सहप्रवास १

सहप्रवास १ 

 (कॉलेजचा एक छोटासा हॉल-वातावरणात अर्थातच यौवन,अदम्य उत्साह आणि जरा जास्तच मात्रेतला आत्मविश्वास-खुर्च्यांची आता कोंडाळी झालीयेत-अंतराअंतरावर चर्चा,गप्पांचे अड्डे-एक छोटंसं स्नेहसंमेलन आत्ताच संपल्याचे संकेत.) 

 मीनू- एक वर्ष कसं गेलं कळलंच नाही उमा.तुला आठवतं,इथे शेवटी भेटलो होतो तेव्हा तूच म्हणाली होतीस्,पुनः फिरून इथं यायचं नाही खूप काळ.वर्षानुवर्षं. 

 उमा-हो आठवतं ना.आणि त्याच्यामागे कुठेतरी पु.शि.रेगेंची सावित्री होती मीनू.तिनेच म्हटलं होतं ना की काही घटना सारख्या मनात हाताळायच्या नसतात.त्यांचे रंग फिके होतात त्यामुळे!तशाच ठेवून द्यायच्या आठवणीसुद्धा.अस्पर्श.खूप वर्षे पुरवायच्या आहेत ना त्या .. 

 मीनू- हेच ते तुझं.साध्या बोलण्यालाही उगीच कसलेतरी कठीण तात्विक साहित्यिक संदर्भ.तरी बरं मला तरी अपवादात ठेवलं आहेस.महिन्या-दोन महिन्यातून भेटतो आपण.इथे नाही,पण कुठेतरी.कुठेही. 

 प्रीता-(पलिकडच्या कोंडाळ्यातून हे ऐकत एकदम वळून या दोघींमध्ये घुसते)- कुठे भेटता ग तुम्ही यूसलेस मुलींनो! मुद्दाम मला न सांगता गुपचूप-आता तरी जरा वयात या ग तुम्ही-हे तुमचं सारखं आपसात असणं किती विनोदी शाळकरी वाटतं माहितेय तुम्हाला? या जरा माणसांत आता.सॉरी हं मीनू,तू असतेसच ग जमिनीवर.मी या बावळट बाईसाहेबांबद्दल बोलतेय.काय उमा? 

 उमा- असू देत ग तुझे प्रबोधनाचे प्रयोग.तू मात्र एकाच वर्षात किती बदललीस प्रीता! हा हेअरकट शोभतोय तुला.मेघःश्यामच्याच ऑफिसात आहेस ना? डनहिल सेक्टर?किती सुंदर बोलला तो मघाशी.रोज गप्पा होत असतील ना तुमच्या?

 प्रीता-ए खरंच की-कुठे गेला हा मेघ्या इतक्यातच?हो तर.गप्पा होतातच.पण मेघःश्याम खूपच कामात असतो ग दिवसभर.त्यातून त्याचा Media Management चा अभ्यास एकीकडे आणि टेलिव्हिजन अँकरिंगचेही प्रकार एकीकडे.मग बॉसला जरासं मॅनेज करावं लागतंच ना त्याला.तोही खूष असतो म्हणा त्याच्यावर.हीरोच आहे मेघ तसा!

 प्रकाश-हाय प्रीता! नमस्कार मीनू,उमा.ओळखदेख काही द्याल की नाही पोरींनो! आत्ताच हे भाव खाणं!उद्या लग्न पोरंबाळं झाल्यावर काय होणारेय कुणास ठाऊक.. 

 मीनू-अरे प्रकाश!त्या दिवशी आयडीबीआयच्या interview ला भेटला होतास.त्याच्यानंतर एकदम इथे? फोन करेन म्हणाला होतास ना?नंबरसुद्धा घेतलास.आणि आता उलट आमच्यावरच डाफरतोस काय? 

 प्रकाश-मीनू स्कॉलर! त्या interview नंतर सहावा नकार घेतला मी.तू सिलेक्ट झाल्याचं न सांगताच कळलं मला.कसल्या तोंडाने फोन करणार होतो? 

 उमा-वेडपटा,एवढं काय त्याचं वाईट वाटायचं? सहा नाहीत,पण एकदोन नकार घेतलेत मीही.अरे बार्टर एक्स्चेंज असतो हा आपल्यातला अन त्यांच्यातला.माझ्याकडे वासरू आहे ते देऊन मला तट्टू हवं आहे.सगळ्या निवडी अशाच रे.तणाव विसरून एंजॉय कर हे सगळं. मला माहितेय रमाकाका किती छान आहेत ते. नक्कीच तुला धारेवर धरत नसणार एवढ्यातेवढ्यासाठी. 

 प्रकाश- टिपिकल पोरींचं लॅाजिक .दूरून दुसर्‍यांचे बाप साजरे! डॅड तुझ्याशी छान आहेत त्याच्यावर जाऊ नकोस.तसेच माझ्याशी असते तर!तुझी मात्र आठवण काढतात ,तुझी ती अबोल मैत्रीण सध्या काय करते?खूप दिवसात दिसली नाही म्हणून विचारत होते.  

मेघ:श्याम-(आताच येतोय बाहेरून हॉलमध्ये)कोण दिसली नाही खूप दिवसात!ओ हाय प्रीता,मीनू,उमा!एकदम तिघीतिघी! lucky me ! 

 प्रीता-सुरुवात झाली तुझी मेघ्या.आता चालू देत गोडगोड गुडीगुडी या दोघींबरोबर.मी अनूला आणि इतरांना भेटून येते.चल रे प्रकाश तूही. 
 (जातात.थोडा वेळ स्तब्धताच.मग मीनूच सुरुवात करते.) 

मीनू-अरे मेघःश्याम! किती सुंदर बोललास रे नेहमीसारखं..सगळं खाऊन टाकलंस गॅदरिंग.आम्ही आपले या गर्दीतले..पण खरं सांगू? तुलासुद्धा खाऊन टाकणारी एक बया आहेच इथे. lucky you ! लकी खराच.कारण ती स्पर्धेतच नाही.(उमाकडे बघते.) 

 मेघःश्याम-(पुटपुटतो) - ती स्पर्धेतच नाही.कुठे अंतर्धान पावली होतीस उमा?तपश्चर्या करावी का तुला पहाण्यासाठी?का इतकं दुर्मिळ करते आहेस स्वतःला?

 उमा-कसलं दुर्मिळ कसलं काय मेघ? मार्केट मेकॅनिझम मध्ये शिकवलं होतं ना कार्लेकरबाईंनी,वस्तूचं मूल्य वाढवण्यासाठी तिची उपलब्धता कमी करावी लागते असं? आमच्यासारख्यांना किंमत यायची ती अशीच. नाहीतरी तुला वेळ तरी मिळाला असता का माझ्यासाठी? 

 मेघ;श्याम- बोल.खोचून बोल.बघ ग मीनू-ही तुझी जिवलग मैत्रीण कधीच सरळ बोलत नाही माझ्याशी.इतकी अप्रूपाने भेटणार आणि असं वाकड्यात बोलून निघून जाणार. तुझं कसं चाललंय मीनू? 

मीनू-अरे झकास.सहा महिन्यातच डिपार्टमेंट मुठीत आलं.दिलेले टार्गेटस पुरे करणं,टीमची वर्कशॉपस, मॅनेजमेंटचा पार्ट टाईम अभ्यासही एकीकडे.चोवीस तास पुरत नाहीत..कधीमधी उमा भेटते,तेवढाच विरंगुळा..

 मेघःश्याम-उमा भेटते?कुठे भेटता तुम्ही?मला का नाही सांगत? कधीतरी मीही नक्कीच येऊ शकेन तिथे.आज एक वर्षाने समोरासमोर आलोय आपण.. 

 उमा-अरे कुठे फारशा भेटीगाठी झाल्या आमच्या तरी? उगीच हिच्या बोलण्यामुळे वाटतंय तुला तसं..एकदा न ठरवताच युनिव्हर्सिटीत अचानक भेटलो.. आपाआपल्या पोस्टग्रॅज्युएशनच्या नोंदणीच्या गडबडीत.मग ठरवून एकदा जहांगिरला..त्या राजेंद्र भारतीच्या गायींच्या चित्रांचं प्रदर्शन होतं.किती जीवघेणं निरागस.सुंदर.मेघ:श्याम,तुझी आठवण तर काढलीच आम्ही..
(उमावर निळा प्रकाश) 
हॅालमध्ये शिरताक्षणीच सगळीकडे गायींची भव्य पेंटिंग्ज..imagine मेघ;श्याम, गाई-गाईंचे कळप इकडे-तिकडे चहू बाजूंनी. आणि जागा बदलत त्यांच्यामध्ये बासरीवाला कृष्ण.. भोळ्या डोळ्यांचा समुद्र हेलकावला हॉलमध्ये शिरताशिरताच ..सर्र झालं रे .काटा आला अंगावर.बासरी ऐकू आल्यासारखी वाटली बघ.
(एकदम भानावर येते, तिच्यावरचा निळा प्रकाशझोत जातो)  आणि एकदा शिवाजीपार्कला.कट्ट्यावर बसून फ्रँकी खाल्ली.अर्थात व्हेज!हे वासरू बरोबर असल्यावर दुसरं काय चालणार?कुटाळक्या केल्या मस्तपैकी. 

 मेघःश्याम- (आता गंभीर)-  not fair उमा -असं तुमचं मला वगळणं.आपली इतकी पर्वा करणार्‍याशी इतकी बेपर्वाई.चालू देत असंच.टाळून प्रश्न टळतील कायमचे. 

 मीनू-उमा हे काय बोलतोय हा? कसले प्रश्न? आता मला क्लिअर होतंय ते असं आहे की मलाच वगळून तुमचं काहीतरी जोरात चाललंय किंवा बिनसलंय.come out guys!

 उमा-कसले ग प्रश्न! याला याच्या टेलिव्हिजन अँकरिंग मध्ये क्रिएटिव मदत हवीय माझी.आता तूच सांग मीनू, तुला माझ्या घराचं चित्र माहितेय .आक्काचं उतारवय,आजारपण,कटकटेपण,पुनः गावी बाबांकडे लक्ष द्यायचं. त्यातच  माझी किरकोळ नोकरी मी खूप मनापासून करते ग! या सगळ्यात याच्या असल्या भन्नाट प्रस्तावांसाठी वेळ असायला मी म्हणजे काय प्रीता वाटले याला?

 (प्रीता,प्रकाश येतात.) 

प्रीता- ..हं.. वाटलंच. बुराई चाललीय ना माझी? उमा,आहेसच तू खालमुंडी पाताळधुंडी! जा पण माफ केलं तुला.मजा आली आज सगळ्यांना भेटून. चला निघू या आता? मेघ,लिफ्ट देणार ना नेहमीप्रमाणे? बाय प्रकाश! 

 उमा-चल प्रकाश,मीनू..आपलाही बस स्टॉप थांबलाय आपली वाट बघत..बाय मेघ,प्रीता.. 

 (निरोपाच्या शब्दांच्या देवघेवी आणि पडदा..)

Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सोळावा- दैवासुरसंपद्विभागयोग

महाकवी कालिदास ऋतुसंहार काव्ये शरदऋतूवर्णन - श्लोक १-१० एक पद्यानुवाद