विश्वाच्या किरणांमध्ये विहरशी उन्मुक्त तू खेळशी - पाब्लो नेरुदा

 

स्पॅनिश भाषेत लिहिणारे नोबेल विजेते कवी पाब्लो नेरुदा यांची कवी आणि माणूस म्हणून कारकीर्द वादळी आणि वादग्रस्त आहे. त्यांची प्रेमकविताही झंझावाती प्रतिमांनी ओतप्रोत नसेल तरच नवल. मानवी आसक्ती, प्रेम ,विरह आणि पंचमहाभूतांचा विराट खेळ एका कवितेच्या पटलावर. त्यांच्या एका प्रसिद्ध प्रेमकवितेचा इंग्रजी अनुवादावरून मी केलेला हा मराठी अनुवाद , एक प्रयत्न, आणखी एक आवडती अनुकृती.

Every day you play with the light of the universe -

विश्वाच्या किरणांमध्ये विहरशी उन्मुक्त तू खेळशी ..


विश्वाच्या किरणांमध्ये विहरशी उन्मुक्त तू खेळशी 

पाण्यातून फुलांमधून,तरले ! साकारशी भेटशी

जो गोरा मुखडा करात धरतो मी रोज लोभावुनी   

द्राक्षांचा मधुघोस तो! तरि प्रिये तू आगळी त्याहुनी   

 

तू नाहीस कधी -असू शकत ना,ज्या प्रेमभारात मी 

ठेवू का तुज अंथरून पिवळ्या शेवंतीहारांत मी 

कोणी नाव तुझे धुक्यात लिहिले दक्षीणताऱ्यांमधे   

तू होतीस कशी तुझ्याहीपरती हे आठवू आज दे      

 

ही माझी खिडकी अचानक खुले वाऱ्यामध्ये वादळी

छायांच्या जणु मासळ्या तडपती आभाळजाळ्यातळी

साऱ्या वावटळी इथे धडकती ,साऱ्याच, केव्हातरी

सारी ही भिरकावतात वसने उन्मुक्तशा या सरी  

 

पक्षी दूर भरारती जवळुनी वारा घुमे घोंगवे   

मी झुंजेनच एकटाच अवघ्या उद्दंड शत्रूंसवे

चक्रीवादळ भिर्भिरे कुठूनसा पाचोळ काळा उडे

रात्री नांगरले पडाव सुटती आता नभाच्याकडे 

 

तू आहेस इथे, मला वचन दे सोडून ना जायचे      

माझी अंतिम साद आर्त घुमता धावून तू यायचे     

यावे तू जवळी मला बिलगण्या भयभीत झाल्यापरी

छाया ही परकी तुझ्या तरळते दृष्टीत थोड़ी जरी 

 

आता सांध्यफुले सवे डवरली घेऊन आलीस  तू  

वक्षाला मधुगंध तो बिलगला न्हाऊन आलीस तू   

ही भोळी फुलपाखरे टिपतसे दु:खार्त वारा वनी   

मी प्रेमात तुझ्या सुखी,रसभऱ्या ओठांस या दंशुनी      

 

जाणायास मला प्रयास सखये तू कष्टुनी साहिले

आत्मा एकट रानटी कुणी नसे वाऱ्यासही थांबले

शुक्राच्या पहिल्या पहाटकिरणांनी पापण्या चुंबल्या

दोघांनी कितिदा प्रभा उगवतीच्या गर्द न्याहाळल्या 

 

माझे शब्द तुझ्यावरी बरसुनी जोजावताना तुला   

हा शिंपेसम देह मी चमकता प्रेमार्त आलिंगला

मी आणेन तुला प्रसन्न फुलवंती डोंगराची निळी 

काही लाल कळ्या.. भरून परडी मी चुंबने आणली   

 

आहे एकच आस आज कळते ते ते करावे तुला

जे जे हा करतो वसंतऋतु ही चेरी फुलारायला  ..  

 

मूळ कवितेचा इंग्रजी अनुवाद –

Every day you play with the light of the universe.
Subtle visitor, you arrive in the flower and the water,
You are more than this white head that I hold tightly
as a bunch of flowers, every day, between my hands.

You are like nobody since I love you.
Let me spread you out among yellow garlands.
Who writes your name in letters of smoke among the stars of the south?
Oh let me remember you as you were before you existed.

Suddenly the wind howls and bangs at my shut window.
The sky is a net crammed with shadowy fish.
Here all the winds let go sooner or later, all of them.
The rain takes off her clothes.

The birds go by, fleeing.
The wind.  The wind.
I alone can contend against the power of men.
The storm whirls dark leaves
and turns loose all the boats that were moored last night to the sky.

You are here.  Oh, you do not run away.
You will answer me to the last cry.
Curl round me as though you were frightened.
Even so, a strange shadow once ran through your eyes.

Now, now too, little one, you bring me honeysuckle,
and even your breasts
smell of it.
While the sad wind goes slaughtering butterflies
I love you, and my happiness bites the plum of your mouth.

How you must have suffered getting accustomed to me,
my savage, solitary soul, my name that sends them all running.
So many times we have seen the morning star burn, kissing our eyes,
and over our heads the grey light unwinds in turning fans.

My words rained over you, stroking you.
A long time I have loved the sunned mother-of-pearl of your body.
Until I even believe that you own the universe.
I will bring you happy flowers from the mountains, bluebells, dark hazels, and rustic baskets of kisses.
I want to do with you what spring does with the cherry trees.

 

Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग