ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सोळावा- दैवासुरसंपद्विभागयोग

 ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय  सोळावा- दैवासुरसंपद्विभागयोग


दैवी आणि आणि आसुरी संपत्तीचे विश्लेषण आणि त्या विश्लेषणाचे प्रयोजन सांगणारा असा हा अध्याय आहे त्याची सुरुवात श्री ज्ञानेश्वर नेहमीप्रमाणेच गुरुस्तवनाने करतात.
ज्ञानेश्वरकृत श्रीगुरुरूपी सूर्याचे स्तोत्र -
ज्ञानेश्वरीत ठायी ठायी विखुरलेल्या मनोहारी रूपकांपैकी हे एक महत्त्वाचे रूपक आहे श्री गुरुला सूर्य कल्पून एका अनुपम अशा ज्ञानसूर्योदयाचे परिपूर्ण असे हे वर्णन आहे.रूढ सूर्योदयातील सर्व काव्यमय तपशील नव्या संदर्भसौंदर्याने या रूपकात प्रकाशमान झालेले आहेत.
ज्ञानदेव म्हणतात-
मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु ।
अद्वयाब्जिनीविकाशु । वंदूं आतां ॥ १ ॥
जो अविद्याराती रुसोनियां । गिळी ज्ञानाज्ञानचांदणिया ।
जो सुदिनु करी ज्ञानियां । स्वबोधाचा ॥ २ ॥
विश्वरूप आभास नाहीसा करत हा श्रीगुरुरूप सूर्य ज्ञानक्षितिजावर येतो तेव्हा अद्वैताच्या कमलिनी उमलू लागतात. अविद्येच्या रात्रीवर रुसून तो ज्ञान व अज्ञान या दोन्ही प्रकारचे नक्षत्रभार नाहीसे करून टाकतो,व ज्ञानीजनांना आत्मबोधाचा उषःकाल करतो.
ज्याच्या उजाडण्याबरोबर जीवरूप पक्षांना आत्मज्ञानाचे डोळे प्राप्त होतात व ते "देह म्हणजेच आपण" अशा विपरीत ज्ञानाची चिमुकली घरटी सोडून विशाल गगनात भरारी घेतात ,तो हा श्रीगुरुभास्कर होय .
याच्या आगमनाबरोबरच लिंगदेहरूप कमळांमध्ये बंदिस्त होऊन पडलेले चैतन्यरूप भ्रमर अगदी मरता मरता वाचतात,मुक्त होतात .शास्त्ररूप अडचणी-वळचणीच्या जागी भेदबुद्धीरूप नदीच्या दोन किनाऱ्यावर विरहाने आर्त होऊन बुद्धी व बोधरूप चक्रवाकांची जोडी क्रंदन करीत असते. श्री गुरुरवीच्या उदेजण्याने ते एकत्र येतात,म्हणजेच बुद्धी व बोध वेगळे राहत नाही ते एकाच चिद्जाणिवेत हरपून जातात. सामरस्याचे सुख भोगवणारा हाच तो चित्तरुप गगनभुवनातला दीपराज. याच्या उजळण्याने भेदाची चोरटी वेळ, तमोमयता संपून जाते. आत्मानुभवाच्या वाटेने योगी पांथस्थ बनवून क्रमणा करू लागतात. याच्या संगतीत याच्या विवेकरूप किरणांमुळे ज्ञानाचा सूर्यकांत मणी पाझरू लागतो व त्या तेजात संसाराची घनदाट अरण्ये जळू लागतात. हाच किरणपुंज मध्यान्हवेळी तीव्र होतो, तेव्हा महासिद्धींचे मृगजळ प्रकट होते. जो आत्मबोधाच्या माथ्यावर "सोsहम् "रूप मध्यान्ही आला की आत्मभ्रांतीची सावली पावलातळी जाऊन दडते,नाहीशी होते. मायेची रात्रच नाहीशी झाल्यावर विपरीतबुद्धीची निद्राही संपते व विश्वरूप स्वप्नही कुठेतरी विरून जाते! मग अद्वैतरुप आनंदबोधाच्या नगरात महान आनंदाचा पूर लोटतो. सुखाच्या अनुभूतींचे देणेघेणेही मंदावते.
मुक्तकैवल्याचे सुंदर दिवस ज्याच्या तेजामुळे लाभतात तो निजधामरूप आकाशाचा स्वामी आपल्या स्व-रूपाने नेहमी उगवलेलाच आहे . त्याच्या उदयाने पूर्व-पश्चिमादि दिशाच हरपतात व उदयास्तही संपून जातात.
किंबहुना ऐसैसें । मुक्तकैवल्य सुदिवसें ।
सदा लाहिजे कां प्रकाशें । जयाचेनि ॥ १३ ॥
जो निजधामव्योमींचा रावो । उदैलाचि उदैजतखेंवो ।
फेडी पूर्वादि दिशांसि ठावो । उदोअस्तूचा ॥ १४ ॥
ज्ञान अज्ञान दोन्ही नाहीसे होऊन नाम रूप हे दोन्ही मात्र प्रकट होतात. अशा अलौकिक पहाटवेळेचा जो कर्ता, दिवसरात्रींच्या पैलप्रदेशीचा ज्ञानसूर्य, त्या श्रीगुरुराजाला पुन्हा पुन्हा नमस्कार.
तो अहोरात्रांचा पैलकडु । कोणें देखावा ज्ञानमार्तंडु ।
जो प्रकाश्येंवीण सुरवाडु । प्रकाशाचा ॥ १६ ॥
तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती । आतां नमों म्हणों पुढतपुढती ।
जे बाधका येइजतसे स्तुती । बोलाचिया ॥ १७ ॥

सोळाव्या अध्यायाची पूर्वपीठिका
श्रीज्ञानेश्वर म्हणतात- पंधराव्या अध्यायात मुरलेल्या व्याधीची (अंगलीन)चिकित्सा करणाऱ्या वैद्याच्या कसबाने श्रीकृष्णांनी अर्जुनाला शास्त्राचे सर्व सिद्धांत पटवून दिले. अश्वत्थ वृक्षाच्या रूपकातून उपाधी व अविनाशी आत्म्याचे वेगवेगळेपण स्पष्ट केले.
तरी  अध्यायी पंधरावा । श्रीकृष्णें तया पांडवा ।
शास्त्रसिद्धांतु आघवा । उगाणिला ॥ ४१ ॥
जे वृक्षरूपक परीभाषा । केलें उपाधि रूप अशेषा ।
सद्वैद्यें जैसें दोषा । अंगलीना ॥ ४२ ॥
उत्तम पुरुषाच्या सिद्धांतातून आत्मतत्त्व निखळ स्वरूपात सांगितले. त्या उत्तम पुरुषाला -पुरुषोत्तमाला -म्हणजेच भगवंताला जाणणे हीच मर्मज्ञता, सर्वज्ञता, भक्तीची परिसीमा. एवढे निरूपिल्यावर सांगण्यासारखे काही उरलेच नाही. जाणत्यांना एवढेच पुरेसे आहे,पण मुमुक्षूंची तृष्णा एवढ्याने भागण्यासारखी नाही.
म्हणौनि इये अध्यायीं । निरूप्य नुरेचि कांहीं ।
आतां गुरुशिष्यां दोहीं । स्नेहो लाहणा ॥ ४६ ॥
एवं इयेविषयीं कीर । जाणते बुझावले अपार ।
परी मुमुक्षु इतर । साकांक्ष जाले ॥ ४७ ॥
ज्ञानासंबंधीचा योगक्षेम म्हणजे ज्ञानाची प्राप्ती, व प्राप्तज्ञानाचे संरक्षण यासंबंधाने त्यांना प्रश्न पडतातच .ज्ञान प्राप्त कसे करावे? त्यातली विघ्ने कोणती? प्राप्त झालेले ज्ञान वाढवावे कसे? असे अनेक प्रश्न अजूनही मुमुक्षुंच्या मनात डाचत आहेत. त्यांच्यासाठी श्री भगवंताला पुन्हा बोलणे प्राप्त होते.
मागे नवव्या अध्यायात श्री भगवंतांनी दैवी व आसुरी संपत्तीच्या विषयाला स्पर्श केला होता, पण दुसराच विषय उपस्थित झाल्यामुळे हा विषय तिथेच अर्ध्यावर सोडला. ज्ञानाच्या हिता-हिताच्या दृष्टीने आवश्यक असा हा विषय श्री भगवंतांनी सोळाव्या अध्यायात पुन्हा विवरिला आहे .
ज्ञानेश्वर म्हणतात - एखाद्याला पोसणारे पुष्कळसे पदार्थ संपादन करणे म्हणजे संपत्ती. या अध्यायात दैवी व आसुरी गुणसमुच्चयाची संपत्ती वर्णिली आहे. तदनुसार ज्ञानाचे पोषण करायचे की अज्ञानाचे हे मुमुक्षूंना मार्गदर्शन होणार आहे.
ज्ञानासि सुजन्म जोडे । आपली विश्रांतिही वरी वाढे ।
ते संपत्तीचे पवाडे । सांगिजेल दैवी ॥ ५९ ॥
आणि ज्ञानाचेनि कामाकारें । जे रागद्वेषांसि दे थारे ।
तिये आसुरियेहि घोरे । करील रूप ॥ ६० ॥

दैवी संपदेची लक्षणे आणि  त्यातील पाच महत्त्वाच्या लक्षणांचे स्पष्टीकरण
दैवी संपत्तीचे अध्यात्ममार्गातील महत्त्व सांगताना ज्ञानदेव म्हणतात-
जे मुमुक्षुमार्गींची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी ।
ते आधीं तंव दैवी । संपत्ती ऐका ॥ ६५ ॥
जी मुमुक्षूंना (आत्मस्वरूपाच्या) मार्गाने पोहोचवणारी व जी मोहरूप रात्रीत धर्मदिशा दाखवणारा दिवा आहे, ती दैवी संपत्ती प्रथम ऐका.

सोळाव्या अध्यायामध्ये भगवंतांनी अभय, सत्वशुद्धी, ज्ञानयोगात स्थिरता, दान, दम म्हणजे इंद्रियदमन ,यज्ञ ,स्वाध्याय म्हणजे अभ्यास, तप, आर्जव म्हणजे प्राणिमात्रांवर प्रीती, अहिंसा,सत्य ,अक्रोध ,त्याग ,शांती ,अपैशुन्य म्हणजे दोषांना क्षमा करणारी दृष्टी, दया, अलोलुपत्व( अनासक्ती), मार्दव, -ही  म्हणजे देह बुद्धीची लाज ,अचापल्य म्हणजे मनपवनाच्या नियमनातून इंद्रियांची धाव थांबवणे ,तसेच तेज, क्षमा, धृती ,शौच, अद्रोह, अमानित्व असे सव्वीसण म्हणजेच  लक्षणे सांगितली आहेत, त्यांचा समुच्चय म्हणजेच दैवी संपदा होय.

'अभय' हा दैवीगुणातील अग्रपूजेचा हक्क असलेला गुण होय.हे अभय अत्युच्च कोटीच्या आध्यात्मिक विकासातूनच सिद्ध होत असते.
विहित व निषिद्ध कर्म, यांच्या संबंधाने अहंकाराला उत्पन्न होऊ न देणे व अशा रीतीने संसाराचा धाक टाकणे याला अभय असे म्हणतात.
दुसर्‍या रीतीने अद्वैतभावाच्या विकासाने, आपल्याहून परके हेही आपलाच आत्मा आहे, असे मानून भयाची संकल्पनाच हद्दपार करून जे टाकणे यास अभय म्हणावे.
तैसा कर्माकर्माचिया मोहरा । उठूं नेदूनि अहंकारा ।
संसाराचा दरारा । सांडणें येणें ॥ ७० ॥
अथवा ऐक्यभावाचेनि पैसें । दुजे मानूनि आत्मा ऐसें ।
भयवार्ता देशें । दवडणें जें ॥ ७१ ॥
पथ्य करणाऱ्याच्या घरात कोणाला रोगाचे भय नसते त्याप्रमाणे अहंकाराला उठू न देताच जो कर्माकर्माच्या विचाराने चालतो, त्याला संसाराचे भय वाटत नसते. याशिवाय त्याच्या ठिकाणचा ऐक्यभाव इतका विस्तारलेला असतो की सर्वांच्या ठायी त्याला आपलेच आत्मरूप दिसते. भयाच्या पोषणासाठी द्वैत आवश्यक असते.ते नाहीसे  झाल्यावर भय कोणाचे? पाणी मिठाला बुडवण्यासाठी भय घालू लागले,तर मीठ पाण्यातच विरून त्या भयाचा अंत करते. अशाप्रकारे ज्ञानोत्तर अवस्थेत सहज अशा निर्भयतेचा विलास असतो.एरवी भयव्याप्त अशा विश्वव्यवहारात हा दैवी गुण दिसला की तिथे ईश्वरी सत्तेची प्रकर्षाने जाणीव होते.

'दम' म्हणजे इंद्रियांना विषयांपासून तोडणे, त्यांना निग्रहाचे बंधन घालणे,आणि त्याद्वारे दाही इंद्रियद्वारे वैराग्याचीच करून सोडणे .श्वासोच्छ्वासाच्या अविरतत्त्वाने अनेक तीव्र व्रतांचे आचरण करणे, असे ते रात्रंदिवस आचरण करीत असता त्यातून जराही विश्रांती व सुटका न शोधणे. त्या कठोर आयुष्यक्रमणेचे नाव 'दम' असे आहे.
श्वासोश्वासाहुनी बहुवसें । व्रतें आचरे खरपुसें ।
वोसंतिता रात्रिदिवसें । नाराणुक जया ॥ ९२ ॥

'स्वाध्याय' म्हणजे अभ्यास. शेतात पेरलेल्या बीवर लक्ष ठेवावे तेव्हा पीक हाती येते. अंधारात पाहण्यासाठी दिव्याची निगा राखावी लागते. फळे येण्यासाठी मुळे शिंपावी लागतात. स्वतःला पाहण्यासाठी सुद्धा आरशाचा पृष्ठभाग पुसून निर्मळ ठेवावा लागतो, त्याचप्रमाणे ईश्वर गोचर होण्यासाठी श्रुती ब्रह्मसूत्र आदिंचा अभ्यास ज्ञात्यांना, तसेच स्तोत्र व नाममंत्रजप करणे हा सामान्यांना स्वाध्याय होय.
तैसा वेदप्रतिपाद्यु जो ईश्वरु । तो होआवयालागीं गोचरु ।
श्रुतीचा निरंतरु । अभ्यासु करणें ॥ १०३ ॥
तेंचि द्विजांसीच ब्रह्मसूत्र । येरा स्तोत्र कां नाममंत्र ।
आवर्तवणें पवित्र । पावावया तत्त्व ॥ १०४ ॥

'सत्य' म्हणजे श्रवणसुख देणारे पण परिणामी सत्यानुभव देणारे अविकृत बोलणे. जणू जाईची कळी! टोकदार असूनही मृदू ! किंवा चंद्राचे तेज -अंधार निवारण  करूनही शीतल! किंवा नेहमीचे साधे पाणी- ओंजळीत घेतले तर बुबुळांनाही खुपत नाही. एरवी पाहिले तर दगडही फोडून मार्ग काढते. तद्वत सत्यवचन हे संदेहाचा भेद करण्यात लोखंडासारखे ,पण माधुर्याच्या योगाने कानांनाही जिभा निर्माण करणे इतके सरस असले पाहिजे .असे सत्यभाषण आपल्या खरेपणाच्या जोरावर ब्रह्मालाही भेदून जाते. (ब्रह्मसाक्षात्कार करून देते).
तैसें तोडावया संदेह । तीख जैसें कां लोह ।
श्राव्यत्वें तरी माधुर्य । पायीं घालीं ॥ ११८ ॥
ऐकों ठातां कौतुकें । कानातें निघती मुखें ।
जें साचारिवेचेनि बिकें । ब्रह्मही भेदी ॥ ११९ ॥
ते पारध्याच्या गायनाप्रमाणे फसव्या मोहात पडणारे नसते, तसेच दुसऱ्याच्या अंगाची लाही व्हावी असे कठोरही नसते. अशा परस्परविरोधी लक्षणांनी युक्त ,मृदू पण पथ्यकर वचन सत्य म्हणून ज्ञानीजनांच्या ओठावर प्रकट होते.

'शांती' म्हणजे ज्ञेयाला गिळून ज्ञाता व ज्ञानही जेथे लयाला जातात, ते परमधाम. जलप्रलयाच्या वेळी साऱ्या विश्वात पाणीच पाणी भरून राहिले, की ओघांची उत्तमाधमता, त्यांचे समुद्राला मिळणे ही सारी कथाच नाहीशी होते. चोहीकडे दिसते ते पाणीच !
तरी गिळोनि ज्ञेयातें । ज्ञाता ज्ञानही माघौतें ।
हारपें निरुतें । ते शांति पैं गा ॥ १३७ ॥
जैसा प्रळयांबूचा उभडु । बुडवूनि विश्वाचा पवाडु ।
होय आपणपें निबिडु । आपणचि ॥ १३८ ॥
ईश्वरी कृपेनंतर निवलेल्या ज्ञानदृष्टीला असाच शांतीचा प्रत्यय चराचरात येतो किंबहुना ती ज्ञानदृष्टीही त्या परमशांतीत लीन होऊन जाते.

अशा प्रकारे सोळाव्या अध्यायातील सव्वीस दैवी संपदा लक्षणांपैकी पाच महत्त्वाच्या लक्षणांवरील ज्ञानेश्वरांचे सुमधुर भाष्य येथे उद्धृत केले आहे.

आसुरी संपदेची  लक्षणे-
"दंभो दर्पोsभिमानश्च" या सोळाव्या अध्यायातील एकाच (चौथ्या) श्लोकात दंभ, दर्प ,अभिमान, क्रोध,पारुष्य म्हणजे काठिण्य, व अज्ञान अशी सहा आसुरी संपदालक्षणे सांगितली आहेत. श्री ज्ञानेश्वर ती विवरिताना म्हणतात-
नाना विषवर्गु एकवटु । तया नांव जैसा बासटु ।
आसुरी संपत्ती हा खोटु । दोषांचा तैसा ॥ २१६ ॥
सर्व प्रकारची विषे एकत्र करून त्यांना काळकूट असे नाव द्यावे, तसे हे सहा दोष एकत्र येऊन आसुरी संपत्ती या नावाने ओळखले जातात.

'दंभ' हा सर्वात मोठा आसुरी दोष आहे त्याचे मूळ कुठेतरी सद्गुण किंवा सुकृतीतच दडलेले आहे, पण त्या सद्गुणाचे किंवा सुकृतीचे लांच्छनास्पद प्रदर्शन हेच दंभाचे मूळ ठरते.ज्ञानदेवांनी यासाठी दिलेल्या उपमांमध्ये स्वतःच्या आईला नग्न करून दाखवण्याची कठोर उपमा आहे.
जीवितपोषण करणारे अन्न अति खाल्ले तर विषासारखे अपचनास कारण ठरते,त्याचप्रमाणे इहपरलोकीचा आपला खरा सोबती  धर्म, तो उघड करून त्याचे वाणीच्या चव्हाट्यावर प्रदर्शन मांडले तर तो अधर्म ठरतो. असे वागणे दंभयुक्त ठरते.
कारण जें जीविता । तें वानिलें जरी सेवितां ।
तरी अन्नचि पंडुसुता । होय विष ॥ २२१ ॥
तैसा दृष्टादृष्टाचा सखा । धर्मु जाला तो फोकारिजे देखा ।
तरी तारिता तोचि दोखा- । लागीं होय ॥ २२२ ॥
नावेत बसले तरच पैलतीरावर पोहोचता येते .तीच नाव डोक्यावर घेऊन पाण्यात उतरले तर काय होईल ? संस्कृत त्याचे प्रदर्शन या श्रेणीत मोडते.

'दर्प' हा दंभाचाच धाकटा भाऊ- पण तो बेताच्या अकलेच्या ठिकाणी जास्त पोसला जातो. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्यासारखा हा प्रकार आहे .जात्याच मूर्ख माणसावर थोडासा अक्षरांचा संस्कार केला, की तो ब्रह्मसभेलाही जुमानत नाही. तबेला ठेवणार्‍यांचा घोडा गजराजालाही तुच्छ मानतो. कुंपणावरला सरडा स्वर्गही तुच्छ मानून आपल्या कुंपणावरच संतुष्ट असतो.
आतां मूर्खाचिये जिभे । अक्षरांचा आंबुखा सुभे ।
आणि तो ब्रह्मसभे । न रिझे जैसा ॥ २२४ ॥
कां मादुरी लोकांचा घोडा । गजपतिही मानी थोडा ।
कां कांटियेवरिल्या सरडा । स्वर्गुही नीच ॥ २२५॥
गवताच्या काड्यांना लागलेली अल्पजीवी आग आकाशात धाव घेऊन पाहते. डबक्यात पोसलेला मासा समुद्राचीही गणना करत नाही.त्याप्रमाणे हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले कित्येक मूर्ख जीव मस्तवाल होऊन भल्याभल्यांना मानत नाहीत. दर्पाचे स्वरूप हे असे आहे.

'अभिमान व क्रोध' ही यानंतरची दुर्गुणावस्था. दर्प याच दुर्गुणाची पुढे वाटचाल होऊन अभिमान व क्रोधात रूपांतर होते. हे माजलेले दर्पिष्ट जेव्हा ईश्वराचे स्तुतीपर वर्णन ऐकतात तेव्हा मत्सराने जळफळून "ईश्वराला खाऊन टाका,वेदांना विष द्या "असे बरळू लागतात. वेदरूपी बापाला सवत मानतो !
अशा प्रकारे त्याला मान्यतेचा असा मोठा ताठा असतो की तो अभिमानी पुरुष अतिशय उन्मत्त होऊन साक्षात रौरव नरकाला जाण्याचा रहदारीचा मार्ग बनतो .
तैसा अभिमानाचेनि मोहें । ईश्वराचेंही नाम न साहे ।
बापातें म्हणे मज हे । सवती जाली ॥ २३५ ॥
ऐसा मान्यतेचा पुष्टगंडु । तो अभिमानी परमलंडु ।
रौरवाचा रूढु । मार्गुचि पै ॥ २३६ ॥
ईश्वराशीच अशी स्पर्धा करणाऱ्यांना दुसऱ्या कोणाशी भरभराट कशी मानवेल? अभिमानाचे अशा प्रकारे क्रोधात रूपांतर होते .दुसऱ्याचे सुख पाहून अशांचा क्रोधाग्नी भडकतो. तापलेल्या तेलावर पाणी शिंपले तर ते जसे चरफडते, सूर्योदय झाल्यावर घुबडांचे डोळे फुटतात व चोरांना दुःख होते ,त्याप्रमाणे क्रोधी माणूस इतरांच्या कुशलवार्तेने नुसता जळत राहतो. वडवाग्नी जसजसे अधिकाधिक अगाध समुद्राचे पाणी पितो, तसतसा तो अधिकाधिक भडकतो. त्याची कधी तृप्ति होत नाही.त्याप्रमाणे विद्या, विनोद, ऐश्वर्य, इत्यादिकांनी युक्त अशी दुसर्‍याची भाग्ये जो जो पहावी, तो तो जो ज्याचा संताप दुप्पट होतो, तो क्रोधी .
अगाधें समुद्रजळें । प्राशितां अधिक जळे ।
वडवाग्नी न मिळे । शांति कहीं ॥ २४१ ॥
तैसा विद्याविनोदविभवें । देखे पुढिलांचीं दैवें ।
तंव तंव रोषु दुणावे । क्रोधु तो जाण ॥ २४२ ॥

'पारुष्य' म्हणजे कठीणता.आता उपरोक्त दुर्गुणांनी बुजबुजलेल्या मनात जणू सर्पांचे वारूळ माजलेले असते. डोळे हे बाणांच्या अग्राप्रमाणे धारदार, बोलणे म्हणजे इंगळांची वृष्टी.प्रत्येक क्रिया म्हणजे पोलादी कर्वतीचा फेरा .ही सारी अधम अशा काठिण्याची लक्षणे होत.असा माणूस सर्व मनुष्यांमधे अधम .
येर जें क्रियाजात । तें तिखयाचें कर्वत ।
ऐसें सबाह्य खसासित । जयाचें गा ॥ २४४ ॥
तो मनुष्यांत अधमु जाण । पारुष्याचें अवतरण ।
आतां आइक खूण । अज्ञानाची ॥ २४५ ॥

'अज्ञान' ही एक अशी दशा आहे जीमध्ये सारासार विवेकाचा काहीच पत्ता राहत नाही. दगड जसा शीतोष्ण जाणत नाही, जन्मांधाला रात्र किंवा दिवस वेगळे कळत नाहीत,बुभुक्षिताला खाद्याखाद्यविवेक राहत नाही, परिसाला सोने आणि लोखंडातला फरक कळत नाही, नाना रसांमध्ये शिरणारी पळी त्यांची चव जाणत नाही, त्याप्रमाणे पाप-पुण्यांची एकत्र शिजवलेली खिचडी ज्या बुद्धीला कडू किंवा मधुर हेही समजत नाही ती बुद्धी अज्ञानयुक्त होय.
तैसें पापपुण्याचें खिचटें । करोनि खातां बुद्धिचेष्टे ।
कडु मधुर न वाटे । ऐसी जे दशा ॥ २५१ ॥
तिये नाम अज्ञान । या बोला नाहीं आन ।
एवं साही दोषांचें चिन्ह । सांगितलें ॥ २५२ ॥

ज्ञानदेव म्हणतात, लक्षणे सहाच, पण आयुष्याचे पुरते अनिष्ट करणारी. ते कसे तर ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर स्त्रीचा बांधा आटोपशीर असला, तरी त्या आकृतीबंधात कामेच्छा निर्माण करण्याची शक्ती फार असते.
इहींच साही दोषांगीं । हे आसुरी संपत्ति दाटुगी ।
जैसें थोर विषय सुभगे अंगीं । अंग सानें ॥ २५३ ॥
आयुष्य संपावयाचे असले म्हणजे शेळीला सात नांग्यांची इंगळी दंश करते, तशी ही सहा आसुरी लक्षणे जीवांना अकल्याणाच्या, दुर्मार्गाच्या दिशेला ढकलत शेवटी पाषाणापेक्षाही नीच योनीत नेतात!

आसुरी प्रवृत्तीच्या माणसाचे आचरण -
"प्रवृत्तींच निवृत्तींच" या सातव्या श्लोकापासून ते "अहंकारं बलं दर्पं" या अठराव्या श्लोकापर्यंत भगवंतांनी जे आसुरी प्रवृत्तीच्या माणसाचे आचरण वर्णिले आहे ते ज्ञानेश्वरांनी अधिकच विस्ताराने मांडले आहे. त्याचा संक्षेप असा करता येईल-
-प्रवृत्ती व निवृत्ती हे दोन्ही न जाणणारा आसुरवृत्तीचा माणूस शुचिर्भूतता स्वप्नातही जाणत नाही.
तरी पुण्यालागीं प्रवृत्ती । कां पापाविषयीं निवृत्ती ।
या जाणणेयाची राती । तयांचें मन ॥ २८१ ॥
तर पुण्याविषयी प्रवृत्ति अथवा पापाविषयी निवृत्ति यांना जाणण्याची जणू रात्र असे त्यांचे मन असते. म्हणजे पुण्यकर्म करावे, पापकर्म करू नये, हा विचारही त्यांच्या मनात केव्हाही येत नाही.

यथेच्छ आचरण हे त्यांचे मुख्य लक्षण. शेळीचे चरणे, वाऱ्याचे धावणे, अग्नीचे जाळणे जसे दिशाहीन, तसेच वर्तन! सत्याशी तर हाडवैर धरलेले .अपानाच्या तोंडातून सुगंध येणे नाही त्याप्रमाणे यांनाही सत्य सापडणे शक्यच नाही. उंटाला सरळ अवयव कोणता आहे  ?तसेच यांचे सारेच वाकडेतिकडे.
विश्वाची अनादि व्यवस्था, ईश्वराची अनादि सत्ता यांच्या लेखी अस्तित्वातच नसते. ह्याप्रमाणे जगाला कामाशिवाय दुसरे काहीही मूळ नाही,असे ते असुर बोलतात.
एवं कामावांचूनि कांहीं । जगा मूळचि आन नाहीं ।
ऐसें बोलती पाहीं । आसुर गा ते ॥ ३१२ ॥
मूर्तिपूजा करणे म्हणजे देवभोळेपणा,संन्यासी म्हणजे समाधीच्या खोट्या आशेवर फसवले गेलेले अभागी असे त्यांना वाटते. येथे मिळते ते भोगून घ्यावे! दुसरे पुण्यफल म्हणजे काय ?अशक्तपणामुळे भोग भोगता आले नाहीत म्हणून चडफडणे हेच पाप! श्रीमंतांचे प्राण घेणे जर पापाचे, तर त्यातून हाती येणारे धनभोग पुण्याचेच ना? बळी निर्बळांना सर्वत्र खातातच .छोटे मासे नाही का मोठ्या माशांच्या उदरी जात ?प्रजोत्पत्तीठी शुभफळ शोधावे कशाला? पशुपक्ष्यांचे कोण शोधतात ?व्यभिचार करून सुख भोगले तरी ते सुखच. त्याने काय अंगावर कोड येते? इंद्र-उर्वशीचा सुखोपभोग व चिखलकिड्यांची रतिक्रीडा तत्वतः एकच. म्हणून काम हेच जगाचे मूळ. स्त्री-पुरुषांचे एकत्र येणे हीच जगाच्या सातत्याची पीठिका. बाकी ईश्वर त्याचे नियंतेपण सर्व खोटे. त्याला कोणी पाहिले आहे का?असे त्यांचे विचारधन!
असे आसुरीजन जगात खूप दंभमान मिळवून असे माजतात की जणू दारू पाजलेले मत्त हत्तीच. पापांची यावेळी भरभराट होते ,पण अपार चिंता मात्र यांच्या हृदयात भरलेली असते. चिंता म्हणजे उपभोगांसाठी केलेली चिंता. स्त्रियांचे गायन,स्वरूप, स्पर्श साऱ्याचा हव्यास. कारण तेच तर परमसुख.
तैसी चिंता अपार । वाढविती निरंतर ।
जीवीं सूनि असार । विषयादिक ॥ ३३३ ॥
स्त्रिया गाइलें आइकावें । स्त्रीरूप डोळां देखावें ।
सर्वेंद्रियें आलिंगावें । स्त्रियेतेंचि ॥ ३३४ ॥
चिंता, आशा या पाशांनी बांधलेले ते कामक्रोधपरायण जीव मग भोग मिळवण्यासाठी वाममार्गाने पैसा लुबाडून पाहतात. कोणाला नागवतात,कोणाला नाशवतात. रात्रंदिवस झटतात !दुसर्‍यांच्या प्राणांचा घात करून द्रव्य मिळावतात व ते द्रव्य मिळाल्यावर चित्ताच्या ठिकाणी कसा संतोष मानतात.
परप्राणघातें । मेळविती वित्तें ।
मिळाल्या चित्तें । तोषणें कैसें ॥ ३४७ ॥
मग प्रौढी मिरवतात -"आज एवढे मिळवले ,उद्या याच्या भांडवलावर उरलेले स्थावर जंगम व्याजात मिळेल! विश्वाचाच स्वामी होईल मी. हे थोडे वैरी मारले इतरही पुष्कळसे मारेन व एकटाच प्रतिष्ठा भोगेन.ईश्वर म्हणजे मीच होईन अशाने! काळही माझ्यापुढे दुर्बळ दिसला पाहिजे .कुबेराहून मी श्रीमंत. माझ्या कुळगोत्रापुढे ब्रह्मदेवही हलका ठरेल. जारणमारण व परपीडा यांना मी यज्ञाची प्रतिष्ठा देईन.
म्हणौनि मिरविती नांवें । वायां ईश्वरादि आघवे ।
नाहीं मजसीं सरी पावे । ऐसें कोण्ही ॥ ३५९ ॥
आतां लोपला अभिचारु । तया करीन मी जीर्णोद्धारु ।
प्रतिष्ठीन परमारु । यागवरी ॥ ३६० ॥
- मग नटनर्तन करून सुखविणाऱ्या लोकांना मी अमाप धन देईन. स्त्रियांच्या बाहुपाशात त्रिभुवनात आनंदाकार होऊन राहीन!"
अशा प्रकारे सर्व वाईट मनोरथ व कृती यांची चढती वाढती तमोवेळ आसुरी वृत्तीच्या लोकांच्या जीवनात, आचरणात प्रकटते.

प्रभुने आसुर प्रवृत्तांना दिलेली शिक्षा
"तानहं द्विषतः कृरान्"या एकोणिसाव्या व "आसुरीं योनिमापन्ना" या विसाव्या श्लोकात प्रभुने आसुर प्रवृत्तांना दिलेली शिक्षा सांगितली आहे.
ऐसे आघवाचि परी । प्रवर्तले माझ्या वैरी ।
तयां पापियां जें मी करीं । तें आइक पां ॥ ४०५ ॥
याप्रमाणे सर्व प्रकारांनी जे माझ्याशी शत्रुत्व करण्यास प्रवृत्त झाले आहेत, तर त्या पाप्यांना जे मी करतो ते तू ऐक.
मनुष्यदेहाचा आश्रय घेऊन जे प्राणिमात्रांचा द्वेष करतात, त्यांच्यापासून प्रथम परमेश्वर तो देह आणि ते पदच हिरावून घेतो. क्लेशरुप गावाचा जो उकिरडा, भवपुरीचा पाणवठा अशा घोर तमोयोनींमध्ये ते जन्म घेतात.ती तमोयोनी त्या मूर्खांना (भगवंत ) वतनदारीसारखी देतो.जेथे गवतही खायला उगवत नाही अशा ठिकाणी ते वाघ,विंचू आदि होऊन जन्मतात.
जे क्लेशगांवींचा उकरडा । भवपुरींचा पानवडा ।
ते तमोयोनि तयां मूढां । वृत्तीचि दें ॥ ४०७ ॥
मग आहाराचेनि नांवें । तृणही जेथ नुगवे ।
ते व्याघ्र वृश्चिक आडवे । तैसिये करीं ॥ ४०८ ॥
भुकेच्या व्याकुळतेने आपलेच मांस तोडून खातात ,मारून मरून पुन्हा जन्मतात, किंवा आपल्याच विषाच्या धगीने ज्यांची त्वचा होरपळते असे सर्प करून त्यांना बिळात डांबले जाते.घेतलेला श्वास सोडावा इतपतही विश्रांती त्यांच्या नशिबात नसते. कोट्यावधी कल्पपर्यंत ही शिक्षा चालते!अशा तमोयोनींमध्ये अंधारालाही काळिमा येतो, नरकांनाही भय वाटते.या तामस योनींचे वर्णन करताना वाचेला रडू कोसळते, मन थरकापून मागे फिरते.
अशा भयावह शिक्षेचे वर्णन करून प्रभू येथे अर्जुनाच्या निमित्ताने प्रत्येकालाच या वाममार्गापासून परावृत्त करीत आहेत.

नरकाच्या तिहेरी द्वाराचे वर्णन

सोळाव्या अध्यायातील एकविसाव्या श्लोकात- "त्रिविधं नरकस्येदं"- नरकाचे तिहेरी द्वार वर्णिले आहे.
काम क्रोध व लोभ हे तिघेच नरकाचे तिहेरी द्वार होत. जेथे यांची प्रतिष्ठा वाढते तेथे अशुभाचेच पिक फळफळते. ज्याला सर्व दुःखांचे दर्शन घ्यायचे आहे अशांसाठी हे जणू पथदर्शक वाटाडे आहेत.
परी काम क्रोध लोभ । या तिहींचेंही थोंब ।
थांवे तेथें अशुभ । पिकलें जाण ॥ ४२५ ॥
सर्व दुःखां आपुलिया । दर्शना धनंजया ।
पाढाऊ हे भलतया । दिधलें आहाती ॥ ४२६ ॥

किंबहुना पाप्यांना नरकभोगात टाकण्यासाठी जगात भरलेली ही पातकांची सभा आहे. हे अंतःकरणात जागत नाहीत तोपर्यंत रौरवाचे फक्त नावच ऐकावयाचे .(हे जागे झाल्यावर रौरवाशी खरा परिचय होतो). अपाय करणे हा या तिघांचा अत्यंत सोपा उद्योग आहे. यातनांचा यांच्याकडे स्वस्तातला साठा भरलेला आहे. हानी म्हणजे हानी नव्हेच, हे तिघे हीच खरी हानी होय.

अशा अर्थी हे तिघे म्हणजे त्रिशूळ लावलेला नरकाचा दरवाजा आहेत. या तिघांच्या मोहजालात जो ओढला जातो तो नरकपुरीच्या सभेत खात्रीने जाऊन पोहोचलाच पाहिजे.

समारोप
दैवी संपत्तीचे संवर्धन आणि आसुरी संपत्तीचे निर्मूलन हाच मुमुक्षूंसाठी अध्यात्म-मंत्र आहे हे या अध्यायातून भगवंतांनी सांगितले आणि ज्ञानदेवांनी त्याचा थरारक असा विस्तार केला आहे .
हा संपूर्ण विस्तार आशयाच्या अंगाने साररूप सामावून घेणारी अशी ही  चारशेएकोणचाळिसावी ओवी .

त्रिदोषीं सांडिलें शरीर । त्रिकुटीं फिटलिया नगर ।
त्रिदाह निमालिया अंतर । जैसें होय ॥ ४३९ ॥
तैसा कामादिकीं तिघीं । सांडिला सुख पावोनि जगीं ।
संगु लाहे मोक्षमार्गीं । सज्जनांचा ॥ ४४० ॥

काम ,क्रोध ,लोभ ही त्रिपुटी सोडल्यानंतरची अवस्था कशी असेल?
तर त्रिदोष (कफ, वात, पित्त यांचा अतिरेक) निघून गेल्यावर जसे शरीर आरोग्यमय होते ,चोरी चहाडी व शिंदळकी  या तीन कपटी गोष्टी नष्ट झाल्यावर जसे नगर सुखी होते, व त्रिविध म्हणजे आधिदैविक,आधिभौतिक व आध्यात्मिक ताप शमल्यावर जसे अंतर शांत होऊन  जीवाला परमसुख प्राप्त होते ,तशी ही शुद्ध शांत अवस्था.
सोळाव्या अध्यायातील या चारशेएकोणचाळिस-चाळिसाव्या ओवीत ज्ञानेश्वरांच्या आकाश कवेत घेणाऱ्या प्रतिभेचा आणखी एक विलास आहे .या अध्यायाचे प्रयोजनच त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे की अर्जुनमिषाने भगवंत येथे मुमुक्षूंना मार्गदर्शन करीत आहेत. अध्यायाची ही मूळ भावना लक्षात घेऊन त्यांनी श्रोत्यांना येथे पुन्हा पुन्हा आर्जवून काम क्रोध व लोभ या आसुरी संपत्तीकडे नेणाऱ्या वाटाड्यांबद्दल सावध केले आहे. हे करत असताना त्यांनी अत्यंत आश्चर्यकारकपणे आधुनिक जगात प्रभावी ठरलेल्या काही मतप्रणालींचा परस्पर समाचारही घेतला आहे हा विषय जरी मोठा व वेगळा असला तरी या ओळीच्या पार्श्वभूमीत तो दाटला आहे.
तीन अत्यंत प्रगल्भ उपमांमधून काम ,क्रोध ,लोभ यांना सोडल्यावर मुमुक्षूंना होणारे फायदे ज्ञानदेव सांगत आहेत.
कफ, पित्त ,वात हे त्रिदोष नाहीसे झाल्यावर ते शरीर आरोग्यसंपदेने तळपू लागते.
एखाद्या शहरातून चोरी चहाडी शिंदळकी या तीन छलयुक्त गोष्टी नाहीशा झाल्या, तर ते स्वर्गाशी स्पर्धा करण्याइतपत सुशांत व सुखी होते.
शेवटी ज्यांच्या मा-यात अंत:करण सतत कळवळते ते त्रिविध ताप जर समाप्त झाले तर परमानंदाशिवाय काहीच शिल्लक राहत नाही.
काम ,क्रोध ,लोभाच्या त्रिपुटीशी या तीन घटकयुक्त तीन संचांची तुलना सहज व सलीलपणे करणे हे ज्ञानेश्वरांच्या सर्वगामी बुद्धीचा एक विलक्षण खेळ आहे.
या लहानशा ओवीतले तीन या आकड्याचे आवर्तन व आशयसंपन्नता तसेच नाविन्य विस्मित करणारे आहेत.
या ओवीच्या आशयाच्या प्रखर अनुभूतीबरोबरच या अध्यायाचा समारोप करता येईल.

भारती बिर्जे-डिग्गीकर


Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –