ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय अठरावा -मोक्षसंन्यास योग- पूर्वार्ध
पूर्वार्ध-
सतराव्या अध्यायातील श्रद्धात्रय आदि संकल्पनांचा विचार करून अर्जुन पुन्हा त्रस्त झाला.कर्मावर श्रद्धा ठेवूनही दोष टळत नाहीत, तर कर्मेच कशाला हवीत? त्याग व संन्यास त्याहून शतपटीने बरे.मुक्तीचा निश्चित मार्ग त्यांच्याच अनुष्ठानात सामावला आहे ,अशा विचाराने तो प्रश्न विचारण्यास सिद्ध झाला .
याप्रमाणे कार्यकारणभावसूत्राने एका अध्यायाच्या शेवटातून दुसऱ्या अध्यायाचा आरंभ अशी गीतेतील श्रीकृष्णार्जुनसंवादाची मांडणी ओळखून ज्ञानदेवांनी ती मांडणी पंचाहत्तराव्या ओवीत अधोरेखित केली आहे. ते म्हणतात ,"याप्रमाणे एक उत्पन्न करणारा व त्यापासून दुसरा उत्पन्न होणारा या नात्याने एका अध्यायापासून दुसरा अध्याय उत्पन्न झाला. आता अर्जुनाने जे विचारले ते चांगले ऐका."
एवं जन्यजनकभावें । अध्यावो अध्यायातें प्रसवे ।
आतां ऐका बरवें । पुसिलें जें ॥ ७५ ॥
या ओवीच्या पार्श्वभूमीवर मोक्षसंन्यासयोग या प्रदीर्घ कळसाध्यायाच्या पूर्वार्धाचे आकलन केले पाहिजे.
कळसाध्यायाच्या महत्त्वाचे विवरण करताना मंदिराचेच मनोज्ञ रूपक ज्ञानदेवांनी योजिले आहे. ते म्हणतात,
अशा तर्हेने गीतारूपी मंदिराची उभारणी करीत असतांना जमीन शुद्ध करण्यापासून पंधरावा अध्याय संपेपर्यंतचे पंधरा अध्यायांचे गीतारूपी मंदिर गच्चीपर्यंत पुरे झाले.वरती सोळावा अध्याय हा गळ्यावरील डेर्याचा आकार होय आणि सतरावा अध्याय तोच कळसाच्या बैठकीचा ओटा होय. त्याच्याही वर अठरावा अध्याय हाच कोणी एक सहजच उभारलेला कळस होय. त्यावर गीतादिक शास्त्रांमुळे व्यास हे कीर्तीची ध्वजा झाले.
ऐसेनि करितां उभारा । पंधरा अध्यायांत पंधरा ।
भूमि निर्वाळलिया पुरा । प्रासादु जाहला ॥ ३९ ॥
उपरी सोळावा अध्यायो । तो ग्रीवघंटेचा आवो ।
सप्तदशु तोचि ठावो । पडघाणिये ॥ ४० ॥
तयाहीवरी अष्टादशु । तो अपैसा मांडला कळसु ।
उपरि गीतादिकीं व्यासु । ध्वजें लागला ॥ ४१ ॥
जीवमात्रांच्या कल्याणासाठी हे गीतेचे मोक्षमंदिर व्यासमुनींनी उभारले आहे त्याचा प्रत्येकजण यथाशक्ती लाभ घेतो. कोणी बाहेरूनच मंदिराला प्रदक्षिणा घालते, कुणी गर्भगृहापर्यंत जाते पण मोक्षप्रसाद हा प्रत्येक मुमुक्षूसाठी इथे ठेवलेला आहे असा या रूपकाचा सुंदर समारोप ज्ञानदेव करतात.
अध्यायाच्या आरंभीचे श्री गुरुस्तवन -
या कळसाध्यायाच्या आरंभीचे श्रीगुरुस्तवन ज्ञानेश्वरांनी अतिशय संस्कृतप्रचूर आणि सुमधुर अशा शब्दांचे योजन करून संपन्न केले आहे.
ज्ञानदेव म्हणतात-
स्वभक्तांना निरंतर मंगलदायी अशा त्या निर्मळ देवाचा जयजयकार असो.
जन्म व वार्धक्यरूप कृष्णमेघाचा परिहार करणारा वादळवाराच अशा त्या परमेश्वराचा जयजयकार असो.हे अतिशय सामर्थ्यवान अशा,अशुभांच्या समुदायांचा ज्याने नायनाट केला आहे, वेदशास्त्ररूपी वृक्षांचे फल असलेल्या व त्या फलाची प्राप्ती करून देणार्या अशा श्रीगुरुदेवा, तुमचा जयजयकार असो.हे स्वरूपत: पूर्ण असणार्या, विषयवासना दवडलेल्यांचा कैवार घेणार्या, कालाच्या लीलेसही अंकित करणाऱ्या, अंशादि विभाजनापलीकडे असलेल्या, हे श्रीगुरुदेवा, तुमचा जयजयकार असो.
जयजय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ ।
जन्मजराजलदजाळ । प्रभंजन ॥ १ ॥
जयजय देव प्रबळ । विदळितामंगळकुळ ।
निगमागमद्रुमफळ । फलप्रद ॥ २ ॥
जयजय देव सकल । विगतविषयवत्सल ।
कलितकाळकौतूहल । कलातीत ॥ ३ ॥
या प्रकारे सुरुवातीच्या दहा संस्कृत प्रचुर ओव्यामध्ये हा जयजयकार असाच निनादत राहतो.
निश्चलस्वरूपी, चंचल चित्ताच्या प्राशनाने पुष्ट,तुंदिलतनु झालेल्या, जगद्रूपाने व्यक्त होऊन लीला करणाऱ्या त्या ईश्वराचा जयजयकार असो.
अत्यानंदाचे स्फुरण करणाऱ्या, सर्व पातकांचा निरंतर नाश करणाऱ्या मूलभूत अशा त्या सद्गुरूंचा जयजयकार असो.
स्वयंप्रकाशी, जगद्रूप मेघ धारण करणाऱ्या अव्यक्त आकाशासारख्या जगाच्या उत्पत्तीच्या मूलस्तंभस्वरूपी गुरुदेवांचा जय असो.
विशुद्ध ,अविद्यारूप वनाचा नाश करणारा जो हत्ती, मदनाच्या गर्वाचा शमदमांच्या साहाय्याने नाश करणारा, करूणेचा सागर अशा श्रीईश्वराचा जयजयकार असो.
एकरूप, कामसर्पाच्या गर्वाचा तिरस्कार करणाऱ्या, भक्तांच्या भावनेच्या मंदिरातला जो दिवा, ताप निवारण करणाऱ्या त्या श्रीगुरुचा विजय असो.
अद्वितीय, परिपक्व शांतीशीलांना अत्यंत प्रिय वाटणाऱ्या, भक्तांकडून जिंकला गेलेल्या, पूजनीय, मायेस अगम्य ठरलेल्या परमेश्वराचा विजय असो.
हे श्रीगुरू, हे कल्पनातीत कल्पतरू,ज्ञानवृक्षाच्या बीजाच्या उत्पत्तीस्थाना, तुझा जयजयकार असो.
पुढेही अठ्ठाविसाव्या ओवीपर्यंत हे श्रीगुरुमहिमान ज्ञानदेवीय अनुपम सुंदर शब्दांमधून उलगडत राहते. शेवटी मौनाच्या किनाऱ्यावर हे सौंदर्यभावी तरंग विलीन होतात.
स्तुती कांहीं न बोलणें । पूजा कांहीं न करणें ।
सन्निधी कांहीं न होणें । तुझ्या ठायीं ॥ २५ ॥
तुमच्या संबंधाने काही न बोलणे ही स्तुति होय, काही न करणे ही पूजा होय आणि साधकाने आपण जीव व शिव अथवा ब्रह्म यापैकी कोणाचाच अभिमान न घेणे, हीच तुमची जवळीक होय.
अर्जुनाचा संन्यास व त्यागविषयक प्रश्न व त्याची पार्श्वभूमी-
"संन्यासस्य महाबाहो" या अठराव्या अध्यायातील पहिल्याच श्लोकात अर्जुनाने विचारलेला प्रश्न ग्रथित झाला आहे. त्याची प्रस्तावना करताना श्रीज्ञानेश्वर म्हणतात-
यालागीं त्याग संन्यास । पुसावयाचें घेऊनि मिस ।
मग उपलविलें दुस । गीतेंचें तें ॥ ८३ ॥
अठरावा अध्यावो नोहे । हे एकाध्यायी गीताचि आहे ।
जैं वांसरुचि गाय दुहे । तैं वेळु कायसा ॥ ८४ ॥
( दुस= वस्त्र )
संवादाच्या निमित्ताने पारमार्थिक सुखाचा उपभोग घेण्याची ही गीतारूप पर्वणी संपत आल्याचा विषाद अर्जुनाला जाणवला व या सरत्या सुखाची परमावधी एकदाच शेवटी पुन्हा अनुभवावी, गीतेचे महावस्त्र पुन्हा उलगडावे,समाप्तीनिमित्त पुनरावृत्ती करावी अशा उद्देशाने अर्जुनाने हा त्याग व संन्यासाच्या मीमांसेचा प्रश्न विचारला आहे. ज्ञानदेव म्हणतात , "हा अठरावा अध्याय नाही तर ही एका अध्यायाची गीताच आहे. ज्यावेळेला वासरूच दूध काढायला लागेल त्यावेळेला पान्हा सोडण्यास गाईस कितीसा वेळा लागेल ? "
तर अर्जुनाचा प्रश्न असा आहे की," देवा, संन्यास व त्याग या दोन्ही शब्दांचा अर्थ एकरूपानेच भासतो. जसे की संघात आणि संघ हे दोन्ही शब्द एका संघाचाच निर्देश करतात, त्याप्रमाणे व्यवहारात त्यागाला संन्यास व संन्यासाला त्याग म्हणतात. आम्ही तरी तसेच जाणतो. या अर्थात जर काही भेद असेल तर तो आपण विशद करावा."
हां जी संन्यासु आणि त्यागु । इयां दोहीं एक अर्थीं लागु ।
जैसा सांघातु आणि संघु । संघातेंचि बोलिजे ॥ ८७ ॥
तैसेंचि त्यागें आणि संन्यासें । त्यागुचि बोलिजतु असे ।
आमचेनि तंव मानसें । जाणिजे हेंचि ॥ ८८ ॥
ना कांहीं आथी अर्थभेदु । तो देवो करोतु विशदु ।
तेथ म्हणती श्रीमुकुंदु । भिन्नचि पैं ॥ ८९ ॥
अशा प्रकारे अध्यात्माशी संबंधित, समानार्थी वाटणाऱ्या या दोन शब्दांचा अतिशय मार्मिक असा आशयविचार येथे अर्जुनाने आपल्या नेहमीच्या सूक्ष्मबुद्धीने उपस्थित केला आहे.
मात्र हा प्रश्न उपस्थित करणाऱ्या अर्जुनाचा मनोभाव इथे समजून घेणे आवश्यक आहे कर्म हे इथून तिथून बंधक असे अर्जुनाला या संपूर्ण संवादात उत्तरोत्तर वाटू लागले आहे. त्यापेक्षा कर्माचा त्याग तुलनेने सोपा आणि आध्यात्मिक प्रगतीला अनुकूल अशी त्याची भावना होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारला गेलेला आहे.कर्मामधे इतक्या पुष्कळ अडचणी आहेत.असे जर आहे तर कर्मठाला मोक्षाकडे जाणे कोठून घडणार ? तर आता कर्माचे हे उणेपण नाहीसे होवो व सर्व कर्मांचा त्याग केला जावो आणि त्या दोषरहित संन्यासाचा स्वीकार केला जावो असे अर्जुनाला वाटत आहे.
कर्मीं हा ठायवरी । आहाती बहुवा अवसरी ।
आतां कर्मठां कैं वारी । मोक्षाची हे ॥ ६८ ॥
तरी फिटो कर्माचा पांगु । कीजो अवघाचि त्यागु ।
आदरिजो अव्यंगु । संन्यासु हा ॥ ६९ ॥
श्रीहरीने सांगितलेल्या त्याग व संन्यास यांच्या व्याख्या -
श्रीज्ञानेश्वर "काम्यानां कर्मणां न्यासं" या अठराव्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात -
जें निपटूनि कर्म सांडिजे । तें सांडणें संन्यासु म्हणिजे ।
आणि फलमात्र का त्यजिजे । तो त्यागु गा ॥ ९२ ॥
मुळी कर्मच करावयाचे नाही, ह्या कर्माच्या त्यागाला संन्यास असे म्हणावे आणि कर्म करून त्या कर्माचे जे केवळ फळ टाकणे त्याला त्याग म्हणावे.
अर्जुनाच्या प्रश्नावर सर्वांच्या अंतरी वसणारा, सर्वसाक्षी असा तो परमेश्वर म्हणाला- " काम्यकर्मामध्ये एक स्वाभाविक असे सामर्थ्य आहे की त्याच्या परिणामांमध्ये जीव अटळपणे गोवला जातो. इच्छेपोटी होणारे असे हे कर्म म्हणजेच काम्यकर्म विष ओकून टाकावे तसे नि:शेष टाकण्याला, त्या प्रकारच्या त्यागाला "संन्यास" असे म्हणतात.
परंतु कर्मे तर करावीच लागतात.विशेषतः नित्य व नैमित्तिक कर्मातून जीवाची सुटकाच नाही. कर्माची मर्यादा उल्लंघन न करता, नित्यनैमित्तिकाकडे चित्त तर देणे, पण त्यांच्या सर्व फळाचा त्याग करणे या कर्मफलत्यागाला "त्याग" असे म्हणतात."
अशाप्रकारे त्याग व संन्यास यांच्या अर्थभेदाच्या सूक्ष्मच्छटा श्रीभगवान येथे उलगडून सांगत आहेत, पण त्याचवेळी त्याचे स्वरूपही या व्याख्यांच्या निमित्ताने त्यांनी येथे अधिक स्पष्ट केले आहे.
संन्यासाच्या योगाने काम्यकर्म बांधू शकत नाही.नित्यनैमित्तिकादि कर्मे धान्य पिकून झाडून जावे तशी त्या त्या अनुषंगाने निर्माण होऊन संपून जातात. अशा प्रकारे संन्यास व त्याग या दोन्हींच्या योगाने परमार्थसाधकाला आत्मज्ञानाच्या जणू राज्याभिषेक होतो.पण ही कर्मत्यागाची हातवटी जर चुकली व मग अनुमानानेच काहीतरी करायचे म्हणून त्याग जर केला, तर त्याग तर होत नाही, पण उलट असा त्याग करणारा मात्र अधिक गुंताड्यात पडतो.
ऐसिया निगुती दोनी । त्याग संन्यास अनुष्ठानीं ।
पडले गा आत्मज्ञानीं । बांधती पाटु ॥ १३० ॥
नातरी हे निगुती चुके । मग त्यागु कीजे हाततुकें ।
तैं कांहीं न त्यजे अधिकें । गोंवींचि पडे ॥ १३१ ॥
रोगाची परीक्षा झाल्याशिवाय दिलेले औषध हे विष ठरते, किंवा भुकेशिवाय जेवलेले जेवण मारक ठरते, तसेच हे आहे. त्याग व संन्यास हे अंतिमतः परमार्थसाधनाचे मार्ग आहेत. त्यांची युक्ती चुकली तर त्यांचे ओझे होईल असे श्रीपरमेश्वर येथे सांगत आहेत. याचे अधिक विश्लेषण पुढे आले आहे.ते हे की यज्ञ, दान, तप वगैरे ही जी आवश्यक कर्मे आहेत, ती कर्मे टाकू नयेत, ते कसे तर ज्याप्रमाणे प्रवास करणार्याने पाऊला पुढे पाऊल टाकत राहणे सोडू नये.
जियें यज्ञदानतपादिकें । इयें कर्में आवश्यकें ।
तियें न सांडावीं पांथिकें । पाउलें जैसीं ॥ १४९ ॥
कारण ज्याप्रमाणे तीर्थाच्या योगाने बाहेरील (शरीरावरील) मळ धुतला जातो व कर्माने चित्तशुद्धी होते, त्याप्रमाणे सत्कर्मे हीच पवित्र तीर्थे आहेत असे समजावे.
तीर्थें बाह्यमळु क्षाळे । कर्में अभ्यंतर उजळे ।
एवं तीर्थें जाण निर्मळें । सत्कर्मेचि ॥ १६० ॥
भ्रमाने माजलेला तामसी मनुष्य, कर्माचे बंधन हे कर्म करण्याच्याच हातोटीने कर्मे करून नाहीसे करावे, हे जाणत नाही. त्याचा कर्मत्याग हा तामस त्याग असतो.
तैसा कर्माचा बाधु कर्में । निस्तरीजे करितेनि वर्में ।
हे तामसु नेणें भ्रमें । माजविला ॥
राजस त्यागाचा प्रकार याहून वेगळा .जेव्हा शरीरास कष्ट होतील या भयाने कर्म टाकले जाते, तेव्हा तो राजस त्याग असे ओळखावे.
ऐसा शरीराचिया क्लेशा । भेणें कर्में वीरेशा ।
सांडी तो परीयेसा । राजसु त्यागु ॥ १९२ ॥
याप्रमाणे ज्ञानदेवांनी येथे कर्माच्या स्वरूपाच्या संदर्भात त्यागाचे बदलणारे आयाम विस्ताराने विश्लेषित केले आहेत.
कर्माची कारणे व हेतू -
"आणि अरे अर्जुना, देहाची मूर्तीच होऊन जे कर्म करण्य़ाला कंटाळा करतात, ते खेडवळ (अज्ञानी) होत."
आणि हां गा सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची ।
खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥ २१८ ॥
कर्माची संकल्पना स्पष्ट करताना भगवंतांनी अर्जुनाला उपदेशिले आहे की मनुष्यदेहाच्या आश्रयाला येऊन कर्माचा कंटाळा करणे हे गावंढळपणाचे म्हणजेच अडाणीपणाचे आहे. देह हा कर्माने व्यापलेला ,कर्माचाच बनलेला आहे श्वासोच्छ्वासादि शरीरस्थ कर्मावर तर आपली सत्ताही नाही .असे असताना अशुभ कर्मफलाच्या भीतीने किंवा शुभकर्मातील कष्टांना कंटाळून किंवा शुभाशुभाचा निर्णय होत नसल्यामुळे कर्म करणेच टाळणे आपल्या स्वाधीन नाही. कर्मांचे स्वरूप समजून घेणे, कारणे व हेतू समजून घेणे हे मात्र आपल्याला शक्य आहे.
या पार्श्वभूमीवर "पंचैतानि महाबाहो" या अठराव्या अध्यायाच्या तेराव्या श्लोकात कर्माची पाच कारणे श्रीभगवंतांनी सांगितलेली आहेत. त्यांचे निरूपण करताना श्रीज्ञानेश्वर म्हणतात-
"अर्जुना, सर्व कर्माची उभारणी या पाच कारणांनी आत्मस्वरूपाच्या बाहेर होते.आणि ज्या पाच कारणांच्या समुदायाकडून कर्मास सुरवात होते, तीच कारणे हेतूही असल्यामुळे ते हेतूही उघड उघड पाच आहेत."
तरी सत्यचि गा धनुर्धरा । सर्व कर्मांचा उभारा ।
होतसे बहिरबाहिरा । करणीं पांचें ॥ ३०४ ॥
आणि पांच कारण दळवाडें । जिहीं कर्माकारु मांडे ।
ते हेतुस्तव घडे । पांच आथी ॥ ३०५ ॥
श्रीभगवंतांनी "देह " हे पहिले कारण म्हटले आहे.यालाच "अधिष्ठान" असेही म्हणतात. हे अशासाठी की भोग्यवस्तूसह भोक्ता या देहात राहतो. इंद्रियाच्या दहा हातांनी अहोरात्र कष्ट सोसून प्रकृती जी सुखदुःखे मिळवते, ती पुरुष देहात राहून भोगतो. हे चोवीस तत्त्वांच्या कुटुंबाचे घर आहे .बंधमोक्षांचे गुंताडे येथे सुटतात. तसेच जागृती स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांचा हा आधार आहे याही अर्थाने "अधिष्ठान" हे नाव समर्पक आहे.
तैसीं यथा लक्षणें । आइकें कर्म-कारणें ।
तरी देह हें मी म्हणें । पहिलें एथ ॥ ३१५ ॥
ययातें अधिष्ठान ऐसें । म्हणिजे तें याचि उद्देशें ।
जे स्वभोग्येंसीं वसे । भोक्ता येथ ॥ ३१६ ॥
"कर्ता "-हे कर्माचे दुसरे कारण आहे. राजा स्वप्नात भिकाऱ्याच्या भूमिकेत तद्रूप व्हावा, त्याप्रमाणे आपल्याच विस्मरणाने चैतन्य देहाकाराशी तद्रूप होते, "जीव" म्हणून प्रसिद्धीस येते. प्रकृतीकडून करविली जाणारी कर्मे "मी केली" असे म्हणते म्हणून कर्ता हे अभिधान त्या भ्रांत चैतन्याला प्राप्त होते. जसे की ,आकाशच पाण्याची वृष्टि करते. त्या पाण्याचे खाली पृथ्वीवर डबके बनते. मग आकाश त्या डबक्यात प्रतिबिंबित होऊन ज्याप्रमाणे त्या डबक्याच्या आकाराचे होते .
आणि कर्ता हें दुजें । कर्माचें कारण जाणिजे ।
प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचें जें ॥ ३२१ ॥
आकाशचि वर्षे नीर । तें तळवटीं बांधे नाडर ।
मग बिंबोनि तदाकार । होय जेवीं ॥ ३२२ ॥
"इंद्रिये"-दृष्टी ही एकच असून ती पापणीच्या केसातून चिरल्याप्रमाणे भासते, त्याप्रमाणे बुद्धीचे एकच ज्ञान श्रोत्रादि इंद्रियभेदाने प्रकटते ती निरनिराळी इंद्रिये हे कर्माचे तिसरे कारण होय.
कां एकुचि पुरुषु जैसा । अनुसरत नवां रसां ।
नवविधु ऐसा । आवडों लागे ॥ ३२९ ॥
तेवीं बुद्धीचें एक जाणणें । श्रोत्रादिभेदें येणें ।
बाहेरी इंद्रियपणें । फांके जें कां ॥ ३३० ॥
"वायुशक्ती" - हे कर्माचे चौथे कारण आहे.. ही वायुशक्ती वाचेत बोलणे होते, हातात देणेघेणे होते, पायात गती,अधोद्वारी मलमूत्रादि, खांद्यापासून हृदयापर्यंत "प्राण", वरच्या बाजूस कंठस्थ "उदान",, पश्चिम द्वारातून वाहिल्यास "अपान" , व्यापकपणाच्या योगाने "व्यान", एकसारखे शरीर भोजनरसाने भरून राहिले की "समान", जांभई, शिंक, ढेकर यांच्या रूपाने "उपप्राण" अशा नानाविध वृत्ती एक वायुशक्ती प्रकट करते.श्रृंगारादि नवरसांच्या अनुरोधाने वागण्यास लागला म्हणजे जसा एकच पुरुष नऊ प्रकारचा आहे असे वाटावयास लागते,त्याप्रमाणे प्राणवायूमधे जी अखंड क्रियाशक्ति आहे ती एकच शक्ति निरनिराळ्या ठिकाणी वाटली गेली असता निरनिराळ्या नावाची होते.
आणि पूर्वपश्चिमवाहणीं । निघालिया वोघाचिया मिळणी ।
होय नदी नद पाणी । एकचि जेवीं ॥ ३३२ ॥
तैसी क्रियाशक्ति पवनीं । असे जे अनपायिनी ।
ते पडिली नानास्थानीं । नाना होय ॥ ३३३ ॥
"देवांचे समुदाय" -हे कर्माचे पाचवे कारण आहे.साऱ्या वृत्तींच्या ऐश्वर्यात जे सर्वोत्तमा बुद्धी. इथे ज्ञानेश्वर चढत्या श्रेणीने सुंदर अशी एक उपमा देतात .जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे व त्या कवित्वात जशी सुरसतेची बहार असावी, व ह्या सुरसतेत ज्याप्रमाणे परमात्मवर्णन यावे त्याप्रमाणे मनादि सर्व वृत्तींच्या ऐश्वर्यात जशी एकटी बुद्धीच श्रेष्ठ. आणि या बुद्धीला इंद्रियांच्या सामर्थ्याची अपूर्व शोभा आहे. कारण त्या दशेंद्रियांच्याही मागे सूर्यादि देवतांचे आशीर्वचक समुदाय उभे असतात.
वाचे बरवें कवित्व । कवित्वीं बरवें रसिकत्व ।
रसिकत्वीं परतत्त्व । स्पर्शु जैसा ॥ ३४७ ॥
तैसी सर्ववृत्तिवैभवीं । बुद्धिचि एकली बरवी ।
बुद्धिही बरव नवी । इंद्रियप्रौढी ॥ ३४८ ॥
ही पाच कारणे हेच कर्माचे हेतूही आहेत. सूर्याच्या प्रकाशाला कारण व हेतू सूर्यच. उसाच्या वाढीला उसाचे कांडेच हेतू, सरस्वतीच्या वर्णनाचे माध्यम शब्दच, त्याचप्रमाणे कर्माचे कारण असलेले शरीरादि हेच कर्माचे हेतू आहेत. अशा देहादिक कारणांनी देहादिक हेतूला धरून जे कर्म उत्पन्न होते, ते जर शास्त्रार्थानुसार असेल तर तो न्यायच न्यायाला हेतू .अन्यथा कर्मांचे होणे म्हणजे अन्याय अन्यायाला हेतू असे समजावे.
कर्म व ज्ञान यांची त्रिपुटी
अठराव्या अध्यायाच्या "ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता" या अठराव्या श्लोकात कर्म व ज्ञान यांची त्रिपुटी वर्णन केलेली आहे.ज्ञान,ज्ञेय, ज्ञाता ही कर्मास कारणीभूत अशी ज्ञानाची त्रिपुटी आहे. ही त्रिपुटी जगाचे कारण आहे आणि हीच कर्माची नि:संशय प्रवृत्ति आहे. जाणावयाचा विषय हे ज्ञेय,जाणून घेणारा तो ज्ञाता, व या दोघांची गाठ घालून देणारा रस्ता ते ज्ञान अशी ज्ञानाची त्रिपुटी आहे.
जें ज्ञान ज्ञाता ज्ञेय । हें जगाचें बीज त्रय ।
ते कर्माची निःसंदेह । प्रवृत्ति जाण ॥ ४६१ ॥.
अविद्येच्या ठिकाणी निपजलेले हे ज्ञान निपजताक्षणीच स्वतःला त्रिधा करून सोडते. ज्ञान आपल्या धावेपुढे ज्ञेयाचा धोंडा (बांध) घालून आपल्या मागल्या बाजूला ज्ञातेपणाला (ज्ञात्याला) उभारते.
तया जीवा नांव ज्ञाता । आणि जें हें सांगितलें आतां ।
तेंचि एथ पंडुसुता । ज्ञान जाण ॥ ४६६॥
जें अविद्येचिये पोटीं । उपजतखेंवो किरीटी ।
आपणयातें वांटी । तिहीं ठायीं ॥ ४६७ ॥
आपुलिये धांवे पुढां । घालूनि ज्ञेयाचा गुंडा ।
उभारी मागिलीकडां । ज्ञातृत्वातें ॥ ४६८ ॥
ज्ञेयाच्या सीमेपासून संपणारे हे सामान्यज्ञान आहे. शब्द,स्पर्श, रूप,रस, गंध हा पाच प्रकारचा आभास ज्ञेयाचा आहे.जसे की एकच आंब्याचे फळ शब्दरूप, रसरूप, गंधरूप तसेच निखळ सौंदर्यरूप असे ज्ञानेंद्रियांना भेटते. इंद्रियांच्या द्वाराने ज्ञानाचा पाच मार्गाने असा स्वीकार होतो.
कारण व कर्म कर्ता ही कर्माची त्रिपुटी अर्थात कर्मसंग्रह आहे. ज्ञानाच्या त्रिपुटीशी याचा संबंध कसा येतो याचे विश्लेषण येथे केले आहे.
ज्ञेयवस्तूचे ज्ञान हे कर्माचे कारण ठरते. ते ज्ञेय (तो विषय) जर कदाचित ज्ञात्याला (जीवाला) प्रिय असेल, तर तो विषय भोगण्याला एक क्षणाचाही विलंब ज्ञात्यास सहन होत नाही. अथवा जर तो विषय अप्रिय असा त्याला वाटला तर त्यास तो टाकीपर्यंत, प्रलयकाल आल्यासारखे दु:ख होऊन, त्या विषयाचा त्याग केव्हा होईल असे त्यास वाटते व त्यागास थोडा वेळ लागला तर त्यास तो वेळ युग गेल्याप्रमाणे वाटतो.
म्हणौनि ज्ञान ज्ञेय ज्ञाता । हे त्रिविध गा पंडुसुता ।
होयचि कर्मा समस्तां । प्रवृत्ति येथ ॥ ४८५ ॥
परी तेंचि ज्ञेय विपायें । जरी ज्ञातयातें प्रिय होये ।
तरी भोगावया न साहे । क्षणही विलंबु ॥ ४८६ ॥
नातरी अवचटें । तेंचि विरुद्ध होऊनि भेटे ।
तरी युगांत वाटे । सांडावया ॥ ४८७ ॥
ज्ञानदेवांनी हे सुंदर व सुलभपणे सांगितले आहे.सर्प किंवा हार या वस्तूचे यथार्थ ज्ञान झाल्यावर ज्ञाता हा कर्ता बनून त्या वस्तूचा त्याग वा स्वीकार करतो. जेवणारा स्वयंपाकास बसावा, कसोटीनेच परीक्षक बनावे तसे ज्ञेयविषयाच्या इच्छेने ज्ञाता कर्ता होतो, ज्ञेय हे कार्य होते व ज्ञान हे क्रियेचे साधन म्हणजे 'करण' होते!
बुद्धी ,ज्ञान, कर्म,कर्ता ,धृती आणि सुख यांची गुणांनुसार त्रिविध स्वरूपे
बुद्धी ,ज्ञान, कर्म,कर्ता ,धृती,सुख या सर्वांचे त्रिगुणानुसार जे तीन स्वरूपाकार होतात यांचे यथार्थ व यथासांग वर्णन अठराव्या अध्यायाच्या एकोणीस ते चाळीस या श्लोकांमध्ये विस्ताराने आले आहे. श्रीज्ञानदेवांनी त्यांचा अधिक विस्तार करताना म्हटले आहे की -
ज्ञान- ज्याच्या उदयाने ज्ञाता व ज्ञान हे ज्ञानत्रिपुटीतील इतर दोन घटक लुप्त होतात तेच शुद्धज्ञान म्हणजे सात्विक ज्ञान. शिवापासून तृणापर्यंत हे ज्ञान समदृष्टी असते.याच्या योगाने विषय ,ज्ञाता व ज्ञान ही तिन्ही उरत नाहीत, ते मोक्षलक्ष्मीचे मंदिर म्हणजेच सात्विक ज्ञान.
म्हणौनि ज्ञाना कर्मा कर्तया । पातेजों नये धनंजया ।
जे दोनी बांधती सोडावया । एकचि प्रौढ ॥ ५१८ ॥
म्हणून अर्जुना, ज्ञान, कर्म व कर्ता यांच्यावर विश्वसू नये. कारण ((राजसिक व तामसिक हे )दोन प्रकार बांधणारे आहेत व (सात्विक हा) एक प्रकार सोडवण्यास समर्थ आहे.
भेदाची कास धरून चालणारे ते राजस ज्ञान होय. भूतांच्या विचित्रतेमुळे आपण स्वत: छिन्नभिन्न होऊन, ज्या ज्ञानाने ज्ञात्याला (जीवाला) बराच भ्रमिष्टपणा आणला आहे ते राजस ज्ञान.
तरी पार्था परीयेस । तें ज्ञान गा राजस ।
जें भेदाची कांस । धरूनि चाले ॥ ५३८ ॥
विचित्रता भूतांचिया । आपण आंतोनि ठिकरिया ।
बहु चकै ज्ञातया । आणिली जेणें ॥ ५३९ ॥
खऱ्या स्वरूपाला विस्मरणाची कडी घालून निद्रा मग स्वप्नसृष्टीचे गाठोडे उघडते, त्याप्रमाणे खऱ्या ज्ञानाच्या शिवाराबाहेर मिथ्यामोहाच्या खळ्यामध्ये जे जीवाला तीन अवस्थांची क्रीडा दाखवते ते सारे राजसज्ञान होय .
तामसज्ञान हे केवळ नावाचेच ज्ञान. निंदेच्या बहिष्कारामुळे म्लेंच्छधर्माच्या डोंगरावर भटकणारे ,तमोगुणरूपी पिशाचाने पछाडल्यामुळे वेडे होऊन भ्रमत राहणारे, विहित-अविहिताचा विचार नसणारे हे ज्ञान (विषयोपभोगाकरता) नात्याची आडकाठी जाणत नाही व कोणताही पदार्थ निषिद्ध म्हणत नाही, ज्याप्रमाणे एखादे कुत्रे ओसाड गावात सोडलेले असावे.
जें गा ज्ञान ऐसें । गुणग्रहें तामसें ।
घेतलें भवें पिसें । होऊनियां ॥ ५५१ ॥
जें सोयरिकें बाधु नेणें । पदार्थीं निषेधु न म्हणे ।
निरोविलें जैसें सुणें । शून्यग्रामीं ॥ ५५२ ॥
केवळ देहाच्या पोषणासाठी, केवळ स्वार्थप्रेरित,ईश्वर न जाणणारे ,न मानणारे असे हे ज्ञान. गावातील देवळातले देव जर खरोखर (सृष्टीचे) नियामक असतील तर देशातले डोंगर गुपचूप का रहातील ? कदाचित देव मानला तर याप्रमाणे देव म्हणजे फक्त दगडच (दगडाची मूर्तीच) समजतो आणि आत्मा तर देहालाच समजतो.असा ज्ञानाच्या नावाने तो सगळा तमप्रलय समजावा.
गांवींचें देवळेश्वर । नियामकचि होती साचार ।
तरी देशींचे डोंगर । उगे कां असती ? ॥ ५७० ॥
ऐसा विपायें देवो मानिजे । तरी पाषाणमात्रचि जाणिजे ।
आणि आत्मा तंव म्हणिजे । देहातेंचि ॥ ५७१ ॥
कर्म -'सात्विक कर्म ' जे अधिकारवशात् प्राप्त झाले व सर्वभावे अनुष्ठिले, ते सात्विक कर्म.जसे पतिव्रतेचे पतीला आलिंगन,किंवा न कंटाळता जीवेभावे आईने केलेले बालकाचे पोषण. सात्विक कर्म हे ब्रह्मार्पणवृत्तीतून सिद्ध होत असते. नित्यकर्म करावयाचे राहिले याच्या खेदाने मनाला वाईट वाटू देत नाही अथवा नित्यकर्म जर त्याच्या हातून यथासांग झाले तरी त्याच्या आनंदाने अभिमान मिरवण्याचे जाणत नाही,अशा हातोटीने जे कर्म घडते, त्याला ‘सात्विक कर्म’ हे गुण नाम आहे.
तरी अकरणाचेनि खेदें । द्वेषातें जीवीं न बांधे ।
जालियाचेनि आनंदें । फुंजों नेणें ॥ ५९२ ॥
ऐसऐसिया हातवटिया । कर्म निफजे जें धनंजया ।
जाण सात्विक हें तया । गुणनाम गा ॥ ५९३ ॥
सक्लेश असे काम्यकर्म हे 'राजसकर्म' म्हणून ओळखावे.घरी कोणाशी धड बोलायचे नाही आणि जगाचे आदरातिथ्य करायचे. तुळशीला पाणीही घालायचे नाही पण द्राक्षवेलीला दूध शिंपायचे. नित्यनैमित्तिक कर्मांसाठी जराही श्रम घ्यायचे नाहीत,बसलेला उठू देखील शकत नाही, पण इतर काम्यकर्मांसाठी देहासहित सर्वस्व खर्च करीत असताही, आपण फार खर्च केला असे त्यास वाटत नाही.
तैसी नित्यनैमित्तिकें । कर्में जियें आवश्यकें ।
तयांचेविषयीं न शके । बैसला उठूं ॥ ५९७ ॥
येरां काम्याचेनि तरी नांवें । देह सर्वस्व आघवें ।
वेचितांही न मनवे । बहु ऐसें ॥ ५९८ ॥
बरे त्यातून निष्पत्तीही क्षुद्रच असते. केवळ भीक मिळवण्यासाठी गारुड्याने साप बाळगावा त्यातली ही गत असते ! पण एखाद्याला तेच गोड वाटत असेल तर त्याला कोण काय करणार!
तामसकर्म- उचित-अनुचित असा विचार न करता, आपल्या अधिकाराचा विवेक न धरता सर्वनाश करणारे, ते 'तामसकर्म'. तरी जे निंदेचे काळे (दोष असणारे) वसतिस्थान आहे व ज्यामुळे निषिद्ध कर्माचे जन्म खरे सफल झाले आहेत, ते तामस कर्म होय. जे तामस कर्म उत्पन्न झाल्याबरोबर पाण्यावर रेघ काढली असता काही दिसत नाही, तसे (ज्याचे फल) दृष्टीला काहीच दिसत नाही.
तरी तें गा तामस कर्म । जें निंदेचें काळें धाम ।
निषेधाचें जन्म । सांच जेणें ॥ ६११ ॥
जें निपजविल्यापाठीं । कांहींच न दिसे दिठी ।
रेघ काढलिया पोटीं । तोयाचे जेवीं ॥ ६१२ ॥
कमळांच्या वनात काट्यांचा फास स्वतःही झिजतो,कमळांचाही नाश करतो .माशी अन्नातून आपणास खावविते व खाणाऱ्याची ओकून ओकून आतडी तोडते, तसा या तामस कर्माचा प्रकार असतो.
कर्ता -त्रिविध कर्मांच्या योगाने कर्ताही त्रिविध प्रकारचा होतो.
सात्विक कर्ता -जो ईश्वरार्पण करण्यास योग्य असा कर्माचा समुदाय उत्पन्न होण्याकरता, त्या कर्मांना जो योग्य काल व शुद्ध स्थळ साधतो आणि कर्मांचा निर्णय शास्त्रांच्या प्रकाशाने (दृष्टीने) पहातो, तो सात्विक कर्ता.
तेवींचि परमात्मलिंगा । समर्पावयाजोगा ।
कर्मकलापु पैं गा । निपजावया ॥ ६३५ ॥
तया काळातें नुलंघणें । देशशुद्धिही साधणें ।
कां शास्त्रांच्या वातीं पाहणें । क्रियानिर्णयो ॥ ६३६ ॥
राजस कर्ता -स्वार्थांध आणि प्रसिद्धिलोलुप असा जो कर्ता ,तो राजस कर्ता. अशी सकाम कर्मे केल्यावर त्याला इच्छित फल प्राप्त झाले तर आनंदाने तो या जगास वेडावून दाखवतो. आरंभलेले कर्म जर फलहीन झाले तर त्या शोकाने जिंकला जाऊन त्या कर्माचा धिक्कार करावयास लागतो.
आणि कर्मजात केलिया । फळ लाहे जरी धनंजया ।
तरी हरिखें जगा यया । वांकुलिया वाये ॥ ६५९ ॥
अथवा जें आदरिलें । हीनफळ होय केलें ।
तरीं शोकें तेणें जिंतिलें । धिक्कारों लागे ॥ ६६० ॥
तामस कर्ता -तामस कर्ता हा स्वैराचारी, आळशी व दुसऱ्याच्या विघ्नात आनंद मानणारा, त्यासाठी कष्ट घेणारा असतो.ज्या क्रिया दुसर्याच्या व आपला घात करणार्या असतील, त्या वाईट क्रिया करण्यास आरंभ करतो. त्या क्रिया करतेवेळी सुद्धा त्यांचा परिणाम काय झाला याविषयी सावधपणा ठेवीत नाही. वावटळीत सुटलेला वारा जसा हवा तिकडे भडकतो, त्याप्रमाणे तो स्वैर रीतीने वागतो.
तैसा पुढीलया आपुलया । घातु करीत धनंजया ।
आदरी वोखटिया । क्रिया जो कां ॥ ६६५ ॥
तिया करितांही वेळीं । काय जालें हें न सांभाळी ।
चळला वायु वाहटुळी । चेष्टे तैसा ॥ ६६६ ॥
बुद्धी - हीसुद्धा त्रिगुणांच्या अधीन होऊन त्रिविध प्रकारची होते.
सात्विक बुद्धी -नित्य व नैमित्तिक ही करणीय व काम्य व निषिद्ध ही अकरणीय कर्मे हे जी व्यवस्थितपणे जाणते ती सात्विकी बुद्धि होय. जी काम्यकर्मे संसारभयदायक म्हणून अकृत्यपणाचे शिंतोडे पडलेली आहेत ,त्या अकरणीय व जन्ममरणाच्या भयाने युक्त अशा कर्माच्या ठिकाणी ही बुद्धी प्रवृत्तीला मागल्या पायीच पळावयास लावते.
हें करणीयाचिया कडे । जें ज्ञान आथी चोखडें ।
आणि अकरणीय हें फुडें । ऐसें जाण ॥ ७०८ ॥
जीं तिथें काम्यादिकें । संसारभयदायकें ।
अकृत्यपणाचें आंबुखें । पडिलें जयां ॥ ७०९ ॥
तिये कर्मीं अकार्यीं । जन्ममरणसमयीं ।
प्रवृत्ति पळवी पायीं । मागिलींचि ॥ ७१० ॥
राजस बुद्धी- जी बुद्धी ही जी धर्माधर्मरूप कृत्याकृत्ये, त्यांची निवड न करता सरसकट आचरण करते ती राजसबुद्धी.
तैसीं इयें कार्याकार्यें । धर्माधर्मरूपें जियें ।
तियें न चोजवितां जाये । जाणती जे कां ॥ ७२० ॥
तामस बुद्धी- जितके शास्त्रानुसार वागणे असेल, तितके सर्व ज्या बुद्धीला पातक असे वाटते व खरे ते खोटे असेच जी बुद्धि मानते अशा विपरीत बुद्धीला तामस बुद्धी म्हणतात.
तैसें धर्मजात तितुकें । जिये बुद्धीसी पातकें ।
साच तें लटिकें । ऐसेंचि बुझे ॥ ७२६ ॥
धृती -
सात्विक धृती-सूर्य उगवल्यावर चोरांचा आश्रय अंधार नाहीसा होतो. राजाची आज्ञा झाली की दुर्व्यवहार बंद पडतो .त्याप्रमाणे सात्विक धैर्याचा म्हणजेच धृतीचा उदय झाल्यावर इंद्रियांच्या व विषयांच्या गाठी सुटतात. मनःप्राण इंद्रियांची धाव बंद होते.मनादिक इंद्रिये आपापला व्यापार उभ्याउभ्याच टाकून देतात, मन संकल्पविकल्परहित होते. प्राण सुषुम्नानाडीत स्थिरावतात. बुद्धी शांत होते. इंद्रियाच्या विषयांशी पडलेल्या गाठी आपोआप सुटतात व दहाही इंद्रिये आपल्या मनरूपी आईच्या पोटात प्रवेश करतात (आपआपल्या विषयांचा संबंध सोडून अंतर्मुख होतात व योगकौशल्याने ही सारी ध्यानाच्या गाभाऱ्यात कोंडली जातात.)
तैसा जो धीरु । उठलिया अंतरु ।
मनादिकें व्यापारु । सांडिती उभीं ॥ ७३७ ॥
इंद्रियां विषयांचिया गांठी । अपैसया सुटती किरीटी ।
मन मायेच्या पोटीं । रिगती दाही ॥ ७३८ ॥
राजस धृतीच्या सहाय्याने शरीराच्या आश्रयाने तीन पुरुषार्थांचा- धर्म ,अर्थ, काम यांच्या- गलबतावरचा साहसी व्यापार जीव करतो.एवढे सायास तो जीवात्मा त्या धैर्याने सहन करतो. जे कर्म भांडवलात गुंतवतो ते चौपट वाढवतो, आणि स्वर्ग आणि संसाराच्या दोन्ही घरात पोटभर नांदतो.
मनोरथांच्या सागरीं । धर्मार्थकामांच्या तारुवावरी ।
जेणें धैर्यबळें करी । क्रिया-वणिज ॥ ७४६ ॥
जें कर्म भांडवला सूये । तयाची चौगुणी येती पाहे ।
येवढें सायास साहे । जया धृती ॥ ७४७ ॥
तामसी धृती ही स्वप्न, भय,शोक,विषाद व मद या पाच दोषांना धारण करणारी असते. कोळसा काळेपणानेच प्राप्त असतो तसे या अधम गुणांनीच तामसी माणसाचे सर्व व्यवहार चालतात. असे त्या विश्वाच्या देवाने (श्रीकृष्णाने) म्हटले.
एवं पांचही हे निद्रादिक । तामसाच्या ठाईं दोख ।
जिया धृती देख । धरिलें आहाती ॥ ७६१ ॥
तिये गा धृती नांवें । तामसी येथ हें जाणावें ।
म्हणितलें तेणें देवें । जगाचेनी ॥ ७६२ ॥
सुख - तीन प्रकारच्या कर्मांपासून जे एक फळ उत्पन्न होते, ज्याला सुख असे म्हटले जाते, तेही (सुख) कर्माच्या आधीन असल्यामुळे तीन प्रकारचे आहे असे समजावे.
येथ फळ जें एक निफजे । सुख जयातें म्हणिजे ।
तेंही त्रिविध जाणिजे । कर्मवशें ॥ ७६७ ॥
सात्विक सुख आरंभी कठीणपणाचा कडेलोट करणारे, पण परिणामी अमृतासारखे मधुर व हितकारक असते.चंदन मिळवण्यासाठी सर्पांचा सामना करावा, खजिन्यासाठी भुतांचे भय ओलांडावे, त्याचप्रमाणे प्रखर वैराग्य कठोर व्रताचरण आदिकरून बुद्धीला भोकसे पाडावे, सुषुम्नेच्या तोंडाने प्राण अपानांचे लोंढे गिळावेत तेव्हा आत्मज्ञान मिळते. विषयांचे घर सोडताना इंद्रियांना युगांत झाल्यासारखे वाटते. जसे एकुलते एक मूल मृत्यू पावल्यावर आईला वाटते, किंवा जळावेगळ्या मासोळीला वाटते तसेच.ज्या सुखाचा आरंभ अशा कठिणपणाच्या त्रासाचा अनुभव देतो, परंतु मग ज्याप्रमाणे क्षीरसमुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यावर जसा अमृताचा लाभ देव-दानवांना झाला,या सुखाच्या अभ्यासारंभी वैराग्यरूपी विष जे निघाले, त्याला धैर्यरूपी शंकराने आपला गळा पुढे केला (ते प्राशन केले). मग ज्या सुखाच्या ठिकाणी ज्ञानरूपी अमृताचा आनंद प्रगट झाला.
ऐसा जया सुखाचा आरंभु । दावी काठिण्याचा क्षोभु ।
मग क्षीराब्धी लाभु । अमृताचा जैसा ॥ ७८८ ॥
पहिलया वैराग्यगरळा । धैर्यशंभु वोडवी गळा ।
तरी ज्ञानामृतें सोहळा । पाहे जेथें ॥ ७८९ ॥
या खडतर प्रवासाच्या शेवटी मात्र अद्वयानंदाची खाण आहे.
राजस सुख विषय व इंद्रियांच्या मिलाफात असते. भोगताना गोड, परिणामी आपत्तीकारक. जणू अधिकाऱ्याच्या गावातील आगमनावेळचा उत्साह. किंवा ऋण काढून केलेले लग्न. बचनागाची पहिली गोडी,चोराची मैत्री ,बाजारू स्त्रीचा संग. हे सुख जिवाला पोसते.संपादलेले पुण्य एक दिवस भोगवाटेने संपून जाते, मग हानीच्या घावांमध्ये लोळत तडफडत पडणे एवढेच उरते. पातकांचे संपादन मात्र झालेले असते. नरकात जाण्याचे द्वारही खुलेच असते. राजस सुखाचे परिणाम एवढे भीषण असतात. बचनाग हे विष नावाला गोड आहे, परंतु त्याचे सेवन करणारास मारून ते आपले मारकत्व परिणामी खरे करते. त्याप्रमाणे जे सुख प्रथम गोड असते व शेवटी कडू असते.ते सुख खरोखर रजोगुणाचे बनलेले आहे. म्हणून कधीही त्या सुखाला स्पर्श करू नये.
पैं नामें विष महुरें । परी मारूनि अंतीं खरें ।
तैसें आदि जें गोडिरें । अंतीं कडू ॥ ८०४ ॥
पार्था तें सुख साचें । वळिलें आहे रजाचें ।
म्हणौनि न शिवें तयाचें । आंग कहीं ॥ ८०५ ॥
तामस सुख हे अपेयपान,अभक्ष्यभक्षण,व्यभिचारीणीचा संग, दुसऱ्यास नागवून मिळालेला लाभ अशा सर्वस्वी निषिद्ध गोष्टींमध्ये सामावलेले असते. ते आळसामध्ये पोसले जाते. निद्रेमध्ये परिणत होते. शेवटी आत्मसुखाच्या मार्गाविषयी भुरळ पाडते .आदिअंती जे अशुद्धच असे तामस सुख सर्वस्वी निंद्यच असते.तामस सुखाला सुख असे म्हणणे संभवत नाही.
जें आलस्यावरी पोखिजे । निद्रेमाजीं जें देखिजे ।
जयाच्या आद्यंतीं भुलिजे । आपुली वाट ॥ ८०८ ॥
तें गा सुख पार्था । तामस जाण सर्वथा ।
हें बहु न सांगोंचि जें कथा । असंभाव्य हे ॥ ८०९ ॥
पूर्वार्धाचा समारोप- त्रिगुणांची सत्ता-
ज्ञानदेव म्हणतात,"अशा प्रकारे हे सर्व जग केवळ तीन गुणांचे शुद्ध बनले आहे . त्रिगुणांची अशी अचाट शक्ति आहे की या गुणांनी देवांच्याही मागे (ब्रह्मा, विष्णु, शंकर असे) तीन प्रकार लावले, या गुणांनी लोकात तीन (स्वर्ग, मृत्युलोक व पाताळ असे) भेद उत्पन्न केले व या चार गुणांनी चार निरनिराळे व्यवसाय जिवांना लावून दिले."
यालागीं हें सकळ । तिहीं गुणांचेंचि केवळ ।
घडलें आहे निखिळ । ऐसें जाण ॥ ८१६ ॥
गुणीं देवां त्रयी लाविली । गुणीं लोकीं त्रिपुटी पाडिली ।
चतुर्वर्णा घातली । सिनानीं उळिगें ॥ ८१७ ॥
अशाप्रकारे अठराव्या अध्यायाच्या पूर्वार्धात सुमारे आठशेहून अधिक ओव्यांपर्यंत या अध्यायातील अनेक जटिल आध्यात्मिक संकल्पनांवर ललितसुंदर अशा उपमा-उत्प्रेक्षांचा वर्षाव करीत त्या संकल्पनांना ज्ञानदेवांनी सामान्यांच्या आकलनाच्या कक्षेत आणले आहे.

भारती बिर्जे-डिग्गीकर
Comments
Post a Comment