का चाललात बाबा ..Do not go gentle into that good night’’ : Dylan Thomas : एक भावानुवाद



Do not go gentle into that good night’’ : Dylan Thomas :एक भावानुवाद


ग्रेट ब्रिटनचे महान कवी डायलन थॉमस ( जन्म १९१४- मृत्यू १९५३ )शिक्षण अपुरे सोडून मनस्वी जीवन जगलेल्या या कवीला खूप मान्यता ब्रिटन व अमेरिकेत मिळाली , पण त्या प्रतिभेचा अंत अकालीच व्यसनी व अस्थिर जीवनशैलीमुळे झाला.‘’Do not go gentle into that good night’’ या त्यांच्या अजरामर अविस्मरणीय कवितेच्या अनुवादाचा येथे आपण आस्वाद घेणार आहोत. या कवितेत ते आपल्या वृद्ध मरणासन्न वडिलांना मनातला  धगधगता संघर्ष वार्धक्यामुळे विझवून अबोलपणे मृत्यूला सामोरे जाऊ नका, शेवटचं बंड करा असं विनवत आहेत तेव्हा जणू आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या आणि शेवटी विकलांग हताश झालेल्या वार्धक्याची चिरंतन शोकांतिका ते शब्दात उतरवत आहेत..

'व्हिलानेल‘ या आकृतिबंधात मूळ कविता आहे .अनुवाद जरा वेगळेपणाने पण त्या अंगाने करण्याचा  प्रयत्न केलाय.

(Villanelle

A French verse form consisting of five three-line stanzas and a final quatrain, with the first and third lines of the first stanza repeating alternately in the following stanzas. These two refrain lines form the final couplet in the quatrain.)

का चाललात  बाबा ..


हळुवार पावलांनी रात्रीत या निघून 
का चाललात बाबा नि:शब्द मालवून
वार्धक्य पाजळून आता जिवास जाळा
विझत्या निराश क्रोधाला येऊ दे उफाळा

तम जिंकतोच अंती .. हे जाणती शहाणे
आकाश व्यापणाऱ्या विद्द्युल्लतेप्रमाणे
नसतात शब्द त्यांचे.. नसतोच तो उजाळा
विझत्या निराश क्रोधाला येऊ दे उफाळा

विरते अखेरची ही अस्तित्व-लाट क्षीण
ही सौम्य सत्प्रवृत्ती जाई हळू विरून
हिरव्या जळी अथांग चमकून शेवटाला
वार्धक्य पाजळून आता जिवास जाळा

बेछूट लोक ज्यांनी सूर्यास हारवीले
पकडून कैद केले जयघोष मत्त केले
ते शोकगीत होते.. कळता उशीर झाला
विझत्या निराश क्रोधाला येऊ दे उफाळा

अन गहनगंभीरांच्या तळपून जाणिवेत
प्रहरात अंतिमाच्या अंधारत्या दिठीत
जळतात धूमकेतू मग राख व्हावयाला
वार्धक्य पाजळून आता जिवास जाळा

त्या दु:खदुर्गमाचे तुम्ही शिखर गाठलेले
बाबा तुम्ही निघाला हे हृदय फाटलेले
द्या दोष तीक्ष्ण आणि आशिर्वचास बोला
अंगार-अश्रू ढाळा मी विनवते तुम्हाला

वार्धक्य पाजळून आता जिवास जाळा
बाबा, निराश क्रोधाला येऊ दे उफाळा..

-भारती बिर्जे डिग्गीकर
(आपले छंद दिवाळी २०१५)
मूळ कविता
Do not go gentle into that good night,
Old age should burn and rave at close of day;
Rage, rage against the dying of the light.

Though wise men at their end know dark is right,
Because their words had forked no lightning they
Do not go gentle into that good night.

Good men, the last wave by, crying how bright
Their frail deeds might have danced in a green bay,
Rage, rage against the dying of the light.

Wild men who caught and sang the sun in flight,
And learn, too late, they grieved it on its way,
Do not go gentle into that good night.

Grave men, near death, who see with blinding sight
Blind eyes could blaze like meteors and be gay,
Rage, rage against the dying of the light.

And you, my father, there on the sad height,
Curse, bless, me now with your fierce tears, I pray.
Do not go gentle into that good night.
Rage, rage against the dying of the light ..

Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सोळावा- दैवासुरसंपद्विभागयोग

महाकवी कालिदास ऋतुसंहार काव्ये शरदऋतूवर्णन - श्लोक १-१० एक पद्यानुवाद