ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय तिसरा- कर्मयोग




ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय तिसरा-कर्मयोग

१. ज्ञानेश्वरांच्या दृष्टिकोनातून अर्जुनाची मन:स्थिती

ज्ञानेश्वरांच्या मते दुसर्‍या अध्यायाच्या अखेरीसच अर्जुन मनात आनंदला आहे. स्थितप्रज्ञल़क्षणांमधून श्रीकृष्ण सर्व कर्मांचाच निषेध करत आहेत असे त्याच्या मनाने घेतले आहे.तिसर्‍या अध्यायाच्या सुरुवातीसच अर्जुनाने आपल्या या शंकेचा उच्चार केला आहे
त्याच्या मनात उभी राहिलेली ही उपपत्ती अनेक भ्रमांचे मूळ आहे. सांख्ययोग व कर्मयोगाची लक्षणे श्रीकृष्णांनी दुसर्‍या अध्यायात विवरून सांगितली खरी, पण अर्जुनाने आपल्या विशिष्ट मनःस्थितीला अनुकूल असाच त्याचा अर्थ लावला.युद्धाबद्दल तीव्र जुगुप्सा तर त्याच्या मनात निर्माण झालीच होती , त्यातच आपला उचित धर्म कोणता याबद्दलच्या तात्त्विक प्रश्नांचे मोहोळ त्याच्या मनात उठले होते. अशा मन;स्थितीत आपली कर्म व ज्ञानाबद्दलची शंका तो श्रीकृष्णांपुढे मांडत आहे. जर तत्त्वत; कर्म अन कर्ता एकच असेल तर तर घोर कर्मे करावीतच कशाला ?
इथे अर्जुनाला असे म्हणायचे आहे की एकदा ज्ञान झाले असेल , वस्तुमात्रांचे यथार्थत्व समजून चुकले असेल , तर कर्मांपासून व्यक्तिने निवृत्त व्हायला काय हरकत आहे? निदान युद्धासारख्या घनघोर अमंगल कर्मास ज्ञानी व्यक्तिने काय म्हणून प्रवृत्त व्हावे ?

हां गा कर्म तूंचि अशेष | निराकारिसी नि:शेष |
तरी मजकरवी हे हिंसक | का करविसी तू ||

'भगवंता, तुझे बोलणे नीट ऐकल्यावर मला असे वाटते की कर्म आणि कर्ता वेगळे उरतच नाहीत.असे असेल तर ही हिंसा माझ्याकडून का करवून घेत आहेस? तूच असा उपदेश करणार असशील तर आम्ही अज्ञान्यांनी काय करावे ? तू मला फसवितो आहेस की काही गूढार्थ मनी धरून बोलतो आहेस ? माझे मन कसे डहुळून गेले आहे. हा विवेक मला अगदी सोपा करून सांग.' (इथे ज्ञानेश्वर सोपा याला समानार्थी म्हणून 'मर्‍हाटा' हा शब्द योजतात ! गीतार्थ मराठीत आणणे म्हणजेच तो सामान्यांसाठी सोपा करणे हे त्यांचे तत्त्व त्यामुळे अधोरेखित होते.)
म्हणोनि आइके देवा | हा भावार्थु आता न बोलावा |
मज विवेकु सांगावा | मर्‍हाटा जी ||

२. श्रीकृष्णांचा प्रतिवाद- कर्माची स्वाभाविकता व कर्मयोगाचा महिमा-
अर्जुनाच्या मनातल्या विकल्पवादळातून त्याला बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णांनी जो प्रतिवाद केला आहे, त्याचा 'मर्‍हाटा' अनुवाद साध्यासोप्या प्रतिमा वापरून ज्ञानेश्वरांनी अतिरसाळपणे केला आहे.
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात,'प्राप्तकर्म सोडल्याने नैष्कर्म्यता साध्य होईल असे जे तुला वाटत आहे ते चुकीचे आहे. भूक लागल्यावर स्वयंपाक करावा लागतो, पुढे तो खावाही लागतो ! तृप्ती झाल्यावर स्वयंपाकाचा पसारा आपोआपच थंडावतो. त्याप्रमाणेच ब्रह्मस्थिती प्राप्त झाल्याशिवाय कर्माचा त्याग करता येत नाही.
ना तरी तृप्ती इच्छिजे | तरी कैसेनी पाकु न कीजे |
कीं सिद्धुही न सेविजे | केवी सांगे ||
शिवाय कर्म न करणे किंवा करणे हे आपल्या इच्छेच्या आधीन आहे असे समजणे हेच मुळात सैराटपणाचे लक्षण आहे. बाह्य आयुष्यात वाट्याला आलेले कर्म टाकले,त्यागले म्हणून इंद्रियांचे संवेदनाग्रहणाचे स्वभाव सुटतील काय ? क्षुधातृषा निमेल काय ?शरीरांतर्गत प्राण अपान वायूंचे चलनवलन स्थिरावेल काय ? निद्रा,स्वप्न, जागृती,जन्म,मृत्यूचे क्रम थांबतील काय ?
सांगे श्रवणी ऐकावे ठेले | की नेत्रीचे तेज गेले |
हे नासारंध्र बुझाले | परिमळु नेघे ||
ना तरी प्राणापानगति | की निर्विकल्प झाली मति |
की क्षुधातृषादि आर्ति | खुंटलिया ||
हे *स्वप्नावबोधु ठेले | की चरण चालो विसरले |
हे असो काय निमाले | जन्ममृत्यू ||
(* स्वप्न-अवबोधु- स्वप्न व जागृती )
कर्माच्या या विराट खटाटोपात भिरभिरणार्‍या जीवाने कर्म सोडण्याचा संकल्प करणेच हास्यास्पदपणाचे आहे ! जसे रथात बसलेला स्वतः स्थिर राहिला तरी रथाच्या गतीमुळे कुठेतरी जातच असतो,पाचोळा वावटळीच्या सत्तेत सापडून आकाशात भोवंडतो तसेच हे .
देखे रथी आरुढिजे | मग निष्चळा बैठिजे|
तरी चळा होऊनि हिंडिजे | परतंत्रा ||
का उचलिले वायुवशे | चळे शुष्क पत्र जैसे |
निचेष्ट आकाशे | परिभ्रमे ||
शेवटी निष्कर्ष हाच की कधीही निष्कर्मता अवलंबू नये कारण ते संभवनीयच नाही,निषिद्ध कर्मेही आचरू नयेत .प्राप्त आणि उचित कर्मात अलिप्तपणे व्यग्र राहणे हा कर्मयोग.. मोक्षदायी.
म्हणोनि जे जे उचित | आणि *अवसरे करूनि प्राप्त |
ते कर्म हेतुरहित | आचर तू ||
देखे अनुक्रमाधारे | स्वधर्मु जो आचरे |
तो मोक्ष तेणे व्यापारे| निश्चित पावे ||
(*अवसरे- काळानुरुप )
अशाप्रकारे येथपर्यंत श्रीकृष्णांनी कर्माची स्वाभाविकता सांगितली. येथून पुढे ते कर्मयोगाचा महिमा वर्णन करतात.
कर्मयोगाचा महिमा असा आहे की प्रकृतीच्या आधीन असलेल्या जीवांनाही कर्मयोगाचा अवलंब करून प्रकृतीच्या पैलतीरावर जाता येते.स्वधर्माचरण हा एक नित्ययज्ञच आहे जो जीवाला कर्मबंधनातून सोडवतो.रोजचीच उपजीविका, ज्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो, हा एक यज्ञविधी आहे.त्यातून सिद्ध होणारे अन्न देव, गुरु, अग्निपूजन ,प्रसंगी पितर व द्विजपूजन करून शेष सहपरिवार भक्षण करणे ही सामान्य गोष्ट नाही ! ते पुण्याचरण आहे.अन्नातून भूतमात्रांचा परिपोष ,पावसातून अन्नाचा परिपोष,यज्ञातून पावसाचा संभव आणि हा यज्ञ कोणता तर कर्मयज्ञ ! ही कर्मे अविनाशी ब्रह्मातून निर्माण झाली.. असे हे 'ब्रह्मबद्ध' सृष्टीचक्र, शेवटी भूतमात्रांनी आपापली नित्यनैमित्तिक कामे निष्ठेने आचरणे या वंगणावर हे चालते. याविरुद्ध, देह म्हणजेच अस्तित्व व भोग म्हणजेच सर्वस्व असे मानणे व वागणे हे पापाचरण आहे.स्वधर्माप्रमाणे वर्तन करताना सहजच पापाचरणापासून संरक्षण होते. ब्रह्मदेवानेच सृष्टीनिर्माणकाळी ही सर्व भूते निर्माण करून त्यांच्यामागे त्यांची नित्यकर्मे लावून दिली.पण त्यांचे स्वरूप सूक्ष्म असल्याने प्रजेला त्यांचे महत्त्व उमगले नाही तेव्हा स्वयं ब्रह्मदेवानेच त्यांना सांगितले की ' तुम्ही व्रत नियम ना करा, शरीरास पीडा देऊ नका,दूर तीर्थाटनास जाऊ नका, योगादिक साधने,सहेतूक पूजाअर्चा ,मंत्रतंत्र हे सारेसारे सोडून द्या.. स्वधर्मच निष्ठेने आचरण करा जशी पतिव्रता पतीला भजते. त्यातच तुमचे परमकल्याण आहे .
अशा स्वधर्माचरणी वरवर कार्यरत पण अंतर्यामी मुक्त असणार्‍याचे चित्रण ज्ञानेश्वर करतात-
तो कामना मात्रे न घेपे | मोहमळे न लिंपे |
जैसे जळी जळे न शिंपे| पद्मपत्र ||
तैसा संसर्गामाजि असे | सकळांसारिखा दिसे |
जैसे तोयसंगे आभासे | भानुबिंब ||
दोनच अर्थवाही उपमा- पाण्यात असूनही पाण्यात न भिजणारे कमळाचे पान, पाण्यात आभासित होणारे पण आकाशात राहणारे सूर्यबिंब ..तसे जीवन्मुक्ताचे अस्तित्व.
अशाप्रकारे ज्ञानदेवांनी वरवर सूक्ष्म व क्षुल्लक वाटणार्‍या नित्यकर्मांची महती वर्णन केली आहे. ही नित्यकर्मेच प्राणिमात्रांना यज्ञस्वरूप आहेत. बाकी सर्व नेमनियम या एकनिष्ठ, अहेतुक नित्ययज्ञापुढे तुच्छ आहेत. अशा प्रकारी आचरण करणारा कर्मयोगी इंद्रियांना आज्ञा करीत नाही, प्राप्तकर्माचा अव्हेर करत नाही, कर्मेंद्रिये कर्माचरण करता असता उसळली तरी तो डळमळत नाही. पाण्यातल्या कमळपत्रासारखा, सूर्यबिंबासारखा तो वरवर 'सकळांसारिखा' पण अंतर्यामी असाधारण धारणायुक्त असतो.ही अवस्था सामान्यांना केवळ स्वधर्माचरणानेच प्राप्त होते.
देखा स्वधर्माते भजाल | तरी कामधेनू हा होईल |
मग प्रजाहो न संडिल | तुमते सदा ||

३. स्वयम भगवंताचे कर्माचरण-ज्ञानदेवांचे विवरण
प्रत्यक्ष भगवंताइतकी महत्ता कोणाची असेल? त्याला तर काही साध्य करावयाचे नाही किंवा कोणते संकटही पडलेले नाही..परंतु तोही स्वकर्माचरण अशा निष्ठेने करतोच , जणू काही एखादा साकांक्ष साभिलाष माणूस. ज्ञानदेव म्हणतात, याचा उद्देश एकच.. जे भूतमात्र परमेश्वराच्या आधीन आहेत त्यांनी भरकटू नये.परमेश्वर जरी पूर्णकाम असला तरी तो जर आत्मस्थितीतच राहिला तर त्याच्या प्रजेसमोर कोणता आदर्श राहील ?
'ते लौकिक स्थिती आघवी | नासिली होईल ||'
म्हणून ज्ञानदेवांच्या शब्दात हे श्रीकृष्णांचे वचन-
जे पुढतपुढती पार्था | हे सकळ लोकसंस्था |
रक्षणीय सर्वथा | म्हणौनिया ||
मार्गाधारे वर्तावे| विश्व हे *मोहरे लावावे |
अलौकिक नोहावे | लोकांप्रति ||
(*मोहरे- योग्य मार्गास)

म्हणजेच, या सर्व लोकसंस्थेचे , विश्वरचनेचे रक्षण व पोषण होण्याकरता सर्वांनीच कर्मरत असणे अत्यंत आवश्यक आहे. इतरांनी कर्मरत रहाण्याकरता आधी त्यांचे नेतृत्व करणार्‍याने,परमेश्वराने, कर्मरत असणे आवश्यक आहे. का? तर या सर्व लोकांची समज बेताची आहे.. लहान मुलाला पक्वान्ने काय कामाची ? ते तर मातृस्तनसुद्धा कष्टानेच घेते.म्हणून या अपरिपक्व लोकांना नैष्कर्माचे, निरिच्छतेचे महत्त्व न सांगता त्यांना सत्कर्मास प्रवृत्त करावे..'अलौकिक'- लोकरुढीहून भिन्न वागू नये.. श्रीकृष्ण हे सर्व 'लोकसंग्रहासाठी ' लोकनेत्याने अलिप्तपणे करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन करतात.कसे ? तर,
जैसी बहुरुपियाची रावो राणी | स्त्रीपुरुषभावो नाही मनी|
परी लोकसंपादणी | तैशीच करिती ||
बहुरुप्याची राजा-राणीची सोंगे- मनात स्त्रीपुरुषभाव नसताना लोकांमध्ये तसे नाटक करून दाखवतात तसे.
अशा समर्पक प्रतिमांचा वापर करत स्वयम भगवंतांची कर्मनिष्ठा ज्ञानदेव विवरून सांगतात.

४. तत्त्वज्ञानी व एकदेशी मूढ यांच्यातील भेद -
तिसर्‍या अध्यायातील सत्ताविसाव्या श्लोकात भगवंत 'अहंकारविमूढात्मा कर्ताहमिती मन्यते ' असे म्हणाले आहेत.
ज्ञानदेव म्हणतात , ''ऐसा अहंकाराधिरुढ |एकदेशी मूढ' - कसा तर शुभाशुभ कर्मे ही मायेमुळे निर्माण होतात पण एकदेशी मूढ त्यांचे कर्तृत्व स्वतःकडे घेतो. दुसर्‍याचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेणारा वाकणारच.. त्याच प्रकारचे त्याचे निरर्थक श्रम असतात. अशा मूर्खास हा गहन परमार्थ कधीही सांगूही नये. पण तत्त्वज्ञान्यांच्या ठिकाणी मात्र असा भाव नसल्याने ते देहाभिमानाची वेस ओलांडून गुणानुरूप कर्मांच्याही पलिकडे जातात व देहात शुद्ध साक्षीभावाने रहातात.जणू सूर्य जगरहाटीचे कारण असला तरी स्वयम त्यात गुंतलेला नसतो.. एकदेशी मूढांचे याविरुद्ध वर्तन असते.. प्रकृतीच्या आहारी जाऊन विषयाचरण करणे हा एकच कार्यक्रम त्यांना भावतो.
ते मोहमदिरा भ्रमले | विषयविखे *घारले |
अज्ञानपंकी बुडाले | निभ्रांत मानी ||
(* घारले- घेरले ) मोहाची मदिरा पिऊन उन्मत्त झालेल्या या मूढांना उपभोगांचे विष चढत जाते..अज्ञानाच्या चिखलात खोलखोल रुतत जाण्याचे मग भान कुठून उरणार ?
ज्ञानदेव म्हणतात,' या इंद्रियांचा संग म्हणजे वाघाची संगत किंवा सापांशी खेळणे. हलाहलाशी किंवा आगीशी कौतुकाने खेळलो म्हणून जीव गेल्याशिवाय रहाणार आहे का ?विष गोड लागले म्हणून त्याचा परिणाम प्राण हरण करण्याचाच असेल ना ?
परी ते संवचोराचा सांगातु | जैसा नावेक स्वस्थु |
जंव नगराचा प्रांतु |सांडिजेना ||
साळसूद चोर जणू आपल्याबरोबर मनात कपट ठेवून चालतोय.. नगरवस्ती सोडेपर्यंत सभ्यपणे वागेल, पण निर्जन ठिकाण आल्यावर आपला लुबाडण्याचा हेतू साध्य केल्याशिवाय रहाणार नाही.
बरे हा देहाला तोषवण्याचा खटाटोप कशासाठी ? स्वधर्म सोडून याच्या वासनांमागे धावावे,मोठ्या कष्टांनी संपत्ती मिळवावी तर हा पंचमहाभूतांचा मेळावा एका क्षणात त्याच महाभूतांमध्ये विरून जाईल.. ,
म्हणऊनि केवळ देहभरण | ते जाणे उघडी नागवण |
यालागी एथ अंतःकरण | देयावेना ||
अशाप्रकारे नाना भोगांची मूळपीठिका जे शरीर त्याचेच क्षणभंगुरत्व वर्णन करून ज्ञानेश्वर निव्वळ देहभरणाच्या आहारी जाण्यापासून मनुष्यमात्रांना परावृत्त करीत आहेत. 'स्वधर्मे निधनं श्रेय; परधर्मो भयावहः' या भगवंताच्या उक्तीपर्यंत पोचून ते भोगांमागून दिशाहीन धावणार्‍या बुद्धीला स्वधर्माच्या रस्त्यावर, प्राप्तकर्माच्या,पिंडप्रवृत्तीच्या चौकटीत राहून आत्मशोध घ्यायला विनवत आहेत.
तरी लोकांची धवळारे | देखोनिया मनोहरे |
असती आपुली तणारे | मोडावी केवी ||
दुसर्‍यांशी तुलना,अर्थहीन स्पर्धा करण्यात आपली बरीचशी बुद्धी खर्च होते, मनात खंत पोसत आपण आपल्या जीवनातलं सौंदर्य समजून न घेताच जगतो.दुसर्‍यांची चुनेगच्ची घरे आहेत म्हणून आपण आपले गवताने शाकारलेले घर मोडून टाकावे का ?आपला स्वधर्म तुच्छ मानावा का ?चंगळवादाच्या, अर्थहीन स्पर्धेच्या काळात हा शांत आत्मरत स्वर कितीएकांनी ऐकणे आवश्यक आहे..

५.काम व क्रोध यांचे ज्ञानेश्वरप्रणीत भयानक स्वरूप-
'अथ केन प्रयुक्तोयम पापं चरति पुरुषः'- जणू काही अनिच्छेने भलीभली ज्ञानी माणसेही ज्याच्या झंझावातात सापडून भ्रष्ट झालेली आपण पहातो ते पापाचरण कशामुळे घडते या अर्जुनाच्या अत्यंत मार्मिक प्रश्नावर ज्ञानदेवांचे हे महाप्रत्ययकारी विवरण .एक खास ज्ञानदेवीय रूपक. यातील 'अरिष्टकुटुंबियां 'ची अंतर्गत नातीही मनोज्ञ !
केवळ कृतांतासारखे हे काम आणि क्रोध.. यांच्याठायी करुणेचा लवलेशही नाही.ज्ञानसंपत्तीवर बसलेले हे विषारी नाग किंवा विषयांच्या दरीत हिंडणारे वाघ. भजनमार्गात आडवे येणारे हे क्रूर मांगच.. देहरूप किल्ल्यातले दुर्गम अनुल्लंघ्य धोंडे.यांचेच अज्ञानरूपी बंड जगात फोफावले आहे. हे रजोगुणापासून बनलेले.समूळ आसुरी स्वरूपाचे.यांचे दाईपण अविद्येने केले. हे जरी रजोगुणोत्पन्न, तरी तमोगुणाचेही आवडते.म्हणून तमाने आपली प्रमाद व मोह ही वैशिष्ट्ये यांना प्रदान केले. मृत्यूच्या राज्यात यांना मोठ्या मित्रत्वाचा मान. कारण हे जीवनाचे, चैतन्याचे वैरीच आहेत. यांच्या क्षुधेला विश्वाचा एक घासही पुरणार नाही..जिच्या बाळमुठीत चौदा भुवनांची खेळणी आहेत ती भ्रांती यांची लाडाची लेक. ती त्रिभुवनाची भातुकली मांडते, खेळता खेळताच खाऊन टाकते. हे असले बाळ सांभाळायला ठेवलेली दाई तृष्णा. मोह या उभयतांना फार मान देतो आणि जगाला आपल्या मर्जीवर नाचवणारा अहंकार यांच्याशी देणेघेणे करण्याचे प्रेमळ नाते ठेवतो. जगामध्ये ज्या दंभ नावाच्या खलनायकाने सत्याचा कोथळा काढून त्यात असत्याचा पेंढा भरला तो दंभ यांनीच जगात रूढ केला. साध्वी शांती भ्रष्ट केली, माया नावाची मांगीण मात्र शृंगारून निष्पाप साधुवृंदांना तपोभ्रष्ट करण्यासाठी पुढे आणली ! यांनी विवेकाचे वसतीस्थान फोडले, वैराग्याचे साल काढले, उपशमाची मान मुरगाळली,संतोषाचे सुंदर वन तोडले, आनंदाचे रोपटे उपटून टाकले, बोधाची रोपे तोडून टाकली.. या दोघांनी जगातली सुखाची भाषा नष्ट केली व जिवामध्ये तापत्रयाची आग लावून दिली !!!
हे शरीराबरोबरच घडलेले,जिवाशीच जडलेले, चैतन्याचे शेजारी, ज्ञानाच्या पंगतीत उठबस करणारे म्हणूनच इतके अनावर..
हे चैतन्याचे शेजारी | वसती ज्ञानाचां एका हारी |
म्हणोनी प्रवर्तले महामारी | सांवरती ना ||
या दीर्घ अन यथार्थ रूपकामध्ये ज्ञानदेवांनी कामक्रोधांची जिवावर चालणारी अनिर्बंध आसुरी सत्ता वर्णिली आहे.त्यांच्या चैतन्याशी असलेल्या आवळ्याजावळ्या नात्यामुळे त्यांना शरीर-मनामधून, त्यात वसणार्‍या जाणिवेतून वेगळे करणे अशक्य ठरते यातच त्यांचे सामर्थ्य सामावले आहे हे श्रोत्यांवर ठसवले आहे.
६. कामक्रोधांच्या नियंत्रणाचा मार्ग
ज्ञानदेव पुढे म्हणतात -मूलत; शुद्ध असे ज्ञान कामक्रोधांनी वेढलेले असते जणू चंदनाभोवती साप,गर्भाभोवती गर्भवेष्टन,सूर्याभोवती प्रभा, अग्नीभोवती धूर, आरशावरती धूळ.. यांचे उच्चाटन करण्यासाठी जे जे इलाज करावेत ते उलट यांनाच सहाय्यकारी होतात! यांना निर्दाळण्याचा एकच इलाज आहे आणि तो म्हणजे यांचे मूळ वसतीस्थान जी इंद्रिये, त्यांचेच निर्दालन म्हणजेच पराकोटीचा इंद्रिय-संयम.
हे अंतरीहूनि जरी फिटले | तरी निभ्रांत जाण *निवटले |
जैसे रश्मीवीण उरले | मृगजळ नाही ||
(*निवटले -मेले )
सूर्यच मावळल्यावर मृगजळ कोठून ? तसे यांचे वसतीस्थान जे अंतर्याम,तिथून यांना उठवणे म्हणजेच त्यांना मारून टाकणे.यांचा शेवट झाल्यावर मागे उरते ते निखळ आत्मसुख.

अशा प्रकारे तिसर्‍या अध्यायात सोप्या सोप्या प्रतिमा-रूपकांच्या वापरातून ज्ञानदेवांनी प्राप्तकर्म,नैष्कर्म्य,निषिद्ध कर्म, स्वधर्म अशा गहन संकल्पना, स्वधर्माचरण,पापाचरण यांचा खरा अर्थ, त्या पापाचरणास प्रवृत्त करणार्‍या कामक्रोधांचे चराचरावर चालणारे अप्रतिहत साम्राज्य व त्यातून सुटण्याचा मार्ग या सर्व विषयांचा उहापोह त्यांना सर्वसामान्यांच्या आकलनकक्षेत आणण्यासाठी केला आहे. '' दूधपित्या बाळास पक्वान्ने काय कामाची '' असे याच अध्यायात एके ठिकाणी म्हणणारा हा बालयोगी लक्षावधी सामान्यांना ''माऊली'' का वाटतो याचे उत्तर या तत्त्वकाव्याच्या एकेक अध्यायाच्या वाचनमननातून उलगडत जाते ..

भारती बिर्जे डिग्गीकर

Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –