्पनेने भरलेल्या भावविश्वाची ही माणसे निरनिराळ्या देवता कल्पून त्यांच्या भजनविधींचे नेमनियम ठरवतात व क्षुद्रफळांच्या प्राप्तीस्तव मोठ्या कष्टाने काहीतरी आराधन करतात. मात्र मी  तेही मान्य करून त्यांच्या इष्टदेवता व त्या त्या इष्टफळांपर्यंत त्यांना पोचवतो पण जे अमूर्त आहे त्याला मूर्त मानून जे स्वस्वरूपी भरले आहे त्याकडे लक्ष न देता क्षुद्र सांसारिक भरभराटीसाठी केलेला हा व्यवहार मुळातच हास्यास्पद असतो. योग मायेच्या प्रभावाने ही माणसे आंधळी झाली नसती, तर वस्तुमात्रामध्ये माझ्याशिवाय काहीही नाही ,प्राप्तव्य असा मीच आहे,  पाण्यात   जशी द्रवता तसा  प्रपंचात मीच भरलेला आहे हे त्यांना कळले असते .."

ब्रह्म,अध्यात्म ,अधिभूत ,अधिदैव अधियज्ञ व प्रयाणकाळ या संज्ञावर अर्जुनाची प्रतिक्रिया-

जेथ तद्ब्रह्मवाक्यफळें । जिये नानार्थरसें रसाळें ।
बहकताती परिमळें । भावाचेनि ॥ १८१ ॥
सहज कृपामंदानिळें । कृष्णद्रुमाची वचनफळें ।
अर्जुन श्रवणाचिये खोळे । अवचित पडिलीं ॥ १८२॥
अशी ही श्रीकृष्णरूप वृक्षाची वचनरूप  रसाळ आणि सुगंधी फळे, सहज कृपारूपी मंद वार्‍याने, अर्जुनाच्या कानरूपी ओटीत अकस्मात पडली. 
सातव्या अध्यायाच्या उपसंहारात भगवंतांनी ब्रह्म,अध्यात्म ,अधिभूत ,अधिदैव अधियज्ञ व प्रयाणकाळ या संज्ञांचा अतिशय संक्षेपाने उल्लेख केला.
या संकल्पना पुढील अध्यायात विस्ताराने चर्चिल्या गेल्या आहेत. त्यांचा येथे  ओझरता उल्लेख केला आहे.
तंव विचाराचिया रसना न दाटती।परी हेतूच्या दशनीं न फुटती ।
ऐसें जाणौनि सुभद्रापती । चुंबिचिना ॥ १८८॥
तेव्हा विचाराच्या तोंडात ती फळे मावेनात (म्हणजे भगवंताचा या क्लिष्ट संकल्पनांचा उच्चार करण्याचा अर्थ काय आहे ते त्याचला कळेना). असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लावीना.
मग चमत्कारला म्हणे।इयें जळींचीं मा तारांगणें ।
कैसा झकविलों असलगपणें ।अक्षरांचेनि ॥१८९॥
मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्ये म्हणजे पाण्यात पडलेल्या तार्‍यांचे प्रतिबिंब होय, मी अक्षराच्या सुलभपणामुळे कसा फसलो ?
ज्ञानेश्वर म्हणतात ," बेसावध अशा अर्जुनाच्या श्रवणाच्या खोळीत सहजकृपेच्या झुळुकीसरशी कृष्णवचनाची ही फळे पडली खरी, पण या सुंदर फळांचा रस आस्वादासाठी मात्र ना त्याच्या विचारांची जीभ ना त्याचे हेतूरूपी दात समर्थ होते.हे शब्द म्हणजे जणू पाण्यातली नक्षत्रबिंबे होती. आकाशाच्या अलगद घातलेल्या घड्या होत्या. तेव्हा कासावीस होऊन पण मर्यादेने यांचा अर्थ अर्जुनाने श्री भगवंताला विचारला .
कैसी पुसती पाहें पां जाणिव । भिडेचि तरी लंघों नेदीं शिंव ।
एर्‍हवीं श्रीकृष्ण हृदयासि खेंव । देवों सरला ॥ १९८॥
अर्जुनाची प्रश्न विचारण्याची चतुराई कशी आहे पहा. तो  मर्यादा तर उल्लंघत करीत नाही. परंतु सहज विचार करून पाहिले तर तो श्रीकृष्णाच्या अंत:करणाला आलिंगन देण्यास जणू प्रवृत्त झाला आहे. 
त्याची ती अवस्था ,मर्यादशीलता व या सर्वातून व्यक्त होणारी अपार ज्ञानतृष्णा या सर्वांनी प्रभावित होऊन श्री ज्ञानेश्वर म्हणतात गुरूला प्रश्न कसा रीतीने विचारावेत हे एक अर्जुनच जाणतो.

या टप्प्यावर सातवा अध्याय संपन्न  झाला.

 


Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग