सहप्रवास २

 सहप्रवास २

(उमाच्या घराचा हॉल.पण स्वरूप लायब्ररीचं.दोन मोठ्ठी बुकशेल्व्ज एकमेकांशी कोन करून. जवळच एक सरस्वतीचं छोटं संगमरवरी शिल्प.वीणाधारिणी. सेटीजवळ एक लहानसं टीपॉय घेऊन उमा काहीतरी लिहितेय.) 

आक्का-(साठीच्या आसपासचं वय.लहान चण. वय होऊनही एक निरागसपणा चेहर्‍यावर-आतून बाहेर येते-) कधीची लिहिते आहेस ग उमा.काय आहे ते? 

उमा- अग मेघःश्याम कधीचा मागे लागलाय त्याच्या टेलिव्हिजनच्या कामात मदत हवी म्हणून.मला वेळ कुठे आहे? पण म्हटलं एखादा एपिसोड तरी करून द्यावा.. 

आक्का-कसला एपिसोड ग ? 

उमा-महाराष्ट्रातले टूरिस्ट स्पॉटस करतोय ना तो..मला म्हणाला पंढरपूरसाठी तुझ्याकडून inputs हवेत..आक्का- पंढरपूरमधल्या निरनिराळ्या मठांवर लिहिलेलं वाचून दाखवू?
काही अजून येण्यासारखं आहे का बघ ना..खरं तर बाबाच इथे हवे होते. 

आक्का- ते ऐकतेच ग.आधी सांग हा मेघःश्याम कोण? वर्षभरापूर्वी ती चारपाच मुलंमुली आली होती त्यातलाच का? काही नीट लक्षात येत नाही..फोनही करतो कधीकधी,आडनाव धुरंधर ना त्याचं?घरी कोणकोण आहेत? 

उमा-आक्का कशाला ग इतक्या चौकशा-चांगला मित्र आहे ,सहृदय,चौफेर व्यक्तिमत्वाचा, गर्भश्रीमंत आहे..बर्‍याच मुली असतात त्याच्यामागे.तसलं काही आमच्या डोक्यातही नाही बघ. 

आक्का-महत्त्वाच्याच गोष्टी तुमच्या डोक्यात का नाही येत ग?कधी येणार त्या डोक्यात?आई नाही तुझी या जगात,मी ही अशी दुखणाईत,कंटाळलेय जगण्याला.. बाप तुझा तसल्या आडगावात जाऊन बसलाय,तिथे वरसंशोधन करणार होय तुझ्यासाठी?आणि तू अशी चित्रविचित्र.वयात आलेल्या मुलीसारखं ना वागणं ना रहाणं.आईचे नको तेच विशेष घेतलेस ग बयो.तिची धडाडी नाही तुझ्यात. उगाच काहीतरी खोलखोल विचार करून अवघड करायचं सगळं. 

उमा- राहू देत हं आक्का नेहमीचं तुझं.आणि तू कशाने इतक्या लवकर कंटाळलीस जगण्याला? मी नेहमी सांगते तुला कामं काढून करत आणि थकत राहू नकोस.भागिरथी आहे ना?मीही आहेच.दोन बायकांचंच तर घर.चल उद्या पुनः तुला डॉक्टरांकडे नेते.औषध बदलून पाहू काहीतरी. 

आक्का- आता कसली औषधं बदलतेस उमा..अपयशीच जगणं माझं.संपण्याची वाट बघतंय झालं.हे दुखरे सांधे फार त्रास देताहेत त्यांच्यात काय आता नवचैतन्य संचारणार होय बाटलीतल्या गोळ्यांनी? आणि आतून मन विझत चाललंय त्याच्यावर कसला इलाज उमा?नवर्‍याने टाकलेली,मूलबाळ नसलेली परित्यक्ता मी.जवळची नाती परकी झाली,वैरी झाली इस्टेटीसाठी..जीव घ्यायच्या धमक्या ऐकून तुझ्या आईवडिलांच्या आश्रयाला आले..दूरच्या नात्यातली खरी जवळची देवमाणसं ती ..काही राहिलं नाही बघ जगावंसं वाटण्यासाठी.एक तुझी आई फक्त श्रीशिल्लक होती-तीही देवाने अवेळीच नेली.तुझं मार्गी लाव बाई आता लवकर.सहनशक्ती नाही उरली फारशी..

उमा - पुरे आक्का! कितीदा तेच तेच! सगळं छान चाललंय.सुखातच आहोत ग आपण दोघी! 


(दरवाजावर ठकठक.उमा दार उघडून निमकरकाकांना आत घेते.आक्काचाच वयोगट. पण उत्साही, हसरे,अखंड बोलणारे.) 

काका- कशा आहात आक्का? मी सांगितलेले श्वसनाचे प्रकार करायला सुरुवात केली की नाही? आजारलेपण पळून जाईल पहा.उमा,तू जरा बाहेरगावी फिरवून आण ग यांना.एखादा week-end पकडून तुमच्याच गावी जाऊन या ना. 

आक्का- week-end ला वेळ कुठे असतो बाईला?रोजचं ते ऑफिसचं काम.त्यातच तिचा कसलाकसला अभ्यास.मग कुणाचंही छोटंमोठं काहीही घेऊन करत रहायचं. हे सगळं कमी म्हणून शनिवारी अंधशाळेचं काम.या वयात हे असं जोगिणीसारखं रहाणं.लग्न तरी कसं जमणारेय कुणास ठाऊक हिचं.. 

काका-लग्न जमायला काय अवघड आहे आक्का?आणि तुम्ही पण किती टिपिकलपणा करावा?कशाला ठाकून ठोकून लग्नाच्या चौकटीत अडकवायची घाई..तिचं वेगळेपण जरा समजू दे ना तिला आणि आमच्यासारख्या तिच्या चाहत्यांना!

आक्का-हे फाजील लाडच डोक्यात चढलेत तिच्या.चालू द्या तुमचं .मी तयार होते बाजारात जायला.(आत जाते.) 

उमा-कशी चाललीय तुमची नवी नोकरी काका? 

काका- कसली ग नवी नोकरी.. या रिटायरमेंटनंतरच्या नोकऱ्या खूप गंभीरपणे थोड्याच घ्यायच्या असतात?माझं आयुष्यभराचं पी.आर. वापरायचं आणि एखाद्या छंदासारखं एंजॉय करायचं सगळं. अग हो, आमच्या M.D. ने एक सांस्कृतिक संध्याकाळ आयोजित केली आहे कंपनीच्या वर्धापनदिनी.येशील ? ज्याँ अनुईच्या अँटिगनीचा प्रयोग आहे. 

उमा- वर्मावरच बोट ठेवलंत.पण बघावं लागेल कसं जमवायचं ते.वेळ स्थळ सांगून ठेवा. 

काका - फारच शिष्टपणा! शनिवारची संध्याकाळ आहे ,एन.सी.पी.ए. ला जायचंय-तुझं
अंधशाळेचं काम एक दिवस बंद ठेव ना. नुसतं कामाचं गाढव होऊ नकोस उमा.आपल्या उत्कटतेचे झरे आपणच बुजवून टाकायचे नसतात असे. हा कसला राग काढतेयस तू स्वतःवर ? वय काय तुझं? विशी नुक्तीच ओलांडली आहेस-बघ, प्रत्येक दिवस तुला किती पर्याय घेऊन सामोरं येतोय तरूण मित्रांसारखा तुझ्या..

उमा- काय हो काका ..असे कितीसे तरूण मित्र आहेत मला? आणि ते तुम्हालाच exciting वाटतात ..दूरून बघता ना,म्हणून.खूप कंगोरे असतात हो प्रत्येक मैत्रीचे. 

काका- कल्पना आहे उमा,पण आता माझ्या या वयात ये म्हणजे कळेल तुला किती मधुर कालखंडात आहेस ते.अगदी तुझ्या त्या कंगोर्‍यांसकट. नंतर नुसते व्यवहारच असतात उमा.आता आहे तो बराचसा विशुद्ध स्नेह.बराचसा म्हणतोय हं मी. 

उमा- (हसत) पुरे काका. येईन मी नाटकाला तुमच्याबरोबर.आक्काला आणेन म्हटलं असतं,पण ती बोअर होईल. 

आक्का-(आतून तयार होऊन पिशवी वगैरे घेऊन निघाल्यात) चलता निमकर माझ्याबरोबर,तुम्हालाही लायब्ररीत जायचं असेल ना ?तेवढंच कोपर्‍यापर्यंत गप्पा मारत जाऊ..(दोघेही सोबतच जातात.)-

उमा-(आता एकटीच उरलीय.एक नि:श्वास टाकून पेन,लिहिण्याचं साहित्य आवरून ठेवते.आता निळा प्रकाशझोत तिच्यावर. स्वगत-)

काका,आक्का.. किती सोपं करता सगळं. इतकं सोपं असतं तर !हे वय म्हणे. हे वय कथाकादंबर्‍यांमधून , नाटकसिनेमांमधून फार रंगवलं जातं काका.खूप त्रासदायक आहे हे वय माझ्यासाठी.ते बालपणच किती निरागस सुंदर होतं. आई होती जवळ.आई..आई.. कुठे ग गेलीस मला सोडून.. कोण घेईल तुझी जागा ?कोण देईल पहाटप्राजक्तासारखं सुगंधी प्रेम मला? कुणाची क्षमता आहे तशी आई? (रडते.पुनः सावरत-) मेघ:श्याम ?किती जिवापाड आवडतो पण नार्सिसस आहे नुसता.स्वतःच्याच प्रेमात पडलेला.का आवडतो पण तोच मलाही?मेघःश्याम..किती उशीर करतो आहेस.वेळ टळून जाईल..आयुष्य वेगळ्या वाटा पकडून निघून जाईल..परकं करशील मला.दुसर्‍यांदा पोरकं करशील...मला टळटळीत दिसतंय सगळं.पराभवाचे पडघम आधीच वाजताहेत.. हे एवढं आयुष्य समोर पसरलेलं...तुझ्याशिवाय ते काढायला नको लावूस मला. . ही किती आर्त हाक देतेय मी तुला..ऐक रे ऐक.. नि:शब्द एकांतात,निगूढ स्वप्नात ऐक मेघ;श्याम. हे शब्दात समोरासमोर कधीच सांगता नाही येणार मला कारण मी कुठे आहे शहाणी? समजून घे.. समजून घे समजणेच प्रथम,खेळ,व्यसन,व्रत म्हणून..पारखून घे शब्दांच्या मयसभा,बाहेर ये त्या चक्रव्यूहामधून..

(खिन्न होते.खिडकीजवळ पाठमोरी उभी.फोनची बेल वाजते. ती दचकते.निळा प्रकाशझोत जातो.)
हलो..(उल्हसत) कोण मेघःश्याम? हो हो ,तयार होतंच आहे लिहून सगळं .कुठे भेटूया? (ऐकत,एकाग्रपणे) ठीक आहे,ठीक आहे..मीनूला पण सांगू यायला? ती excite होईल बघ. (पुनः ऐकून हसते) बरं बाबा नाही सांगत, ही भेट आपल्या दोघांचीच फक्त.उद्या संध्याकाळी..(फोन ठेवते).
(गुणगुणते) सहज सख्या.. एकदाच..येई सांजवेळी..


(पडदा).

Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सोळावा- दैवासुरसंपद्विभागयोग

महाकवी कालिदास ऋतुसंहार काव्ये शरदऋतूवर्णन - श्लोक १-१० एक पद्यानुवाद