ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय अठरावा -मोक्षसंन्यास योग- उत्तरार्ध



ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय अठरावा -मोक्षसंन्यास योग- उत्तरार्ध-

त्रिगुणाधारित चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे ज्ञानेश्वरांनी दिलेले स्पष्टीकरण
"ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परंतप"या अठराव्या अध्यायातील एक्केचाळिसाव्या श्लोकाचे स्पष्टीकरण देताना ज्ञानेश्वर प्रथम चातुर्वर्ण्य कोणते हे सांगून नंतर त्रिगुणांशी त्यांचा संबंध उकलून देतात.
चातुर्वर्ण्य व्यवस्थेत ब्राह्मण हे मुख्य आहेत. तदनंतर क्षत्रिय आणि वैश्य हेही वेदोक्त कर्म करण्याचे अधिकारी असल्यामुळे ब्राह्मणांच्याच बरोबरीचे आहेत. चौथ्या शूद्रांचा मात्र वेदांशी संबंध नाही पण त्यांची उपजीविका इतर तीन वर्णांवर अवलंबून असल्याने त्या वृत्तीच्या सान्निध्यात श्रुतीने शूद्रांचा इतर वर्णांबरोबर स्वीकार केला आहे.हे स्पष्ट करताना ज्ञानदेव एक सुंदर उपमा देतात.ज्याप्रमाणे फुलाच्या बरोबर श्रीमंत मनुष्य सुताचा वास घेतो, त्याप्रमाणे ब्राह्मणादि तिन्ही वर्णांबरोबर शूद्राचा निकटचा संबंध असल्यामुळे श्रुतीने शूद्राला स्वीकारले आहे.
चौथा शूद्रु जो धनंजया । वेदीं लागु नाहीं तया ।
तर्‍हीं वृत्ति वर्णत्रया । आधीन तयाची ॥ ८२० ॥
तिये वृत्तिचिया जवळिका । वर्णा ब्राह्मणादिकां ।
शूद्रही कीं देखा । चौथा जाला ॥ ८२१ ॥
जैसा फुलाचेनि सांगातें । तांतुं तुरंबिजे श्रीमंतें ।
तैसें द्विजसंगें शूद्रातें । स्वीकारी श्रुती ॥ ८२२ ॥
बापाने संपादलेले मुलांमध्ये वाटून द्यावे, सूर्य जसा प्रवाशांना वाटा नेमून देतो किंवा धनी चाकरांची कामे निश्चित करतो,त्याप्रमाणे प्रकृतीच्या गुणांनी या चारही वर्णांना कामे वाटून दिली आहेत .
हे गुणकर्मांचे गुणोत्तर कोणते हेही ज्ञानदेवांनी स्पष्ट केले आहे .सत्वाने आपल्या अंगच्या समविषमभावानुसार ब्राह्मण व क्षत्रिय वर्ण धारण केले आहेत. तसेच रजोगुणात सत्वगुण मिसळला असता वैश्यवर्णाची निश्चिती होते,तर रजोगुणात तमोगुणाचे मिश्रण झाल्यास तेथे शूद्र वर्ण असल्याचे ठरते.
मनुष्यसमुदायाचे चार भेद या तीन अंगभूत गुणामुळे पडतात. तदनुसार त्यांची कर्मे ठरतात. 

अशा प्रकारे चातुर्वर्ण्यव्यवस्था ही मूलतः"गुणकर्मविभागश:" निश्चित होते “जन्मकर्मविभागश:” नाही हे येथे  पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे ,व श्रीज्ञानेश्वरांनी सहृदयपणे चारी वर्णांची कामे येथे निरूपिली आहेत. हेतू हा आहे की चारी वर्णांनी करावयाच्या कर्ममार्गाचे स्वरूप स्पष्ट करावे,की ज्यायोगे  (स्वाभाविक कर्मांनी) ते चारी वर्ण, जन्ममृत्यूच्या कात्रीतून चुकवून, ईश्वराच्या ठिकाणी पोहोचतील.
ऐसैसी गा पार्था । हे चतुर्वर्णव्यवस्था ।
करूं आतां कर्मपथा । यांचिया रूपा ॥ ८२३ ॥
जिहीं गुणीं ते वर्ण चारी । जन्ममृत्यूंचिये कातरी ।
चुकोनियां ईश्वरीं । पैठे होती ॥ ८२४ ॥

ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांची स्वाभाविक कर्मे-
अठराव्या अध्यायाच्या बेचाळिस,त्रेचाळिस व  चव्वेचाळिसाव्या  श्लोकात अनुक्रमे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची स्वाभाविक कर्मे निवेदिली आहेत.श्रीज्ञानेश्वरांनी त्यांचा विस्तार करताना म्हटले आहे -
ब्राह्मणवर्णाच्या ठिकाणी नऊ गुणरत्ने स्वाभाविकरित्या शोभत असतात.
शम- पतिव्रता स्त्रीप्रमाणे इंद्रियांच्या वृत्ती समेटून बुद्धीचे आत्म्याला मिळणे, त्यातील शांती हे ब्राह्मणत्वाचे प्रथम लक्षण.
दम-विधीच्या दंडनाने अधर्माकडे वृत्ती कधीच जाऊ न देणे.
तप- सटवाईच्या रात्रौ बाळंतघरातल्या दिव्याकडे लक्ष द्यावे त्याप्रमाणे चित्तात ईश्वराचे अनुसंधान ठेवणे.
शौच -शुद्ध भावनेने निर्वाळलेले मन व विहित कर्मांनी शृंगारलेले शरीर अशी अंतर्बाह्य शुचिता.
शांती -पृथ्वीप्रमाणे सर्वांचे अपराध सहन करून क्षमाभावनेने भूतमात्रांकडे पाहणे.
आर्जव-वाकड्या प्राण्याशीसुद्धा सरल वर्तन,जणू वाकड्या ओघानेही गंगेचे वाहणे सरळनिर्मळच असते ,असा वृत्तीविशेष म्हणजे आर्जव.
ज्ञान -सर्व शास्त्राचार हे एका ईश्वरासाठी हे समजून ज्ञान संपादन करणे जणू माळ्याने झाडांच्या मुळांशी श्रमणे,जे फळांमध्ये प्रकट होते.
विज्ञान- सिद्धांतबुद्धीमध्ये सत्त्वशुद्धी आणून शास्त्रद्वारे किंवा ध्यानद्वारे ती ईश्वरतत्त्वाकडे वळविणे.
आस्तिक्य -राजचिन्हे धारण केलेल्याला राजाचा मान द्यावा त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी सत्यताबुद्धी धरून शास्त्रोचित मार्गांना मान द्यावा ,हे आस्तिक्य..
ब्राह्मणांच्या ठायी हे नऊ गुणविशेष शोभिवंत व अव्यंग अलंकारांप्रमाणे सतत शोभत असतात.
क्षत्रियांचे सात गुणविशेष वर्णिले आहेत. ते याप्रमाणे -
शौर्य- स्वभावत:च साह्याशिवायची बलाढ्यता- जणू सूर्याचे तळपणे, सिंहाचे गिरीगव्हरात विचरणे!
तेज -  याच एकमेवत्त्वामुळे अंगी विकासलेले तेज पुन्हा सूर्याचीच उपमा मागते. एका सूर्यापुढे अगणित नक्षत्रांची शोभा लोपून जावी, तसे क्षात्रतेजापुढे जग चकितदृष्टी होऊन जाते.
धैर्य-( धृती) मस्तकावर आकाश कोसळले असतानाही मनबुद्धीचे अडिग अविचल राहणे असे क्षत्रियाचे धैर्य असते.
दक्षता- कितीही पाणी मागे सारून कमळ त्यातूनच फुलारून वर येते किंवा उंचीमध्ये आकाश कशासही मागेच टाकते तसेच सूक्ष्मबुद्धीने वरचढ ठरणे हा क्षत्रियाचा गुणविशेष आहे.
युद्धाला सामोरे जाणे- सूर्यफुलांनी सूर्याकडे सन्मुख व्हावे तशा सहजभावाने क्षत्रिय युद्धसन्मुख होतो, उत्तम युद्ध करतो !रजस्वलेला शय्येवर घेणे टाळावे तसे तो शत्रूला पाठ दाखवणे टाळतो.
दान -फळे फुले पोसून झाड ते सहजपणे देऊन टाकते, कमळे स्वतःचा सुगंध जगात लुटवतात. चांदणे कुणी कसेही पांघरतो. त्याप्रमाणे सहजभावे क्षत्रिय मोठी दाने देत असतो.
ईश्वरीभाव - वेदाज्ञांशी एकनिष्ठ राहून स्वतःला पराक्रमासाठी समर्थ बनवणे, जगाला आपलेसे करून त्यावर सत्ताही करणे या प्रकारचा ईश्वरीभाव हे क्षत्रियाचे सातवे गुणवैशिष्ट्य.
वैश्याचे कर्मसमुदाय थोडक्यात वर्णिले आहेत ते असे -
उत्तम प्रकारच्या भूमीत बीजाचा, भांडवलाचा आधार घेऊन अपार नफा मिळवणे. शेतकीवर निर्वाह करणे,गोरक्षण करणे किंवा स्वस्त वस्तू विकत घेऊन महागात विकणे! वैश्यांची वैशिष्ट्ये गीतेत व ज्ञानेश्वरीतही इतक्या थोडक्यात आलेली आहेत!

विहितकर्मामुळे होणारी मोक्ष प्राप्ती-
"स्वे स्वे कर्मण्यभिरत:" या श्लोकावर श्री ज्ञानेश्वरांनी पुढील प्रमाणे भाष्य केले आहे-
गोऱ्या माणसाला जसे अंगचे गोरेपण तसे वर्णाश्रमधर्माने वाट्याला आलेल्या स्वभावविहित कर्माला मनुष्याने स्वीकारून आदरेखून वर्तन केले पाहिजे. आपलेच रत्न, पण परीक्षकाच्या हातून स्वीकारावे, आपलेच डोळे पण दिव्याच्या प्रकाशातच त्यांचा उपयोग ,तसे स्वकर्म शास्त्राच्या आधारे आचरावे. स्वभावधर्माप्रमाणे वाट्यास आलेले कर्म आळस सोडून,फलेच्छा टाकून प्राणपणाने आचरावे- जणू ओघातल्या पाण्याने फुसांडत पुढे वहावे.अशा आचरणाचा जीव मोक्षाच्या पैलतीरासच पोहोचतो कारण निषिद्धकर्माच्या भानगडीतच तो पडत नाही ,आणि काम्यकर्मही त्याने साभिलाष  स्वीकारलेले नसते. अशा निर्लेप मनोभूमिकेमुळे त्याच्या नित्यकर्माच्या फलांना तो आपसूकच मुकतो .त्याच्या संसारातील शुभाशुभे नाहीशी होतात.मोक्षद्वारात तो उभा राहतो.सुकृतकल्पतरूचे फूल जे वैराग्य त्यामध्ये भ्रमराच्या सहजतेने व कोमलतेने त्याचा प्रवेश होतो,व पुढे मग आत्मज्ञानाचा दिवस उजाडण्याआधीची पहाट होते.
विहितकर्म  हेच अशाप्रकारे एकच एक ओलावा आहे. सर्वात्मक ईश्वराची तीच एक श्रेष्ठ सेवा आहे.
हें विहित कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा ।
आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ॥ ९०६ ॥
पतिव्रतेच्या सर्व व्यवहारात पतीचेच स्मरण असते किंवा आईची सेवा हाच मुलाचा श्रेष्ठ धर्म आहे तसा विहितकर्मात ईश्वराराधनेचा आनंद साधकाने घ्यायचा असतो. माशाने पाणी समजून जरी गंगेत विहार केला तरी त्याला तीर्थसहवासच घडत असतो.त्याप्रमाणे ज्यांचे जे विहित, तेच ईश्वराचे मनोगत. ते करून ईश्वरालाच हस्तगत करावे. जी जीवप्राण जिंकते तिला दासी म्हणावे की धनीण!  अशा प्रकारे धन्याचे मनोगत समजून सेवेची हद्द गाठणे हीच परमार्पणभावना, बाकी सारे केवळ वाणिज्य आहे.
अशाप्रकारे विहित कर्म आचरणातून तयार होणारी वैराग्ययुक्त फलाशारहित मनोभूमी मोक्षमार्गाकडे नेणारी आहे हे येथे श्रीज्ञानेश्वरांनी तळमळीच्या शब्दात समजून सांगितले आहे.

ब्रह्मयोग्यता मिळवण्यासाठी करावे लागणारे अनुष्ठान-
"यत: प्रवृत्तिर्भूतानां"  आदि श्लोकात ब्रह्मयोग्यता मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनुष्ठानाचे वर्णन आहे. ज्ञानदेव म्हणतात-
विहित क्रिया करणे म्हणजे सृष्टीच्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे. जो अविद्येच्या चिंध्या गुंडाळून त्रिगुणांच्या तिपेडी दोरीने जीवमात्रांच्या बाहुल्या नाचवतो, चैतन्यतेजाने त्यांच्या आतबाहेरून व्यक्त होऊन राहतो, त्या सर्वात्मक ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी स्वकर्मरूप पुष्पांनी त्याची पूजा बांधावी लागते!ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते.
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा । तोषालागीं ॥ ९१७ ॥
या पूजेच्या आचरणाने आत्मराजा प्रसन्न झाला म्हणजे जीवाला वैराग्याचे वरदान मिळते. एका ईश्वरलाभाशिवाय दुसरे काही सुचेनासे होऊन मोक्षलाभाचा दरवाजा खुला होतो.
अशी ब्रह्मयोग्यता देणारी स्वधर्माचरणाची सत्ता आहे. हा स्वधर्म कित्येकदा आचरणाला कठीण असतो,तरी ज्या परिणामाने तो फलद्रूप होईल त्या परिणामाकडे दृष्टि ठेवावी. येथे ज्ञानदेव अनेक समर्पक उपमा देतात .जर निंबप्राशनानेच आराम मिळणार असेल तर त्याच्या कडूपणाला कसे त्रासून चालेल?
अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणीं जरी विषमु ।
तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणें ॥ ९२३ ॥
जैं सुखालागीं आपणपयां । निंबचि आथी धनंजया ।
तैं कडुवटपणा तयाचिया । उबगिजेना ॥ ९२४ ॥

आपली आई समजा कुब्जेसारखी  कुरूप आहे म्हणून तिच्या ममतेत काही दोष राहतो का? पाण्याहून तूप गुणकारी म्हणून माशांनी तुपात राहणे श्रेयस्कर होईल का? विषातला किडा विषातच जगतो. त्याला गुळात ठेवले तर तो मरेल.चालणे हे काम पायांचे, हे डोक्याने अंगिकारावयाचे ठरवले तर काय होईल? म्हणूनच केवळ स्वधर्म पाळावा,परधर्म त्यागावा, कारण त्यानेच आत्मज्ञान मिळते. 

याउलट तर्कत: आत्मज्ञान मिळेपर्यंत कर्माचरण तर करावेच लागते असाही विचार करता येईल. कर्म करावयाचे तर सायास ठेवलेले आहेतच. याही पर्यायाचा क्रमप्राप्त परिणाम अभ्यासला तर स्वधर्माचरणच चांगले असे दिसून येते. कर्म जर आचरावयाचेच आहे तर निर्दोष स्वधर्म का नको ? धोंडा वाहून देणे आणि शिदोरी दोन्हीत कष्ट समान, मग शिदोरीच का वाहून नेऊ नये ?दही घुसळावे की पाणी? घुसळण्याचे श्रम तेच पण लाभ मात्र दही घुसळण्यात आहे .धर्मपत्नीला व वेश्येला पोसण्याचा खर्च एकच, मग वेश्यागमनाचा कलंक का पत्करावा ?पाठीवर घाव घेऊन मरायचेच तर सामोरे होऊन का लढू नये ?कुळस्त्रीने परक्याच्या घरात शिरूनही दांड्याचा मार मिळत असेल तर नवऱ्याला का टाकावे? सर्वस्व वेचून विकत घ्यायचे तर थोडेसेच होईना अमृत घ्यायचे की मरण व आत्महत्येच्या दोष दोन्ही देणारे विष ?म्हणूनच स्वकर्माची उपेक्षा करू नये. ईश्वराचा संतोष मिळवण्याचा हाच एक महामार्ग आहे .तो संतुष्ट झाल्यावर हृदयात शुद्धसत्वाचा उदय होतो व सर्व ऐहिक व पारलौकिक भोग कालकूट विषाप्रमाणे वाटतात.
मग ययाचि गा कपिध्वजा । स्वकर्माचिया महापूजा ।
तोषला ईशु तमरजा । झाडा करुनी ॥ ९५२ ॥
शुद्धसत्त्वाचिया वाटा । आणी आपुली उत्कंठा ।
भवस्वर्ग काळकूटा । ऐसें दावी ॥ ९५३ ॥
अशाप्रकारे ब्रह्मयोग्य अशी सत्वस्थिर मनस्थिती तयार होते, ती ईश्वरी कृपेने आणि एका स्वधर्माचरणातूनच हे इथे विस्ताराने,उपमावैविध्याने वर्णिले आहे.

ब्रह्मभूत पुरुषाची लक्षणे
अठराव्या अध्यायाच्या ५४ व ५५व्या श्लोकात ब्रह्मभूत पुरुषाची लक्षणे वर्णिली आहेत. अठराव्या अध्यायात पुन्हा एकदा मुमुक्षूचे आत्मज्ञानसाधन यत्पूर्वी श्रीभगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितले आहे .
त्याग व संन्यास संकल्पनांनंतर, व त्रिगुणांमुळे त्रिधा झालेल्या अनेक मूलभूत संकल्पनांचा अभ्यास, पुन्हा एकदा स्वधर्माचरणश्रेष्ठत्व, कठोर अध्यात्मसाधन या क्रमाने भगवंत ब्रह्मभूत अवस्थेपर्यंत येऊन पोहोचले आहेत.
आता आत्मबोधाच्या प्राप्तिकरिता वैराग्यादि साधनांची खटपट करीत असतांना जे श्रम होतात, ते श्रमसुद्धा जेथे शांत होऊन जातात, 'आत्मबोध प्रसन्नता’ या नावाने त्या अवस्थेची प्रसिद्धी आहे. भगवंत म्हणतात ,"हे अतिबुद्धिमान अर्जुना, तो योग्य पुरुष ती अवस्था भोगतो."
तैसा आत्मबोधीं उद्यमु । करितां होय जो श्रमु ।
तोही जेथें समु । होऊनि जाय ॥ १०९४ ॥
आत्मबोधप्रशस्ती । हे तिये दशेची ख्याती ।
ते भोगितसे महामती । योग्यु तो गा ॥ १०९५ ॥
अशाप्रकारे ब्रह्मभूत पुरुष आत्मज्ञानाच्या प्रसन्न सिंहासनावर आरूढ होतो. स्वयंपाकाचा अग्नि विझवल्यावर स्वयंपाक आस्वादाचा व्यवहार चालू होतो किंवा गाणे बंद झाल्यावर मृदंगाची साथही बंद होते,तसे आत्मज्ञानासाठी केलेले श्रम शांत होतात. आत्मज्ञानप्राप्तीसाठीही जी इच्छा, शोक असतो ,तोही संपून चित्ताला खरी साम्यता प्राप्त होते.पाटीवर असलेली अक्षरे पुसावीत,तसे भेदाभेद मोडतात. जागृती आणि स्वप्न या अवस्थांमधली विपरीत ज्ञाने नाहीशी होतात. ज्ञान वाढू लागते तसतसे अव्यक्त कमी होत जाते. जेवताना क्षुधा क्रमशः कमी होऊन तृप्तीच्या क्षणी नाहीशी होते, चंद्राला पूर्णत्व येताक्षणी शुक्लपक्ष संपतो, तसेच ज्ञानही ईश्वरांमध्ये लीन होते. अज्ञान तर नाहीसेच होते.कल्पांतवेळेला दूरवर पाणी भरून राहावे घट,मठ नंतर एकरूप आकाशच प्रत्यंतरास यावे अशी ही सर्व ब्रह्ममय अवस्था असते.
ही भगवंताची ब्रह्मभूत पुरुषांच्या ठिकाणी प्रकटलेली चौथी भक्ती म्हणावी ,तर तसेही नाही. पण आकलनाच्या सोयीसाठी इतर जे आर्त, जिज्ञासु व अर्थार्थी भक्त हे भगवंताला ज्या मार्गाने भजतात, ते भक्तीचे तीन मार्ग पाहून या भक्तीस चौथी भक्ति म्हटले आहे. खरे तर ब्रह्मभूत स्थितीलाच भक्ती म्हणतात!  ती पहिली ,दुसरी वगैरे कधी नसतेच. तीच आर्ताची आर्ती ,जिज्ञासूची जिज्ञासा, अर्थार्थीचा अर्थ.
येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी । हे भजती जिये पंथीं ।
ते तिन्ही पावोनी चौथी । म्हणिपत आहे ॥ १११२ ॥
येर्‍हवीं तिजी ना चौथी । हे पहिली ना सरती ।
पैं माझिये सहजस्थिती । भक्ति नाम ॥ १११३ ॥
दृश्यमार्गाच्या अतीत भक्तियोगी ब्रह्मभूत पुरुष पोहोचतो. जीवपणाला घेऊन ईश्वरपणाही नाहीसा होतो अशा तत्स्वरूपात सामावतो. तरुणीने तारुण्य भोगावे, लाटेनेच पाणी उपभोगावे,प्रभेने बिंबात विलसावे आकाशामध्ये अवकाशाने लोळावे तशा अद्वैतपातळीवर तो ईश्वररूप होऊन ईश्वरालाच भोगतो. त्याचे मौन हे ईश्वराचे स्तवन, त्याचे पाहणे पाहणाराच दाखवते! पाहण्याचा पदार्थ नाहीसा होऊन पाहणारा पाहणाऱ्यास पाहतो तेव्हा एकत्वाने पाहणाराच नाहीसा होतो. करणे न करणे एक होते व ते दोन्ही ईश्वराचे खुणेचे पूजन ठरते ,कारण त्याचे सारे कर्माकर्म ईश्वररूपच असते .कापराला जाळून अग्नी नाहीसा व्हावा तसे अज्ञान भेदून ज्ञान, नेणीव सांडून जाणीवही नष्ट होते.
ज्ञानी इयेतें स्वसंवित्ती । शैव म्हणती शक्ती ।
आम्ही परम भक्ती । आपुली म्हणो ॥ ११३३ ॥
ज्ञानी हिला (चौथ्या भक्तीला, या ब्रह्मभूत अवस्थेला) स्वसंविति म्हणतात. शैव हिला शक्ति म्हणतात, आणि आम्ही आपली श्रेष्ठ भक्ति म्हणतो.
अशा प्रकारे ज्ञानदेवांनी गूढ अद्वैती अवस्थेचे ब्रह्मभूत पुरुषाच्या लक्षणाच्या निमित्ताने शब्दांकन केले आहे.

श्रीहरीने अर्जुनाला दिलेला आदेश-
"यथेच्छसि तथा कुरु" असे ६३ व्या श्लोकात अर्जुनाला सांगतासांगताच परम प्रेमळ श्रीहरी पुन्हा एकदा ६४,६५ व ६६ व्या श्लोकात आपल्या प्रियतम अर्जुनाला हितकर आदेश देत आहेत." सर्वधर्मान्परित्यज्य  मामेकं शरणं व्रज" या त्या अनुपम अशा आदेशाचा ज्ञानदेवांनी  उलगडा केला आहे-
स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु ।
सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥ ११९६ ॥
नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु ।
स्थुलु मी अणु । जें कांहीं तें मी ॥ ११९७ ॥
श्रीहरी म्हणतात ,"मी स्वामी व निरंतर असणारा आहे व स्वत:सिद्ध व अखंड आहे, मी सर्व आहे, सर्वव्यापी आहे, मी सर्वांच्या पलीकडला आहे.मी नवा व जुना आहे, मी शून्य आहे व मी संपूर्ण आहे, जे काही मोठे आहे व सूक्ष्म आहे ते मी आहे.
हे वीरश्रेष्ठा! अशा मला सर्वव्यापकाला आपल्या अंतर्बाह्य व्यापाराचा विषय कर.वायू जसा आकाशात मिळून असतो त्याप्रमाणे आपल्या सर्व कर्मात मला मिसळून टाक. वाणीने माझी उत्तम नामे ,हाताचे करणे ,पायाचे चालणे मजप्रीत्यर्थ, सर्वांवर उपकार करण्याचा महान यज्ञ माझ्यासाठी आचरलेला, प्राणिमात्रांचा द्वेष सोडून सर्वत्र सेवाभाव, नमनभावना हे केलेस ,तर सर्वत्र हे प्रेमळा!  तुझामाझा एकांतच भरून राहील. तिसरेपण शिल्लकच राहणार नाही मग तू सत्स्वरूप होण्याला कसला अवधी काय ?तुझी शपथ घेऊन काय हे सांगावे ?सारी कर्मे मलाच अर्पण कर म्हणजे सर्वत्र माझी प्रसन्नता अनुभवशील. त्या प्रसन्नताप्रसादाने ज्ञानाची परिपूर्ती होते. करण्यासारखे काही उरत नाही.
आशेपासून दुःखे व निंंदेपासून पातके निर्माण व्हावीत, तद्वत स्वर्गनरकसूचक अज्ञानापासून धर्माधर्मांचे बंड उत्पन्न होते. हे अज्ञान सोडून दे,त्यातून उद्भवलेले धर्मही सोडून दे. एका मजवरच चित्त स्थिर कर.मला शरण ये म्हणजे धर्मा-धर्माची गरजच संपेल. तुझे सारे पापपुण्य मीच होईन. माझ्या ज्ञानात बंधनकारक पाप म्हणून शिल्लक राहील का ?तेव्हा तू पापापासून मुक्त होशील हे सांगावयासही नको.मला एकालाच शरण ये,सर्व चिंता शोक सोडून दे. हे शरण येणे कसे, तर- मग मी एकट्यावाचून दुसरे भिन्न भिन्न काहीच नाही, (असे जे माझे स्वरूप) त्याच्या ठिकाणी ‘तोच मी आहे’ अशा ज्ञानाने अनन्य होअर्जुना, आपल्याला माझाहून भिन्न न मानता जे माझे एकपण जाणावयाचे, त्याचेच नाव मला शरण येणे होय. "
तैसा मी एकवांचूनि कांहीं । मग भिन्नाभिन्न आन नाहीं ।
सोऽहंबोधें तयाच्या ठायीं । अनन्यु होय ॥ १३९७ ॥
पैं आपुलेनि भेदेंविण । माझें जाणिजे जें एकपण ।
तयाचि नांव शरण । मज यीणें गा ॥ १३९८ ॥
या अमृतशब्दांमध्ये काही उणे राहिलेच असेल तर ते भरून काढण्यासाठी श्रीहरींनी आपला शामल सकंकण उजवा बाहू पसरून अर्जुनाला हृदयाशी धरले! शामसुंदर श्रीकृष्णाने आपला कंकणयुक्त उजवा बाहू पसरून आपल्याला शरण आलेला सर्व भक्तांचा राजा जो अर्जुन, त्याला आलिंगन दिले!
मग सांवळा सकंकणु । बाहु पसरोनि दक्षिणु ।
आलिंगिला स्वशरणु । भक्तराजु तो ॥ १४१८ ॥
आपल्या हृदयातले शब्दातीत गूढ त्याच्या हृदयात घातले .त्याला स्वस्वरूप करून सोडले. दोघांची ही भेट दोघांना आवरेना.त्या आलिंगनाच्या वेळी देवांचे हृदय व अर्जुनाचे हृदय एक झाले. देवांनी आपल्या हृदयात असलेला बोध अर्जुनाच्या हृदयात घातला आणि देव व भक्त, हे द्वैत न मोडता, देवांनी अर्जुनाला आपल्यासारखे केले.
हृदया हृदय येक जाले । ये हृदयींचें ते हृदयीं घातलें ।
द्वैत न मोडितां केलें । आपणाऐसें अर्जुना ॥ १४२१ ॥
श्रीज्ञानेश्वरांनी या दृश्याचा ,या शब्दांचा ,या भेटीचा थरार आपल्या साक्षात्कारी शैलीने येथे रंगवला आहे व श्रीहरींच्या हृदयंगम आदेशाचे सौंदर्य सामान्य श्रोत्याच्याही चित्तावर ठसेल इतके सुस्पष्ट केले आहे.

गीताज्ञान ऐकण्याची मुख्य पात्रता-
भगवंत म्हणतात ,”माझ्या भक्तांना व मला दुष्टपणे बोलणारे असे जे कोणी आहेत, त्यांना तू गीताशास्त्र देण्यास योग्य समजू नकोस. माझ्याविषयी व माझ्या भक्तांविषयी त्यांची पूज्य बुद्धि नसेल तर त्यांची असलेली इतर सर्व सामुग्री म्हणजे दिव्यावाचून रात्रीची जशी ठाणवई असते तशी समजावी. “

माझ्या सज्जनेंसिं मातें । पैशुन्याचेनि हातें ।
येक आहाती तयांतें । योग्य न म्हण ॥ १४९९ ॥
तयांची येर आघवी । सामग्री ऐसी जाणावी ।
दीपेंवीण ठाणदिवी । रात्रीची जैसी ॥ १५०० ॥

तपोहीन व गुरुभक्तीहीनाला आस्था नसलेल्याला हे गीताशास्त्र सांगू नये अशी श्रीकृष्णांची आज्ञा आहे. म्हणून तपस्वी, भक्तिमान,श्रवणेच्छू  व ईश्वराठायी आस्तिक्यबुद्धी असलेल्यालाच गीताज्ञान ऐकण्याला पात्र म्हणावे लागेल. विशेषतः ईश्वराच्या सुजनतेवर वाग्प्रहार करणारा ,त्याच्या भक्तांची निंदा करणारा प्राणहीन शरीराप्रमाणे त्याज्य आहे, अपात्र आहे.

श्रीहरीने अर्जुनाला विचारलेला शेवटचा प्रश्न व त्याचे प्रयोजन
"अर्जुना हा सारा शास्त्रार्थ नीट समजला ना?तू एकाग्रचित्ताने श्रवण केल्यावर, तो तुझ्या मनात ठसला किंवा नाही ?" हा श्रीहरींचा शेवटचा प्रश्न.
तरी सांग पां पांडवा । हा शास्त्रसिद्धांतु आघवा ।
तुज एकचित्तें फावा । गेला आहे ? ॥ १५४० ॥
ज्ञानदेव त्यामागचे खरे मर्म सांगतात. अर्जुन निजानंदनिमग्न होऊन अद्वैतात विरून जाईल पूर्णब्रह्म होईल व पुढील कार्यभाग साधावयाचा नाही म्हणून श्रीहरींनी या प्रश्नाच्या निमित्ताने त्याला पुन्हा भेदस्थितीला आणले त्याचे व्यावहारिक भान जागृत केले. अर्जुन पूर्णब्रह्म झाला, तरीपण पुढील कार्यार्थ साधण्याकरता (देहस्मृतीची) मर्यादा श्रीकृष्णनाथ त्याला उल्लंघू देईनात.
पार्थु स्वानंदैकरसें । विरेल ऐसा भेददशे ।
आणिला येणें मिषें । प्रश्नाचेनि ॥ १५४६ ॥
पूर्णब्रह्म जाला पार्थु । तरी पुढील साधावया कार्यार्थु ।
मर्यादा श्रीकृष्णनाथु । उल्लंघों नेदी ॥ १५४७ ॥
याप्रमाणे प्रश्न करून नसतेच अर्जुनपण (नाहीसा झालेला अर्जुनाचा देहाहंकार) आणून, देवाने अर्जुनाला प्राप्त झालेली पूर्णस्थिती मोडून त्याला बोलायला लावले..
गीतेत सामावलेली वेदाची कर्म ,देवता व ज्ञान ही तीन कांडे-
अठराव्या अध्यायात १४३४ ते १४५० या ओव्यांमध्ये ज्ञानदेवांनी वेदाची उपरोक्त तीन कांडे गीतेत कोठे सामावली आहेत ते प्रकट केले आहे.
पहिला अध्याय प्रस्तावना स्वरूप आहे.
दुसऱ्या अध्यायात सांख्यशास्त्र असल्याने तो ज्ञानप्रधान आहे.
प्रभावरहित कर्माचरणाचा विचार तिसऱ्या अध्यायात,तर कर्मयोगाने ईश्वराचे ठिकाणी उपासना कशी करावी ह्या सांगण्याच्या विषयास चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला आहे. हे कर्मप्रधान विवरण होते.
सर्व कर्मांनी ईश्वराचे यजन करावे हे देवताकांड आठव्या अध्यायापर्यंत स्पष्ट केले आहे.
पुन्हा १२व्या अध्यायापासून ते १५ व्यापर्यंत ज्ञानफलाचे म्हणजेच पर्यायाने ज्ञानकांडाचे निरूपण आहे.
ज्ञानविरोधी अशा अज्ञानवर्गाचे वर्णन सोळाव्या अध्यायात आले आहे.
हे अज्ञान शास्त्राचा स्नेह संपादन करून कसे जिंकावे हे विवरण १७व्या अध्यायात आले आहे.
अठरावा अध्याय तात्पर्यस्वरूप आहे.
अशा प्रकारे पहिला अध्याय ते सतरावा अध्याय वेदातील कर्म,देवता व ज्ञान या तीन कांडांच्या निरूपणार्थ मांडले गेले आहेत.
ज्ञानदेव म्हणतात," गीता ग्रंथ वेदाचा अवतार पण वेदाहूनही थोर आहे, कारण वेदांप्रमाणे तो कृपणपणे तीनच वर्णांच्या कानाशी न लागता उदारपणे त्याने स्त्रीशूद्रांनाही जवळ केले आहे."

गीतोपदेश ऐकून अर्जुनाने दिलेली ग्वाही
"नष्टो मोहस्मृतीर्लब्धा" या अठराव्या अध्यायातील ७३व्या श्लोकात अर्जुनाने ही ग्वाही दिली आहे. "करिष्ये वचनम् तव" या वाक्याचा अर्थविस्तार ज्ञानेश्वरीत असा झाला आहे -
अर्जुन म्हणाला,"देवा मोह गेला म्हणून काय विचारता? तो तर सहकुटुंब गेलाच! सूर्याने जवळ येऊन डोळ्यांना विचारावे आता अंधार आहे का ?तशातली गत. अर्जुनपण संपले तुझेपण सुरू झाले.
मग अर्जुन म्हणे काय देवो । पुसताति आवडे मोहो ।
तरी तो सकुटुंब गेला जी ठावो । घेऊनि आपला ॥ १५५८ ॥
आतां मोह असे कीं नाहीं । हें ऐसें जी पुससी काई ।
कृतकृत्य जाहलों पाहीं । तुझेपणें ॥ १५६२ ॥
गुंतलों होतों अर्जुनगुणें । तो मुक्त जालों तुझेपणें ।
आतां पुसणें सांगणें । दोन्ही नाहीं ॥ १५६३ ॥
कर्माचा संबंध नाही असे तुझे स्वरूप मी झालो -सारे कर्तव्य लयास गेले. तुझ्या आज्ञेशिवाय काहीच शिल्लक राहिले नाही. ज्यावरून अद्वैत ओवाळून टाकावे ती माझी गुरुमूर्ती तूच .आता तुझी जी आज्ञा असेल ती मला शिरसावंद्यआहे."
अशा प्रकारे संवादाच्या बोहल्यावर जणू श्रीकृष्णार्जुनांचे लग्नच लागले.ते दोघे स्वरूपैक्यतेला पावलेले पाहून संजय आनंदाने उचंबळला.
ऐसे संवादाचिया बहुलां । लग्न दोघांचियां आंतुला ।
लागलें देखोनि जाला । निर्भरु संजयो ॥ १५७८ ॥
कृष्णार्जुनांमध्येअभिन्नता आली. श्रीकृष्णाची जी आज्ञा ती नि:शेष पाळण्याची ग्वाही अर्जुनाने दिली.अर्जुनविषादाचा संपूर्ण निरास झाला.

"यत्र योगेश्वर कृष्ण" या श्लोकाचे महत्व
संजय आनंदाने उचंबळला. त्या आनंदाच्या भरतीने मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला “महाराज, आपण दोघे व्यासांकडून कसे रक्षिले गेलो ! आज जगातील पदार्थ पहाण्याची जी चर्मदृष्टी, तीही ज्या तुम्हास नाही, त्या तुम्हाला अतींद्रिय पदार्थ दाखवणार्‍या ज्ञानदृष्टीच्या व्यवहारात आणले,आणि रथ चालवण्यास जे घोडे लागतात, त्या घोड्यांसाठी (घोड्यांची परीक्षा करून ते घेण्यासाठी) तुम्ही ज्या आम्हाला ठेवले, त्या आम्हाला या गोष्टी (कृष्णार्जुनांचा संवाद) व्यासकृपेने ऐकण्यास मिळत आहे!”
तेणें उचंबळलेपणें । संजय धृतराष्ट्रातें म्हणे ।
जी कैसे बादरायणें । रक्षिलों दोघे ? ॥ १५७९ ॥
आजि तुमतें अवधारा । नाहीं चर्मचक्षूही संसारा ।
कीं ज्ञानदृष्टिव्यवहारा आणिलेती ॥ १५८० ॥
आणि रथींचिये राहाटी । घेई जो घोडेयासाठीं ।
तया आम्हां या गोष्टी । गोचरा होती ॥ १५८१ ॥
."यत्र योगेश्वर कृष्ण"- संजयाचा परमानंद सामावून धरणाऱ्या भगवद्गीतेच्या या शेवटच्या मिताक्षरांवरचे ज्ञानदेवांचे भाष्य म्हणजे भावोर्मींचा कल्लोळ आहे. ज्ञानदेव म्हणतात ,अष्टसात्विक भावांच्या योगाने अतिशय बोबडी वळली असता संजय हा कृष्णार्जुनाच्या संवादसुखाचा चव्हाटा झाला
किंबहुना सात्विकां आठां । चाचरु मांडतां उमेठा ।
संजयो जालासे चोहटां । संवादसुखाचा ॥ १६०६ ॥
श्रीज्ञानेश्वरीतला संजय म्हणतो-" महाराज !मी दुसऱ्यातिसऱ्यांचे काय सांगू? पण आयुष्य तेथे जीव, चंद्र तेथे चांदणे, शंकर तेथे पार्वती, संत तेथे विवेक, गुरु तेथे ज्ञान ,ज्ञान तेथे आत्मदर्शन आहे हे मी जाणतो त्याच निश्चितीने पुरुषोत्तम श्रीकृष्ण जेथे ,तिथेच श्रीलक्ष्मीचा निवास हेही मला कळते. पतीसहवर्तमान जगन्माय जिथे राहाटते ,तिथे अणिमादिक सिद्धी दासी म्हणून वावरणारच. कृष्ण हा स्वयं विजयस्वरूप.तो ज्या पक्षात आहे त्यांचाच विजय हे काय सांगायला हवे? त्यातून विजय हे तर अर्जुनाचे एक नावही आहे व श्रीकृष्णनाथही विजयाची मूर्ति आहे. लक्ष्मीसहित सर्व विजय निश्चितपणाने तेथेच आहे असे समज.
कृष्ण विजयस्वरूप निजांगें । तो राहिला असे जेणें भागें ।
तैं जयो लागवेगें । तेथेंचि आहे ॥ १६४० ॥
विजयो नामें अर्जुन विख्यातु । विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु ।
श्रियेसीं विजय निश्चितु । तेथेंचि असे ॥ १६४१ ॥
अर्जुन श्रीहरींसहवर्तमान जिथे आहे ,त्या गावातली झाडे कल्पतरू ,दगड चिंतामणी, जमिनी सुवर्णमय, नद्या अमृतमय,आणि साधे बोल वेदांच्या तोलामोलाचे होणारच !समुद्रापासून मेघ होतो पण जगदुपकारासाठी तो समुद्राहून चांगला ठरतो. श्रीहरींच्या अर्जुनाचे स्थान परमार्थात त्या मेघासारखे बलवत्तर ठरले आहे.त्याच्या या कीर्तीशोभेत श्रीहरींना अनुपम आनंद आहे.मुलाने जिंकले तर बापाला आनंदाशिवाय काय वाटणार? व्यासांच्या खरेपणावर तुमचा विश्वास असेल तर या भाषणाची सत्यता तुम्हाला पटेलच.पुन्हा एकदा जिथे लक्ष्मीपती ,तिथे भक्तांचे समुदाय, तिथेच कल्याण व सुखाचा लाभ ."
असा ओवीचा अर्थविस्तार करून ज्ञानदेव म्हणतात," अनंत वेदांपासून सव्वा लक्ष महाभारत,भारताचे सारसर्वस्व सातशे श्लोकी गीता, गीतेचा इत्यर्थ या एका संजयच्या पूर्णोद्गारात आहे. या एका श्लोकाचा जो आश्रय करीत त्याने अज्ञान जिंकले."
तैसें शब्दब्रह्म अनंत । जालें सवालक्ष भारत ।
भारताचें शतें सात । सर्वस्व गीता ॥ १६६१ ॥
तयांही सातां शतांचा । इत्यर्थु हा श्लोक शेषींचा ।
व्यासशिष्य संजयाचा । पूर्णोद्गारु जो ॥ १६६२ ॥
कुरुरणभूमीवर संजयने काढलेले हे उद्गार कोणत्याही देशकालस्थितीत आजही आपापल्या रणात प्रत्येकाला मार्गदर्शक ठरणारे आहेत. जिथे योगेश्वर कृष्ण आणि त्यांचा भक्तराज सुहृद अर्जुन ,तिथे सर्व कल्याणमंगल हे समजून त्यांच्या सगुणरूपापासून ते गहनबोधापर्यंतचे सारे सतत हृदयात जपण्यानेच उद्धार होईल हे संजयोद्गाराचे आशयसूत्र ज्ञानदेवांनी येथे विस्तारले आहे.
गीता माहात्म्य-
शेवटी ,हे सर्व सामावून धरणाऱ्या गीतेचे महती अशी आहे की गीता ही सप्तशत मंत्रांनी (सातशे श्लोकरूपी मंत्रांनी) प्रतिपादन करण्यास योग्य अशी देवी आहे, व ती मोहरूप महिषासुराच्या नाशाने आनंद पावली आहे. म्हणून जो मनाने, शरीराने अथवा वाचेने गीतारूपी देवीचा सेवक होईल, त्याला ही गीता स्वानंदरूपी साम्राज्याचा सार्वभौम राजा करेल.
कीं गीता हे सप्तशती । मंत्रप्रतिपाद्य भगवती ।
मोहमहिषा मुक्ति । आनंदली असे ॥ १६६६ ॥
म्हणौनि मनें कायें वाचा । जो सेवकु होईल इयेचा ।
तो स्वानंदासाम्राज्याचा । चक्रवर्ती करी ॥ १६६७ ॥
ज्ञानदेव म्हणतात , म्हणून मला आता समर्थन करण्यास विषय राहिला नाही. गीता ही प्रभूची शब्दमय सुशोभित मूर्ति आहे असे समजा. इतर कोणतेही शास्त्र, आपल्या विषयांचे अर्थज्ञानरूपी फल देऊन आपण नाहीसे होते तसे हे गीताशास्त्र नाही. तर हे सगळे परब्रह्म आहे.
म्हणौनि मज कांहीं । समर्थनीं आतां विषय नाहीं ।
गीता जाणा हे वाङ्ग्मयी । श्रीमूर्ति प्रभूचि ॥ १६८४ ॥
शास्त्र वाच्यें अर्थें फळे । मग आपण मावळे ।
तैसें नव्हें हें सगळें । परब्रह्मचि ॥ १६८५ ॥

पसायदानाचा अर्थ -
हा महान वाग्यज्ञ सिद्धीला जाण्याचा क्षण येऊन ठेपला असता ज्ञानदेवांनी त्याचे श्रेय प्रथम सद्गुरु श्रीनिवृत्तीनाथांना अर्पण केले .स्वतःकडे फक्त पाईकपण घेतले.
किंबहुना तुमचें केलें । धर्मकीर्तन हें सिद्धी नेलें ।
येथ माझें जी उरलें । पाईकपण ॥ १७९२ ॥
आणि शेवटी महाप्रसाद म्हणून जे मागणी मागितले ते विश्वकल्याणमंगलाचे! 
ब्रह्मभूत अवस्थेची अशी जितीजागती खूण निर्माण करून पसायदानाचे अनुपम लेणे शब्दसृष्टीला देऊन ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीची परिसमाप्ती केली.
त्या पसायदानाचा हा शब्दशः अर्थ -
-आता विश्वात्मक देवाने या वाग्यज्ञाने संतुष्ट होऊन मला एवढा प्रसाद द्यावा- 
-दुष्टांची दुष्टबुद्धी नाहीशी व्हावी. त्यांना सत्कर्माची अभिरुची निर्माण व्हावी. प्राणीमात्रांमध्ये परस्परांचा स्नेह वाढीस लागावा.
-पापाचा अंधकार लयास जावो. विश्वामध्ये स्वधर्मरूप सूर्याचा उदय होवो. जो जो प्राणी जी जी इच्छा करेल ती ती परिपूर्त होवो.
-सदैव जगताच्या कल्याणात तत्पर अशा भाग्यवान ईश्वरनिष्ठांचे समुदाय निरंतर प्राणिमात्रांस भेटत राहोत .
-चालत्या बोलत्या कल्पतरूंचे अरण्य, सचेतन चिंतामणींचे गाव, अमृताचे चालतेबोलते जे समुद्र-
-जे निष्कलंक चंद्र, जे तापरहित सूर्य, असे ते संतसज्जन सदासर्वकाळ सकळांचे सोयरे होवोत.
-किंबहुना तिन्ही लोक सर्वमुखी पूर्ण होऊन सदासर्वकाळ आदिपुरुष परमेश्वराच्या भजनात मग्न होवोत.
-या लोकांमध्ये जे विशेष आदराने हा ग्रंथ बाळगतील ते या व परलोकातही विजयी व्हावेत.
-यावर सद्गुरु म्हणाले,"हा प्रसाद होईल".
-या वराच्या योगेकरून ज्ञानदेवांना फार आनंद झाला.

या पसायदानातील आवडलेली एकच ओवी बाजूला काढणे फारच अवघड, पण त्यातूनही "जे फळांची व्यंकटी सांडो|तया सत्कर्मी रती वाढो| भूतां परस्परे पडो| मैत्र जिवाचे||" या पहिल्याच मागणीत ज्ञानदेवांनी हिमालयाची उंची गाठली आहे. त्यांच्या आचारविचारातील सुसंगती सांगणारी ही ओवी त्यांनीच वेळोवेळी वर्णिलेल्या ब्रह्मभूत भगवद्भक्तालाच सुचू शकेल.
सर्वप्रथम खलांचा, जगातल्या दृष्टांचा विचार करून त्यांचे निर्दालन नव्हे तर त्यांच्या खलत्वाचे ,दुष्टत्वाचे निर्दालन व्हावे, त्यांना सन्मार्गावर येण्याची बुद्धी व्हावी असे मागणारे ज्ञानदेव करुणेची परमोच्च कोटी गाठतात. 
मारेकऱ्यांसाठी क्षमा मागणाऱ्या येशूप्रमाणे व्यक्तिगत आयुष्यात सर्व हेटाळणी,मातृ-पितृवियोगाचे विष पचवून ते या मुक्कामाप्रत आले आहेत.एका अल्पकाल आयुष्यातला हा प्रवास केवळ ईश्वरी लीलाविलास, एक अभूतपूर्व चमत्कार म्हणावा लागेल.
पुढे "भूतमात्रांमध्ये मैत्र वाढीस लागो"ही या ओवीतील ज्ञानेश्वरांनी केलेली दुसरी मागणी ही तितकीच स्वार्थरहित, भव्यार्थयुक्त आहे.तिच्यावर भाष्य करण्याचाही धीर होत नाही. हा साक्षात शब्दातीत असा शुद्धसत्वभाव आहे.

पसायदानातच वर्णिलेल्या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीतला हा अग्रणी संतश्रेष्ठ आपल्या मराठी भूमीत अवतरून गेला, येथील सकळांचा सोयरा झाला हे आपलेच परमभाग्य. 

इतिश्री! 

भारती बिर्जे डिग्गीकर





Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –