ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य  परिचय- अध्याय चौदावा- गुणत्रयविभागयोग

 ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य  परिचय- अध्याय चौदावा- गुणत्रयविभागयोग


तेराव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी सर्व जग क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संगाने कसे झाले आहेत या प्रमेयाचे प्रतिपादन केले ,तर आत्म्यासारख्या असंगाला मायेचा संग कसा घडतो ?हा सुखदुःख भोगतो की गुणातीत आहे? गुण कोणते ?किती ?त्यांच्या बंधनाचे स्वरूप कोणते ? गुणातीताची लक्षणे काय आहेत ?-हे सर्व विवेचन चौदाव्या अध्यायात म्हणजेच गुणत्रयविभागयोगात येते.
चौदाव्या अध्यायाचा मागील अध्यायाशी संबंध पुढील ओव्यामध्ये स्पष्ट झालेला आहे-
तरी कैसा पां असंगा संगु । कोण तो क्षेत्रक्षेत्रज्ञायोगु ।
सुखदुःखादि भोगु । केवीं तया ? ॥ ३५ ॥
गुण ते कैसे किती । बांधती कवणे रीती ।
नातरी गुणातीतीं । चिन्हें काई ? ॥ ३६ ॥
एवं इया आघवेया । अर्था रूप करावया ।
विषो एथ चौदाविया । अध्यायासी ॥ ३७ ॥

अध्यायाच्या आरंभीचे श्री गुरुस्तवन

या अध्यायाच्या आरंभी आपल्या नित्य रीतीला अनुसरून श्री ज्ञानरायांनी सद्गुरूंचे स्तवन मांडले आहे.सद्गुरूंचे स्वरूप विविध विशेषणे व संबोधनांच्या वर्षावातून त्यांनी वर्णिले आहे.
हे सद्गुरु समस्त देवगणांचेही आचार्य आहेत. प्रज्ञेच्या पहाटवेळी शोभणारे ते सूर्य आहेत. या सूर्याबरोबरच सुखाचा उदय होतो. ते सर्वांचे विश्रांतीस्थान आहेत 'मी ब्रह्म' हा भाव त्यांच्यामुळे प्रकटतो. कितीएक लोकसमूहांच्या लहरी खेळणारा समुद्र म्हणजेच सद्गुरु.या सद्गुरूंच्या लपण्यामुळे विश्व प्रकट होते व त्यांच्या प्रकटसाक्षात्कारानंतर विश्वभ्रम लोपतो,असे त्यांचे गारूड आहे. तर सर्वत्र तेच ते आहेत तर कुणाला बोध? कुणाला माया? ते जणू आपलेच विविध मिषांनी कौतुक करत आहेत, क्रीडालाघव दाखवत आहेत. जगात आर्द्रता आहे म्हणतात, पण त्या आर्द्रतेला स-रसत्व या सद्गुरूंमुळे आले. त्यांच्यामुळे ही वसुंधरा क्षमामूर्ती झाली. सूर्यचंद्रादि शिंपल्यांना झळाळी मिळाली. आकाश त्यांच्यात लपंडाव खेळत राहिले, असा त्यांचा गुरुत्वमहिमा. सारी माया व ज्ञान त्यांच्यामुळेच डोळस झाली. श्रुतींनाही त्यांच्या वर्णनप्रसंगी कष्ट पडले व वेद मूग गिळून बसले हे प्रचलित झाले. जिथे परेसह वैखरी कुंठित होते तिथे वर्णनासाठी शब्द कोठून आणावेत? चरणांवर मस्तक ठेवणेच  सोपे.
यालागीं आतां । स्तुति सांडूनि निवांता ।
चरणीं ठेविजे माथा । हेंचि भलें ॥ १५ ॥
तरी तू जैसा आहासि तैसिया । नमो जी श्रीगुरुराया ।
मज ग्रंथोद्यमु फळावया । वेव्हारा होईं ॥ १६ ॥
असा समारोप करून शेवटी "हे गुरुराया, तू जसा आहेस तशा तुला नमस्कार असो!" अशा शब्दात श्रीज्ञानदेव श्रीगुरुवर्णनातील शरणागती व्यक्त करतात.

आत्मज्ञानी पुरुषांना जन्ममरणातीत करणाऱ्या ज्ञानाचे वर्णन
ज्या ज्ञानाचे वर्णन श्रुतींनी पुन्हा पुन्हा 'पर' म्हणून केले आहे, त्या परमअर्थमय ज्ञानाची महती श्रीहरींनी चौदाव्या अध्यायाच्या विषयविस्तारारंभी वर्णन केली आहे. ज्ञानदेव त्याचे असे विवरण करतात-
म्हणौनि गा पुढती । सांगिजैल तुजप्रती ।
पर म्हण म्हणौनि श्रुतीं । डाहारिलें जें ॥ ४१ ॥
एर्‍हवीं ज्ञान हें आपुलें । परी पर ऐसेनि जालें ।
जे आवडोनि घेतलें । भवस्वर्गादिक ॥ ४२ ॥
अगा याचि कारणें । हें उत्तम सर्वांपरी मी म्हणें ।
जे वन्हि हें तृणें । येरें ज्ञानें ॥ ४३ ॥
सहज विचार करून पाहिले तर हे ज्ञान हे आपले स्व-रूपच आहे. मग त्याला पर म्हणजे परके असे अभिधान का प्राप्त झाले ?कारण मायेच्या प्रभावाखाली प्रपंच आणि स्वर्गप्राप्ती याच्या मोहात पडल्यामुळे हे आपले स्व-रूपच आपल्याला परके  वाटू लागले आहे. हे ज्ञान जणू अग्नि व इतर ज्ञाने ही गवतसदृश आहेत. या ज्ञानासमोर त्यांचा टिकाव लागत नाही. म्हणून अर्जुना, हे ज्ञान सर्व ज्ञानांपेक्षा उत्तम आहे.
इतर ज्ञाने भवस्वर्गाला जाणतात, यागच चांगले म्हणतात, व भेदाभेदांची उत्तम परीक्षा करण्यातच घोटाळतात. ती ज्ञाने या परमज्ञानाच्या उदयानंतर स्वप्नासारखी विरून जातात. आकाशाने वाऱ्याच्या लाटा गिळूनटाकाव्यात तशी त्यांची अवस्था होते.सहस्ररश्मीच्या प्रभावापुढे चंद्रादिकांचा काय पाड लागणार?
ज्या ज्ञानाच्या योग्य साक्षात मोक्ष सुख हस्तगत होते व काहीही मिळवण्याजोगे शिल्लक राहत नाही त्या त्या पारमार्थिक ज्ञानाच्या योगाने आत्मज्ञानी पुरुष जन्म मरणाच्या अतीत म्हणजे मुक्त होतो .मनानेच मन मागे सारून विश्रांती मिळवतो, देहात असूनाही देहाएवढाच राहत नाही, आणि देहाचे कुंपण- ते बंधन -संपल्यावर तर एकदम परमेश्वररूपच होतो.घट फुटल्यावर घटाकाश महदाकाशात मिळावे ,तितक्या सहजतेने हे घडते.परमेश्वराच्या नित्यतेने नित्य, परिपूर्णतेने परिपूर्ण,अनंत आनंदमयतेने अनंतानंद, त्याच्या सत्यतेने सत्यस्वरूप- एकूण परमेश्वराच्या शुद्ध अंशासारखे पारमार्थिक ज्ञानमय पुरुष नित्य मुक्त होतात, देहबंध संपवतात.
मी जैसा अनंतानंदु । जैसाचि सत्यसिंधु ।
तैसेचि ते भेदु । उरेचि ना ॥ ५३ ॥
जें मी जेवढें जैसें । तेंचि ते जाले तैसें ।
घटभंगीं घटाकाशें । आकाश जेवीं ॥ ५४ ॥
असे या मोक्षदायी परमआनंदमय ज्ञानाचे वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे.

प्रकृतीने जन्म दिलेले लेकरू
"मम योनीर्महद्बब्रह्म"या चौदाव्या अध्यायातील तिसऱ्या श्लोकाचा अतिशय सुभग सुलभ असा आशय ज्ञानेश्वरांनी विवरण केला आहे.
"तरी माझी गृहिणी| अनादी तरुणी| अनिर्वाच्यगुणी|अविद्या हे ||" अशा शब्दात प्रकृतीचे येथे वर्णन केले आहे .ती श्रीहरींची गृहलक्ष्मी ,त्यांच्याप्रमाणेच तिच्याही वयाचा हिशोब नाही. अनादिकाळापासून ती तरुण व प्रसवक्षम आहे. त्रिगुणांना निर्मिणाऱ्या महामायेच्या गुणांची वाचेने काय गणती करणार ?अशी ही अविद्या, हिला वस्तुत: अस्तित्व नाही, हेच हिचे स्वरूप आहे. ही अविद्या स्वरूपी निजलेल्यांना जवळ आहे व स्वरूपी जागे असलेल्यांना दूर आहे, परमेश्वरी सत्तेच्या संभोगाने ही गर्भवती होते. परमेश्वर निजतो तेव्हा ती जागते.
इये नाहीं हेंचि रूप । ठाणें हें अति उमप ।
हें निद्रितां समीप । चेतां दुरी ॥ ८८ ॥
पैं माझेनिचि आंगें । पहुडल्या हे जागे ।
आणि सत्तासंभोगें । गुर्विणी होय ॥ ८९ ॥
तिच्या पोटात अष्टविकारांचा गर्भ दिसामासाने वाढू लागतो. आधी बुद्धितत्त्व उत्पन्न होते. त्यायोगाने मन जन्मते. मनाची पत्नी जी ममता, तिच्यापासून अहंकाराची निर्मिती होते.पंचमहाभूते रूपास येतात. विकारांच्या क्षोभातून त्रिगुण व वासना उत्पन्न होते. उदकाच्या संग झाला की बीजदाण्यातून झाडाचा आकारबंध तयार होतो त्याप्रमाणे ईश्वरी संकेताच्या संगाने अविद्येला अनेक विश्वांचे कोंभ फुटू लागतात.वायुच्या संगतीने आकाशात गर्भरस वाढला की अंडजसृष्टी निर्माण होते. तम आणि रज पोटात ठेवून उदक आणि तेजाची वृद्धी झाली की स्वेदज प्रजा निर्माण होते. पृथ्वीवर उदकाच्या आधिक्याने व निकृष्ट अशा तमाच्या योगाने स्थावर जमिनीपासून उत्पन्न होते ती उद्भीज सृष्टी. पाचांना पाचांचे सहाय्य मिळून मनबुद्धि सिद्ध होतात .तेथे जारज म्हणजे गर्भाशयापासून निर्माण होणारे जीव तयार होतात. या चार सृष्टी हे ज्याचे हात व पाय ,विशाल महाप्रकृती हे मस्तक, प्रवृत्ती हे  तुंदिल पोट, निवृत्ती ही सरळ पाठ, स्वर्गातील आठ देवयोनी ही अष्ट अंगे, स्वर्गरूप उंच मान ,मृत्यूलोक हा मध्यभाग व  पाताळ हा कटिभाग असे विराट लेकरू आदिमायेच्या उदरी हालचाल करू लागते. चौ-यांशी लक्ष योनी या पेरापेरांच्या व सांध्यांच्या जोडण्या झाल्या. मोहरूप नवे नवे स्तनपान देऊन आई लेकराचे पोषण करते.
ऐसें लेकरूं एक । प्रसवली हें देख ।
जयाचें तिन्ही लोक । बाळसें गा ॥ १०६ ॥
चौर्‍यांशीं लक्ष योनी । तियें कांडां पेरां सांदणी ।
वाढे प्रतिदिनीं । बाळक हें ॥ १०७ ॥
नाना देह अवयवीं । नामाचीं लेणीं लेववी ।
मोहस्तन्यें वाढवी । नित्य नवें ॥ १०८ ॥
या मायेचे लेकरू एकच, पण अवर्णनीयच  व अविचारकाली सुंदर ! त्याला प्रसवून ती स्त्रीत्वाच्या पक्व दशेला आली, परिपूर्ण झाली. या बाळाची सकाळ म्हणजे ब्रह्मा, मध्यान्ह विष्णू, सायंकाळ शंकर होय .खेळ संपवून ते प्रलयाच्या शय्येवर गाढ झोपते व कल्पोदयाच्या वेळी विषमज्ञानाची नवी जाग त्याला येते. संकल्प व अहंकार त्याचे खेळगडी आहेत. असे हे बाळ मिथ्यादृष्टीच्या घरात बाललीला करते.
अशा प्रकारे माया हे विश्व प्रसवून ईश्वरी सत्तेची परिपूर्ती करते. सुंदर भव्य असे हे आई-बाळाचे रूपक ज्ञानेश्वरांनी भगवंतांच्या मूळ संकल्पनेची शोभा विस्तारण्यासाठी येथे रंगवले आहे.

श्रीहरी पिता व प्रकृती माता हे स्पष्ट करण्यासाठी माऊलींनी दिलेली उदाहरणे-
"तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रद पिता" या चौदाव्या अध्यायातून चौथ्या श्लोकात भगवंतांनी वरील नात्याचा स्पष्ट उच्चार पुनश्च केला आहे. ज्ञानेश्वर ते स्पष्ट करताना म्हणतात-
"अनेक शरीरे पाहून हे अर्जुना, मनात भेद आणू नकोस. मनबुद्धी आदि करून सर्व भूते एकच आहेत. एकाच देहात अवयव वेगवेगळे पण देह एकसंध एकात्मच असतो तसे भिन्नत्वाने बहि:श्चर  स्वरूपात नटलेले हे विश्व एकाच विशालदेही असे श्रीहरी व प्रकृती या दांपत्याचे मूल आहे. उंच ,सखल विविध डहाळ्या दिसल्या तरी बीज एकच, घट हा एकाच मातीचा पुत्र, वस्त्र हे कापसाचेच नातवंड, लाटा ही सागराचीच संतती, अग्नीच्या ज्वाला व अग्नी वेगवेगळे नाहीतच,तद्वत हे विश्व ही  श्रीहरींचीच मायेच्या उदरी स्थापलेली निर्मिती. कांतीने माणिक झाकून जात नाही तसेच स्वतःच निर्माण केलेल्या ब्रह्मांडसंततीमुळे ईश्वर लोप पावत नाही. कमल विकास पावले तर त्याचे कमलत्व संपेल काय? अपत्य प्रसवून हा पिता त्याच्या अंगोपांगात प्रकट होतो. जग पलीकडे ढकलून ईश्वराला पाहू जावे असा प्रकार संभवत नाही त्याप्रमाणे येथे नातेसंबंध अपत्य व पिता असा असला तरी सर्व ईश्वरमयच आहे.
तैसीं इयें नाना देहें । दाऊनि मी नाना होयें ।
तेथ ऐसा जो बंधु आहे । तेंही देखें ॥ १३४ ॥
"त्याप्रमाणे हे अनेक देह दाखवून (प्रकाशून) मी अनेक होतो आणि त्या अनेक शरीरात मी गुणांकडून बांधला गेलो आहे असे जे वाटते त्या वाटण्याचे प्रकाशनही मीच करतो. "
अशा शब्दात या अलौकिक एकमेव कुटुंबातला दांपत्य व अपत्यभाव ज्ञानेश्वरांनी मांडला आहे.

प्रकृतीचे तीन गुण व त्यांची लक्षणे
"सत्वं रजस्तम इति गुणा: प्रकृतिसंभवा:" या चौदाव्या अध्यायातील अभिप्रायावर ज्ञानेश्वरांचे स्पष्टीकरण असे आहे -
तरी सत्त्वरजतम । तिघांसि हें नाम ।
आणि प्रकृति जन्म- । भूमिका ययां ॥ १३८ ॥
येथ सत्त्व तें उत्तम । रज तें मध्यम ।
तिहींमाजीं तम । सावियाधारें ॥ १३९ ॥
सत्व रज व तम या तीन गुणांची प्रकृती ही जन्मभूमी आहे .सत्व हे उत्तम, रज हे मध्यम व तम हा या तिन्हीस आधारभूत असतो.
एकाच देहात बाल्य, तारुण्य वार्धक्यादि दशा नांदून जाव्यात, त्याप्रमाणे एकाच वृत्तीच्या ठायी हे त्रिगुण उत्पन्न होतात .
निर्मल प्रकाशमय असा सत्वगुण जणू एक पारधी आहे. ज्ञानाच्या सुखमय जाणिवेच्या पाशात तो जिवाला बांधतो. असा अडकलेला जीव मृगासारखा ज्ञानाने चडफडतो ,समजूतीची लाथाळी करतो व आत्मसुख हातचे दवडतो.
तेवीं सत्त्वें लुब्धकें । सुखज्ञानाचीं पाशकें ।
वोढिजती मग खुडके । मृगु जैसा ॥ १४८ ॥
विद्येपासून होणाऱ्या सन्मानात मग्न राहतो, क्षुद्र लाभाने तृप्त होतो .प्रौढी मिरवतो."माझ्यासारखा भाग्यवंत,सुखी मीच !"म्हणून सत्वाच्या अष्टविकारांनी फुगतो.अंगात संचारलेली विद्या भुतासारखी त्याच्या मानगुटीवर बसते .मूळ ज्ञानस्वरूप नाहीसे होऊन विषयज्ञानाचीच त्याला हळूहळू धुंदी चढते.राजाने स्वप्नात भिकारी व्हावे व भिकेत दोन दाणे मिळाले म्हणून चढून जाऊन इंद्राला खिजवावे  तशी या बाह्यज्ञानाने त्याची स्थिती होते. असा ज्ञानी पुरुष प्रवृत्तीशस्त्र व यज्ञक्रियेत प्रवीण होतो. स्वर्गच श्रेष्ठ मानतो. आपणच काय ते सज्ञान, चातुर्यचंद्राची प्रकाशण्याची जागा म्हणजे आपले चित्ताकाश असे तो मानतो. जिवाला या सुखज्ञानाची वेसण बसून तो पुरता बैल बनून जातो.

रज म्हणजे "रंजविणारा". अभिलाषेचे साक्षात तारूण्य असा हा गुण.
हें रज याचि कारणें । जीवातें रंजऊं जाणे ।
हें अभिलाखाचें तरुणें । सदाचि गा ॥ १६० ॥
रजोगुणाला रज हे नाव याच कारणाकरता आहे की तो रजोगुण हा जीवाला विषयात रंजवण्याची कला जाणतो व रजोगुण हा अभिलाषेचे (लोभाचे) कधी कमी न होणारे तारुण्य आहे.
हा जिवात थोडा जरी भरला तरी कामाची धुंदी निर्माण होते. तृष्णेचा वारा सुटतो . घृतसिंचन केलेल्या कुंडात वज्राग्नी चेतवला तर पुढे आणखी काय होणार? तृष्णेच्या ज्वाला उफाळतच राहतात. इंद्राचे वैभवही कमी वाटू लागते. कवडीसाठी जीव ओवाळण्याची,तृणाच्याही लाभामागे धावण्याची वृत्ती वाढते. सकाम क्रियांचा पसारा वाढतो .स्वर्गाला गेले तर तिथे काय खायचे म्हणून यज्प्रपंच मांडला जातो.इष्टप्राप्तीसाठी व्रतांमागून व्रते ,यज्ञ ,पुण्याच्या आकांक्षेने तलाव बांधणे असा कर्मकल्लोळ सुरू होतो .ग्रीष्मऋतूतील अखेरच्या वाऱ्याप्रमाणे किंवा माशाप्रमाणे किंवा स्त्रीच्या कटाक्षाप्रमाणे किंवा विजेप्रमाणे जिवाची चंचलता बलवत्तर होते.
काय चंचळु मासा ? । कामिनीकटाक्षु जैसा ।
लवलाहो तैसा । विजूही नाहीं ॥ १७० ॥
रजोगुणापुढे मासा कसला चंचल आहे ? जसा स्त्रीचा नेत्रकटाक्ष चंचल असतो तसा तो रजोगुणी पुरुष चंचल असतो. विजेमधेही तसा (त्या रजोगुणी पुरुषाइतका) चंचलतेचा आवेग नसतो.
स्वर्ग व संसारविषयक आकांक्षांमुळे कर्मांच्या धगधगत्या अग्नीत प्रवेश केला जातो. हा महाव्यापारखटाटोप हे रजोगुणाचे मुख्य लक्षण आहे.

तमोगुणाचे मुख्य लक्षण म्हणजे अज्ञान .व्यवहारांची नजर मंदावणे ,मोहरात्रीचा काळोख दाटून येणे ,विश्वभ्रमाचे नर्तन सुरू होणे हे तमोगुणाचे लक्षण.
व्यवहाराचेहि डोळे । मंद जेणें पडळें ।
मोहरात्रीचें काळें । मेहुडें जें ॥ १७४ ॥
व्यवहाराचीही दृष्टी ज्या पडद्याने मंदावते (असा तमोगुण हा पडदा आहे) व जो तमोगुण मोहरूपी रात्रीतील काळा मेघ आहे.
अविवेकाचा महामंत्र ,मूर्खत्वरूप मद्याचे पात्र असा तमोगुण जीवाला मोहनास्त्र घालतो. तेव्हा देह हाच आत्मा वाटू लागतो. चराचराच्या शरीरात तमोगुण दाटतो. इंद्रियांना जडत्व येते, मनाला मूर्खता व आळसाची बाधा होते .काम करणे नकोसे आणि जांभया देणे हवेसे वाटते . दगड कोसळो की पृथ्वी रसातळाला जावो ,आपण लोळत पडावे ,दोन्ही हात गालावर घेऊन, मान गुडघ्यावर तुकवून स्वस्थ रहावे. स्वर्गसुखही तुच्छ मानून झोपी जावे.
आणि निद्रेविषयीं चांगु । जीवीं आथि लागु ।
झोंपीं जातां स्वर्गु । वावो म्हणे ॥ १८६ ॥
त्यातूनही काम करायचा प्रसंग आलाच तर कामापेक्षा प्रमाद अधिक करावेत, करू नये ते साहस करावे ही सारी तमोगुणाची बाधा आहे.
तैसा वळघे साहसा । अकरणींच धिंवसा ।
किंबहुना ऐसा । प्रमादु रुचे ॥ १९२ ॥
एवं निद्रालस्यप्रमादीं । तम इया त्रिबंधीं ।
बांधे निरुपाधी । चोखटातें ॥ १९३ ॥
(त्या पतंगाप्रमाणे) हा तमोगुणी पुरुष एखाद्या धोक्याच्या कामाकडे वळतो व जे काम करू नये ते करण्याची त्याला प्रबल इच्छा असते. फार काय सांगावे ? याप्रमाणे त्यास प्रमाद (भलतेच करणे) आवडतो.
याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस व प्रमाद या तीन प्रकारांनी निरुपाधिक व शुद्ध आत्म्याला बांधतो.

अशा प्रकारे त्रिगुणांची मूळ लक्षणे येथे सांगितली आहेत.

तीन गुणांची वृद्धीलक्षणे व तदनुषंगिक गती

त्रिगुणांनी  युक्त अशा अस्तित्वात एकेका वेळी एकेका गुणाचे आधिक्य कसे असते याचे तपशीलवार वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे.
सर्वप्रथम सत्वगुण जेव्हा आणि रज आणि तमावर मात करून वर्धमान होतो तेव्हा ते अस्तित्व कसे सहजपणे विशुद्ध होऊन जाते याचे विवेचन येते.पावसाळ्याच्या दिवसात जसा महानदीला अपरंपार पूर येतो त्याप्रमाणे सर्व शास्त्रात बुद्धी पसरते. पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे चंद्रप्रकाश आकाशात जिकडे तिकडे पसरतो, त्याप्रमाणे ज्ञानमय वृत्ती सर्वत्र पसरते.
धाराधरकाळें । महानदी उचंबळे ।
तैसी बुद्धि पघळे । शास्त्रजातीं ॥ २११ ॥
अगा पुनवेच्या दिवशीं । चंद्रप्रभा धांवें आकाशीं ।
ज्ञानीं वृत्ति तैसी । फांके सैंघ ॥ २१२ ॥
अशा अवस्थेत मरण आल्यास त्या सात्विकाला तशीच सद्गती मिळते, जणू काही एका गावातील दिवा दुसऱ्या गावात नेऊन ठेवावा तसे ते अवस्थांतर असते.
तैसी ते सत्त्वशुद्धी । आगळी ज्ञानेंसी वृद्धी ।
तरंगावों लागें बुद्धी । विवेकावरी ॥ २२२ ॥
पैं महदादि परिपाठीं । विचारूनि शेवटीं ।
विचारासकट पोटीं । जिरोनि जाय ॥ २२३ ॥
दिव्याच्या तेजाप्रमाणे त्याच्या सत्वगुणाचे निर्मलत्व ज्ञानासह विशेषच वाढते व त्याची बुद्धी विवेकावर पोहू लागते. महतत्त्वादि अनुक्रमाचा विचार करून अखेरीस विचार करणारा त्या विचारांसकट  ब्रह्मस्वरूपात लीन होतो.

जेव्हा रजोगुण सत्व आणि तमोगुणावर मात करतो तेव्हा  विधीनिषेधांची तमा नसलेले असे एक कर्मवादळ अशा व्यक्तीच्या आयुष्यात उभे राहते.परस्त्री वगैरेंशी प्रसंग आला असता या गोष्टी शास्त्रनिषिद्ध आहेत असे त्यास वाटत नाही व मग तो शेळीप्रमाणे इंद्रियांना बरे वाईट विषय सरसकट चरतो.
पांजरली वाहुटळी । करी वेगळ वेंटाळी ।
तैसी विषयीं सरळी । इंद्रियां होय ॥ २२८ ॥
परदारादि पडे । परी विरुद्ध ऐसें नावडे ।
मग शेळियेचेनि तोंडें । सैंघ चारी ॥ २२९ ॥
आणि अशाच रजोगुणप्रभावी अवस्थेत मरण आल्यास ती व्यक्ती  तसलीच काम्य कर्मे करणार्‍या लोकांच्या कुळात जन्म पावते.
कर्मजडाच्या ठायीं । किंबहुना होय देहीं ।
जो रजोवृत्तीच्या डोहीं । बुडोनि निमे ॥ २४२ ॥

जेव्हा रजोगुण व सत्वगुण नाहीसे होऊन तमोगुण वाढतो,तेव्हा जसे अमावास्येच्या रात्रीचे आकाश सूर्य, चंद्र यांनी रहित असते तसे त्या व्यक्तीचे मन होते.त्याचप्रमाणे त्याचे अंत:करण पूर्णपणे विचारशून्य व रिकामे होऊन त्या अंत:करणातून सारासारविवेकाची गोष्ट नाहीशी होते.
तरी होय ऐसें मन । जैसें रविचंद्रहीन ।
रात्रींचें कां गगन । अंवसेचिये ॥ २४५ ॥
तैसें अंतर असोस । होय स्फूर्तिहीन उद्वस ।
विचाराची भाष । हारपे तैं ॥ २४६ ॥
आणि अशा अवस्थेत तमाच्या गाठोड्यात संकल्पाला बांधून (म्हणजे तामस संकल्प करीत असतांना) ज्याचा देह जातो, त्याला पुन्हा तामस देह मिळतो.
अधिक काय सांगावे ! जो तमाच्या उत्कर्षात मरण पावतो, तो पशु अथवा पक्षी अथवा झाड किंवा किडा होतो.
म्हणौनि तमाचिये लोथें । बांधोनियां संकल्पातें ।
देह जाय तैं मागौतें । तमाचेचि होय ॥ २५८ ॥
आतां काय येणें बहुवे । जो तमोवृद्धि मृत्यु लाहे ।
तो पशु कां पक्षी होये । झाड कां कृमी ॥ २५९ ॥

अशाप्रकारे प्रत्येक गुणाचा उत्कर्ष झाल्यावर व्यक्तीला येणारी अवस्था व मिळणारी गती याचे प्रदीर्घ व प्रत्ययकारी वर्णन ज्ञानेश्वरांनी येथे केले आहे.

भगवंतांनी सांगितलेली गुणातीत पुरुषाची लक्षणे
"प्रकाशं च प्रवृत्तीं च मोहमेव च पांडव" या अर्जुनाच्या प्रश्नावर उत्तर देणाऱ्या श्लोकात श्रीभगवंतांनी गुणातीत पुरुषाची लक्षणे सांगितलेली आहेत.
मी दाऊनि गुण देखे । गुणता हे मियां पोखे ।
ययाचेनि निःशेखें । उरे तें मी ॥ २९८ ॥
ऐसेनि विवेकें जया । उदो होय धनंजया ।
ये गुणातीतत्व तया । अर्थपंथें ॥ २९९ ॥
"मी गुणांचे प्रकाशन करून परत गुणांस पहातो, गुणांच्या ठिकाणी (असणारा) गुणपणा माझ्याकडून पोसला जातो व या गुणांचा निरास झाल्यावर जे उरते तेही मीच आहे,अर्जुना, अशा या विवेकविचाराचा ज्याच्या ठिकाणी उदय होतो त्यास या आशयाच्या अनुषंगाने गुणातीतत्व प्राप्त होते."
असा पुरुष  रजोगुणवृद्धीमुळे प्रवृत्ती देहात कर्माचा अंकुर वेटाळून घेते, तेव्हा "मीच कर्मठ" म्हणून फुगत नाही,किंवा दारिद्र्याला विटत नाही.सत्ववृद्धीने सर्व इंद्रिये ज्ञानाच्या प्रकाशात न्हाऊन निघतात, तेव्हा विद्वत्तेच्या गर्वाने आत्मसंतुष्ट होत नाही.तमाची वृद्धी झाल्यावर अज्ञानाच्या जाणिवेने दु:खीकष्टी होत नाही. अज्ञानाचा स्वीकारही करत नाही. ज्ञानप्राप्तीचीही इच्छा धरत नाही. ज्ञान प्राप्त झाले म्हणून कर्माचा स्वीकार करीत नाही. कर्मे घडली म्हणून दुःखही मानत नाही. सूर्यास्त सकाळ व मध्यान्ह या तीन काळांची मोजदाद सूर्य ठेवतो का? किंवा तो बोध होण्यासाठी काही वेगवेगळ्या तऱ्हेने प्रकाशतो का ?समुद्र पावसामुळे ताजा होतो का? हिमालय थंडीने काकडतो का? मोठ्या अग्नीला उन्हाळा असह्य वाटतो का ?
त्याप्रमाणे गुणागुणांची कार्यभूमी म्हणजे आपणच आहोत म्हणून जो एकेका कृतीची ताटातूट करून हर्षविमर्षांनी  झाकोळत नाही ,तो गुणातीत पुरुष समजावा. वाटेत अडथळा झाल्याप्रमाणे तो देहात वस्तीला आलेला असतो. किंबहुना तो युद्धातील फडफडणाऱ्या निशाणाप्रमाणे युद्धभूमीवरील जय पराजयाच्या पलीकडे अलिप्तपणे साक्षीभूत असतो. शरीरात जसा प्राण, घरी आतिथ्यास आलेला ब्राह्मण किंवा चव्हाट्यावरचा उदासीन खांब तसे त्याचे अस्तित्व. मृगजळाच्या हेलकाव्याने मेरू पर्वत चळत नाही तसाच गुणांच्या येण्या-जाण्याने त्याच्या दृढधारणेत फरक पडत नाही. तो त्यांच्याकडे कौतुकाने पाहतो. तेव्हा तो जणू कुणी प्रेक्षक व गुणदोष हे बाहुल्यांचा खेळ असतात .सूर्य जितपत लोकव्यवहारात लक्ष घालतो, तितपतच तो या खेळात रमतो .जसे समुद्रांचे भरणे, सोमकांत मण्यांचे द्रवणे ,चंद्रविकासिनी कमलिनींचे प्रफुल्लित होणे या सर्वात चंद्र स्वस्थच असतो ,तसा गुणांच्या गोंधळात जो ढळत नाही, तो गुणातीत पुरुष जाणावा.वस्त्राला पाठ आणि पोट दोन्ही सुताचेच,तशी त्याला सर्व सृष्टी हरीमय  दिसते आत्मस्वरूपात वस्ती झाल्याने सुखदुःख एकाकार होतात. बुद्धीला रात्र-दिवस व देहातील द्वंद्वे सारखीच जाणवतात.जणू निद्रिस्ताच्या अंगाला साप झटो की उर्वशी, त्याला त्याचे काहीच नसते.शेण आणि सोने त्याला सारखेच !रत्न आणि दगड समरूप. घरी स्वर्ग येवो की अंगावर वाघ झडपो, त्याच्या आत्मस्वरूपबुद्धीत व्यत्यय येत नाही.
घरा येवों पां स्वर्ग । कां वरि पडो वाघ ।
परी आत्मबुद्धीसि भंग । कदा नव्हे ॥ ३५८ ॥
मग त्याची "साक्षात ब्रह्म" म्हणून स्तुती करा की नीच म्हणून निंदा करा, राखेला पेटणे व विझणे दोन्ही कळत नाही तशी त्याची साम्यबुद्धी मोडत नाही. मानापमानांचेही तसेच. ईश्वर व म्हणून वंदा की चोर म्हणून छळा- त्याला दोन्ही सारखेच.
सर्व आरंभांचे त्याच्या ठिकाणी उच्चाटन झालेले असते. कर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती मावळून गेलेली असते. अथवा ज्या अग्नीत कर्मफळे जळतात तो अग्नि तो गुणातीत पुरुष स्वतःच असतो.
सर्वांरंभा उटकलें । प्रवृत्तीचें तेथ मावळले ।
जळती गा कर्मफळें । ते तो आगी ॥ ३६६ ॥
अव्यभिचारी भक्तीमुळे तो या ब्रह्मदशेला प्राप्त झालेला असतो.आता तो गुणांना जिंकतो ही भाषाही रहात नाही, कारण की आता एकपणाही सरला. फार काय सांगावे ? अशा प्रकारची जी अवस्था ती हे मर्मज्ञ अर्जुना, ब्रह्मत्व होय. वर सांगितल्याप्रमाणे जो अव्यभिचारित्वाने मला भजतो त्यास ते प्राप्त होते.
आतां गुणातें तो किरीटी । जिणे या नव्हती गोष्टी ।
जे एकपणाही मिठी । पडों सरली ॥ ३९६ ॥
किंबहुना ऐसी दशा । तें ब्रह्मत्व गा सुदंशा ।
हें तो पावें जो ऐसा । मातें भजे ॥ ३९७ ॥
सर्वांरंभापासून दूर झालेला गुणातीत  पुरुष हा कसा असतो , तसेच तो त्या दशेला कशाच्या योगाने प्राप्त झालेला असतो हे श्रीभगवंतांनी चौदाव्या अध्यायाच्या अखेरीस वर्णिले आहे.

समारोप 

"ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च ।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥ २७ ॥"

"नित्य, अमृत, शाश्वत, धर्मरूप व अखंड सुख असे जे ब्रह्म ते ज्यात रहाते ते ब्रह्माची मूर्तीच मी आहे"-भगवंतांच्या या सुंदर परम-अर्थमय शब्दांनी 
या अध्यायाची सांगता झाली आहे .यावर ज्ञानदेव म्हणतात,
अगा नित्य जें निष्कंप । अनावृत धर्मरूप ।
सुख जें उमप । अद्वितीय ॥ ४०६ ॥
विवेकु आपलें काम । सारूनि ठाकी जें धाम ।
निष्कर्षाचें निःसीम । किंबहुना मी ॥ ४०७ ॥
“अर्जुना, ते ब्रह्म नित्य. अचल, प्रगट, धर्मरूप, अमर्याद सुख व अद्वितीय असे आहे.विचार (अज्ञान नष्ट करण्याचे) आपले काम करून ज्या ठिकाणी प्राप्त होतो ते स्थान मी आहे. फार काय ?सिद्धांताचे कडेलोटाचे स्थान ते मीच आहे समज.”

अशाप्रकारे सत्व रज व तम या तीन गुणांची वैशिष्ट्ये,त्यांच्या संयुक्त उत्कर्ष-अपकर्षाचे परिणाम व गती,गुणातीतत्त्वाची लक्षणे व ते प्राप्त होण्यासाठी कारण असलेली अव्यभिचारी भक्ती याचे समूळ विवेचन चौदाव्या अध्यायात आलेले आहे.

भारती बिर्जे-डिग्गीकर

Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –