ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय तेरावा -क्षेत्रक्षेत्रज्ञयोग

 

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य  परिचय- अध्याय तेरावा -क्षेत्रक्षेत्रज्ञयोग

ज्ञानदेवांनी मांडलेल्या देहाला क्षेत्र म्हणण्यामागील विविध भूमिका
तेराव्या अध्यायाच्या प्रारंभी या देहाला क्षेत्र म्हणण्यामागील विविध सिद्धान्त भूमिका श्रीज्ञानदेव स्पष्ट करतात.

या एवढ्याशा साडेतीन हात देहामुळे जगाचे व्यापारव्यवहार चाललेले आहेत, शास्त्रांचे परस्परसंबंध जुळलेले आहेत.हे कोणाचे स्थान आहे?सुपीक  की नापीक?
हें क्षेत्र का म्हणिजे । कैसें कें उपजे ।
कवणाकवणीं वाढविजे । विकारीं एथ॥ ११ ॥
हें औट हात मोटकें । कीं केवढें पां केतुकें ।
बरड कीं पिके । कोणाचें हें॥ १२ ॥
ज्ञानदेव इषत् विनोदबुद्धीने म्हणतात," पण घरोघरी जो तो 'हे माझे' म्हणून डोके बडवून घेत आहे. नास्तिक, वैदिक व दिगंबरवाद्यांच्याही वादसभांचे हे एकच खाद्य आहे."
तोंडेसीं तोंडा न पडे । बोलेंसीं बोला न घडे ।
इया युक्ती बडबडे । त्राय जाहली ॥ १७ ॥
नेणों कोणाचें हें स्थळ । परि कैसें अभिलाषाचें बळ ।
जे घरोघरीं कपाळ । पिटवीत असे ॥ १८ ॥
असा हा देह तत्त्वतः क्षेत्र म्हणजे शेत आहे. त्याला जाणणारा जीव हा क्षेत्रज्ञ आहे. पण येथेही मतभेद आहेत.
जीववाद्यांच्या मते हे जिवाच्या मालकीहक्काचे ठिकाण आहे.
एक म्हणती हें स्थळ । जीवाचेंचि समूळ ।
मग प्राण हें कूळ । तयाचें एथ ॥ २७ ॥
प्राण हे कूळ येथे लागवड करते. अपान व्यान उदान व समान असे चार भाऊ या शेतात खपतात. येथे अन्यायाचे बीज घातले तर कुकर्माचे पीक येते, किंवा सत्कर्माचेही बीज पेरता येते. तदनुसार अनंत जन्म सुखदु:खांचे भोग जीव भोगतो.
सांख्य तत्वज्ञानानुसार या शेतात उदासीन जीव केवळ वस्तीला उतरला आहे व प्राण येथला बलुतेदार आहे.
अहो जीवु एथ उखिता । वस्तीकरु वाटे जातां
आणि प्राणु हा बलौता । म्हणौनि जागे ॥ ३४ ॥
हे मूळ वतन प्रकृतीचे आहे .तिच्या घरचा हा परिवार आहे. सृष्टीतले त्रिगुण मेहनतीचे काम करतात .महत्तत्त्वाच्या खळ्यात काळरुपी बैलाकडून मळणी करून सूक्ष्मभूतांची रास उभी केली जाते.
मायावादी या शेताला व त्याच्या कसण्याला परमेश्वराचा सृष्टीसंकल्प जबाबदार आहे असे मानतात.
काळवादी ही काळाची सत्ता मानतात.सर्व आकारमात्र  हाच जणू एक महाकाय हत्ती, तो ज्या चवड्यामधे धरला गेला आहे, तो काळरूपी सिंहाचा पंजा केवढा पसरला आहे याचीच जाणीव करून देतात.
न्याहाळीं पां केव्हडा । पसरलासे चवडा ।
जो करूनियां माजिवडा । आकारगजु ॥ ६४ ॥
म्हणौनि काळाची सत्ता । हाचि बोलु निरुता ।
ऐसे वाद पंडुसुता । क्षेत्रालागीं ॥ ६५ ॥
अजूनही कित्येक मतमतांतरे असली तरी हे देहाचे शेत असल्याबद्दल मात्र सर्वांचे मतैक्य आहे. त्याचे स्वरूप ,मालकीहक्क, जिवाचे शेताशी नाते याबद्दल वेगवेगळ्या कल्पना आहेत. ज्ञानदेवांनी त्यांचा साक्षेपाने येथे समाचार घेतला आहे.
तेराव्या अध्यायातील पुढील सत्तराव्या ओवीमध्ये देहरुप शेताचे स्वरूप, त्याचे स्वामीत्व, जीवाचे तेथील नेमके नाते याविषयीची मतमतांतरे नोंदून झाल्यावर श्री भगवंत म्हणत आहेत की या ज्ञानाबद्दल नात्यांचा अंतिम निर्णय अद्याप झाला नाही.
परी ऐसें हें एवढें । कीं अमुकेयाचेंचि फुडें ।
हें कोणाही वरपडें । होयचिना ॥ ७० ॥
- आणि त्याहीपुढे एकशेअठ्ठावन्नाव्या ओवीत स्वयं भगवंतांनी ज्या क्षेत्राबद्दलचे वादविवाद कधीच क्षमत नाही त्याचे स्वरूप व व्याप्ती  सांगितली आहे.
पैं परतत्त्वाआरौतें । स्थावराआंतौतें ।
जें कांहीं होतें जातें । क्षेत्रचि हें ॥ १५८ ॥
परंतु परब्रह्माच्या अलीकडे व स्थावरापर्यंत धरून त्या दोहोंच्या दरम्यान जे जे काही उत्पन्न होते व नाहीसे होते, ते सर्व क्षेत्रच होय.
परब्रह्म वगळून स्थावर जंगम सृष्टी या क्षेत्राच्या म्हणजे शेताच्या कक्षेत येते. ज्ञानदेवांच्या मते एक परब्रह्मच क्षेत्रज्ञ व बाकी सारे क्षेत्र कारण परब्रह्माला वगळून सर्व स्थावर विस्तार हा क्षेत्रात मोडतो तेव्हा त्या क्षेत्राबाहेर राहिलेला एकटा परमपुरुषच त्याचा ज्ञाता ठरतो .क्षेत्र ही तर ज्ञेय वस्तू आहे.
बलवत्तर अशा ईश्वरी संकल्पातून या सर्वांची सुरुवात झाली..
निरालंबींची वाडी । होती त्रिभुवनायेवढी ।
हे तयाचिये जोडी । रूपा आली ॥ ४४ ॥

क्षेत्राची  छत्तीस तत्वे आणि त्यापैकी अव्यक्त ,मन,सुख-दुःख, चेतना, धृती व संघात याबद्दल  थोडक्यात माहिती
पंचमहाभूते, अहंकार ,बुद्धी ,अव्यक्त, दश इंद्रिये व मन ,द्वेष ,सुख-दुःख व इच्छा, चेतना, धृती ही क्षेत्राची तत्वे आहेत. या सर्व अतिशय अवघड अशा संकल्पनांचा ज्ञानदेवांनी तरलसुंदर अशा उपमा-प्रतिमांच्या सहाय्याने विस्तार केला आहे त्यापैकीच अव्यक्त ,मन,सुख-दुःख, चेतना, धृती व संघात या अतिशय महत्त्वाच्या संकल्पना आहेत.
सांख्यांनी ज्याला प्रकृती म्हटले आहे तेच येथे अव्यक्त या अभिधानाने व्यक्त झाले आहे.
पैं सांख्यांचिया सिद्धांतीं । प्रकृती जे महामती ।
तेचि एथें प्रस्तुतीं । अव्यक्त गा ॥ ९० ॥
देह पडल्यावर कृतकर्माच्या पोटात देहाची उपाधी नाहीशी होते, बीजामध्ये झाड थांबून राहिलेले असते, तंतूंमध्ये वस्त्रपण सामावलेले असते, त्याप्रमाणे महाभूते स्थूलत्व टाकून सूक्ष्मात जेथे लयास जातात,त्याला अव्यक्त असे नाव आहे.
कां बीजमुद्रेआंतु । थोके तरु समस्तु ।
कां वस्त्रपणे तंतु- । दशे राहे ॥ ९५ ॥
तैसे सांडोनियां स्थूळधर्म । महाभूतें भूतग्राम ।
लया जाती सूक्ष्म । होऊनि जेथे ॥ ९६ ॥

जे भ्रांतीचे कोठार आहे व जे वायुतत्वाच्या आतला गाभा आहे व ज्याने बुद्धीचे द्वार झाकले आहे,अशा मूर्तिमंत चंचल मनाचे अश्रुतपूर्व असे विश्लेषण ज्ञानदेव करतात.
जें भुलीचें कुहर । वायुतत्त्वाचें अंतर ।
बुद्धीचें द्वार । झाकविलें जेणें ॥ ११५ ॥
तें गा किरीटी मन । या बोला नाहीं आन ।
आतां विषयाभिधान । भेदू आइकें ॥ ११६ ॥

सुख आणि दुःख यांची फार थोडक्यात आणि नेमक्या शब्दात ज्ञानदेवांनी केलेली व्याख्या निरंतर लक्षात ठेवावी अशी आहे.
किंबहुना सोये । जीव आत्मयाची लाहे ।
तेथ जें होये । तया नाम सुख ॥ १३१ ॥

फार काय सांगावे ? जीवाला आत्म्याचा लाभ (ऐक्य) जेथे प्राप्त होतो, तेथे जी स्थिती होते त्य़ा स्थितीला सुख हे नाव आहे.
आणि ऐसी हे अवस्था । न जोडतां पार्था ।
जें जीजे तेंचि सर्वथा । दुःख जाणे ॥ १३२ ॥

आणि अर्जुना अशी ही स्थिती प्राप्त न होता जे जगणे तेच सर्वथा दु:ख आहे असे समज.
चेतना म्हणजे देहातील संगरहित केवळ साक्षीभूत अशी चैतन्याची सत्ता.ही शरीरामध्ये नखापासून शिखेपर्यंत सतत जागृत असते. जागृती, स्वप्न व सुषुप्ती तिन्ही अवस्थांमध्ये तिच्यात बदल होत नाही. मनबुद्धी आदि तिच्यामुळेच टवटवीत राहतात .जणू या मायेच्या वनात अवतरलेला हा वसंतऋतूच.
मनबुद्ध्यादि आघवीं । जियेचेनि टवटवीं ।
प्रकृतिवनमाधवीं । सदांचि जे ॥ १३६ ॥
जडाजडीं अंशीं । राहाटे जे सरिसी ।
ते चेतना गा तुजसी । लटिकें नाहीं ॥ १३७ ॥
राजाज्ञेने बलवान अशा परचक्राचा पराभव व्हावा , लोहचुंबकाच्या सान्निध्याने लोखंड चळावे, सूर्योदयाबरोबर जगाची रहाटी सुरू व्हावी तसेच चैतन्यामुळे जड वस्तूंना सजीवत्वाचा लाभ होतो.

धृती या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी आधी पंचतत्त्वांमध्ये स्वभावतःच असलेले वैर समजून घ्यावे लागेल. पृथ्वीला पाणी नाशते ,,पाण्याला तेज आटवते, तेजावर वायूची फुंकर पडते, गगनात वायूचा लोप होतो इत्यादि. आकाश तर कशातही शिरून स्वतः निराळे राहते .पण अशी ही द्वंदात्मक महाभूते देहरूपाने मात्र एकरस होऊन नांदतात. एकमेकांचे पोषण करतात.ही अप्राप्य मैत्री ज्या धैर्याच्या बळावर चालते हीच धृती .
ऐसीं पांचही भूतें । न साहती एकमेकांतें ।
कीं तियेंही ऐक्यातें । देहासी येती ॥ १४६ ॥
द्वंद्वाची उखिविखी । सोडूनि वसती एकीं ।
एकेकातें पोखी । निजगुणें गा ॥ १४७ ॥
ऐसें न मिळे तयां साजणें । चळे धैर्यें जेणें ।
तयां नांव म्हणें । धृती मी गा ॥ १४८ ॥
संघात म्हणजे समुदाय. पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, दशेंद्रिये व त्यांचे दहा विषय, मन ,इच्छा, द्वेष ,सुख,दुःख ,संघात ,चेतना, धृती अशा एकूण छत्तीस तत्वांचा जिवासहवर्तमान असलेला मेळावा म्हणजे संघात.हेच क्षेत्र!
आणि जीवेंसी पांडवा । या छत्तिसांचा मेळावा ।
तो हा एथ जाणावा । संघातु पैं गा ॥ १४९ ॥
एवं छत्तीसही भेद । सांगितले तुज विशद ।
यया येतुलियातें प्रसिद्ध । क्षेत्र म्हणिजे ॥ १५० ॥

ज्ञानाची लक्षणे: त्यापैकी अहिंसा, शुचित्व ,अव्यभिचारी भक्ती व वैराग्य याविषयी ज्ञानदेवांचे मत
अमानित्व (मोठेपणा मिरवण्याची नावड-"चातुर्य लपवी । महत्त्व हारवी ।
पिसेपण मिरवी । आवडोनि ॥"-अशी! ), अदंभित्व (दांभिकतेचा अभाव), अहिंसा, क्षांती (आक्रोशरहित क्षमा), आर्जव (सौजन्यपूर्ण सरलता) व आचार्योपासना (गुरुभक्ती), शुचिता( पवित्रता), स्थैर्य व आत्मनिग्रह ही ज्ञानाची लक्षणे आहेत. हे विशद करताना ज्ञानेश्वर एका सुंदर उपमेची योजना करतात.
कां भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव ।
नाना आचारगौरव । सुकुलीनाचें ॥ १८१ ॥...
तैसें हृदयींचेनि ज्ञानें । जियें देहीं उमटती चिन्हें ।
तियें सांगों आतां अवधानें । चांगें आइक ॥ १८४ ॥
जसा अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदुपणा सांगतो किंवा आचार हा चांगल्या कुलवानाचा थोरपणा दाखवतो,
- त्याप्रमाणे हृदयातील ज्ञानाने देहाच्या ठिकाणी जी लक्षणे उमटतात ती आता सांगतो. चांगले लक्ष देऊन ऐक.

अहिंसेचे निरुपण करताना ज्ञानदेवांनी तीव्र उपरोधाचा आश्रय करून प्रथम रूढ अहिंसेत लपलेल्या हिंसेचे प्रकटन केले आहे. अहिंसेवर मतमतांतरे तर विपुल  आहेत, पण कित्येकदा अशी अहिंसा ही जशा वृक्षाच्या फांद्या तोडून मग त्या शाखांनी वृक्षाच्या बुडाशी रक्षणार्थ कुंपण करावे तशी असते.
तरी अहिंसा बहुतीं परीं । बोलिली असे अवधारीं ।
आपुलालिया मतांतरीं । निरूपिली ॥ २१८ ॥
परी ते ऐसी देखा । जैशा खांडूनियां शाखा ।
मग तयाचिया बुडुखा । कूंप कीजे ॥ २१९ ॥
निरनिराळ्या  यज्ञांमध्ये होणारी पशुहिंसा , रोगनिवारणार्थ वनस्पतींचे केले जाणारे हाल अशा कृती सकृत्दर्शनी कल्याणकारी पण हिंसेला प्रचलित करणाऱ्या आहेत.
ज्या यज्ञांच्या सुरुवातीलाच पशुहिंसा असते ,त्या यज्ञांच्या याज्ञिकांना अहिंसेचे पैलतीर कसे दिसेल? हिंसेची पेरणी करून अहिंसा कशी उगवेव?या याज्ञिकांचे यज्ञनिमित्ताने विश्वमंगल करण्याच्या वृत्तीमागचे हे अज्ञानी धाडस आहे,असे ज्ञानदेव म्हणतात.
ज्ञानदेवांची अहिंसा इतकी सूक्ष्म व करुणापूर्ण आहे, की सामान्यांना तिची कल्पनाही करणे कठीण आहे.या ईश्वरी करूणेने ओथंबलेला ज्ञानी ,तरंगही ओलांडत नाही ,पाण्याचा साठा मोडत नाही, भूमीवरही अपार मार्दवाने पावले ठेवतो, गवतातूनही नवी जपून चालतो. शब्दाने  कोणाला दुखवत नाही.
पुष्पमाला झेलणे म्हणजे सूक्ष्म जीवांना गोफणीने हाणणे हे तो जाणतो! स्वतःच्या शरीरावरील केसात दडलेल्या सूक्ष्म जीवांना दुखापत होईल म्हणून तो स्वतःचेही शरीर कुरवाळत नाही, नखे कापत नाही, अवकाशालाही नख लागेल म्हणून लागतील म्हणून काळजी घेतो.
अशाप्रकारे सूक्ष्मजीवांची नकळत होणारी हत्या किंवा मनातल्या सूक्ष्म भावांवर होणारे आघातही तो टाळतो. जणू "जिवातळी जीव अंथरून" तो जगतो.
या अध्यायातील दोनशेपन्नासाव्या ओवीत खऱ्या आयुष्याने प्रेरित झालेल्या महात्म्याचा वर्तनाची प्रत फार वेगळी असते हे ज्ञानदेव स्पष्ट करतात.
ते वाट कृपेची करितु । ते दिशाचि स्नेह भरितु ।
जीवातळीं आंथरितु । आपुला जीवु ॥ २५० ॥
मानवांना मिठीत घेऊन त्याची नजर जीवमात्रांच्या कल्याणासाठी प्रार्थना करीत असते. क्षुद्र जीवजंतूही जणू त्याची नेणती मुले असतात. त्यांच्याही जाणिवेने तो दयार्द्र असतो. त्याचे चालणे बोलणे वागणे कुणाच्याही शरीराला किंवा मनाला इजा होणार नाही अशा हळुवारपणाने ओसंडलेले असते. अशा कल्याणकारी संतांचे वर्णन खूपच समरसून करताना एकाहून एक भावस्पर्शी ओव्या ज्ञानदेवांनी योजलेल्या आहेत." पतिव्रते यावे वार्धक्य जैसे "सारख्या सत्वोत्कट उपमा दिल्या आहेत .असा महात्मा चालताना ती वाटच कृपेची वाट होते. त्याच्या भ्रमणाची दिशाच प्रेममय  होते. या संकल्पना प्रेमाचे भव्य भरते अशा व्यक्तिच्या केवळ अस्तित्वाने चराचरात कसे दाटते ते सांगतात.
ओवीचा पुढील अर्धभाग प्रेमाचा सूक्ष्म अर्थ सांगतो. हे प्रेम किती सूक्ष्म असते तर प्रत्येक जीवमात्राच्या खाली जणू या महात्म्याने आपला जीव अंथरला असतो. आईने लहान बाळाच्या कोवळ्या तळव्याखाली पदर अंथरावा ,त्याला खडे खुपू नयेत म्हणून कासावीस असावे तशी, त्याहूनही श्रेष्ठ ही करुणामय प्रेमाची जात आहे.
पुढां स्नेह पाझरे । माघां चालती अक्षरें ।
शब्द पाठीं अवतरे । कृपा आधीं ॥ २६३ ॥
असा महात्मा कोणाशी बोलत असता पुढे प्रेम पाझरते व मागून अक्षरे चालतात आणि कृपा आधी प्रगट होते व शब्द मागून प्रगट होतात.
करुणा, अहिंसा या अतिपरिचित शब्दांचा हरवलेला अर्थ ज्ञानदेवांनी असा स्पष्ट केला आहे..

"शुचित्व" म्हणजे ज्ञानदेवांनी प्रतिपादिलेली अंतर्बाह्य पवित्रता. जणू कापराचे उचलेले शरीर व मन. शुद्ध श्वेत सुगंधी एकवट अनुभव देणारे. किंवा रत्नांचे संभार- आतून-बाहेरून तेजाळलेले, स्वच्छ, पैलूदार. किंवा सूर्यच- स्वयंप्रकाशाने सर्वत्र रसरसलेला. ज्ञानी हा तसाच आतून ज्ञानाचा उजाळा व इंद्रियांवर कर्माची शुद्धी वागवणारा असतो.
बाहेरीं कर्में क्षाळला । भितरीं ज्ञानें उजळला ।
इहीं दोहीं परीं आला । पाखाळा एका ॥ ४६४ ॥
स्फटिकगृही दीप डोलत असावा तसे त्यांचे निर्मल सुंदर तेजाळ अस्तित्व सर्वस्वी दोषरहित असते.
म्हणौनि सद्भाव जीवगत । बाहेरी दिसती फांकत ।
जे स्फटिकगृहींचे डोलत । दीप जैसे ॥ ४७६ ॥
एरवी बाह्य शुद्धीने  काय होणार? मढे शृंगारावे तसा तो प्रकार .येथे ज्ञानियांच्या मानसातील "अव्यभिचारी भक्ती"बद्दल किंवा गुरुभक्तीबद्दल ज्ञानदेवांनी  विस्ताराने भावविभोर वर्णन केले आहे. विरहिणीचे लक्ष पतीकडे असावे तसे ज्ञानीजनांचे गुरूकडे असते. त्या दिशेकडून येणार्‍या वार्‍यालाही ते लोटांगण घालतात. युगाएवढी त्यांना निमिषे गुरूविरहाने भासू लागतात. हृदयाच्या पवित्र आवारात ते गुरुमानसपूजा करतात .बोधरुप सूर्याचा उदय होताच बुद्धीरूप परडीत सात्विकभावाची फुले भरून गुरूला वाहतात. ऐक्याची पाकसिद्धी करतात व जिवाच्या शय्येवर गुरूंसह विराजतात. पाण्यात पोहणारे मासे होतात. प्रसाद म्हणून आकांक्षाही अशी की गुरूंचा परिवार, उपकरणे आपणच होऊन राहावे. गुरूंचे मंदिर तर आपणच व्हावेच, पण वाटेत ज्या उंबरठ्यांना त्यांचा पदस्पर्श होईल तेही आपणच व्हावे .पादुका आपणच व्हावे, त्या घालायला आपणच द्याव्यात.  एकूण गुरूंचा सर्व परिसर ,त्यांचे अवकाश व्यापून टाकावे हीच कामना.

"वैराग्य" हे ज्ञानलक्षण पुढील श्लोकातील गुणसमुच्चयात येते.( वैराग्य, अहंकार, जन्मदुःखाची जाणीव.)त्याविषयी ज्ञानदेव म्हणतात,"विषयाच्या संबंधाने ज्याच्या मनात वैराचा चांगला जिवंत पुरवठा असतो, -
आणि विषयांविखीं । वैराग्याची निकी ।
पुरवणी मानसीं कीं । जिती आथी ॥ ५१३ ॥
वमिलिया अन्ना । लाळ न घोंटी जेवीं रसना ।
कां आंग न सूये आलिंगना । प्रेताचिया ॥ ५१४ ॥
- "ओकलेले अन्न भक्षण करण्यास जीभ धजावत नाही, प्रेताचे आलिंगन घेण्यासाठी शरीर इच्छा करत नाही , विष खाणे रुचत नाही, वाघाच्या गुहेत जाणे, धगधगत्या लोहरसात उडी घेणे  किंवा अजगराची उशी करणे या क्रियांसाठी शरीर आणि मन रेटत नाही, तसाच जो विषयसुखाचा तीव्र तिटकारा तेच वैराग्य. विषय सुखाची इतकीच स्वर्गसुखाची ही किळस. जणू कुत्र्याच्या सडलेल्या मांसाला पाहून होणारी भावना म्हणजे धगधगीत वैराग्य.

घर, नातीगोती यांच्याबद्दलची ज्ञानी पुरुषाची भावना अस्तित्वाचे यथार्थ आकलन झाल्यामुळे अत्यंत स्थितप्रज्ञ अशा अलिप्ततेने भरलेली असते. वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे आस्था नसते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे स्वत:च्या घरावर किंचितही ममत्व नसते.आपली सावली आपल्याबरोबरच नेहमी असते. परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला आसक्ती नसते, त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते.
आणि त्याला जी मुलेबाळे झालेली असतात, त्यास तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो अथवा झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड जसे उदास असते तसा तो ज्ञानी मुलाबाळांसंबंधी उदासीन असतो.
कां झाडाची साउली । वाटे जातां मीनली ।
घरावरी तेतुली । आस्था नाहीं ॥ ५९५ ॥
साउली सरिसीच असे । परी असे हें नेणिजे जैसें ।
स्त्रियेचें तैसें । लोलुप्य नाहीं ॥ ५९६ ॥
आणि प्रजा जे जाली । तियें वस्ती कीर आलीं ।
कां गोरुवें बैसलीं । रुखातळीं ॥ ५९७ ॥

"जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम्" यावर समग्र भाष्य करताना ज्ञानदेवांनी यांतील विशेषतः जरेवर म्हणजेच वार्धक्यावर अतिशय चित्रदर्शी मनस्पर्शी असे भाष्य विस्ताराने केले आहे. वार्धक्याकडे बघण्याची त्यांची वृत्ती एका तत्त्वकठोर योग्याची आहे .वार्धक्य येण्याआधीच वार्धक्याबद्दल सावधान असणे त्यांना अत्यंत महत्त्वाचे वाटते. वार्धक्याचा त्यांनी अजिबात उदात्तीकरण केलेले नाही, उलट नित्य व्यवहारात दिसणारे दाखले देऊन वार्धक्याची भयावहता व अनुकंपनीय अवस्था त्यांनी स्पष्ट शब्दात रेखाटली आहे. आणि हे रेखाटन करूणेला आवाहन करण्यासाठी नसून धगधगीत वैराग्यभावनेला आवाहन करण्यासाठी आहे, हे विशेष.
ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणीं ।
देखे मग मनीं । विटे जो गा ॥ ५७६ ॥
म्हणे पाहे हें येईल । आणि आतांचें भोगितां जाईल ।
मग काय उरेल । हितालागीं ? ॥ ५७७ ॥
अशा प्रकारे ज्ञानलक्षणांवर अत्यंत सूक्ष्म विचारातून सिद्ध झालेली मते श्रीज्ञानदेवांनी मांडली आहेत.

"आचार्योपासने"चे ज्ञानदेवकृत नवविध स्वरूप -

मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी ।
विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ १० ॥
"श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं" अशा प्रकारची नवविधाभक्ति सांगितली गेलेली आहे."आचार्योपासने"वर भाष्य करताना ज्ञानदेवांनी हेच सूत्र लक्षात ठेवून विवरिले आहे.
श्रवणं कीर्तनं स्मरणं- गुरुगुणांचे श्रवण कीर्तन व गुरुंचे संततस्मरण हा ज्ञानदेवांच्या आचार्योपासनेचा स्थायीभाव आहे.विरहिणी स्त्रीला पती जिथे आहे तो प्रांत जसा सततच स्मरतो, तसे ज्ञानी पुरुषाचे लक्ष गुरूच्या देशाकडे लागलेले असते. तिकडून आलेल्या वाऱ्यालाही तो लोटांगण घालून "घरी चलावे" म्हणतो. इतक्या वेडावलेल्या मनस्थितीत तो गुरुस्मरणाने जाऊ शकतो. गुरुकुलाच्या नामसुखानेच तो फुगून जातो.
दास्यं पादसेवनं-गुरुसेवेसाठी झटणारा ज्ञानी पुरुष प्रेममय आसक्तीने गुरूंचे अंतरंग व बाह्यसृष्टी सर्वस्वी वेढून घेऊ इच्छितो. श्रीगुरूंचे मंदिर मीच होईन व तिथे दास्यही मीच करेन. त्यांचा पदस्पर्श होणारे उंबरठे मीच, आणि आणि द्वार व द्वारातले द्वारपालही  मीच.पादुका मीच होईन, व त्या घालावयासही मीच देईन. झारी मीच समोर धरेन व चूळ घेणारे तस्तही मीच होईन. श्रीगुरूंच्या सर्व संवेदना मीच व्यापून टाकेन. त्यांचे डोळे ममतेने जिथे पाहतील तिथले वस्तुमात्र मीच, त्यांच्या जिभेला गोड लागणारे रस मीच,त्यांच्या श्रुतींमधली शब्दसभा मीच. देह आहे तोवर सेवा तर करेनच, पण देह पडल्यावर त्या देहाची मातीही तिथेच विरवेन जिथे श्रीगुरूंची पायधूळ झडते आहे.अशाप्रकारे पादसेवन दास्यभक्तीचे परमस्वरूप ज्ञानी पुरुषाच्या मानसात प्रकटलेले ज्ञानेश्वरांनी दाखवले आहे.
अर्चनं वंदनं - ज्ञानी पुरुषाची पूजा व वंदनशैली मानसिक निकषांवर सर्वस्वी वेगळी असते. हृदयाच्या शुद्ध केलेल्या आवारात श्रीगुरूंची प्रतिष्ठापना केली जाते. बोधरुप सूर्याचा उदय होताच बुद्धीच्या परडीत सात्विकभावांची फुले भरून गुरूंना लाखोली वाहिली जाते.सांज, सकाळ व दुपार या तिन्ही वेळी जीवदशेचा धूप जाळून ज्ञानदीपाने ओवाळणी होते.ऐक्याची रससोय करून नैवेद्य सिद्ध होतो. हृदयातल्या प्रेमाची भरती जणू क्षीरसागराचे रूप घेते. गुरु ध्यानसुखाची शेषशय्या सजते. तिथे शेषशायी म्हणून गुरूंचे रूप तो पाहतो व मनोमन चरणसेवा करणारी लक्ष्मी बनतो. कधी गुरूला आई करून स्तनपान करीत आनंदाने त्यांच्या मांडीवर लोळतो. नाना भूमिकांमधून गुरुंकडे पहात तो प्रेमसुखाची वृद्धी करतो.
सख्यं आत्मनिवेदनं- अशाप्रकारे गुरूंच्या प्रेमाने पुष्ट झालेला, त्यांचा एकमात्र सखा होऊ पाहणारा, ध्यानीमनी त्यांनाच जपणारा व या प्रेमाचे निवेदनही त्यांनाच करणारा ज्ञानी पुरुष ज्ञानेश्वरांनी रेखाटलेला आहे.

अतिशयोक्तीच्या सीमेपर्यंत गेलेली या सर्व  संकल्पना-चित्रणातील भावोत्कटता ज्ञानेश्वरांच्या ठायी श्रीनिवृत्तीनाथांच्या स्मरणाने प्रकटली आहे, कारण या विवेचनाच्या शेवटी स्वतःकडे सर्व कमीपणा घेत मनामध्ये मात्र आपण गुरूप्रीतयुक्त आहोत, त्या गुरुसेवेच्या अपूर्त अभिलाषेतून हे बोलणे झाले असेही त्यांनी विनयाने म्हटले आहे.

अज्ञानाची सर्व लक्षणे -दंभित्व ,मानित्व,अनार्जव, आत्मज्ञानाचा अभाव
तेराव्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकात अज्ञानाची नकारात्मक व्याख्या केलेली आहे ."अध्यात्मज्ञाननित्यत्वं" या उपरोक्त श्लोकात अध्यात्मज्ञानात नित्य स्थिती व तत्त्वज्ञानातून सर्वत्र परमेश्वराला पाहणे हे सोडून सर्व अज्ञानच असे म्हटले आहे.
श्रीज्ञानेश्वरांनी याचा विस्तार करताना मानित्व,दंभित्व ,हिंसा, अक्षांती, अनार्जव,आचार्योपासनरहितता,अशौच,आत्मविनिग्रहाचा अभाव, संयमाचा अभाव, विषयासक्ती, अहंकार ,मृत्यूविषयी जाणिवेचा अभाव,व्याधी, वृद्धत्व व दुःखचिंतनाचा अभाव,स्त्रीमध्ये आत्यंतिक आसक्ती इतकेच नव्हे तर परमेश्वराच्या विविध रूपांची सकाम आराधना करण्याची वृत्ती (व्यभिचारिणी भक्त) ही सर्व अज्ञानलक्षणे सविस्तर निवेदिली आहेत.

दांभिकाचे हे नेमके वर्णन या ओव्यांमध्ये येते-
घाली विद्येचा पसारा । सूये सुकृताचा डांगोरा ।
करी तेतुलें मोहरा । स्फीतीचिया ॥ ६६० ॥
आंग वरिवरी चर्ची । जनातें अभ्यर्चितां वंची ।
तो जाण पां अज्ञानाची । खाणी एथ ॥ ६६१ ॥
"विद्येचा पसारा घालतो, केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटवतो आणि जेवढे म्हणून काही करतो, तेवढ्याचा मोर्चा कीर्तीकडे असतो. स्वत:च्या अंगाला भस्म, गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तर्‍हेने फासतो व लोक याची पूज्य म्हणून पूजा करत असता हा त्य़ास फसवीत रहातो, तो अज्ञानाची खाण आहे असे समज."

द्रव्य आणि स्त्रीबद्दलची आसक्ती याबाबतीत अज्ञानी पुरुषाला काहीही विधिनिषेध नसतो. ज्ञानदेव त्याला कुत्र्याची उपमा देतात! ज्याप्रमाणे कुत्रे पोटाला अन्न मिळण्याकरता एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे हा विचार करीत नाही, त्याप्रमाणे द्रव्याकरता जो आपले व परके अशी निवड जाणत नाही, कुत्र्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कुत्रीच्या संगाला योग्य किंवा अयोग्य जागा याचा विचार नसतो, त्याप्रमाणे स्त्रीसंगाविषयी जो काही विचार करत नाही तसेच त्याचे असते
जैसें पोटालागीं सुणें । उघडें झांकलें न म्हणे ।
तैसें आपलें परावें नेणे । द्रव्यालागीं ॥ ६८० ॥
इया ग्रामसिंहाचिया ठायीं । जैसा मिळणी ठावो अठावो नाहीं ।
तैसा स्त्रीविषयीं कांहीं । विचारीना ॥ ६८१ ॥


सामान्य अज्ञानी माणसाची व्यभिचारिणी भक्ती म्हणजे द्रव्यप्राप्ती किंवा इष्टप्राप्तीवर डोळे ठेवून केलेली सकाम आराधना. व्यभिचारिणी स्त्री वरवर नवऱ्याचे मन सांभाळते, पण ती दुसऱ्याबरोबरही जायला तयार असते .किंवा कुणबी नवीन शेते मांडून पहिल्या शेतांची हेळसांड करतो, तसाच हा अर्धवट प्रकार. ईश्वराच्या विविध रूपामध्ये विविध आकांक्षांपोटी धावणे ! घरी देव स्थापून यात्रेला जाणे! पर्वणी काळात पुन्हा तिसऱ्याच दैवताचे आराधन. चौथ्याला नवस करणे. श्राद्ध पक्षात पितरांची प्रतिष्ठा वाढवायची,एकादशीच्या दिवशी विष्णूचे सोपस्कार! तर नागपंचमीला नागाचे ! चतुर्थी आली की श्री गणेशाचा धावा .चतुर्दशीला जगदंबेचा! नवरात्रात चंडी, रविवारी भैरव, सोमवारी शंकर!  अखंड सुवासिनी म्हणजेच वेश्या ज्याप्रमाणे गावचे सर्व उंबरठे पुजते तसा स्वेच्छाचारी भक्त सर्वत्र धावाधाव करतो.
ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे क्षणभरी ।
अवघेन गांवद्वारीं । अहेव जैसी ॥ ८२२ ॥
अत्यंत कठोर शब्दात या व्यभिचारी भक्तीची निर्भर्त्सना करताना श्रीज्ञानेश्वरांनी सामान्यजनांना अध्यात्म म्हणून प्रसृत झालेल्या काही गोष्टी अध्यात्मकक्षेत येत तर नाहीतच , उलट अज्ञानाचेच पोषण करतात हे समजावलेले आहे. त्यांना सावध केले आहे.
मानित्व- प्रतिष्ठेकरिता ज्याने प्राण धारण केले, ज्याने मानाची इच्छा केली, सत्कारांच्या योगाने जो संतुष्ट झाला, त्याच्या ठायी मानित्व आहे हे ओळखावे.
दंभित्व -देवळात खराटा उभा करून ठेवावा त्याप्रमाणे वाचारूप पिंपळावर जो स्वधर्माची मोळी बांधून ठेवतो, विद्येचे प्रदर्शन मांडून सत्कृत्यांची दवंडी पिटवतो, करावयाचे ते सारे प्रतिष्ठाप्राप्तीकरिताच करतो तो दंभित्वाने परिपूर्ण दांभिक म्हणूनच ओळखावा.
अनार्जव- मनामध्ये अढी  ठेवून वरवर वाचा व दृष्टी मात्र मोकळी ठेवणे, ज्याला जिवाभावाने मिळायचे त्याला पाठ दाखवणे, पारध्याने चारा खाऊ घालावा तसे वर्तन करून सज्जनांचे हृदय विटवून सोडणे, गारेला शेवाळीने गुंडाळावे तशी किंवा पिकलेल्या निंबोणीसारखी बाह्यक्रियाच काय ती शोभिवंत असणे ही अनार्जवाची लक्षणे होत.
आत्मज्ञानाचा अभाव -आत्मज्ञानाचा अभाव म्हणजेच आत्मविनिग्रहाचा अभाव. ओढ्याचा लोंढा वाळूच्या बांधाला ऐकत नाही तसे निषिद्धाचे भय नसणे, व्रते झुगारणे,स्वधर्म लाथाडणे, पापाचा कंटाळा न करणे, लज्जेचे कुंपण तोडून टाकणे, कुलधर्माला विन्मुख होणे ही आत्मज्ञानाच्या अभावाची लक्षणे आहेत. आंधळ्या हत्तीने माजावर आल्यासारखा किंवा डोंगराला वणवा लागल्यासारखा अशांचा व्यवहार असतो.अन्नछत्रातील रांधप, वेश्येचे सौंदर्य किंवा धर्मशाळेच्या छपरासारखे तिथे सर्व इष्ट अनिष्ट गोष्टींना खुले निमंत्रण असते. जन्मापासून मरणापर्यंत विषयाच्या आशेने अनेक व्यथा भोगत त्यांचा त्रासही न मानता उलट अधिकाधिक त्यावर प्रेम करणारे असे हे अज्ञानी जीव एका आत्मज्ञानाच्या अभावामुळे सर्व आयुष्य ठोकरून टाकतात.

ज्ञानदेवांचा प्रकृतीपुरुष विवेक
"प्रकृतिं पुरुषं चैव"या एकोणिसाव्या श्लोकात निरूपिलेल्या प्रकृतीपुरुष विवेकाबद्दल ज्ञानदेव म्हणतात ,"दिवसाबरोबर ज्याप्रमाणे रात्र असते, त्याप्रमाणे अनादि पुरुषाबरोबर त्याची छाया प्रकृती ही असतेच. धान्याबरोबर नि:सत्व कोंडा असतोच तद्वत ही दोघे परस्परांशी जुळलेली आहेत. क्षेत्र म्हणून निवेदिली गेलेली ती प्रकृती व क्षेत्रज्ञ तो पुरुष असे जाणावे.
पैं क्षेत्र येणें नांवें । जें सांगितलें आघवें ।
तेंचि एथ जाणावें । प्रकृति हे गा ॥ ९६३ ॥
आणि क्षेत्रज्ञ ऐसें । जयातें म्हणितलें असे ।
तो पुरुष हें अनारिसे । न बोलों घेईं ॥ ९६४ ॥
पुरुष हा केवळ सत्तास्वरूप व त्यातून होणाऱ्या क्रिया- प्रकृतीस्वरूप. बुद्धी, इंद्रिये ,अंत:करण इत्यादि विकार सत्वादि त्रिगुण हिच्याठायी उद्भवतात. कार्यकारणकर्तृत्वाचे मूळ ही प्रकृतीच. सत्वगुणाच्या, रजोगुणाच्या व तमोगुणाच्या आश्रयाने ज्या क्रिया होतात तो प्रकृतीचा उद्योग व पुरुषांचा भोग असतो!  येथे स्त्री मिळवते व पुरुष खातो! या दोघांचा संग होण्याचा काही मार्ग नसतानाही प्रकृतीरुप स्त्री संपूर्ण सृष्टी प्रसवते आणि तो पुरुष मात्र निराकार ,पांगळा, कफल्लक आणि म्हाताऱ्यातला  म्हातारा. पुरुष हे फक्त नाव धारण करणारा ,एरवी कर्तेपणाच्या दृष्टीने नपुंसक किंवा स्त्रीच. डोळे, हात, पाय ,वर्ण नसलेला हा अकर्ता उदासीन पुरुष आपल्या पतिव्रतेच्या उद्योगामुळे सारे भोग भोगतो.
अर्जुना कांहींचि जेथ नाहीं । तो प्रकृतीचा भर्ता पाहीं ।
कीं भोगणें ऐसयाही । सुखदुःखांचें ॥ ९८४ ॥
तो तरी अकर्ता । उदासु अभोक्ता ।
परी इया पतिव्रता । भोगविजे ॥ ९८५ ॥
हीच त्याची महाशक्तिशालिनी माया. हे भ्रमाचे मोठे बेट ,व्याप्तीचे साक्षात रूप, विकारांची जननी. ही कामाचा मंडप,  मोहवनातील वसंतशोभा.
हे भ्रमाचे महाद्वीप । व्याप्तीचें रूप ।
विकार उमप । इया केले ॥ ९९१ ॥
हे कामाची मांडवी । हे मोहवनींची माधवी ।
इये प्रसिद्धचि दैवी । माया हे नाम ॥ ९९२ ॥
वेदशास्त्रांची ,कलांची, सकलविद्यांची खाण,ही  नादब्रह्माची टाकसाळ. उत्पत्ती व प्रलय हे हिचे दिनारंभ-दिनांत. ही निराकाराची गृहलक्ष्मी, थोर सौभाग्यवती.ही निराकाराची साकारशोभा,नामरहिताचे नाम, जन्मरहिताचे जन्म ,निर्गुणाचे गुण, पादरहिताचे पाद,भावरहिताचे श्रवण.
तया निराकाराचा आकारु । तया निर्व्यापाराचा व्यापारु ।
निरहंकाराचा अहंकारु । होऊनि ठाके ॥ १००३ ॥
तया अनामाचें नाम । तया अजाचें जन्म ।
आपण होय कर्म- । क्रिया तया ॥ १००४ ॥
अमावास्येला चंद्र हरवावा तसा तो पुरुष आपल्या स्त्रीच्या विस्तारात हरवून जातो. जुईच्या वेलात खांब दिसेनासा व्हावा तसा हा त्या नाजूक पण सर्वशक्तिमान पाशात दिसेनासा होतो. देहात परमात्मा म्हणून गुप्तपणे नांदतो तो हाच पुरुष.
याप्रकारे प्रकृती-पुरूषविवेक जाणून ज्याची बुद्धी शुद्ध झाली, तो जन्म-मरणाच्या चक्रातून सुटला असे समजावे असे श्रीज्ञानेश्वरांनी या विवेकविचारांचे महत्त्व वर्णन केले आहे.
तेणें पाडें अर्जुना । प्रकृतिपुरुषविवंचना ।
जयाचिया मना । गोचर जाहली ॥ १०३२ ॥
तो शरीराचेनि मेळें । करूं कां कर्में सकळें ।
परी आकाश धुई न मैळे । तैसा असे ॥ १०३३ ॥

अशाप्रकारे अतिशय अवघड अशा आध्यात्मिक संकल्पनांचे  विवरण पूर्ण  रसमाधुरीने ज्ञानेश्वरांनी तेराव्या अध्यायात केले आहे .
तसेच या अध्यायात अनेक महत्वाची सविस्तृत वैशिष्ट्यपूर्ण भाष्ये आलेली आहेत. या सर्वांचा थोडक्यात समाचार घेणे त्यामुळेच कठीण आहे .

या अध्यायाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे यात  अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरांनी अतिशय कठोर भाषेचा अवलंब केलेला आहे आणि कित्येकदा या वर्णनांत मोकळेपणाने बीभत्सरसाचा परिपोष केलेला आहे, जे त्यांच्या एरवीच्या मृदुतेच्या अगदी विरुद्ध आहे, पण त्यांच्या अद्भुत परिपक्वतेची साक्ष देणारे आहे. उदाहरणार्थ या अध्यायात आलेले "वार्धक्य" या विषयावरील विस्ताराने केलेले भाष्य, तसेच अज्ञानलक्षणांमधील अनेक लक्षणे, ज्यात व्यभिचारिणी भक्तीचा समावेश आहे.

दैनंदिन जीवनातील विपुल उपमा आणि मार्मिक निरीक्षणे, भाषेचे अत्यंत विकसित सौंदर्य या सर्वांमुळे ज्ञानेश्वरांनी केलेली ही तत्त्वचर्चा अमृताची ठेव ठरली आहे.

भारती बिर्जे-डिग्गीकर  

Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –