ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य  परिचय- अध्याय  पंधरावा- पुरुषोत्तमयोग

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय-अध्याय पंधरावा- पुरुषोत्तमयोग-


"पुरुषोत्तम" म्हणजे साक्षात ईश्वराचे नाव धारण करणारा हा अध्याय. यात प्रपंचरुपी वर ब्रह्मात मुळे असलेल्या व खाली विस्तारलेल्या अश्वत्थवृक्षाचे भव्य उदात्त असे रूपक आहे, ज्याचा अधिकच अद्भुतरम्य विस्तार ज्ञानदेवांनी आपल्या शैलीत केला आहे. त्यातच जन्मोजन्म अविरत भरकटणाऱ्या जीवात्म्याचे  चित्रण तशाच प्रतिभाश्रीमंत शब्दात या अध्यायात आले आहे .या सर्वावर पसरलेल्या प्रभुप्रभावाचे विश्लेषण आहे, आणि सर्वात शेवटी या विचित्र संसारनगरात राहणाऱ्या क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम या पुरुषांचे आकलन आहे. आपल्या नेहमीच्या रीतीनुसार गुरुपूजनाने ज्ञानदेवांनी अध्यायनिरूपणाची सुरुवात केली आहे.

माऊलींनी केलेली श्रीगुरुंची मानसपूजा-
गीतेच्या प्रत्येकच अध्यायाच्या निरूपणाची सुरुवात श्रीगुरुपूजनाने ज्ञानदेवांनी केलेली आहे, असे असले तरी या पंधराव्या अध्यायाच्या आरंभीच्या ज्ञानेश्वरांच्या श्रीगुरुमानसपूजनाच्या ओव्या या मानसपूजेचा वस्तुपाठ म्हणाव्यात अशा आहेत. प्रीतीयुक्त भक्तीची चरम सीमा ज्ञानेश्वरांनी इथे गाठलेली आहे.
आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें ।
वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूंचीं ॥ १ ॥
ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुड्मुळी ।
भरूनियां पुष्पांजुळी । अर्घ्यु देवों ॥ २ ॥...
"आता या हृदयाचा चौरंग करून वर श्रीगुरूंच्या पावलांची प्रतिष्ठापना करू. ऐक्यभावाचीच ओंजळ करू, कारण ओंजळीत दोन तळवे अगदी एकत्र एकपणे जुळतात. आणि त्या ओंजळीत सर्व इंद्रियांच्या उमलत्या कळ्या भरून श्री गुरुचरणी अर्पित करू.अनन्यभावनेच्या शुद्ध पाण्याने धुतलेली श्रीगुरुनिष्ठ वासना हे चंदनाचे बोट त्या पावलांना लावू.प्रेमाचे सोने गाळून त्याची सुंदर पैंजणे त्या सुकुमार पदकमलांना लेववू. अव्यभिचारी भक्तीची घट्ट जोडवी त्या बोटांमध्ये घालू. आनंदाच्या सुगंधाने परिमळणारे सात्त्विकाचे उत्फुल्ल कमळ त्या पावलांवर ठेवू. मग तेथे अहंचा धूप जाळू.नाहंच्या तेजाने दीप प्रज्वलित करून ओवाळणी करू.सामरस्याची कधी न सुटणारी मिठी देऊ. माझे शरीर व मन यांच्या खडावा या श्रीगुरुचरणांना करून भोग व मोक्षाचे निंबलोण करून या पावलांवरून उतरू!"
या मानसपूजनाला अपेक्षित असलेला प्रसाद असा आहे की पूजनोत्तर श्रीगुरूंची कृपा झाली की ज्ञानेश्वरांची वाणी आशीर्वचित होणार आहे ,जशी की सूर्याने स्वीकारलेली पूर्व दिशा.
सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ॥ १२ ॥
ज्याप्रमाणे सूर्याने पूर्वदिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे (श्रीगुरूंच्या आशीर्वादाने) वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते.
जें ज्ञानासि न चोजवे । ध्यानासिही जें नागवे ।
तें अगोचर फावे । गोठीमाजीं ॥ १६ ॥
तरी बहु बोलूं काई । आजि तें आनीं ठाईं ।
मातेंवाचूनि नाहीं । ज्ञानदेवो म्हणे ॥ १८ ॥
जे ज्ञानाला कळत नाही ध्यानासही सापडत नाही असे जे निर्विषय ब्रह्म ते (भाग्यवान शिष्याच्या) बोलण्यात सापडते.गुरूंच्या संबंधाने फार काय सांगू ? आज ते दैव माझ्याशिवाय दुसर्‍या कुणाच्याच ठिकाणी नाही असे ज्ञानदेव या मानसपूजेचा समारोप करताना म्हणतात.

प्रपंचरुपी उर्ध्वमूल वृक्षाचे स्वरूप

"उर्ध्वमूलमध:शाख"  या गीतेतील श्रीकृष्णवचनाचा विस्तार करताना श्रीज्ञानेश्वर म्हणतात-
उपडिलें कवतिकें । झाड येरिमोहरा ठाके ।
तें वेगें जैसें सुके । तैसें हें नोहे ॥ ४१ ॥
यातें एकेपरी । रूपकाचिया कुसरी ।
सारीतसे वारी । संसाराची ॥ ४२ ॥
सहज उन्मळून पडलेले झाड, शेंडा खाली व बूड वर असे पडले असता ते लवकर सुकते, त्याप्रमाणे हा संसारवृक्ष नाही,तर यात एका प्रकारच्या (म्हणजे संसार हाच कोणी एक, बूड वर व शेंडा खाली असलेला वृक्ष आहे अशा) रूपकाच्या चातुर्याने भगवान जन्ममृत्युरूपी संसाराची येरझार संपवतात.
पंधराव्या अध्यायात संसाराचे मिथ्यत्व परिपूर्णतेने पटवून देणारे वृक्षाकाराचे हे असे  रूपक भगवंतांनी गीतेत योजिले आहे.आपण आपल्या स्वरूपाच्या घराकडे येत असतांना जे विश्वरूपी दृश्य मधे अडथळा करते ,ते म्हणजे एक दृश्य नसून जणू एक प्रकारचा मोठा बळावलेला वृक्ष आहे .
अगा पैं पंडुकुमरा । येतां स्वरूपाचिया घरा ।
करीतसे आडवारा । विश्वाभासु जो ॥ ४६ ॥
तो हा जगडंबरु । नोहे येथ संसारु ।
हा जाणिजे महातरु । थांवला असे ॥ ४७ ॥
हा संपूर्ण अवकाश व्यापून एखाद्या पिंपळासारखा किंवा वडासारखा नुसता फोफावत सुटला आहे. याचे नाव अश्वत्थ. अश्वत्थ म्हणजे तसे तर पिंपळ. पण याच्या नावाचा तो संदर्भ नाही.अ-श्वत्थ म्हणजे क्षणिक या अर्थी हे नामाभिधान आहे.
वर आणि खाली हा या वृक्षाच्या मूल-शाखादिकांच्या वर्णनात येणारा भाग एकदा समजला, की एरवी त्याला खाली-वर आणि मध्ये असा भेदच नाही. सत्य-वस्तू परमात्मा तोच या वृक्षाचे तत्वतः उर्ध्वमूल आहे. त्या अर्थी याचे मूळ वर परमात्म्यात रुजले आहे .ब्रह्मामध्ये हा विस्मरणशील अज्ञानाचा कांदा बीजरूपाने तयार झाला आहे. निर्मळ आत्म्यात रुजलेल्या या कांद्याला आळे आहे ते मायेचे.
तर या संसारवृक्षाच्या मुळाची माया म्हणून जी प्रसिद्ध आहे ती नसलेलीच आहे,ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे हे  नुसते शब्दच आहेत .
ऐसें वस्तु जें साचें । तें ऊर्ध्व गा यया तरूचें ।
तेथ आर घेणें मूळाचें । तें ऐसें असे ॥ ७९ ॥
तरी माया ऐसी ख्याती । नसतीच यया आथी ।
कां वांझेची संतती । वानणें जैशी ॥ ८० ॥
मग अपार संदेहांचे पहिलेवहिले अंकुर जोमाने न वाढले तरच नवल. पहिले नाजूक पान उमलते हे चित्तवृत्तीचे. मग सत्व-रज-तमाचे अधोमुखी त्रिदल फुटते. त्यातूनच बुद्धीचे डहाळी फोफावते व भेदरुपी पानांची वृद्धी करते. मनाच्या पाण्यावर पाने टवटवू लागतात. चित्त-चतुष्ट्याचे कोवळे पल्लव डहाळ्यांवर झुलू लागतात. आकाश ,वायू, तेज, आप ,पृथ्वी हे पंचमहाभूतांचे फोक सरळ जातात. सूक्ष्म भूते हे अंतर्साल व पोटातील कोवळी पाने असतात. श्रोत्रांची वाढ झाल्यावर शब्दांचे अंकुर फुटतात. स्पर्शांकुर संभवले की विकारांचा माज वाढतो. रूपपल्लवी झुलू लागली की व्यामोह रसार्द्र होतो. हा रसयुक्त पाला जिभेच्या शेंड्यांना जोर धरावयास मदत करतो.गंधाला कोंब फुटले की घ्राणाची फांदी जोर  धरते. लोभाचा आनंद सगळीकडे भरून राहतो.
याप्रमाणे ब्रह्मच या अज्ञानमूळ असलेल्या संसारवृक्षाच्या आकाराने तयार होते, पुढे पुढे विस्तारत जाते .स्वप्नामध्ये आपण एकटेच सारा परिवार बनतो ,तसेच काहीसे.
आतां याचा हाचि विस्तारु । हाचि यया पैसारु ।
जैसा आपणपें स्वप्नीं परिवारु । येकाकिया ॥ १०८ ॥
जसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार होतो, त्याप्रमाणे एकाकी जे ब्रह्म त्याचा सर्व विस्तार हाच संसारवृक्ष आहे व त्याचा सर्व अवकाश हाच आहे.
अश्वत्थ हे नाव क्षणभंगुरतेमुळे हे मागे आलेच. ही क्षणभंगुरता कशी ?तर मेघांमुळे समुद्राची घट होणे व नदीमुखातून पाण्याची वाढ होणे या अविरत चक्रात समुद्रजलभार आहे तसाच भासतो, पण तसा नसतो.
आणीकुही येकु थोरु । यया अव्ययत्वाचा डगरु ।
आथी परी तो भीतरु । ऐसा आहे ॥ ११८ ॥
जैसा मेघांचेनि तोंडें । सिंधु एके आंगें काढे ।
आणि नदी येरीकडे । भरितीच असती ॥ ११९ ॥
इथे ज्ञानदेव अर्थान्वयनासाठी इतरही अनुपम उपमांचा वर्षाव करतात .दान करणारा पुरुष द्रव्याचा व्यय करून संचयी असतो,त्याप्रमाणे हा वृक्ष नाशिवंततेतच अव्यय आहे.एका देहाचा देठ तुटेतो दुसऱ्या देहाचा मोड उगवतो. एक वर्ष जुने होईतो नवे वर्ष समोर येते. कलियुगाचे साल गळून पडेतो कृतयुगाची ओली साल आतून जोर धरते. हातातला पलिता गरगर फिरवला म्हणजे तेजाचे वर्तुळ भासमान होते, पण खरे तर तिथे काहीच नसते.
अशा प्रकारे अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाचा सरस व  सार्थ विस्तार  ज्ञानेश्वरांनी केला आहे.

हा वृक्ष उन्मळून टाकण्यासाठी ज्ञानेश्वरांनी सुचवलेला खात्रीलायक उपाय-

"अश्वत्थमेन सुविरूढमूलमसंगशस्त्रेन दृढेन छित्वा" या श्रीहरीवचनाचा अर्थ सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात,
ऐसा गाढा आणि अफाटु । आतां कोण करी यया शेवटु ।
तरी झणीं हा हळुवटु । धरिसी भावो ॥ २१३ ॥
परी हा उन्मूळावया दोषें । येथ सायासचि कायिसे ।
काय बाळा बागुल देशें । दवडावा आहे ? ॥ २१४ ॥
"अर्जुना !आता हा एवढा प्रबळ विस्तारशाली प्रपंच वृक्ष छेदावा तरी कसा या क्षुद्र विचाराने तुझा मनात घर केले असेलच. ब्रह्मदेव ही ज्याची टोकाची फांदी ,व मूळ निराकार उर्ध्वात हरवलेले,खालच्या शाखा स्थावररूपी तर मधल्या शाखांवर मनुष्यलोक वसलेले- अशा घनदाट अफाट वृक्षाचे निर्मूलन कोण्या शक्तिधराने करावे? कोणत्या हत्याराने?  तर अर्जुना,हा उपटण्यासाठी कसले कष्ट ?बाळाचा बागुलबोवा दुसऱ्या देशी पाठवावा लागतो का ?गंधर्वांचे किल्ले पाडावे लागतात का?सशाचे शिंग मोडावे लागते का? जे खरे नाही ते खोटे पाडण्यास काय सायास करावे? याच्या मुळे-डहाळ्यांचा गुंता म्हणजे वांझेच्या लेकरांनी गजबजलेले घर.
मूळबीज अविद्या नष्ट करणारे ज्ञान जेव्हा मनात जागे होते, तेव्हाच याच्या अस्तित्वाच्या अंताचा क्षण येतो. हा अनादि आहे असे म्हणतात, तोही या विलक्षण रीतीनेच. जो सत्यभाषेत अस्तित्वातच येत नाही, त्याला आदिपणा कुठून असणार ?वांझेच्या मुलाची जन्मकुंडली मांडण्याचाच हा प्रकार.या अर्थाने त्याला आदिअंतही नाहीत.
तेवींचि हा अनादी । ऐसी ही आथी शाब्दी ।
तो आळु नोहे अनुरोधी । बोलातें या ॥ २३० ॥
जें संसारवृक्षाच्या ठायीं । साचोकार तंव नाहीं ।
मा नाहीं तया आदि काई । कोण होईल ? ॥ २३१ ॥
त्याची स्थितीही आभासमय.मृगजळ कुठे उगम पावते ?कोणत्या समुद्रजळात मिळते? मधल्या मध्ये उगीच भासते मात्र.
अशा प्रकारे ज्याला आदि नाही, अंत नाही अस्तित्वही नाही त्याला उपटून काढण्यासाठी सायासही नाहीत त्याच्या निवारणासाठी आत्मज्ञानाचे शस्त्र हे एकच पुरेसे आहे.इतर सर्व उपायांनी याला बांधलेच जाणे होते. त्याच्या फांद्यांच्या गुंत्यात हरवून जाणे होते. एका ज्ञानावाचून त्याच्या नाशाकरता जितके उपाय करावेत त्या उपायांच्या योगाने या संसारवृक्षात अधिक अडकून जाणे मात्र होते. मग या संसारवृक्षाच्या फांद्या-फांद्यांनी खाली व वर किती फिरावे ? त्या फिरण्याला अंतच नाही. म्हणून या संसारवृक्षाचे अज्ञानरूपी मूळच यथार्थज्ञानाने तोडून टाकावे.
वांचूणि ज्ञानेवीण ऐकें । उपाय करिसी जितुके ।
तिहीं गुंफसि अधिकें । रुखीं इये ॥ २४९ ॥
मग किती खांदोखांदीं । यया हिंडावें ऊर्ध्वीं अधीं ।
म्हणौनि मूळचि अज्ञान छेदीं । सम्यक् ज्ञानें ॥ २५० ॥
स्वप्नातील भीतीला जागे होणे हेच औषध आहे, त्याप्रमाणे अज्ञानरूपी मूळ असलेल्या याला नाश करण्यास समर्थ एक ज्ञानखड्गच आहे.पण यासाठी आत्मज्ञानाची तलवार उचलणे ही सोपी गोष्ट नाही. ती उचलण्यासाठी बुद्धीला धारदार वैराग्याचे बळ हवे .
म्हणौनि स्वप्नींचिया घाया । ओखद चेवोचि धनंजया ।
तेवीं अज्ञानमूळा यया । ज्ञानचि खड्ग ॥ २५४ ॥
परी तेचि लीला परजवे । तैसें वैराग्याचें नवें ।
अभंगबळ होआवें । बुद्धीसी गा ॥ २५५ ॥
देह-अहंकाराच्या म्यानातून हे शस्त्र उपसावे लागते. विवेकाच्या सहाणीवर पाजळावे लागते. ब्रह्म म्हणजेच आपण या बोधाची तेजस्वी धार त्याला आणावी लागते, आणि निश्चयाची घट्ट मूठ वळावी लागते. निजध्यासाच्या तादात्म्यतेने ते शस्त्र आपल्या संकल्पाने भारून टाकून नंतर बलशाली वार करावा लागतो.
अशा रीतीने अश्वत्थवृक्षाचा अंत करण्याचा उपाय ज्ञानेश्वर वर्णितात.

अव्ययपद व त्याचे लक्षण-

विरागी पुरुषांचे मन अव्यय पदाला जाऊन अंतिमतः स्थिरावते. अव्ययपद म्हणजे ज्या पदाला नाश नाही, ते पद. डोळ्यांनी पहावे ,ज्ञानाने जाणावे असे हे पद नाही. या पदाचे वर्णन "न तद्भासयते सूर्यो" या श्लोकात श्रीभगवंतांनी केले आहे. ते निरूपिताना ज्ञानेश्वर म्हणतात-
चंद्र सूर्याची महत्तेजे ज्याच्या आधाराने प्रकाशतात, ती (ब्रह्म)वस्तू किंवा तो मूळ तेजाचा पुंज सर्व प्राणिमात्रांच्या ठायी प्रकाशत असतो. चंद्रसूर्य हे त्याचे केवळ कवडसे होत.
ते वस्तु कीं तेजोराशी । सर्वभूतात्मक सरिसी ।
चंद्रसूर्याच्या मानसीं । प्रकाशे जे ॥ ३१२ ॥
म्हणौनि चंद्रसूर्य कडवसां । पडती वस्तूच्या प्रकाशा ।
यालागीं तेज जें तेजसा । तें वस्तूचें आंग ॥ ३१३ ॥
"सूर्य उगवला की चंद्रासहवर्तमान नक्षत्रे नाहीशी होतात, त्याप्रमाणे ज्या तेजाचा प्रभाव प्रकटला की चंद्रसूर्यांसह वर्तमान हे जगही नाहीसे होते, कोणताच आभास उरत नाही, तेच माझे वतनदारीचे घर, हे ध्यानात ठेव "असे भगवंत अर्जुनाला येथे म्हणत आहेत. महासागराला मिळणारे ओघ किंवा समुद्रात टाकलेली मिठाची हत्तीण माघारी येत नाही, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने जे परमेश्वराशी एकरूप झाले, त्यांची परतीची वाट खुंटते.

येथे श्रीकृष्णांना अर्जुनाने अडवून एक मार्मिक प्रश्न विचारला. "भगवंता ,फुलांवर गेलेले भ्रमर काय फुले होऊन बसतात? तुझे भक्त तूच कसे होतील? निशाणावर सोडलेले बाण भात्यात परत यावेत तसे त्यांनी अव्ययपदाला पोचून परतले पाहिजे.निदान बुद्धीला तरी असेच वाटते, व तू सांगतोस ते पटत नाही."
तरी देवेंसि स्वयें एक होती । मग माघौते जे न येती ।
ते देवेंसि भिन्न आथी । कीं अभिन्न जी ॥ ३२२ ॥
जरी भिन्नचि अनादिसिद्ध । तरी न येती हें असंबद्ध ।
जे फुलां गेलें षट्पद । ते फुलेंचि होती पां ॥ ३२३ ॥
पैं लक्ष्याहूनि अनारिसे । बाण लक्ष्यीं शिवोनि जैसें ।
मागुते पडती तैसे । येतीचि ते ॥ ३२४ ॥
या शंकेचा तर्कशुद्ध रीतीने निरास करताना श्रीभगवंत म्हणाले," अव्ययपदाला पोचून माघारी येणारे एकाच वेळी माझ्यापासून भिन्न व अभिन्न असतात. वरवर भिन्न आतून अभिन्न .हे नाते समुद्र व लाटा ,किंवा सोने व अलंकारांचे आहे. फूल व भ्रमराचे नव्हे."
अशा प्रकारे अव्ययपदाच्या लक्षणांचे वर्णन पंधराव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी केले  आहे.

जीवात्म्याचे स्वरूप व कार्य-

"ममैवांशो जीवलोके" या श्लोकात वर्णिलेले जीवात्म्याचे स्वरूप व कार्य ज्ञानेश्वरांनी सोप्या शब्दात सांगितले आहे-
- पवित्र आत्मा प्रकृतीशी ऐक्य पावून प्रकृतीचा अधिकार स्वीकारतो. मनासहवर्तमान सहा इंद्रिये, श्रोत्रादि प्रकृतीकार्ये आपली म्हणून व्यवहार करू लागतो. स्वप्नामध्ये संन्याशी स्वतःच स्वतःचे कुटुंब होतो, व त्याच्या मोहाने सैरावैरा पळत सुटतो तसा स्व-स्वरूपाचे विस्मरण पडलेला आत्मा प्रकृतीत स्वतःला समजून प्रकृतीसारखेच वागू लागतो. तिच्या भजनी लागतो.
पैं मनादि साही इंद्रियें । श्रोत्रादि प्रकृतिकार्यें ।
तियें माझीं म्हणौनि होये । व्यापारारूढ ॥ ३५२ ॥
जैसें स्वप्नीं परिव्राजें । आपणपयां आपण कुटुंब होईजे ।
मग तयाचेनि धांविजे । मोहें सैरा ॥ ३५३ ॥
मग तो जीवात्मा मनाच्या रथात आरूढ होतो .श्रवणाच्या द्वारातून बाहेर पडतो. शब्दांच्या रानात हरवतो. मग प्रकृतीचा लगाम त्वचेच्या क्षेत्राशी वळवून स्पर्शांच्या अद्भुत अरण्यात रमतो. कधी एकदा नेत्रमार्गे रूपांच्या गिरीमाळांमध्ये स्वैर हिंडतो. किंवा रसनेच्या वाटेने रसांची दरी धुंडाळतो. तो जीवात्मा घ्राणेंद्रियांच्या मार्गांनी गंधांचे मोठमोठे विस्तार ओलांडतो.
अशा प्रकारे तो जीवात्मा देह व इंद्रियांचा स्वामी म्हणून शब्दादि विषयांचा कसा स्वैर उपभोग घेतो त्याचे मनोज्ञ वर्णन ज्ञानेश्वर करतात.
पण याच सत्तेला सोडण्याची वेळही येतेच. देह उत्पन्न झाल्यापासून उपभोग घेणारा हा स्वामी देह सोडण्याच्या समयी मन आदिकरून सहा इंद्रियांना आपल्याबरोबर घेऊन जातो.
अथवा शरीरातें सांडी । तर्‍ही इंद्रियांची तांडी ।
हे आपणयांसवें काढी । घेऊनि जाय ॥ ३६४ ॥
मग येथे किंवा स्वर्गलोकामध्ये जेव्हा जेव्हा तो जीवात्मा दुसऱ्या देहाचा स्वीकार करतो, तेथे तो मनादिक  पुन्हा प्रकट करतो. दिवा मालवल्यावर प्रभाही लोपते पण दिवा पुन्हा लावला तर पुन्हा प्रकट होते, तसेच हे सातत्य असते.
अशा प्रकारे जीवात्म्याचे स्वरूप व कार्य ज्ञानदेवांनी पंधराव्या अध्यायात वर्णिले आहे.

सर्व सृष्टीमात्रात श्रीहरीच्या व्याप्तीचे ज्ञानेश्वरीतील वर्णन-

"यदादित्यगतम तेजो" आदि क्रमशः चार श्लोकांमध्ये भगवंतांच्या व्याप्तीचे सुंदर वर्णन स्वयं भगवंतांनी दिले आहे. ज्ञानेश्वर त्या वर्णनाची शोभा विस्तारताना म्हणतात-
सूर्यासकट अवघी विश्व रचना ही भगवंताची दीप्ती आहे. ओलांश पुरवणारी चंद्रम्याची कांती ही ईश्वराचीच. असंख्य वस्तूंचे दहन व पचनसिद्धी करणारी अग्निगत तेजवृद्धी ईश्वराचीच. पृथ्वीमध्ये हा श्रीभगवंत शिरून राहिला आहे म्हणून ती मातीची ढेप महासमुद्रांच्या पाण्यात विरघळत नाही!
मी रिगालों असें भूतळीं । म्हणौनि समुद्र महाजळीं ।
हे पांसूचि ढेंपुळी । विरेचिना ॥ ४०१ ॥
हे सारे अपार चराचर  प्राणिमय जगतही विचित्र परमात्मशोभाच आहे .चंद्ररूपाने आकाशात वावरणारे चालते अमृताचे तळे हा श्रीभगवंतच. त्याच्या किरणांवर पोसलेल्या औषधींच्या बागाही तोच असतो. धान्यांचा सुकाळ करणारा तोच.
त्याहीपुढे हे अन्न पचवण्यासाठी तो प्राणिमात्रांच्या शरीरात नाभिस्कंधावर आगटी तयार करून उदरस्थ जठराग्नीचे रूप घेतो.प्राणापानाचा दुहेरी भाता अहोरात्र फुंकून किती अन्न पचवण्याचे सायास भूतमात्रांसाठी घेतो ते त्याचे त्यालाच ठाऊक!
म्हणौनि प्राणिजातांच्या घटीं । करूनि कंदावरी आगिठी ।
दीप्ति जठरींही किरीटी । मीचि जालों ॥ ४०७ ॥
प्राणापानाच्या जोडभातीं । फुंकफुंकोनियां अहोराती ।
आटीतसें नेणों किती । उदरामाजीं ॥ ४०८ ॥
चतुर्विध ओल्यासुक्या अन्नांचे पचन करणारा तोच. तोच जन, तोच त्यांचे निर्वाहजीवन . तोच त्यांचा जीवनवन्ही.
एवं मीचि आघवें जन । जना निरवितें मीचि जीवन ।
जीवनीं मुख्य साधन । वन्हिही मीचि ॥ ४१० ॥
सर्वत्र तोच पण प्राण्यांच्या बुद्धीनुसार त्यांना आकळतो, फळतो. पाणी बीजधर्मानुसार वनस्पतीची उत्पत्ती करते, तसेच हे आहे. सज्ञान्यांना तो सुखावह व अज्ञान्यांना दुःखदायी वाटतो. ती ही एकच परमात्मवस्तू.
सर्वांच्या हृदयात "मी अमुक" हे जे स्फुरण येते ते परमात्म्यामुळे.
एर्‍हवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी ।
जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥ ४२१ ॥
सज्जनसंगतीत गुरुचरणांची उपासना करताना हे आकळते, पण त्याला न जाणून अज्ञानाने विषयात गुरफटणे ही सुद्धा त्याचीच लीला आहे. निद्रेला किंवा जागृतीला कारण एक प्रबोधच असतो. अशा प्रकारे दुसरेपणाशिवाय अद्वैत जाणणारा  व त्या बोधालाही जाणणारा असा एकच सर्व-ज्ञ सर्वशक्तिमान या चराचराध्ये भरून राहिला आहे याबद्दलचे आकलन आणि वर्णन येथे ज्ञानेश्वरांनी केले आहे.

क्षर, अक्षर व उत्तम पुरुष यांचे ज्ञानेश्वरवर्णित स्वरूप-

"द्वाविमौ पुरुषौ लोके" या श्लोकावरील भाष्याचे स्वरूप असे मांडता येईल-
या संसारनगरात फारच तुरळक वस्ती आहे. कारण दोघेच पुरुष येथे राहतात. क्षर व अक्षर ही त्यांची नावे. क्षर हा आंधळा वेडा व पांगळा.अक्षर सर्वांगपरिपूर्ण, पण एकाच ठिकाणी वस्ती असल्यामुळे दोघांची मैत्री जडली.
एक आंधळा वेडा पंगु । येर सर्वांगें पुरता चांगु ।
परी ग्रामगुणें संगु । घडला दोघां ॥ ४७५ ॥
तया एका नाम क्षरु । येरातें म्हणती अक्षरु ।
इहीं दोहींचि परी संसारु । कोंदला असे ॥ ४७६ ॥
महादाहंकारापासून गवताच्या पात्यापर्यंत जे जे जगात मांडलेले नाशिवंत वस्तुमात्र, तेथेच आत्मा विस्मृतीच्या निजेत असंबद्ध स्वप्ने पाहतो. त्या स्वप्नमायेत  तन्मय होऊन "हा बाप ,ही आई ,हा मी, असा मी आहे, तसा मी नाही" वगैरे बरळत भवस्वर्गात हरवतो.
हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता ।
पुत्र वित्त कांता । माझें हें ना ॥ ४९२ ॥
ऐसिया वेंघोनि स्वप्ना । धांवत भवस्वर्गाचिया राना ।
तया चैतन्या नाम अर्जुना । क्षर पुरुषु गा ॥ ४९३ ॥
अशा स्वप्नावर स्वार होऊन जे चैतन्य संसार व स्वर्गरूपी रानात धावते, त्या चैतन्याला क्षर पुरुष असे नाव आहे..
याच अध्यायात वर्णन केलेले अश्वत्थ रूप म्हणजे आपणच आहोत असे या चैतन्याला वाटते.
हें मागील सांगों किती । अगा आतांचि जें प्रस्तुतीं ।
वृक्षाकार रूपाकृती । निरूपिलें ॥ ४८५ ॥
तें आघवेंचि साकारें । कल्पुनी आपणपयां पुरे ।
जालें असें तदनुसारें । चैतन्यचि ॥ ४८६ ॥
अक्षर हा जणू आधारभूत मध्यस्थ.तो ज्ञानातही पडत नाही ,व अज्ञानातही पडत नाही. यथार्थ ज्ञानही नाही व भेदबुद्धीही नाही.डिखळे मोडली, पण गाडगी न झालेल्या चिखलासारखी ती मधली अज्ञानदशा, म्हणजेच अक्षर पुरुष.
जीवकार्याचे हा कारण. मायेचा संग हे याचे लक्षण. अन्यथाज्ञान किंवा विपरीत ज्ञानमय विचारांच्या यात्रेत हा हरवलेला असतो.जगणे तर पार नाहीसे होते, परंतु स्वप्नाचा काही आरंभ होत नाही अशा त्या गाढ निद्रेसारखे अक्षर पुरुषाचे स्वरूप समजावे. संपूर्ण विश्वाभास नाहीसा होतो आणि आत्मबोध तर प्रकाशित होत नाही त्या केवळ अज्ञानावस्थेला अक्षर असे नाव आहे.
पार्था जागणें तरी बुडे । परी स्वप्नाचें कांहीं न मांडे ।
तैसिये निद्रे सांगडें । न्याहाळणें जें ॥ ५०७ ॥
विश्व आघवेंचि मावळे । आणि आत्मबोधु तरी नुजळे ।
तिये अज्ञानदशे केवळे । अक्षरु नाम ॥ ५०८
अन्यथा ज्ञानाची ही अवस्था गर्द अज्ञानात लय पावते व ही दोन्ही जाणिवेची रूपे खरे ज्ञान सन्मुख झाल्यावर त्या ज्ञानात बुडून जातात. अज्ञान ज्ञानाने नेल्यावर जाणण्याशिवाय जे जाणते, उरते त्याला उत्तम पुरुष म्हणतात. हा तिसरा व शेवटचा.
तैसें अज्ञान ज्ञानें नेलें । आपण वस्तु देऊनि गेलें ।
ऐसें जाणणेंनिवीण उरलें । जाणतें जें ॥ ५२८ ॥
तें तो गा उत्तम पुरुषु । जो तृतीय कां निष्कर्षु ।
दोहींहून आणिकु । मागिला जो ॥ ५२९ ॥
प्रलयतेजात दिवस म्हणजे ज्ञान व रात्र म्हणजे अज्ञान दोन्ही लोपतात. कल्पांतीचा महासागर नदी-नदांना तर गिळतोच, पण स्वतःच्याही मर्यादा ओलांडतो ,तसाच हा आहे. आहे-नाहीच्या तर पलीकडचा, पण अनुभवाचीही भाषा हा नष्ट करून टाकतो. याच्या ठायी  सोsहम भावनेचाही अस्त होतो. सांगणारा सांगणे होतो, दृष्टा- दृश्य नाते नाहीसे होते. असा हा नादाने ऐकावयाचा नाद ,स्वादानेच चाखावयाचा स्वाद, ईशपणाशिवायचा ईश अशा गहन गूढ शब्दात उत्तम पुरुषाचे ज्ञानेश्वरांनी वर्णन केले आहे.
जो प्रकाश्येंवीण प्रकाशु । ईशितव्येंवीण ईशु ।
आपणेंनीचि अवकाशु । वसवीत असे जो ॥ ५४६ ॥
जो नादें ऐकिजता नादु । स्वादें चाखिजता स्वादु ।
जो भोगिजतसे आनंदु । आनंदेंचि ॥ ५४७ ॥
शेवटी श्रीज्ञानेश्वर भगवंतांचे नाव- "पुरुषोत्तम योग"- या अध्यायाला का प्राप्त झाले ते पुन्हा एकदा स्पष्ट करतात-
तो  गा  मी निरुपाधिकु । क्षराक्षरोत्तमु एकु ।
म्हणौनि म्हणे वेद लोकु । पुरुषोत्तमु ॥ ५५८ ॥
"क्षर व अक्षर या दोन पुरुषांहून श्रेष्ठ व उपाधिरहित असा काय तो मीच आहे, म्हणून वेद व सर्व जग मला पुरुषोत्तम म्हणतात."

समारोप-

तें श्रीकृष्णवचनामृत । पार्थीं भरोनि असे वोसंडत ।
मग व्यासकृपा प्राप्त । संजयासी ॥ ५८९ ॥
हे सर्व श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले बोधामृत अर्जुनरूपी पात्रात भरून सांडत होते. मग ते बोधामृत व्यासांच्या कृपेने संजयाला प्राप्त झाले.
उपसंहाराच्या या ओवीत संजयाच्या भाग्ययोगाचे कौतुक करतानाच कोणीही प्रयत्न करून जिथे पोहोचू शकणार नाही अशा श्रीकृष्णार्जुन एकांत-संवादाचे अमृतसुख संजयाला उगीच मिळाले नाही, तर त्यामागे व्यासांची कृपा व नियतीचा संकेत होता ,हे ज्ञान अर्जुनाच्या निमित्ताने, संजयाच्या माध्यमातून सर्व दुःखपीडित-आर्त-जिज्ञासू जनांपर्यंत पोहोचणार आहे असे ज्ञानेश्वर येथे सुचवत आहेत.
इथे या अद्भुत अध्यायाची परिसमाप्ती होते.

भारती बिर्जे-डिग्गीकर



Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –